तन मनाने व्हावा नामजप
लिंगपूजा विचारांचे आचरण
होईल विचारांची दैदीप्यमानता
संचारेल ती कणा कणात
तुमच्या प्रतिभेचा ध्यास
प्रचिती घडे नित्य आम्हास
बाराव्या शतकातील क्रांतिसूर्य महात्मा बसवण्णा हे मध्ययुगीन काळातील समाजसुधारक होते. ते एक ऐतिहासिक महापुरुष होते. त्यांचे चरित्र, वचन, वाङ्मय व कार्याचा परिचय जनमानसात होणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे.
बारावे शतक हे परिवर्तनाचे शतक होते. ते बसवयुग, समतायुग व ज्ञानयुग होते. बाराव्या शतकापूर्वी भारतात विशेषत: दक्षिणेत कर्मकांडाचे प्रस्थ वाढले होते. यज्ञ, होम, हवन, जप-तप, सोवळे- ओवळे, व्रत - वैकल्याचे आवडंबर व कर्मकांड हेच लोकांचे धर्माचरण बनले होते. समाजात उच्चभ्रू श्रेष्ठ तर शुद्रांना कनिष्ठ दर्जा होता. शूद्रांचा स्पर्श बाट समजला जात होता. राजे महाराजे आपापसात लढाया करीत होते. आपल्याच भाऊ-बांधवांना संपवित होते. आम जनतेकडे मात्र त्यांचे लक्ष नव्हते. अंधश्रद्धा समाजमनात खोलवर रुतून बसल्या होत्या. परिणामी सामान्य माणूस भरडला जात होता. धर्माच्या नावाखाली अधर्माचे स्तोम माजले होते. समाज जातिपातीत बंदिस्त होता. कष्ट करणारे कष्ट करत होते. स्वर्ग - नरक या कल्पना बहुजन समाजाच्या माथी मारल्या जात होत्या. अशा संवेदनशून्य सामाजिक परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्यासाठीच महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला. बाराव्या शतकात दक्षिणेत मंगळवेढा नावाचे एक राज्य होते. येथे कळचूर्य राजा बिज्जल राज्य करीत होता. कळचूर्य बिज्जल कल्याणी चालुक्य राजाचा आश्रित मांडलीक होता. तत्कालीन मंगळवेढा राज्यात बसवन बागेवाडी नामक राज्यात मादिराज व मादलांबिकेच्या पोटी इ. स. ११०५ साली बाळ जन्माला आले. त्याचेच नाव बसव ठेवण्यात आले.
१२ व्या शतकाच्या उत्तरार्धात महामानव महात्मा बसवेश्वरांचे कार्य महान होते. महात्मा बसवेश्वरांनी केलेली क्रांती समग्र व सर्वागीण स्वरुपाची अभूतपूर्व अशी महान क्रांती होती. त्यांनी केलेल्या क्रांतीला जगाच्या इतिहासात तोड नाही. महामा बसवेश्वरांनी सामाजिक आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केली. जातिभेद, वर्गभेद, वर्णभेद, लिंगभेद, कृत्रिम मानवनिर्मित भेद नष्ट करण्याची प्रक्रिया बसवेश्वरांनी स्वतः पासूनच सुरु केली. जातिप्रथेवर प्रहार करून जातीयतेचे समूळ उच्चाटन करणारे विश्वगुरू महात्मा बसवेश्वर हे महान क्रांतिपुरुष होते. क्रांतीकारी बसवेश्वरांनी समाजात असणारी सामाजिक, आर्थिक, धार्मिक दरी दूर केली. जातीच्या भिंती पाडून एकसंध समाजाची निर्मिती केली. मूर्तिपूजा, कर्मकांड यास विरोध केला. मंदिराच्या उभारणीला विरोध केला. देह हेच देवालय, पाय हेच खांब, मस्तक हाच कळस, आत वास करणारे तत्व हाच ईश्वर होय. माणसातल्या चैतन्यतत्वांची अर्थात माणसाची उपेक्षा करू नका. "दया हाच खरा धर्म " हा संदेश त्यांनी कर्मकांड युगात सांगितला. समाजाचा विरोध झाला तरीही त्यांनी आपले कार्य जोमाने सुरू ठेवले. त्यांच्या सोबत सर्व जाती-धर्मातील स्वतंत्र विचाराचे शरण आले. त्यांनी बसवण्णांच्या विचाराला पाठिंबा दिला.
क्रांतिकारी बसवण्णांनी समाजातील घटकांचा सर्वांगिण विकास साधला. महिलांसाठी १२ वे शतक सुवर्णकाळ ठरले. क्रांतीगंगोत्री नागालांबिका, नित्यमुक्त लिंगम्मा, त्यागमयी महादेवी, आत्मज्ञानी लच्छम्मा, सुज्ञानी रायम्मा, सत्यनिष्ठ वीरम्मा, साध्वी सातव्वा, सत्वशील काळव्वा या महान क्रांतिकारक महिलांचा सुवर्णकाळ म्हणजे बारावे शतक. स्त्री स्वातंत्र्यासंबंधीचा हा केवळ वरपांगी विचार नसून प्रत्यक्षातील ती कृतीच होती. आज हे विचार आपणा सर्वांना वर्तमान आणि भविष्यकाळातही दिशादर्शक आणि महत्त्वपूर्ण आहेत. बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या अनुभव मंटपात त्यांनी स्त्रियांना स्थान देऊन त्यांच्याविषयी आदर व सन्मान दिला. त्यांना पुरुषांबरोबर काम करण्याची संधी मिळवून दिली. आज आपण ३३% आरक्षण स्त्रियांना दयावे म्हणून झगडलो. ५०% चा प्रस्ताव मांडत आहोत. परंतु बसवेश्वरांनी आरक्षण कृतीत आणले. त्यांच्या अनुभव मंटपात ७७० शरणार्थी पैकी ७० स्त्रिया होत्या. जेथे स्त्रियांना वंदिले जाते, त्या ठिकाणी देवदेवतांचा वास असतो. याच पद्धतीने त्यांची कृती होती.
मानवी जीवनासाठी मार्ग दाखविणारी वचने निर्माण करणारे जगातले पहिले साहित्यिक बसवेश्वर होते. हातांनी कागदावर जीवनग्रंथ लिहिणारे कर्मयोगी, हे मनाने मात्र माणसांच्या काळजावर संस्कार कोरत होते. थांबलेल्या माणसाला गतिमान करण्यास, उत्तेजित करण्यासाठी त्यांच्या मनात स्फूर्तीचे स्फुल्लिंग चेतवणारा अग्नी होते.
"झिजलात तरी चालेल पण गंजू नका."
हा सतत मोलाचा संदेश देणाऱ्या त्यांच्या आत्म्याचा हा आवाज होता. स्वतंत्र, समानतेने जगण्याचा हक्क असण्याची जाणीव अंत:प्रेरणेने दिली जाते. तर तो हक्क मिळविता येतो, याची जाणीव मात्र बाह्यप्रेरणेने मिळते. गांजलेले लोक कायम गांजलेले राहुच शकत नाहीत. केव्हातरी त्यांची ऊर्मी उफाळून बाहेर येतेच आणि ऊर्मी बाहेर येण्यासाठी बाहयप्रेरणा म्हणून गरिबांच्या अंतः प्रेरणेला चालना देणारा दीपस्तंभ म्हणजे महात्मा बसवेश्वर.
जय बसवा!