विचारांचा दसरा
मी घाईघाईने नवरात्रीची तयारी म्हणून घरं आवरायचा प्रयत्न केला. पण सासूबाई घरातलं कोणतंच सामान जे सध्या उपयोगी नाही ते काही टाकूच देत नसल्याने लाखो रुपये खर्च करून जणू या सामानासाठीच घर बांधलं की काय असा प्रश्न माझ्या अन् राजेशच्या मनात येत असे. मी लग्न होवून आले तेव्हा तर एकत्र कुटुंब अन् सामानाची रेलचेल पाहून मुंबईत आटोपशीर घरात, आटोपशीर सामानात राहणारी मी गडबडून गेले. तसं तर मुंबई-पुणे इकडच्या मुली गावाकडे जरा कमीच राहतात. पण मला पंढरपूरात आत्या असल्याने आधार वाटत होता. आता मात्र जसं जसा माझ्या मागे कामाचा व्याप वाढला. तस तसं सासूबाईंना नवीन गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न मी करे पण… त्याही तेवढयाच जिद्दी. शेवटी पिढयातले अंतर.
मला आता माझं ऑफिस दोन लेकरं सासू-सासरे नवरा यांचं पाहत पाहत सारी कामं उरकावी लागणार होती. तसं तर मला आठवतंय त्याप्रमाणे माझं लग्न झालं तेव्हा आमच्या सासूबाईच्या दोन जावा होत्या. एका वाडयात तीन कुटूंब. तीन कुटुंबं असं मी एकदा बोलता बोलता म्हणाले तर आत्ती खूप रागावल्या.
‘तीन नव्हे एकच कुटूंब आहे हे. तुमच्या मुंबईसारखं आमच्याकडे जागा, माणसे, वेळ यांची कमी नाही बरं का? असे काही बोलून उगीच घरातल्यांचा रोष ओढवून घेवू नकोस.’
त्यांच्या या वाक्यानंतर मी घरात कधीच कुणाच्या मध्ये आणि कुणाविषयी बोलत नसे. एकतर मुंबईकरांना जास्त बोलायची अन् उगाच कुणाचे काय जाणून घेण्याची इच्छा नसते. त्यामुळेच आमच्या शेजारच्या फ्लॅट मध्ये कोण रहातं याची कधी आम्ही चौकशी करत बसत नाही. वेळ- काळानुसार माहिती होतंच की. जसं जसं माझ्या चुलत नणंदा व दिरांची लग्न होवू लागली. घरात हळूहळू जागा कमी पडू लागली. तरीही सारेच खूप आनंदाने रहात होते. सासूबाई सासरे अन् दोन चुलत सासरे त्यांची प्रत्येकी दोन दोन मुलं. पाहता पाहता गोकुळ वाटावे असे झाले होते घराचं रुपडे पण जागेची कमी साऱ्यांनाच खटकू लागली. एकाच वाडयात राहणारे सारे आम्ही सारी नाती माणूसकीने जपत होतो. म्हणजे आमच्याकडे सुनांच्या माहेरच्या लोकांचं येणं जाणं सुरू होते. नेहमी असणारी माणसं कशीतरी घरात राहत पण पाहुणे आले की झाले. मी नवीन असताना काही वाटत नव्हते पण जशा मला चुलत जावा येत गेल्या, तसतसे वातावरण बदलत गेले. अन् एक एक करत सारे वेगळे झाले. खरं मी शहरात रहात असूनही मला मात्र यांच्या घरात आल्यावर खूप छान वाटायचे. मात्र जसजसे सारे कमी कमी होत गेले तसे मलाही करमेनासे झाले. पण शेवटी प्रत्येकाला मोकळीक ही हवीच ना!
अलिकडे घरामध्ये मी, यांनी, सासू-सासरे, आमची दोन मुलं, दिर. माझे दिरही नौकरीच्या निमिताने पुण्याला गेले अन् आमचं कुटुंब पुन्हा आणखी छोटं वाटू लागले. सासूबाईंना एवढ्या मोठ्या खटल्याच्या घरात राहिल्यामुळेच आता करमेनासे झाले होते. तसे सर्वजण वेगळे राहू लागले तरी कार्यक्रमाचे निमिताने एकत्र येतच होतो. मात्र सणवार आला की त्यांनाच काय पण मलाही सर्वांची तिव्रतेने आठवण येई. मात्र एक झालं, मी माझं शिक्षण असल्यामुळे नोकरीसाठी बाहेर पडू लागले पण आत्ती मात्र घरातच असत. नवरात्र जवळ येवू लागलं तसं माझ्या मनात कामाचे वारे वाहू लागले. नियोजन करून सगळी कामे उरकावी लागणार होती. आत्तींना आता जास्त काम होत नव्हतेच. त्यामुळेच माझ्यावर कामाचा ताण वाढत होता. राजेशने मला सुचवलं अन् मी कामाला बाई ठेवली. सासूबाईंना जरी कामवालीचं काम पटत नव्हतं तरी मी मात्र त्यांना गोड बोलून का होईना, कामाला बाई ठेवलीच. माझ्याही कामाचा व्याप वाढला होता. एक मुलगा पाचवीला अन् मुलगी तिसरीला. ऑफिस, सासू-सासऱ्यांचा अधुनमधून दवाखाना, माझ्या सासूबाई थोरल्या त्यामुळे मोठ्या सणांची जबाबदारी आपोआपच आमच्या घरावरच होती. मी अन् माझ्या सासूबाई आम्हा दोघींचे विचार छान जुळायचे. मात्र का कुणास ठाऊक त्यांच आणि माझं वय वाढू लागलं अन् हळूहळू विचार जुळेनासे होवू लागले. त्या बऱ्याच वेळा असं बोलत जसं मी कालच लग्न होवून आले. अन् मला काही स्वयंपाक घरातलं, सण-समारंभ, नाती-गोती यातले काही कळतच नाही. पण तरीही मी बरं… तुमचंच खरं म्हणून आली वेळ भागवत होते पण या नवरात्रीच्या आधी मात्र आमच्या दोघीत बरीच मत मतांतरे झाली. मी सासूबाईंना समजावून पण त्या ऐकायला तयारच नव्हत्या, घरात आमच्या माझा नवरा आणि दिर लहानपणी ज्या पाळण्यात झोपला तो पाळणा, त्यांनी चालायला वापरलेला लाकडी पांगुळगाडा, लाकडी खेळणी, लहानपणापासूनचे त्यांचे आणि ननंदबाईंच्या दुपट्यापासून लग्न होईपर्यंत वापरलेल्या कपड्यांची थप्पी. बापरे! मी तर वैतागले. एकतर ज्याला गरज आहे. त्याला देवू, नाही तर टाकून देवू. या दोन्ही गोष्टी तरी एकही गोष्ट त्यांना मान्य नव्हती. मग ज्याच्या वस्तू त्याला देवू या. यावर तर त्या खूप चिडल्या. तुला माझ्या लेकीच्या सामानाची अडचण होते का? आता काय बोलणार? मी एकच सांगितले.
‘एवढं धुणं-भांडी करायला कामवालीबाई अव्वाच्या सव्वा पैसे मागते अन् कपड्यांचं मशीन आपले नेहमीचे अन् हे वर्षानुवर्षे साठवलेले कपडे धुवून बिघडून जाईल. यावर त्याच म्हणाल्या,
‘मी तुझ्या मशीनला काय फाडायला कपडे अजिबात देणार नाही.’
काय करावे कळतच नव्हते. शेवटी मीच म्हणाले, ‘आपण कपड्यांचा दसरा काढतोय नात्यांचा नाही.’ यावर मी ऑफिसला गेल्यावर बरंच विचार मंथन झालं असावं उदास मनाने का होईना गरजवंताला वस्तू दयायला त्या तयार झाल्या. काही का असेना, ‘हे ही नसे थोडके.’