अघटीत

                                    अघटीत
                               हिरव्यागार वनराईत मस्त पक्ष्यांचा किलबिलाट, सोबत आदित्य होताच. निसर्गाचं सौंदर्य नजरेतून सहज टिपावं असं मन मोहून टाकणारं. आकाशात सूर्य उगवण्यापूर्वी तांबडं फुटलेलं, पक्ष्यांच्या रांगा एका मागोमाग एक छान उडत होत्या. ती आदित्यला हे सारं पुन्हा पुन्हा दाखवत होती. बघ ना! गवताच्या पात्यांवर तो दवबिंदू. एखादा  मोती दिसावा तसा दिसतोय. अन् त्यावर सूर्यकिरण  पडून जणू हिराच चमकतोय असं वाटतंय. पक्षी झाडांवर किती हालचाल करताहेत. त्या घरट्यातून ते चिमणीचं पिलू चोच आ वासतंय. शेजारच्या घरट्यात चिमणी चिवचिव करतेय. आकाशात सुंदर पोपट उडत चाललेत. त्यांचा पोपटी रंग, गळ्याचा काळा पट्टा अन् लाल चोच पाहिली की, मला हेवाच वाटतो. मी कितीवेळा अशा पोपटी रंगाचा ड्रेस घ्यायचा म्हणते. पण मिळतच नाही. यावेळेस माझ्या वाढदिवसाला तू घ्यायचा म्हणजे घ्यायचा.
‘संयुक्ता, संयुक्ता   अगं उठ. बघ साडेपाच वाजून गेले. तुला शाळेला जायला उशीर होतो पुन्हा.’
‘ अं, बापरे लवकर उठवायचंस ना. मला उशीर झाला की, मग काही सुचत नाही.’
तिला आता भलतेच टेन्शन आले होते. घरात सासरे, दोन मुले अन् आदित्य. एकूण पाच माणसं. तिला या सर्वांसाठी नाश्ता, चहा करणं महत्त्वाचं होतं. घर, अंगण स्वच्छ करून सडा-रांगोळी व आपला प्रातर्विधी, आंघोळ उरकून ती पळतच स्वयंपाकघरात
आली. साडेसहा वाजत आले होते. आज नाश्त्याच्या नादी लागण्यापेक्षा स्वयंपाकच करावा, असे तिला काल रात्री वाटले होते. म्हणून तिने रात्रीच भेंडी धुवून चिरून ठेवली होती. आज त्यांच्या शाळेत कार्यक्रम होता. ती सांस्कृतिक प्रमुख. त्यामुळे
कार्यक्रमाची सर्व जबाबदारी तिच्यावरच. कधी कधी ती विचार करे. आपण शिस्तबद्ध व कामात चपळ असण्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होतो. कारण घरातही सगळी कामं आपणच पळून पळून करतो. आदित्य मात्र निवांत असतो.  त्याचेच काम त्याला उरकत नाही. सगळ्यांचं जिथल्या तिथं करून स्वतःचा वाचनाचा छंद जोपासून शाळेची जबाबदारी योग्यरीतीने निभावणे सोपे नाही. मात्र आदित्य फक्त  या सर्वात बघ्याची भूमिका घेत असे. खूप  स्त्री समानतेचं महत्त्व सांगितलं. कामाच्या ताणामुळे प्रकृती अस्वास्थ्याची तक्रार केली, तर मग कसातरी उपकाराच्या नजरेतून  चहा मिळे. नाहीतर तुम्हा स्त्रियांना वाटतं पुरुषांना काही काम नसतं. पण घरची
आर्थिक जबाबदारी, तुझी-मुलांची, बाबांची काळजी अन् नोकरी, एक का दोन सर्वच कामं महत्त्वाची.’ हे त्याचं वाक्य तिला पाठ झालं होतं. आर्थिक कमाईमध्ये तर तीही हातभार लावत होतीच की  आणि बाकी आर्थिक व्यवहाराचं म्हटलं तर तोच तिला काहीही कळू देत नसे. मी बघतो सगळे आर्थिक व्यवहार. तू कशाला ताण घेतेस? तू फक्त तुझे काम, शाळा, प्रकृती अन् छंद जोपासत जा. माझ्या डोक्यावरच्या  केसांची स्थिती पहाता तुझ्या लक्षात येत असेल ना ! किती त्रास असतो पुरुषांना?  तू व्यवस्थित रहा. बाकी पहातो माझे मी. एवढ्या उपकारात्मक वाक्याची रांग ऐकून
संयुक्ताला कधी कधी हसू येई. काय पण स्वारी आव आणते काम करण्याचा. पण  जाऊ दे म्हणून ती सारे सोडून देऊन नव्या जोमाने कामाला लागत असे. पहाता  पहाता लग्नाला अठरा वर्षे झाली. सासूबाई गेल्यापासून तिच्यावर जबाबदाऱ्या वाढल्या
होत्या. पाहुणे-रावळे, सण-वार, घरातल्या सर्वांचं खाणं-पिणं, आजारपण, घरातली अन् शाळेतली वाढती कामं. पण हे सारं तिला आता अंगवळणी पडलं होतं. हा सारा विचार करत करतच ती आवरत होती. भाजी अन् कामापुरत्या पोळ्या झाल्या की, तिने  उरलेली कणीक फ्रीजमध्ये ठेवली. पटापट सर्व झाकून ठेवणं तिला भाग होतं. नवरा, मुलं काय, अन् सासरे काय कोणीच काही करू लागत नसल्याने, घरात हात हलता  राहिला तर ठीक नाहीतर… नाहीतर एके दिवशी गंमत झाली. पोळ्या-भाजी करून
तिने डबा भरून घेतला. अन् घाईघाईतच पोळ्या झाकायची विसरली. ती गेल्यावर  स्वयंपाकघरात कुणाचे काही काम निघाले नाही, म्हणून कोणी तिकडे फिरकलेच  नाही. शेवटी नऊ साडेनऊला सासरे नाश्त्यासाठी गेले. त्यांना भाजी तर सापडली
पण पोळ्या काही सापडेनात. टोपल्यातल्या पोळ्या अर्धवट वाळलेल्या होत्या. त्या धड ताज्या आहेत की, शिळ्या ते कळतच नव्हते. शेवटी त्यांनी तिला शाळेत फोन केला. ताज्या पोळ्या कुठे ठेवल्या म्हणून विचारले. तिने सांगितल्यानुसार रात्री नुसता
भात केला होता. पोळ्या शिल्लक नव्हत्या. डब्यात ज्या पोळ्या आहेत त्या ताज्याच आहेत. पण पोळ्या डब्यात नसून टोपल्यातच होत्या. हे सासऱ्यांनी सांगितल्यावर ती  एकदम ओरडली,
‘बापरे, बाबा मी पोळ्या डब्यात ठेवायचे विसरले. वाळल्या का हो?  तुम्हाला चावणार नाहीत. मिक्सरला बारीक करून घेता का?’ पण सासऱ्यांना मिक्सर लावता येत नसल्याने ती शाळेतून जाईपर्यंत ते उपाशीच  रहाणार होते. कारण त्यांना बाहेरचे काही पचतही नसे. तिला त्या दिवशी खूप वाईट वाटले. खरंच सकाळी पंधरा मिनिटे लवकर उठले तर बरं. कारण पंधरा मिनिटाच्या
झोपेच्या मोहापायी केवढी ओढाताण अन् मानसिक त्रास सहन करावा लागतो.  म्हणून ती तेव्हापासून चार साडेचारलाच उठे.
                             आज मात्र तिला स्वप्न पडल्यामुळं गजर होऊनही जाग आली नाही. स्वप्नातच  काहीतरी आवाज येतोय असं वाटलं. आता मात्र ती घड्याळाच्या काट्याच्याही पुढे पळत होती. आज कार्यक्रम म्हणून तिनं तिच्या आवडत्या रंगाची म्हणजेच हिरव्या रंगाची बारीक काठाची साडी नेसली. वेणीचा छान शेपटा बांधला. गुच्छेदार गोंडा खाली छान दिसत होता. भांगात कुंकू लावले. डोळ्यात हलकंसं काजळ लावलं, ओठांवर
हलकीसी लिपस्टिक अन् हलकासा मंद तरल वासाचा स्प्रे मारला. सर्व आटोपले अन् आरशात पाहता पाहता तिला उगाचंच स्वतःचंच रूप पाहून आपलीच नजर आपल्याला लागते का? असं वाटलं. अन् सौंदर्यवती ती, गालातल्या गालात हळूच लाजली. आदित्य तिच्या गाडीचा हॉर्न वाजवू लागला तसं त्या आवाजाने दचकून ती  भानावर आली. सातला पाच कमी. बापरे, तिला आता काहीच सुचेना. तिने पटकन् शाळेची बॅग उचलली. अन् धावतच गाडीपर्यंत पोहोचली. तरी नशीब आज कधी नव्हे ते तिची घाई पाहून आदित्यने गाडी बाहेर काढून ठेवली होती. पटकन् बँग अडकवली, स्कार्फ अन् गॉगल कसातरी घातला अन् ती निघाली. तेवढ्यात सासरे ओरडलेच,
‘बेटा हळू. सावकाश जा. कितीवेळा सांगितलं पंधरा मिनिटं लवकर निघत जा.’ तिने तेवढ्या घाईत
‘हो बाबा.’
म्हणत गाडी तशीच पुढे पळवली. झालं, ती  गेली अन् आदित्यने मुलांची आवराआवर करण्यासाठी त्यांना उठवलं. आठ वाजता  शाळा म्हणजे साडेसातला व्हॅन येणार. त्यापूर्वी मुलांची आवारावर होणं महत्वाचं  होतं. बाबांनी चहा घेतला अन् ते बागेत जाऊन उन्हात पेपर वाचत बसायचं म्हणून खुर्ची घेऊन गेले. आदित्यला कॉलेजची ड्यूटी आज दुपारी होती. सिनिअर कॉलेजचे पेपर सुरू झाल्याने पेपरसाठी परीक्षक म्हणून जावे लागे. तोही मुलांना आवरायला पाठवून पेपर घेऊन बसला. मुलं कशीबशी घाईघाईत आवरून तयार झाली. आदित्य त्या दोघांना व्हॅनपर्यंत सोडवायला गेला. मुलांना सोडवून आल्यावर
‘बाबा मी जरा पडतो.’  
म्हणून आत जाऊन गादीवर आडवा झाला. त्याच्या डोक्यात तिचं बडबडणं आलं. मला ड्रेस हवा असंच काहीसं ती बडबडत होती. खरंच तिचा वाढदिवस पंधरा दिवसांवर आला. नेहमी ती मागते अन् मग आपण तिच्या वाढदिवसाला काहीतरी घेतो. यावेळेस मात्र आपण सरप्राईज द्यायचं, असा विचार करत करत त्याचा डोळा  लागला. रात्री पेपर तपासत बराचवेळ जागल्याने पहाटे संयुक्ताने लावलेल्या गजरने,  तो जागा झाल्याने त्याला पूर्ण विश्रांती मिळाली नव्हती. पडल्या पडल्या कधी झोप लागली हे त्याला कळलेच नाही.
‘आदी, आदी उठ बेटा. बघ बाहेर कोण आलंय?’
बाबांच्या हाका मारण्याने तो जागा झाला. बाबा मोठं काहीतरी झाल्यासारखं ओरडत होते. ही त्यांची नेहमीचीच सवय. आदित्यने कंटाळल्याने अंथरूणातूनच विचारले,
‘कोण आहे? पेपर बिल असेल तर उद्या या.’
त्याने पुन्हा डोळे झाकले. बाबा जणू धावतच आत आले.
‘आदी, आदी.’
‘काय हो बाबा? जरा विश्रांती घ्यावी म्हटलं तर?’
‘अरे शाळेचा शिपाई आला अन् संयुक्ताचा अपघात…’
त्याला काही कळेना. असा कसा झाला अपघात ? कुठे
अन् कसा? तो गादीवरून धड उठूही शकेना. ऐकून जणू त्याच्या पायातलं अवसान गेल्यासारखंच झालं. तो कसाबसा खोलीच्या बाहेर आला. शिपाईही चांगलाच घामाघूम झाला होता.
‘सर सर चला लवकर. त्यांना दवाखान्यात दाखल करायला नेलंय.’
‘ अरे पण कसा झाला अपघात? खूप लागलंय का?’
‘ चला मी सगळं सांगतो. आधी तुम्ही माझ्याबरोबर चला.’
‘ बाबा मी जाऊन येतो, तुम्ही थांबा.’
या त्याच्या वाक्यावर बाबा उसळलेच.
‘अरे मी पण येणार. तिला किती  लागलं? काय झालंय मलाही पहायचंय.’
असं म्हणून तेही तयार होऊन निघाले. गाड़ी घेऊन शिपाई पुढे अन् हे दोघे आदित्यच्या गाडीवर मागे. आपण कुठे चाललोय
या प्रश्नावर आदित्य बाबांवरच चिडला.
‘कुठे जाणार? दवाखान्यात.’
‘तसं नव्हे कोणत्या दवाखान्यात?’
‘ सरकारी हॉस्पिटलला. अपघाताच्या केसेस  तिथेच असतात.’
‘आपण तिला खासगी दवाखान्यात दाखल करूया आदी. मला तर योग्य निर्णय  पटकन् घ्यावा असे वाटते.’
‘बाबा आपण तिला पाहून मग निर्णय घेऊ. खूप लागलं नसेल तर तिथंच बरी  होईल ती.’
दोघांच्या संवादात हॉस्पिटल केव्हा आलं कळलंच नाही. आदिनं कशीबशी गाडी लावली. अन् तो धावतच आत गेला. संयुक्ता आयसीयूमध्ये होती. तिला खूप लागले होते. बाबांना चालताना दम लागत असल्याने ते हळूहळू येत होते. बाबा तिथे पोहचताच आदित्यचा एवढा वेळ धरलेला धीर सुटला. तो बाबांच्या गळ्यात पडून रडू लागला. लहानपणापासून आदित्यला आई गेल्यावर रडलेलं पाहिलं, त्यावर आताच  ते पहात होते. तसं तर अपघात झालेला कळल्यापासून बाबा मनातून कोलमडले  होते. पण आदित्य आणि त्याची दोन मुलं यांच्यासमोर बाबांना समजूतदारपणे सर्व  परिस्थिती हाताळणं भाग होतं. आदित्यला शांत करून बाबांनी, डॉक्टरांना भेटून  नक्की काय झालं, हे विचार असं सांगितलं. तेवढ्यात तिथे शाळेच्या मुख्याध्यापिका
व पोलिस कॉन्स्टेबल आलेच. मुख्याध्यापिकांनी त्यांना अपघात कसा झाला ते  सांगितलं. कागदपत्रांवर काही ठिकाणी मुख्याध्यापिकांच्या व आदित्यच्या सह्या घेऊन  कॉन्स्टेबल निघून गेला. सकाळी शाळेपासून काही अंतरावर संयुक्ताची गाडी चालली असताना, एका अज्ञात वाहनाने तिच्या गाडीला मागून जोरात ठोकरल्याने, ती उडून  पडली आणि पडताना डोक्यावर पडल्याने डोक्याला जबरदस्त मार लागला. अज्ञात  वाहनचालक बिनधास्त निघून गेला. हे सर्व एका चौथीतील विद्यार्थीनीने  पाहिले. पण  तिला गाडीचा नंबर किंवा चालकाचा चेहरा काहीच नेमकं सांगता येत नव्हतं. ती खूप  घाबरली होती. पळत येऊन तीने घडलेली सारी हकीकत शाळेत सांगितली आणि  मग सगळे घटनास्थळी पोहोचले. तेवढ्यात कोणीतरी पोलिसांना कळविल्याने पोलिसपण घटनास्थळी पोहोचले. योग्य ती कारवाई करण्यासाठी पुरावे शोधून अपघातग्रस्त व्यक्तीला म्हणजे संयुक्ताला त्यांनी पटकन् दवाखान्यात दाखल केले.
                      डॉक्टर संयुक्ताविषयी जास्त काही बोलत नव्हते. फक्त आमचे प्रयत्न चालू आहेत  एवढंच सांगत  होते. तिची ती अवस्था आदित्यला पाहवत नव्हती. या साऱ्या गोंधळात मुलं  शाळेतून येऊन दारात थोडावेळ वाट पाहून शेजारी गेली. शेजारी कुणालाच काही  माहीत नव्हते. शेजाऱ्यांनी आदित्यला फोन केला. त्यावेळेस आदित्यच्या लक्षात आलं, आपण या साऱ्या धावपळीत विसरलोच. मुलांची शाळा आज लवकर सुटणार होती.  आपल्या कॉलेजमध्ये फोन करायचंही विसरलो. त्याने बाबांना घरी सोडलं.  मुलांना फक्त आईला जरा लागलंय म्हणून दवाखान्यात ठेवलंय एवढंच सांगितलं. शेवटी कॉलेजमध्ये जाऊन रीतसर अर्ज देऊन तो दवाखान्यात गेला. 
                   आठ दिवस झाले. पण काहीच सुधारणा होत नव्हती. डॉक्टर प्रयत्न करत होते.  पोलिस तपास करीत होते. मुलं, बाबा आणि आदित्य देवाकडे एकसारखा धावा. करत होते. परिस्थिती सुधारेल अशी आशा प्रत्येकाला वाटत होती. आदित्य तर  आयसीयूमध्ये तिच्या शेजारी जाऊन ती शुद्धीवर नव्हती कोमात होती. तरी गप्पा  मारी.
‘संयुक्ता, तुझ्या वाढदिवसाला तुला पोपटी ड्रेस घ्यायचा ना? मग तो आताच घेऊ.  वाढदिवस चार-पाच दिवसांवर आलाय. तुझ्या नेहमीच्या टेलरकडे टाक म्हणजे  तू वाढदिवसादिवशी घालशील.’
                       बोलता बोलता त्याचे डोळे भरून येत. डॉक्टरांना आज काय ते शेवटचंच विचारायचं. असं ठरवून तो बाबांसह डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी नक्की काय झाले ते व्यवस्थित  समजावून सांगितले. आपण आणखी एक प्रयत्न म्हणून एक ऑपरेशन करू. त्यातून  पेशंट कोमातून बाहेर येईल, अशी अपेक्षा आहे. अपेक्षेवरच जग चाललंय. मग आपण  का नाही, असा विचार आदित्यने केला. आतापर्यंत पाण्यासारखा पैसा त्याने खर्च केला होता. घरी बाबांना सोडायला गेला. घरची स्थिती तर बघवेना. दोन दिवसांपासून घरात झाडून, स्वयंपाक, धुणं, भांडी यासाठी बाई लावली होती. गेल्या आठ दिवसात घराची अवस्था वाईट झाली होती. बाई लावल्यापासून जरा बरं वाटू लागलं होतं. पण संयुक्ताच्या कुठल्याच कामाची सर तिच्या कामाला येत नव्हती. पैशासाठी काम करणं आणि हे सर्व माझंच आहे, या मालकी भावनेतून, जिव्हाळ्याने, प्रेम लावून काम करणं यात खूप फरक असतो. बागेतील झाडेदेखील पहिल्यासारखी  टवटवीत वाटत नव्हती. उदासीची छटा सार्‍या घरादारावर दिसत होती.   ऑपरेशनला लागणाऱ्या कागदपत्रांवर सह्या करून आदित्यने पैशांची पूर्तता केली.  ऑपरेशनच्यावेळी बाबा, आदित्य दवाखान्यात होते. मुलं घाबरतील म्हणून त्यांना  घरीच सोडलं होतं. ऑपरेशन एक-दीड तास चाललं. डॉक्टरांनी चोवीस तासांची  मुदत दिली. ती कोमातून वाढदिवसादिवशी बाहेर येईल, अशी अपेक्षा साऱ्यांनाच  होती. सर्वजण आपापल्यापरीने देवाला आळवीत होते.
                  ऑपरेशननंतर पेशंटला कोणीच भेटायचं नाही, असं सांगितल्यानं  दुसऱ्यादिवशी बाबांना घरी सोडून आदित्य दवाखान्यात बाकावर बसला होता. रात्रंदिवस पडणाऱ्या ताणामुळे तो  थकून गेला होता. बाकावर बसल्या बसल्या त्याचा डोळा लागला. त्याच्या केसातून
कुणीतरी प्रेमाने हात फिरवत होतं. त्यानं पाहिलं तर संयुक्ता. ‘संयुक्ता, अगं तू केव्हा आलीस?’
अशा त्याच्या प्रश्नावर
‘मी तुम्हाला झोप लागल्यावर आले. अहो, माझा  वाढदिवस ना? चला माझ्यासाठी ड्रेस आणा पाहू. माझा आवडता रंग आणा हं’
‘ हो आणतो आणतो.’
असं आदित्य झोपेतच ओरडत होता. नर्सने त्याला जागं केलं.
‘ दवाखान्यात गोंधळ केलेला चालत नाही. बाहेर बसा पाहू.’ आदित्य बाहेर आला. स्वप्नामुळे   त्याची झोप उडाली. तो बाहेर आला. इथे बसून तरी काय तिच्या आवडीचा ड्रेस आणू. उद्या ती शुद्धीवर आली की, तिला सरप्राइज देऊ. म्हणून तो बाजारात गेला. अर्ध्या तासात तो परतलाच. जेवणाचा डबा घरून आला. पण त्याला जेवूच वाटेना. शेवटी शरीरधर्म म्हणून दोन घास खाल्ले अन् आत येऊन बसला. संध्याकाळचे पाच-साडेपाच वाजले होते. त्याला आज, लग्न जमल्यापासून ते आजतागायतच्या सर्व  घटना, प्रसंग आठवत होते. तो एकेका दृश्यात रमत होता.  एवढ्यात नर्सने जोरात हाक मारल्याचे त्याच्या लक्षात आले.
‘अहो डॉक्टर बोलावताहेत.’
तो धावत आत गेला. जाताना ड्रेसची कॅरीबॅग घेऊन गेला. बहुतेक ती शुद्धीवर आली. तो आत गेला. 
ती शुध्दीवर येवू लागली होती. तो पटकन तिच्या जवळ गेला. तिने डोळे उघडले. समोर आदित्य होता. ती पुसटश्या आवाजात आदि…. आदि…. म्हणू लागली. तसं आदित्यने तू काही बोलू नकोस. शू…गप्प रहा. असे खुणावले आणि आपला हात तिच्या हातात देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अन् हळूच ड्रेसची बॅग पुढं केली. तशा अवघड स्थितीतही ती गालातल्या गालात हसली. तिचं हसू पाहून आदित्यला स्वर्गसुखाचा भास झाला. त्याने हात जोडून देवाचे आभार मानले. तशी संयुक्ताची प्रश्नार्थक मुद्रा पाहून तो हसत हसत म्हणाला,
‘नुसतं भेटवस्तू घेऊन बसशील. आम्हाला तुझ्या हातचा केक हवाय. देवाला प्रार्थना केली मी. तुझ्या हातचा केक लवकर खायला मिळू दे अशी. ‘
यावर संयुक्ताने त्याच्या हातावर आपला हात हळूच दाबला अन् त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. जणू ती सांगत होती. मी बरी होवून लवकरच घरी येणार. माझ्या आवडीचा ड्रेसही घालणार अन् तुला केकपण खाऊ घालणारच.
                                                     सौ.आशा अरूण पाटील
                                                                ९४२२४३३६८६

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!