माणुसकीची ऐशीतैशी
मोबाईलवर बोलत बोलतच मी रिक्षाला हात केला. मोबाईल थोडासा लांब धरून कुठे जायचे ते सांगून पुन्हा मोबाईलवर संवाद सुरू झाला. मैत्रिणीशी गप्पा म्हणजे काय. ना वेळेचे भान, ना आवाजाचे. मी फोनवर बोलत असतानाच. अजून एक सीट घेऊ का? म्हणून रिक्षावाल्याने मला विचारले. खरं तर फोनवर बोलण्याच्या नादात एवढे स्पष्ट कळाले नाही पण मी नंतर विचारल्यावर त्याने सांगितले. अन् मग मीही विचार केला. एवढ्या मोठ्या रिक्षांमध्ये एकटे बसून जाण्याऐवजी, आणखीन एक व्यक्ती आली तरी काय बिघडेल. तेवढेच इंधन बचत म्हणजे देशकार्याला हात लागण्याची भावना. अन् माझेही पैसे वाचणार. हे काय कमी आहे का? म्हणून मी मानेनेच हो म्हटले. रिक्षा रस्त्याच्या कडेला थांबली. एक स्त्री अन् सोबत एक चार वर्षांचा मुलगा. जाऊ दे काय हरकत नाही. मी लगेच सरकून जागा दिली. आमची रिक्षा पुन्हा सुरू झाली. मी माझी पर्स मांडीवर ठेवूनच मोबाईलवर बोलत होते. ती स्त्री माझ्याकडे पाहून हसली. मीही तिच्याकडे पाहून हसले. अन् मैत्रिणीला परत फोन करते असं सांगून मी फोन ठेवला. छोटाही चांगलाच गोड होता. दिसायला चांगला गब्दुल होता. अन् लाघवी ही होता. तो गोड बोलत बोलत माझ्या मांडीवर केव्हा येऊन बसला, कळलेही नाही. त्याच्या आईकडेही बरेच सामान होते. तो आपल्या मांडीवर बसला तरी एवढे काय म्हणून मीही त्याच्याशी बोबडय़ा बोलात प्रश्न विचारात होते. थोड्या वेळाने रिक्षा रस्त्याच्या कडेला थांबली. मी रिक्षावाल्याला इथे कुठे म्हणून विचारल्यावर, या ताई उतरणार आहेत. असे त्याचे उत्तर आले. त्या स्त्रीने आपली बॅग रिक्षातच ठेवली. अन् आलेच दोन मिनिटात, तेथे अपार्टमेंट आहे. तिथे आमचे पाहुणे रहायला आले आहेत. माझ्याकडे त्यांचा मोबाईल नंबर नाही. मी दोन मिनिटात येते. म्हणून मला,रिक्षावाल्याला सांगून आमची परवानगी मिळायच्या आत तर ती बॅग ठेवून गेली. येईल पाच मिनिटात अस मी रिक्षावाल्याला सांगितलं. मघापासून त्या छोट्याशी अन् त्याच्या आईशी बोलून मला एवढं तरी कळलं होतं कि ते या शहरातले नाहीत. एवढ्याश्या लहान मुलाला घेऊन ती एकटी बॅग कशी घेणार अन् पत्ता कसा सापडणार.या विचारामुळे मी रिक्षावाल्याला,पैसे घे अन् माझे मला सोड. असे म्हणण्याचे माझे धाडस झाले नाही. मी याच विचारात होते अन् माझा मोबाईल वाजला. यांचा फोन होता.
बराच वेळ झाला. मी घरी कशी पोहोचले नाही म्हणून यांनी फोन केला होता. घरातून निघताना सकाळीच माझ्यावर यांनी सूचनांचा भडीमार केला होता. बँकेतून येताना रिक्षा, टमटमच्या नादी लागू नको. गर्दी असते, भरपूर पॉकेट मारणारे असतात आणि बरंच काही. आणि अचानक माझा हात माझ्या मांडीवर रेंगाळला. अरे बापरे त्या मुलाला घेण्याच्या नादात माझ्या मांडीवरची पर्स खाली तर नाही ना पडली. म्हणून मी इकडे तिकडे शोधली. पण ती काही केल्या सापडेना. मिनी पर्स म्हटलं तरी चांगली हातभर होती. नुकतेच बँकेतून काढलेले पैसे त्यात होते. माझ्या हालचालीवरून माझे काही तरी हरवले हे रिक्षावाल्याच्या लक्षात आलेच होते. त्याने तशी विचारणाही केली. मी सांगितल्यावर तो म्हणाला,
'चॉकलेटी ना! त्या बाळाच्या हातात होती.'
मी चिडले, बाळ काय म्हणता. चार पाच वर्षांचा मुलगा आहे तो. मला तर चक्रावल्यासारखेच झाले. पण परत मनात विचार आला. त्या बाईची बॅग इथेच आहे. म्हणजे ती नक्की परत येणार. तिच्या बाळाच्या हातात पर्स असेलच. ती सापडेल असा विचार करतच होते. एवढ्यात रिक्षा वाल्याने हाक दिली,
‘अहो मॅडम, फोन वाजतोय. अगंबाई खरंच की. आपण पण काय. आपल्याच जवळ फोन वाजतोय आणि कळलंही नाही. रिक्षावाल्याने जरा उतरुन चौकशी करावी असं मला वाटत होते. पण तो पण ढिम्म, जागचा हालतच नव्हता.
‘ अहो भाऊ, जरा पाहा ना. ‘
त्यावर तो म्हणाला,’ रिक्षांमध्ये मी थांबतो तुम्हीच पाहुन या.!’
मलाही ते योग्य वाटले. मी ती बाई गेली त्या अपार्टमेंटच्या दिशेने निघाले. तेथे गेटवरच चौकीदाराने अडवले.
‘बाई कोण हवंय? कोणाकडे आलात.’
मला जरा त्याचा रागच आला. मी काय त्याला चोर वाटत होते. मी जरा रागातच म्हणाले,
‘ मी तुम्हाला चोर वाटले का? ‘
‘ आहो तसं नाही पण येथे येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करणं माझं कर्तव्य आहे आणि तसंही या वहीत तुमचं नाव लिहा अन् सही करा. कोणाला भेटायचे, कोणाच्या घरी आलात? ते लिहा, भेटीचे कारण लिहा.’
त्याचं एवढं सारं बोलणं ऐकलं अन् माझं डोकंच गरगरायला लागलं. मी त्याला माझ्यासोबत रिक्षात बसणाऱ्या बाईचे वर्णन करून तिला पाहिलं का? असं विचारल्यावर, त्यांने त्या बाईचे नाव विचारले. मी त्याला सारी हकीकत सांगितली. सारं ऐकल्यावर अशी कोणी बाई आलीच नाही असे सांगितले. मी विनंती केल्यावर एंट्री बुक उघडून दाखवले तर गेल्या अर्ध्या तासात कोणीही स्त्री आल्याची नोंद नव्हती. मला तर घामच फुटला. काय करावे कळेना. खरंच आपण एवढे शिकलेलो पण आपल्याकडून अशी चूक व्हावी म्हणजे काय वेडेपणा आहे. असे बरेच विचार डोक्यात घोंगावत होते. मध्येच त्या चौकीदाराने या घटनेची पोलिसांत नोंद करा म्हणून सांगितले. तिथे जवळच पोलिस चौकी होती. रिक्षावाल्याला घेऊन पोलीस चौकीला जावे. म्हणून मी पुन्हा रस्त्याकडे वळले. मला आता मात्र मोठा धक्काच बसला मी जिथून रिक्षातून उतरले. तेथे रिक्षा नव्हती. मी आजूबाजूला चौकशी केली असता, कोणाला काहीच कल्पना नव्हती. तिथे जवळच एक पानाचे दुकान होते. त्याला विचारले असता, एवढे काही नक्की माहित नाही पण बऱ्याच वेळ रिक्षा उभी होती. अन् थोड्या वेळाने मात्र रिक्षात एक बाई बाळाला घेऊन बसल्याचं त्यांने पाहिलं होतं. मला आता मात्र चक्कर आल्यासारखे वाटू लागले. मला तर दरदरून घाम आला. घशाला कोरड पडली. मी थरथर कापत होते. हे सर्व पाहून त्या पानटपरी वाल्यांने मला बसायला पटकन शेजारच्या हॉटेलमधली खुर्ची दिली. एक पेलाभर पाणी दिले.
‘मॅडम ठीक वाटतंय ना! अहो काय झालंय?’
असं म्हणून तो मला विचारपूस करू लागला. मला थोडं पाणी पिल्यावर बरं वाटू लागलं. खरं तर मी एका कारस्थानाचा बळी पडले होते.
मी पोलीस चौकीत जाऊन रितसर तक्रार नोंदवायची ठरवली तरी माझ्याजवळ रिक्षाचा नंबरही नव्हता. फक्त मी त्या तिघांचे वर्णन करू शकणार होते. पण शेवटी काही का असेना आपण तक्रार नोंदवलीच पाहिजे असे ठरवून मी पती राजांना घरी फोन केला. त्यांना फक्त मी अमुकअमुक ठिकाणी आहे आणि जरा महत्त्वाचे काम आहे. तुम्ही जरा मला न्यायला या. एवढी जुजबी माहिती सांगून बोलावून घेतले. अन् त्यांनी आल्यावर सर्व सविस्तर माहिती सांगितली. त्यांची स्थिती पाहता मी मनातून खूप घाबरले. एकतर पैसे गेले होते पण त्या धक्क्याने यांना काही होऊ नये एवढीच प्रार्थना मी मनातल्या मनात देवाला करत होते. आम्ही पोलिस स्टेशनमध्ये गेलो.
पोलिस स्टेशनमध्ये प्रथम तर एकंदरीत उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पण मुख्य साहेबांना भेटून विनंती केल्यावर रीतसर तक्रारीची नोंद झाली. आपण सामान्य नागरिक. आपल्याला या जगाचे छक्के पंजे थोडेच माहित असणार. बघता बघता चौकशी पूर्ण पद्धतीने तक्रार नोंदवून घेतली गेली. तेथे रेकॉर्डला संशयित वाटणारे, नेहमीच चोरीत सामील असणार्यांचे फोटो दाखवले पण एकजण पण रिक्षात बसलेल्यांपैकी वाटेना. शेवटी साहेबांनी आम्ही तपास यंत्रणा चालू करून मिळेल ती माहिती कळवतो, असे सांगितले. आम्ही घरी परतलो. मला तर अपराधीपणाची भावना मनामध्ये निर्माण झाली होती. फिरून फिरून सकाळपासून कशाप्रकारे घटना घडत गेल्या, त्याची चलत चित्र डोळ्यासमोरून सरकत होती. कोणत्याच कामात मन लागेना. काय करावे ते सुचेना. एकही काम धड होईना. बघता बघता दुपारचे पाच वाजले. आज आपल्यासाठी दिवस वाईट गेला. खरंच आपण कारस्थानात कसे काय अडकलो? याचे राहून राहून मला नवल वाटत होते. यांनी मला एखादा शब्द जर बोलला तर ते मला सहन होईल असे वाटत नव्हते. आम्ही आता फक्त विचार करणे आणि पोलिस स्टेशनमधून फोन येईल याची वाट पाहणे. याशिवाय दुसरे काही करू शकत नव्हतो. मला आता झालेल्या आर्थिक हानीमुळे उभ्या राहिलेल्या समस्या सतावत होत्या. परगावी शिकत असलेल्या मुलाची शैक्षणिक फी भरण्यासाठी केलेली धावपळ पाण्यात गेली होती. पण शैक्षणिक फी आताही भरावीच लागणार होती. पैसे चोरीची घटना सांगितल्याने चार आठ दिवसांची वाढीव मुदत मिळाली होती. आता काय करायचे हा यक्षप्रश्न होताच. दागिने मोडून का होईना वर्तमानातील नड भागवणे गरजेचे होते. आता मात्र आम्ही दोघं आणि सोबत माझा भाऊ अशा लवाजम्यासह आम्ही सर्व व्यवहार करणार होतो. म्हणतात ना!
‘दूध पोळल्यानंतर माणूस ताकही फुंकून पितो.’
तसंच काहीसं आमचं झालं होतं. परगावी शिक्षणासाठी राहिलेल्या मुलगा मुलगी या दोघांनाही आम्ही चोरी प्रकरणानंतर गावी येऊ दिलं नव्हतं. कारण गेलेल्या गोष्टी मिळत नसतात, हे सत्य आम्ही स्वीकारलं होतं. मला मात्र राहून राहून कधी तरी ती बाई रिक्षावाला किंवा छोटा मुलगा दिसेल किंवा पोलिस स्टेशनमधून तपासात आरोपी सापडले. तुमच्या हरवलेल्या गोष्टी घेऊन जा. असा फोन येईल अशी आशा वाटत होती.
सौ आशा अरुण पाटील