अचूक

अचूक
‘रुचा, अगं चल पटकन, सगळे मिळून जेवण करू या. तसंही तुम्हाला रोज ऑफिस असतं.’
माझी हाक ऐकल्याने रुचाला स्वयंपाक घरात यावं लागलं. खरंतर तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. शरदने पाहिल्यावर जवळ जात तो काहीतरी कुजबुजला,

कसं काय कोण जाणो. पण मी वाक्य ऐकलं आणि मला वाईट वाटलं.
‘काय मॅडम, वेळ झाली नाही का जेवायची.’
‘नाही रे भूक लागलीय खरं पण आईचा फोन सुरू होता. मी आईला फोन करत असते, तेव्हा नेमकं आईंना मात्र इतर कामांची खूप घाई लागून राहिलेली असते.’
आपण हिच्यासाठी म्हणालो आणि हिने काहीतरी गैरसमज करून घेतला की काय? या सर्व विचारांच्या नादात गॅसवर कोशिंबीरीसाठी ठेवलेली फोडणी करपली. एवढयात रुचा म्हणालीच,
‘आई, अहो तुमची सर्व तयारी होईपर्यंत माझा फोनही निवांतपणे झाला असता. घाईगडबडीत गोंधळ होतो भलताच.’
मी वसंतराव, शरद व रुचाकडे नजर टाकतंच, ‘होय खरं आहे.’ असे वाक्य उच्चारले खरे पण माझ्या नजरेत वेगळेच भाव दिसत होते. नजरेने एक अन तोंडाने एक असं झालं होतं माझं. रुचाला मात्र समजलेच नाही..

                गेले तीस एकतीस वर्षापासून संसारात रमलेली मी माझी कर्तव्य अगदी निष्ठेने पार पाडतेय. माझ्या सासूबाई आणि माझी आई यांच्या वेचक चांगल्या गुणांचा मी अंगिकार केला. खरंच एवढ्या वर्षाच्या संसारात लोणचे मुरावं तशी मी मुरत गेले. मुरलेले लोणचं स्वादिष्ट, रुचकर लागते तसंच काहीसं माझ्या बाबतीत झाले आहे. दोन वर्षापर्यंत मी सून होते. शरदचं लग्न झालं तशी मी सासूबाई झाले. माझ्या मनामध्येही लेकीला सासरी देताना बरेच प्रश्न आणि धाकधूक असते तसच काहीसं झालं होतं. कारण लेक सासरी जाते. तेव्हा सासरच्या माणसांसोबत लेकीच जमलं का? विचारात तफावत पडून काही वादविवाद होतील का? हिच्या सवयी तिकडच्यांना कशा वाटतील. लाडाकोडात वाढलेली ही तिथे जबाबदारीने वागेल का? या सगळ्या शंका माझ्या मुलीच्या वेळेस माझ्या मनात येणारच. पण दोन वर्षापूर्वी शरदचे जेव्हा लग्न झाले, तेव्हाही माझ्या मनात अनेक प्रश्न उपस्थित राहिले. येणारी मुलगी आपल्या घरात मिसळून वागेल का? आपल्या सर्वांचे स्वभाव आणि तिचा स्वभाव, सवयी यात फरक तर असणारच आहे. मग ती काही सवयी बदलेल आणि आपणही काही बदल करून घ्यायलाच हवे. आपण नौकरी संपल्यामुळे आता निवांत आहोत. आपण तिला पूर्णपणे सहकार्य करूच पण तिला ते मान्य होईल ना! नाही म्हणले तरी असंख्य प्रश्न माझ्या मनात होते पण मी साशंक नव्हते. आतापर्यंत मी नौकरी करून घर पाहुणे यावे, सण समारंभ, आप्तेष्टांची कार्य सारं पार पाडले. या सर्वांमध्ये मला कधी त्रास झाला, मानसिक तणाव वाटला तरी पण मी माझ्या स्वभावाची शिस्त सोडून दिली नाही. खरं पाहता मुलीच्या आयांपेक्षा आजकाल मुलांच्या आयांनाच विचार करावा लागतोय. रूचा घरात येण्यापूर्ण तिची आणि शरदची दोन चारदा भेट झाली. मी ही खरेदीसाठी म्हणून दोनदा भेटले पण लग्नापूर्वी ‘अहो आई' म्हणण्यात जेवढा आदर असतो. तेवढा कायम राहिला म्हणजे झालं. हीच भावना आणि विचार मनात विजेप्रमाणे चमकून गेले. रुचा नौकरी करत असल्याने लग्नानंतर ऑफिसला जाण्यापूर्वीच मी तिला गप्पा मारत असताना, तिला काय काय करायला जमतं, तिच्या वेळेत स्वयंपाक घरात काय करणार आहे? तिला आवडीने कोणत्या गोष्टी करायला आवडतात. कोणत्या गोष्टी आवडत नाहीत. हे सारे जाणून घेवूनच एकंदरीत कामाचे नियोजन मी केलं होतं. रविवारी तिला विश्रांती म्हणूनच मी तिला त्या दिवशीचं सकाळचं सर्व नियोजन माझ्याकडे असंही सांगितलं. रविवारी दुपारी आठवडाभराचा भाजीपाला, किराणा, दळणे, घराची स्वच्छता, बाहेरची खरेदी करायची म्हणून सांगितल. तिनेही बऱ्याच प्रमाणात समजून घेतले. त्यातलं किती करायचं आणि किती सोडायचं शेवटी तीच ठरवणार. शेवटी मी मार्गदर्शन करणार. एक मात्र खरं. आमच्या घरात पडलेल्या टाचणीचा आवाज माझ्या कानावर उशिरा यायचा पण माहेरी आधी पोहोचायचा. पहिलं फोनची सोय नव्हती हे छानच होतं म्हणायची वेळ माझ्यावर आली होती. ऊठसुठ माहेरी आईला नाहीतर बहिणीला फोनवर बोलत बसणारी रूचा घरात काम करायची पण लक्ष सारं तिकडेच. सर्वजण जेवत असताना अवेळी माहेरचा फोन आल्यावरही ती ताटावरून उठे. मला या गोष्टीचा राग येई. म्हणूनच मी शरदला या गोष्टीबद्दल बोलले, तो ही समंजसपणे,

‘आई मी बोलतो तिच्याशी.’
म्हणाला. शेवटी काय घर आहे म्हणजे भांडी असणारच, भांडयाशेजारी भांडे ठेवले की वाजणारचं पण हे वाजणं कधी कलह तर कधी कर्णमधूर नादमयता निर्माण करू शकतं. तिने माहेरी फोन करू नये असं माझं मुळीच मत नाही, पण माझी लेकही नवीन असताना प्रत्येक गोष्टीसाठी फोन करायची. तेव्हा मी मिला स्पष्ट सांगितलं,
‘बाळा तुला काही अडचण असेल, काही विचारायचं असेल तर आईंना विचारत जा! मला सारखा फोन करत जावू नको. संसारात आणि बाहेरील व्यवहारातही तूझ्या सासूबाई हुशार आहेत.’
तेव्हापासून आठवडा-पंधरा दिवसातून तिचा फोन येतो. फक्त ख्याली खुशाली विचारण्याकरता. घरातले प्रश्न त्या दोघी सासूसुना व्यवस्थित सोडवतात. माझ्या मनात विचार सुरु असतानाच रूचाने मला हाक मारली,
‘आई, अहो चला ना! सर्वजण मिळून एखादा कौटुंबिक मराठी सिनेमा पाहू.’
मला जरा स्वप्नवत वाटले. शरदने समजून सांगितल्यावर ही आकांडतांडव करते की काय? असे वाटले होते पण समंजसपणे तिने दोन्ही बाजू समजून घेतल्या. शेवटी सून कोणाची आहे म्हणायचं?
योग्य वेळी अचूक निर्णय घेणं ही आमची परंपराच आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!