
मी या प्रेमाने आणि आपुलकीने तयार झालेल्या घरात आजतागायत म्हणजे वयाची सत्तावीस वर्षे पूर्ण होईपर्यंत राहिले. तशी मी सतरा- अठरा वयाची होईपर्यंतच राहिले. पुढील शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडले. अजाण वयात मला बाहेर पडताना वाईट वाटत होते. अगदी आईच्या गळ्यात वगैरे पडून रडले नसले तरी एकांतात तरी दोन अश्रू गाळले. समोर स्वप्नांमध्ये पाहिलेली दुनिया खुणावत होती. त्या ठिकाणी जावून मी माझ्या जीवनातले महत्वाचे क्षण अनुभवणार होते. माझे व्यक्तिमत्व घडवणार होते. व्यावसायिक शिक्षण होणं आणि त्यानंतर नोकरी मिळवणे हे दिव्य मी पार पाडण्यासाठी जाणार असल्याने मनात प्रचंड उत्साह, उत्सुकता आणि नाविन्यता होती. त्यामुळे माझी अवस्था एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हासू अशी होती. पहिले काही महिने मी घरी येवून जाताना माझे डोळे भरून येत. पण नंतर, नंतर मन बोथट झालं असावं, आई-बाबा, दादा मात्र भरल्या मनानं, डोळ्यातील पाणी लपवत निरोप देत असत.
मला आज मात्र लग्न होवून या घरातून निरोप घेताना हळूहळू माझ्या हातून काहीतरी निसटतंय याची जाणीव होवू लागली आणि गलबलून, भडभडून येवू लागले. मी परकी झाली होते या घरासाठी आणि सर्वांसाठीच. मी माझ्या मनाच्या खोलवरच्या कप्प्यात या घराच्या, घरातल्या व्यक्तिंच्या आठवणी मनात साठवत होते. घराच्या कोपऱ्या-कोपऱ्यात माझ्या बालपणापासूनच्या स्मृती भरगच्च प्रमाणात होत्या. अन् एखादा चलत-चित्रपट डोळ्यासमोरून सरकावा तसं काहीसं होत होतं. माझं पहिलं पाऊल, माझा पहिला शब्द, माझं पहिलं भांडणं, माझे कोपऱ्यात बसून रुसणे. या साऱ्यांचं शूटिंग आई-बाबांनी करून ठेवल्याने मी ते आनंदक्षण अनुभवू शकत होते. आज मी जरी ताडमाड अन् शिडशिडीत होते तरी लहानपणी गोंडस रूपडे लोभसवाणं दिसत होते, तसे मला सर्वजण गब्दुली म्हणून हाक मारायचे आणि मीही चेकाळत हुंकार द्यायचे. वाढतं वय आणि तारुण्याची ओढ ही साहजिकच असते. तसंच झालं अन् शिक्षणाच्या एक एक पायऱ्या चढत बारावी झाली अन् मग घरापासून दूर शिक्षणासाठी रहाण्याचा निर्णय झाला. त्यावेळेसही मला पाठवायला बाबा तयार नव्हते पण शेवटी आईनेच समजूत घालत आपण तिच्या प्रगतीचे, पंख छाटणं चुकीचं आहे हे समजावले. दूर पाठवायला तयार नव्हते त्यावेळेस ही ती आज नाही उद्या लग्न करून जाणारच आहे ना, मग निर्णय योग्य वेळीच घेणे तिच्या व्यावसायिक शिक्षणासाठी महत्वाचं. हे आईने समजून सांगितल्यानेच, मी गावातल्या गावात न शिकता महानगरात राहू शकले. शिकत असताना घरी जाणं तसे कमीच होत होत. पण तरीही दर रविवारी मी घरी व्हिडिओकॉल करून तिघांनाही बोलत असे. त्यावेळेसही,
‘आम्हाला तुझ्याशिवाय करमत नाही. अन् नवीन काही करू वाटत नाही आणि केलंच तर घशाखाली उतरत ननाही’
या आईच्या वाक्यावर मला भरून येत असे. पण मी कशीबशी का होईना त्यांची समजूत काढण्यात पटाईत झाले होते.
आज मात्र मला माझ्या भावी आयुष्यातील जोडीदाराबरोबर जात असताना एक हात माहेरच्यांच्या हातात अन् एक हात सासरच्यांच्या हातात असल्याचे जाणवत होते. मात्र मला दोन्ही हातातले हात न सोडता तसेच राहू द्यावे वाटत होते. तरीही जगाच्या रीतीपुढे, मानसिकतेपुढे ते चालणार नव्हते. मी माझ्या मनाची मानसिकता केली तरी माझ्या मनाची भूमिका निश्चित होत नव्हती. कारण माझ्या आयुष्याच्या स्वप्नांना पूर्णत्व देणारा माझा जोडीदार मला आश्वासकपणे नेणार होता. जग-रीत, परंपरा या मी पाळणार होते. स्त्री सक्षम, विचारांची पक्की, बदल स्विकारणारी आणि आपल्याप्रमाणे परिस्थिती बदलवू शकणारी, वेळप्रसंगी प्रसंगावर यांचे स्वतः बदलणारी असतेच. म्हणून कदाचित देवाने म्हणा किंवा परंपरेने मुलगी सासरी जाते. सासरच्या सर्व नात्यांना मनापासून स्विकारून आपलंस करणं, आपलंच मानणं हे तिलाच तर जमते. माझ्या आजी, आई, काकू, आत्या, ताई, सासूबाई, ननंदबाई, जावूबाई यांनी हेच तर केले आणि आता मीही करणार होते. सोपं जरी नसले तरी अशक्य असे काहीच नव्हते
मी त्या घरातलं सुख-दुःख, मान-सन्मान, रीती-रिवाज, माणसे यांचा स्विकार मनापासून केला आहे. त्यामुळे ते घर माझं स्वतःचं आहे. म्हणूनच मी आज माहेरची पाहुणी आहे. माझ्या आई बाबांनी संस्कारांच पाणी घालून वाढवलेलं हे रोपटे सासरच्या अंगणात विस्तारणार होते. तिथे बहरणार होते. आपल्या मायेची शीतलता सर्वांना देणार होते आणि त्यांचा विश्वास आणि प्रेम मिळवणार होते. सर्वांसोबत आणि सर्वासह आनंद, समाधान सुख मिळवणार होते. हे मात्र अगदी १०१ % खरं होतं, यात काही वादच नाही. सासर-माहेर या दोघांमध्ये अंतर न पडू देता. दोन्हीकडील नाती आपलीशी करत माझं व्यक्तिमत्व आयुष्य बहरणारच. दोन्ही कडची नाती डावी-उजवी न मानता समानतेने मानत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असे वचन मी बाबांना दिलं होतंच. आई-बाबा आणि दादाला विश्वास होता. सोबत माझ्या अहोंना आणि त्यांच्या आई-बाबांनाही विश्वास वाटत होता. तो मी सार्थ करणार होतेच.