“रिना एवढ्या घाईत कुठे चाललीस’
‘अगं काही नाही. नवरात्राचे घट उठवायचे आहेत. परड्या भरायच्यात, नेहमी येणाऱ्या परडीवाल्या मावशी आज आल्याच नाहीत. म्हणून वाट पाहून घाईघाईने बोलवायलाच निघालेय.’
तिची घाई बघता मला कसेतरी वाटले. – दोघीही नौकरी करणाऱ्याच. माझ्या घरीही आज सण, एकत्र कुटूंबात राहणारी मी आज सणादिवशीही व्यवस्थित आवरून ऑफिसला निघाले होते. ऑफिसपासून घर तसे अर्धा-पाऊण तासाच्या अंतरावर. माझे ऑफिस दुसऱ्या मजल्यावर तर रिनाचे सातव्या मजल्यावर. पण कधी जर चुकून लिफ्ट बंद असेल तर मात्र मग खरी मजा होते. विचारात मी गुरफटलेली असतानाच मला रिना परडी वाल्या मावशीला घेवून जाताना दिसली. खरंतर आता सर्व देवदेव उरकून तिला यायला उशीर तर होणारच. रिनाने आज सखीला माझ्यासाठी फळं डब्यात द्यायला सांग असे सांगून ती घराकडे वळली. घाईत गडबड आणि गडबडीत घोटाळा नको म्हणून मी सखीला फोन केला व रिनासाठी डबा सांगितला.
उद्याचे काम आज आणि आजचे आताच या नियमाने नेहमीच मी वेळेपूर्वी काम करते, पण जर कोण उशिर करत असेल तर नियमाने वागणाऱ्या मला मात्र वाईट वाटते. आपण नेहमी म्हणतोच की क्षणाची किंमत अनमोल असते. क्षणाची किंमत ठरते, ती कोणत्या व्यक्तिचा हा क्षण आहे त्यावर. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनिअर आणि अशा बऱ्याच व्यक्ती. ज्या समाजासाठी महत्त्वाच्या असतात. त्यांचे क्षणही अनमोल असतात पण या उलट कामं नसलेली माणसं, व्यसनाधीन, गरीब माणसांनाही क्षणाची किंमत तितकिशी वाटत नसते. रिना माझी मैत्रीण एकाच सोसायटीत अन् योगायोगाने एकाच इमारतीत राहतो. दोघीही नौकरीला एकाच इमारतीत. शक्यतो आम्ही दोघी गाडीवर जातो. बऱ्याच सुख-दुःखाच्या गोष्टी एकमेकांला सांगतो. म्हणतात ना, जीवनात एक तरी मैत्रीण असावी. जी आपलं मन, आपली चलबिचल न सांगताही ओळखणारी. काही तरी झालेय हे न सांगता ओळखणारी असावी, अशीच होती रिना आणि माझी मैत्री. आमच्या घरी एकत्र कुटुंब. एकत्र कुटुंबात माणसं भरपूर त्यामुळे जबाबदाऱ्या कमी. पण तरीही कधी कधी रिनाच्या घरचं वातावरण मला छान वाटे. हम दो हमारा एक. अन् पहाता पहाता आम्ही दोघी आमचे अनुभव, मग ते चांगले असो किंवा वाईट एकमेकांना सांगत असू. रिनाच्या सासूबाई नेहमीच परंपरांना नको तितके महत्व देणाऱ्या व त्यामुळे रिना बरेच उपास तापास करत असे. बऱ्याच वेळा तर ऑफिसच्या जबाबदाऱ्या पेलवत असताना तिला या गोष्टींचा त्रास होई. पण सांगेल कोणाला आणि ऐकते कोण? खरं तर ठिक आहे, बऱ्याच परंपरा तुम्ही पूर्वापार चालत आल्या आहेत म्हणून त्याचा अर्थबोध करूनही न घेताच चालवत आलात आणि चालवत रहाता..
पण काही परंपरा पुढे नेत असताना त्याला शास्त्राचाही आधार आहे का? हे पाहिलेच पाहिजे. रिनाला सांगून सांगून तरी मी बरेच उपवास खडीसाखरेवरून फळांवर तरी नेले. ऑफिसमध्ये एका बाईला आम्ही जणू ऑफिसमधील लेडीज लोकांचे कंत्राटच दिले आहे. उपवासा दिवशी फक्त सरबत किंवा ज्यूस, इतर दिवशी काकडी, टोमॅटो इत्यादींचे सॅलड. तशी ती बाई आम्हाला हवी ती मदत करते. कधी कोणाला डबा आणायला जमले नाही तर ती तिला निरोप दिल्यावर डबा पण करून आणते. पैसे देवूनही कधी कधी कामे होतील की नाही ते सांगता येत नाही. पण आमची सखी सर्वांच्या मदतीला धावणारी. सखी आम्हाला भेटल्यापासून तिला आणि आम्हाला समाधान म्हणजे काय ते खऱ्या अर्थाने समजले. ती खेडेगावातून शहरात येवून पाच वर्ष झालं. गावाकडे जिराईत शेती होती, इतर कामं करणं कमीपणाचं. म्हणून सरळ तिने तिच्या बहिणीच्या मदतीने शहर गाठले. तिच्यासाठी कुठलीच गोष्ट अशक्य नव्हती. जेमतेम चौदावीपर्यत शिकलेल्या तिने एक-दोन ठिकाणी नौकरी केली पण राबण्याच्या प्रमाणात पगार मिळत नव्हता. म्हणून शेवटी आपल्या अवाक्यातला छोटासा व्यवसाय म्हणून तिने ऑफिसमधील फक्त फळं, सॅलड, ज्यूस यांचं पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट घेतलं. नंतर काम वाढू लागला तसा हळूहळू तिनं आपल्या हाताखाली बायका ठेवल्या, तिला बायका ठेवून नफ्याला कशाला वाटेकरी? असं विचारल्यावर ‘मॅडम माझ्यामुळे एक जणीचं घरं, कुटूंब व्यवस्थित चालत असेल तर काय हरकत आहे. तिच्या या वाक्यावरूनच तिचा समाधानी स्वभाव जाणवे. मी आणि रिना तर अलिकडे आपणच आपली काळजी घेतली पाहिजे, या तत्वानुसार सखीकडूनच भाज्या निट करून घेतो. म्हणजे ती नीट केलेल्या भाज्यांची पाकिटंच घेवून येते. मी तिला एकदा शंका विचारलीही,
‘जर नीट केलेल्या भाज्या विकल्या गेल्या नाही तर त्यांच काय करायचं?’
यावर मॅडम, नाही गेल्या तर रात्रीच्या मेसच्या डब्यांना वापरायच्या. रात्री मोजून ती पंचवीस डबे देत होती. यावेळी वेगळ्या मदतनीस बायका होत्याच. आम्हीही पोटासाठी पळत होतो आणि तीही. पण स्वतःच्या व्यवसायामुळं तिच्यावर कोणाची ताबेदारी नव्हती. तिनं स्वतःच स्वतःसाठी काही नियम लागू करून घेतले होते. तिनं या व्यवसायात स्वतःसह नवरा, चुलत दीर, जाऊ आणि बाहेरच्या तिघींना मदतीला घेतले हे सर्व अंक तिला कामात मदत करत. तर ही त्यांना आर्थिक सक्षम करत होती. गुणवत्तेच्या बाबतीत कधीही तडजोड ती करत नव्हती. ‘खूप काम वाढवून एक ना धड…’ असं करण्याची तिची भूमिका नव्हती. शेवटी कितीही कमवलं तरी पोटाची भूक किती असणार? माणसाला नाही तरी गरजेपुरतं अन्न, वस्त्र अन् निवारा मिळाला की झालं. शेवटी कोणी ढिगानं कमवले म्हणून काय फरक पडणार. माणूस मोकळ्या हाताने येतो आणि मोकळ्या हाताने जातो. सखी तिच्या कुटुंबासह मदत करणाऱ्या या सगळ्यांना घेऊन वर्षातून दोन सहली काढे. एक सहल खास देव देव करण्यासाठी म्हणून तर दुसरी सहल निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी. खरंच कामाची व्यस्तता माणसाने तेवढीच ठेवावी जेवढी त्याला पेलवण शक्य आहे. तिला आम्ही आर्थिक व्यवहाराबाबतीत बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या. तिनेही आनंदाने समजून घेतल्या शेवटी काय? समाधान कशात मानायचं हे ज्याचे त्याचे मापदंड वेगळे. सखी मात्र म्हणे जास्त काही नाही पोटापुरते झाले म्हणजे झाले.
विचारांचा जागर झाला म्हणजे अनेक प्रथा परंपरा आपोआप कमी होतील किंवा त्याला शास्त्रीय आधार आहे का हे तरी आजच्या नवदुर्गा नक्की पाहातीलच.