अट

संध्याकाळची वेळ होती. अंगणातल्या तुळशीपाशी दिवा लावून झाल्यावर सुलभाताई शांतपणे खुर्चीत बसल्या होत्या. पण मन मात्र कुठेतरी भटकत होतं. आजकाल लग्न म्हणजे एक अग्नीपरिक्षाच आहे. प्रत्येक मुलीला आयता संसार हवा आहे. बरं अपेक्षा तरी किती त्या? अपेक्षा फक्त पुढच्या व्यक्ती कडूनच. अटीतटींवर संसार व्हायचा अवघडच. विचारांचं काहूर डोक्यात माजलं होतं.

तेवढ्यात त्यांचा मुलगा समीर ऑफिसवरून घरी आला.

“आई, काय झालं? इतक्या शांत का बसलीस?” त्याने विचारलं.

सुलभाताईंनी हळूच सुस्कारा सोडला.

“काय सांगू रे समीर… आज पुन्हा एका स्थळाचा फोन आला होता.”

समीर थोडा हसत म्हणाला, “मग? काय म्हणाले ते लोक?”

“ अरे मुलगी पाहणं, पसंत करणं, मुलीला मुलगा पसंत असणं. याआधीच इतके प्रश्न विचारले त्यांनी की मला वाटलं आपण मुलगी बघतोय की इंटरव्ह्यू देतोय!”

“काय विचारलं एवढं?” समीर उत्सुकतेने विचारू लागला.

सुलभाताई सांगू लागल्या—

“पहिला प्रश्न – तुमच्याकडे स्वतःचा फ्लॅट आहे का?

दुसरा – मुलाची परदेशात जाण्याची तयारी आहे का?

तिसरा – घरात वयस्कर किती आहेत? त्यांची जबाबदारी कोण घेणार?

आणि शेवटी – लग्नानंतर मुलगा स्वतंत्र राहणार का?”

समीर काही क्षण शांत बसला. त्याचं शांत बसण्याचं कोडं सुलभाताईंना उलघडेना! त्या म्हणाल्या, ‘अरे काही तरी प्रतिक्रिया दे. म्हणजे हे बरोबर आहे की चुकीचं.’

यावर समीर बोललाच, “आई, हे प्रश्न चुकीचे नाहीत कदाचित… पण इतकं सगळं आधीच ठरवायचं म्हणजे… नातं कसं तयार होणार?”

सुलभाताई म्हणाल्या, “अगदी तसंच वाटतं मला. आमच्याकाळी असं नव्हतं. माणसं बघायची, स्वभाव बघायचा. आता सगळं ‘सेट’ पाहिजे.”

समीर हसत म्हणाला, “आई, आजकाल सगळ्यांना तयार घर हवंय. पण घर तयार होतं कसं, हे कुणी विचारत नाही.”

शेवटी काय तर नोकरदार मुलगा, गाडी, बंगला आणि एकटा राहणारा हवा.

दुसऱ्या दिवशी समीर एका रिया नावाच्या मुलीला भेटायला जाणार होता.  रिया व त्याची कॉफी शॉपमध्ये भेट ठरली.

रिया आत्मविश्वासाने बोलत होती.

“समीर, मला करिअर खूप महत्त्वाचं आहे. लग्नानंतर मला कोणतीही तडजोड करायची नाही.”

समीर शांतपणे म्हणाला, “छान आहे. पण नात्यात कधीच तडजोड नाही, असं होऊ शकतं का?”

रिया थोडी गोंधळली.

“म्हणजे?”

“म्हणजे… दोन माणसं एकत्र आली की काही गोष्टी बदलतात, काही स्वीकाराव्या लागतात. तेच तर नातं आहे.”

रिया काही क्षण विचारात पडली.

“पण मला सुरक्षित आयुष्य हवं आहे. स्थिरता हवी आहे.”

समीर हसला.

“स्थिरता तयार करावी लागते रिया… ती कुठे तयार मिळत नाही.”

त्या भेटीनंतर समीर घरी आला.

सुलभाताईंनी विचारलं, “काय वाटलं मुलीबद्दल?”

समीर म्हणाला, “आई, मुलगी चांगली आहे. पण तिला तयार आयुष्य हवंय… आणि मला आयुष्य तयार करायचं आहे.”

काही दिवसांनी एक साधा प्रस्ताव आला. मुलीचं नाव माधुरी. छोट्या शहरात वाढलेली, साधी, पण समजूतदार. ती छोट्या शहरातली म्हणून समजूतदार होती असं नाही तर तिचा जन्मतः स्वभावच होता.

पहिल्याच भेटीत माधुरीने विचारलं—

“तुम्हाला आयुष्यात काय हवं आहे?”

समीर थोडा विचार करून म्हणाला—

“सुख… पण तयार नाही, मिळवलेलं.”

माधुरी हसली.

“मग आपण दोघं मिळून शोधू या ना ते?”

काही महिन्यांनी त्यांचं लग्न ठरलं.

सुलभाताई समाधानी होत्या.

त्या एकेदिवशी लेक व सुनेला सहज बसल्या असताना म्हणाल्या,

“निवड मोठी नसते रे… निवडीमागचा विचार मोठा असतो.

आजच्या काळात प्रश्न विचारणे चुकीचं नाही…

पण नातं फक्त “अटींवर” उभं राहत नाही… नातं उभं राहतं विश्वासावर, समजुतीवर आणि एकत्र चालण्याच्या तयारीवर.

 ती दोघं गालात हसतानाचा क्षण सुलभाताईंच्या नजरेने अचूक टिपला.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!