ताळमेळ

मी आवरले अन् मंदिरात जाण्यासाठी घरातून बाहेर पडणार तेवढ्यात स्वयंपाकघरातील संवाद कानावर पडला. अन् आपोआपच माझी पावलं मंदिराकडे जाण्याऐवजी स्वयंपाक घराकडे वळली. शेवटी आपल्या घरातल्या प्रश्नांना आपण नाही तर कोण उत्तर शोधणार? शेवटी घर म्हणजे तरी काय? चार भिंतींना प्रेमाने सांधणं अन् जिव्हाळ्यानं एकमेकांना सावरणं, आजपर्यंत घराचं मांगल्य, निर्मलता, पावित्र्य होतंच ते सानिकाने चुढे तसचं टिकवणं महत्त्वाचं. दोन् पिढ्यामधलं अंतर बरंच काही विचार करायला लावणारे असले तरीही त्यातली दरी न वाढू देणं हे घरातल्या व्यक्तिंवरच अवलंबून असते. मग यासाठी गुण, तत्वं आणि कधी कधी मूल्यांची तडजोड करणे योग्य आहे का? याचा विचार माझ्या मनात घोंगावत होता.

सानिका ऑफिसला जाण्यासाठी साडेनऊला निघते. आज माञ तिची धावपळ जरा जास्तच चालली होती. आम्ही आमच्या घरून यांच्या घरी रहायला येवूनही एक महिना झाला. खरंतर आमचं आणि यांचे असं वेगळं काही नव्हतंच. शेवटी मुलगा आणि सून याच्याशिवाय आम्हालाही कोणीच नव्हतं. पण सोलापूरला आम्ही दोघं सेवानिवृत्ती नंतरचं आयुष्य जगत होतो. काही कारणास्तव नरेंद्र अन् सानिका कडे पुण्याला आलो. सर्व सुखसोई होत्या, कामाला बायका होत्या. काम म्हणून असे काहीच नव्हते. इकडची काडी तिकडे करायची नव्हती पण सेवानिवृत्ती नंतर रिकामा वेळच नको वाटतो. कामाच्या धावपळीत वेळही धावत होता. पण आता मात्र वेळ जाता जात नव्हता. पाहून पाहून टि. व्हि. तर किती पहाणार, एकमेकांशी किती बोलणार, या दोघांच्या ऑफिसमुळे बाहेर जावे तर मग बाळाला कोण पाहणार विचार करत असतानाच मी ठरवून टाकलं. आपण आपल्याला शक्य तेवढे काम स्वतः करायचे किंवा तिला म्हणजेच सुनबाईंना कामात मदत करायची.

आमचा सोलापूरचा दिनक्रम थोडा फार नव्हे तर संपूर्णच बदलला, सोलापूरात वेळच वेळ असल्याने विविध कार्यक्रमांना आम्ही हजर राहत असू. पुण्याला आल्यापासून काही शक्य झाले नाही. एकतर शहर नवखं. इथली धावपळ अन् कामामुळे व्यस्तता पाहून आम्ही दोघंच कुठे जाणार म्हणून आम्ही आपलं घरातल्या घरातच फिरत होतो. खरंतर पुण्यामध्ये फिरायला खूप ठिकाणं पण नरेंद्र- सानिका शिवाय फिरणं जरा अशक्यच वाटत होतं.

त्यांचं सोमवार ते शुक्रवारचं कामाचं वेळापत्रक ठरलेलं. शनिवार रविवारी सुट्टी असे. दर शनिवार रविवार ते आम्ही नसताना सहलीला जात. या सहलीत ते पूर्णपणे निवांतपणा अन् आनंद लुटण्यासाठी जात. मी एकवेळ शांतपणे विचार केला तर मला मी सून असतानाचा कालावधी आठवला. महिन्या-दोन महिन्याने पाहुण्या- राऊळ्यात काही कार्यक्रम निघाला तरच घराच्या बाहेर पडायला मिळायचे. काही सणावारांच्या निमित्ताने निसर्गसानिध्य मिळे.

सणावाराला विशिष्ट प्रकारचे पदार्थ केले जात. सध्या मात्र ‘राजाला दिवाळीचं काय नवल’ अशी अवस्था या नविन पिढीची. सुखं सगळी मुठीत, जगही मुठीत पण माणसांमधले अंतर मात्र वाढतंय. आम्ही आल्यापासून आमच्या शनिवारी सामान खरेदीला ती दोघं पालवीला आमच्याकडे सोडून जात. रविवारी सगळे मिळून नाटक, सिनेमा, मंदिर किंवा मग जवळच्या एखादया ठिकाणास भेट देण्यासाठी एक दिवसीय सहलीचं आयोजन होई.

आतापर्यंत चार ठिकाणं बघून झाली. दर शुक्रवारी ठिकाणं ठरत होती. आठवड्यापुर्वी तयारी करावी लागे. शनिवार अन् रविवार भुर्रकन जाई. पुन्हा सोमवार पासून शुक्रवारपर्यंत यांची घाई अन् आमची कामं ठरलेलीच. आम्ही दोघं तर लहान मुलांसारखं शनिवार-रविवारची वाट पहात बसू. गंमत वाटे खरंच. मुलं लहान असताना आठवड्याचे दिवस कसे जात ते कळत नसत. रविवारी घरातलं हवं नको पाहून आपल्याला जमेल तसे मुलांचे हट्ट पुरवत असू. शेवटी सगळं करायचं ते त्यांच्यासाठीच ना? आज नरेंद्र-सानिकाचा संवाद ऐकला अन् मनात विचारांचं काहूर माजले. सानिका बाळासाठी नोकरी सोडणार होती. पालवीच्या पाठीवर त्यांनी बाळाचा निर्णय घेतला होता.

आज दवाखान्यात जाण्यासाठी धावपळ, गडबड सुरू होती. पालवीला खेळायला सोबती येणार होता. आता सानिका बहुतेक नोकरी सोडेल तिने काही काळासाठी सोडली तरी मी तिला सांगून बघणार आहे. शेवटी निर्णय तिचा. आजपासून माझी जबाबदारी वाढली होती. शक्य तेवढी मी तिला मदत करणार होतेच, सोबत तिला तिची काळजी घ्यायलाही सांगणार होते. पालवीच्या वेळी ती माहेरी गेली होती. आता मात्र मी तिची अन् येणाऱ्या बाळाची काळजी घेणार होते. येणारं बाळ हे साऱ्यांना हवंसं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालवीला हककाचा साथीदार येणार होता. खेळण्यासाठी अन् भांडण्यासाठीही. एकाला दोघं असली म्हणजे चांगले असा साऱ्यांचाच विचार होता. फक्त सानिकाची नोकरी अन् घरातल्या वाढत्या जबाबदाऱ्यांचा ताळमेळ बसणं महत्वाचं.

शेवटी आम्ही सारे तिच्या मदतीसाठी होतोच, हे सारं तिला सांगण्यासाठी मी स्वयंपाकघरात गेले. तीने मला वाकून नमस्कार केला. मला तिची आता काळजी घ्यायची होती. आता मात्र मी पटकन मंदिरात जाण्यासाठी निघाले. माझ्या पालवीची प्रार्थना देवाने ऐकली होती, तिला खेळायला सोबती यावा असं तिने गेल्यावेळेस माझ्याबरोबर मंदिरात आल्यावर मागणं मागितले होते. अन काय योगायोग बाप्पाने प्रार्थना ऐकली. आजकालच्या या सिमेंटच्या जंगलात माणूस हरवत चाललाय. या धावपळीच्या युगात माणसाला माणसाशी बोलायला वेळ मिळत नाही. पण माझ्या पालवीला आता काही दिवसांनी सवंगडी मिळणार आहे. चला मी जरा मंदिरात जावून येते. आम्हा सर्वांसाठी आरोग्य, शांती, सद्बुद्धी मागणार आहे. तुमच्यासाठी काय मागू....

4 thoughts on “ताळमेळ

  1. अगदी वास्तव कथा रंगवली आहे . पुण्यामध्ये असे जोडपी आमच्या संघातच आहेत . तसेच या उलटही काहींच्या तक्रारी असतात . असो .
    कथेचा ओघ अतिशय सुंदर ठेवला आहे . पुढील प्रवासास शुभेच्छा .

    1. धन्यवाद सर आपल्या प्रेरक प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!