नाणं आपलंच

नाणं आपलंच
सरिता माझ्यावर जोरात व्हसकली.
‘आई अहो, टेबलक्लॉथ गहाण झाला ना! नीट जेवता येत नाही का?’
दीपक पुढेच बसला होता पण शब्दही बोलला नाही. मला खरंतर खूप वाईट वाटले होते पण तरीही,
‘बरं बाळा पुन्हा नाही सांडणार.’
या माझ्या वाक्यावर सरिता पुन्हा चिडली.
‘बाळा नका म्हणू मला. तुम्हीच बाळासारखे वागता.’
निश्चल शांतपणे बसून विचार करत होता.
कारण आपले आई-बाबा आपल्या आजीवर का बरं ओरडतात. हे त्याच्या लक्षात येत नसावं. कारण थोड्या वेळापूर्वी निश्चल कडून टेबलवर वरण सांडले होते पण त्याची आई त्याला काहीच बोलली नाही. तो काहीतरी बोलणार एवढ्यात सुनबाई म्हणाल्या,
‘अरे बाळा, तू अजून लहान आहेस. त्यांना काय झालं सांडायला. आता केस सगळे पांढरे झाले की.’
सर्वांच्या नकळत मी डोळे पुसलेले निश्चलने पाहिले. त्याला खरंतर आईने मला म्हणजेच त्याच्या आजीला बोललेलं त्याला आवडलं नाही. कारण मी त्याची खूप माया करायचे. त्याला आपल्या आजीचा स्वभाव गरीब आहे हे माहीत होतं. त्याने इकडे तिकडे पाहून हळूच डोळ्याने खुणावले आणि तो म्हणाला,
‘सावित्री आजी रडू नकोस.’
तो तरी काय करू शकत होता म्हणा.

एका जीवाला जन्म देणे हे काय असतं हे मी स्त्री असून स्त्रियांना सांगणं चुकीचंच. कारण जेव्हा मला दीपक होणार होता त्यावेळेस त्याचे डोहाळे कडक. त्यामुळे मला पहिले तीन महिने काहीही पचत नव्हते. अगदी फोडणीचा वास आला तरी उचमळे. पण माझ्या सासूबाई भलत्या कडक. त्यांनी लगेच मला चार वाक्य सुनावलीच.
‘आम्हालाही झाली बरं लेकरं बाळ पण असला नाजूकपणा नव्हता बाई. कुठे लेकरं राहिली आणि कुठे झाली ही घरात कुणाला कळलं देखील नाही. नाहीतर या आजकालच्या नाजूक पोरी.’
तसं तर मला माझी आई देखील सांगायची, ‘सावित्री, बाईच्या जातीने मिळते ते खावं आणि पडेल ते काम करावे आणि धरणी मातेच्या कुशीत निवांत पडावं. सगळं मान्यच होतं मला. पण मी तरी काय करणार. उगाच बोलणं ऐकायला नको म्हणून मी तोंडाला पदर बांधून स्वयंपाक करायची. एवढ्या मोठ्या भरल्या घरात कोणी मदत करायला आलं तर उलट त्याच्यावर सासुबाई ओरडत. जणू त्या लेडीज हिटलरच होत्या. घरात एखाद्याची चूक दिसली तर मग चूक असणाऱ्याची बिना पाण्याची चंपी होत असे. माझं तर वयाच्या पंधराव्या वर्षी लग्न झालं. त्यावेळेस काही नियम आणि कायदे कडक नव्हते लग्नाच्या वयाबाबत. त्यामुळे लहान वयात हे लग्न झालं. लेडी हिटलरच्या हाताखाली राहून माझा स्वभाव आकसला गेला होता. यांना काही सांगायची माझी हिम्मत झाली नाही आणि यांनाही कुठून कळलं तरी बोलायची हिंमत यांची झाली नाही.
पाहता पाहता दिवस जात होते. दीपकचा जन्म झाला. ही गोष्ट माझ्या दृष्टीने बरीच म्हणायची. कारण मुलगी झाली असती तर पुन्हा ही… बाळासाठी चे सर्व नियम वेगळेच. आम्ही आपले नियमानुसार कार्य करणारे कार्यकर्ते. दीपक मोठा झाला. चांगला दोन वर्षाचा झाला असेल लगेच त्यांची विचारणा सुरू. दिपकला भाऊ कधी होणार. यावर मी चुकून बोलले, बहीण झाली तर.
‘बोला, बोललात. शुभ बोलणे आपल्याला जमलेच नाही.’
यावर शेवटी सासरेच मध्ये बोलले.
‘सरकार, आपल्यासारखी तडफदार एखादी नात झाली म्हणजे झालं.’
या वाक्यावर मात्र त्या गालातल्या गालात हसल्या मात्र घरात तेही कुणाला दिसू न देता. नंतरही त्यांचे सारे नियम मी नकळत पाळत होते. सासूबाई स्वर्गवासी झाल्या. त्यांनी दिलेली शिकवण मला बरंच जगाचं ज्ञान देवून गेली. होता जरा त्यांचा स्वभाव कडक. काय करायचं, स्वभावाला औषध नसतं.
पाहता पाहता दिवस बदलले. दीपकचेही लग्न झाले. आपल्या सासूबाईंनी आपल्याला पाजलेले उपदेशाचे कडू डोस आपण सुनेला पाजायचे नाही. असे ठरवून पहिल्या दिवसापासूनच तिला लेकीप्रमाणेच वागवले. घरातल्या रिती-परंपरा, सण, उत्सव, नाती-गोती सारं समजावून सांगितलं. तिला स्वयंपाक घरातील छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या. कारण शिकण्यासाठी ती घराबाहेर राहिली होती. पाहता पाहता मी तिला घराच्या म्हणजे सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. चाव्या तिच्या ताब्यात दिल्या. निश्चल झाल्यापासून तर मला जणू यांनीच पुन्हा जन्म घेतला असं वाटत होतं. मी सहज म्हणलं,
‘यांनी पुन्हा जन्म घेतला आहे असं वाटतंय.’
तर सुनबाईंनी काय गोंधळ घातला. काहीही बोलता का? परंपरांच्या जोखडात अडकवण्याचे तुमचे प्रयत्न मी यशस्वी होऊ देणार नाही आणि बरंच काही. शांत झाल्यावर मी तिला समजून सांगायला गेले पण पुन्हा तेच. दीपकही तिला समजून सांगण्याऐवजी मला काय चुकलं ते सांगत होता. मला त्याचा राग आला होता. मी बोलणार होते पण एवढ्यात मला शेजारच्या विनाबाईंचं बोलणं आठवलं.
‘लग्न झालं की संपलं सारं म्हणायचं आपलं राज्य. आपल्या लेक आपला म्हणायचं नाही. या पृथ्वीवर त्याच्या बायकोसाठी त्यांने जन्म घेतलेला असतो. काही गोंधळ घातला तर आपल्याच लेकराची अवस्था अडकित्त्यातल्या सुपारी सारखी होईल.’
बसल्या बसल्या मागचे सारे दिवस आठवले. नऊ महिने दीपक पोटात असताना झालेला त्रास. लहानपणीचा खोडकरपणा, रात्र रात्र आजारी असताना झालेली जागरण, शेजारीपाजारी केलेल्या खोड्यांमुळे होणारी भांडणं, आई म्हणून घातलेली मायेची पांघरूणं. एकदा तर सायकल खेळायला मोठ्या रस्त्यावर गेला आणि रस्त्याच्या शेजारच्या झाडावर धडकून बेशुद्ध पडला. त्या दोन तासात माझ्या मनाने नाही नाही तो विचार केला आणि सगळ्या देवांना साकडं घातलं. देव पाण्यात ठेवले काय. उपवास करते लवकर बरं कर म्हणून मागणं मागितलं. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा जीवात जीव आला. आज मात्र तो गप्प बसतोय. पांगच फेडतोय म्हणायचं. शेवटी काय आपलंच नाणं…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!