शंतनू
मी क्रिडांगण पार करून पटकन गाडीवरून घर गाठावं असं मनाशी ठरवतच शाळेच्या ऑफिसमधून बाहेर पडले होते. मी विचार करतच चालले होते. इतक्यात मला जाणवलं की, कोणीतरी माझ्यासमोर उभा आहे. मी माझ्या तंद्रीतच, त्याला न पाहता दुस-या बाजूने जावू लागले पुन्हा ती व्यक्ती माझ्या रस्त्यात उभी. छे! हा काय पोरकटपणा चाललाय. मी शिक्षिका होवूनही वीस वर्ष झाली पण या काळात असा अनुभव केव्हाच आला नाही. मी ज्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न करे. ती व्यक्ती त्याच बाजूने पुढे येई. मी एक जळजळीत कटाक्ष त्या व्यक्तिकडे टाकला. मला तर काय बोलावे तेच सुचेना. रस्ता अडवणारी व्यक्ती लहान म्हणजे अवघी अठरा एकोणीस वर्षाची असेल. मी रागात काही तरी बोलणार, एवढ्यात त्याने माझ्या पायांना स्पर्श केला. मला हे सारे वेगळेच वाटत होते. समोरची व्यक्ती पाया पडते म्हणजे तिला गैर अर्थ घेवून काही उलट- सुलट विचारायला नको वाटू लागले. समोरची व्यक्ती आदराने वागत असेल तर आपण तिला जरा शांतपणे विचारायला हवं. म्हणून मी विचारायला सुरूवात केली, “आपण कोण?”
एवढ्या वेळात माझ्या मनात चलबिचल सुरू झाली होती. हा चेहरा आपण कुठे पाहिल्याचं आठवेना. एवढ्यात ती व्यक्तीच बोलली,
“तुम्ही ओळखलंत ना मला? सहा वर्षापूर्वी मी शाळेत तुमच्या हाताखाली शिकलो.”
ती काही बोलणार तेवढ्यात माझ्या डोळ्यासमोर त्याचा सातवीतला चेहरा आठवला अन् मी जवळजवळ ओरडलेच,
“शंतनू, केवढा मोठा झालास? पहिल्यापेक्षा खूप वेगळा दिसतोस. परंतू आता मला तुझा पहिला चेहरा चांगलाच आठवला.”
त्याने बोलायला सुरूवात केली, “बाई, तुम्ही मला ओळखलंत. मला खूप आनंद झाला. मी तुमच्या हाताखाली खूप चांगल्या संस्कारीत गोष्टी शिकलो.”
शंतनू जेव्हा आमच्या शाळेत आला, तेव्हा फक्त साडे तीन वर्षाचा होता. माझ्या हाताखाली तो पहिलीपासून होता. तो खूप विनम्र, विनयशील, प्रामाणिक होता. हे त्याला पहाणा-या प्रत्येकाला जाणवत असे.
” सध्या तू काय करतोस? आणि तुझ्या घरचे सर्व व्यवस्थित आहेत का?”
“बाई, मी बारावी विज्ञान शाखेची परिक्षा दिली. मला ८० टक्के गुण मिळाले. मला एम बी बी एस ला प्रवेश मिळाला आहे.” त्याच बोलण ऐकल्यावर मला खूप आनंद झाला. मी त्याचं अभिनंदन केलं. माझा विद्यार्थी डॉ. होणार ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. कारण माझी शाळा कामगार वस्तीत भरत होती. तिथे रहाणा-या ब-याच जणांची परिस्थिति नाजूकच असे. त्याच्या यशातच माझे यश होते. त्याला घरी येण्याचे आमंत्रण देऊन मी त्याचा निरोप घेतला. तरीही त्याच्या गतकाळातील आठवणींनी मन भरून आले होते. त्याने निरोप घेण्यापूर्वी आठवणीने स्वत:चा फोन नंबर दिला, माझा ही घेतला. त्याचे कॉलेज सुरू झाल्यावर एक दोनदा त्याने फोन केला. त्याचे यश पाहून सर्वच शिक्षकांना खूप आनंद झाला.
“शिक्षकांना कोणत्याही पुरस्काराची गरज नसते. शिक्षकांना खरा पुरस्कार त्यांचे शिष्यच देत असतात. शिष्य कतृत्ववान निघाले की आपोआप शिक्षकांची मान उंचावते.”
शालेय जीवनात शंतनू लोकप्रिय होता. त्याचा स्वभाव अन् हुशारपणा यामुळे त्याच्याभोवती सतत मित्रांचा गराडा असे. प्रत्येक स्पर्धेत यशस्वी होणे, यश मिळवण्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची तयारी या सर्व गुणांमुळे, तो नेहमी यशाचे दार ठोठावून यश मिळवीत असे. त्याचे अक्षर मोत्यासारखे नव्हते पण सुवाच्य असल्याने छान वाटे. घरीही तो आजी आजोबांचा लाडका होता. कोणालाही आवडावा असाच होता. पण वाईट एक गोष्टीचं वाटे, त्याचे आई-वडील त्याच्या लहानपणीच वारले होते. मातृपित्रृ छाया तो दोन वर्षाचा असतानाच हरवली होती.
शंतनू व त्याचे आई-वडील उन्हाळ्याच्या सुटीत थंड हवेच्या ठिकाणी खाजगी वहानाने सोलापूरहून निघाले होते. कारमध्ये फक्त चार व्यक्ती . शंतनू,आई, बाबा व कार चालक. पहाटेची वेळ असावी तेव्हा गाडी पुण्याच्या पुढे घाटात असताना चालकाला झोप येऊ लागली. परंतू लोणावळा गाठण्यासाठी काही तास राहिले होते. लोणावळा गाठण्याच्या विचारात झोपेचा विचार त्याने झटकला. मुक्कामी पोहोचल्यावर विश्रांती घेवू असे ठरवले. मात्र खरा घोळ इथेच झाला. शेवटी व्हायचं तेच झालं, ब्रेक दाबल्याचा प्रचंड आवाज आल्याने शंतनूचे आई बाबा जागे झाले. त्यांच्या पापण्या आणखी उघडतच होत्या, तो क्षण पुढे सरकतो न सरकतो तोच गाडी घाटात असताना कंटेनरला मागून जोरात धडकली. जागीच दोन व्यक्ती ठार झाल्या. शंतनूचे बाबा अन् चालक दोघांनीही या जगाचा निरोप घेतला. शंतनू व आई वाचली, परंतू आईही गंभीर जखमी झाली होती. तिने आपल्या बाळाला पोटाशी घट्ट पकडून ठेवले होते. पोलिसांची मदत घेवून त्याला व आईला पटकन दवाखान्यात पोहोचवले. आईची चौकशी केल्यावर पोलिसांना घरचा पत्ता मिळाला. शंतनूच्या आईने भीषण अपघात पाहिलाच सोबत स्वत:च्या नव-याचे मरणही प्रत्यक्ष पाहिले. या धक्क्यातून ती सावरू शकली नाही. अपघातानंतर अवघ्या चार पाच तासात तिनेही या जगाचा निरोप घेतला. आपल्या चिमुकल्याला तिने प्राण सोडताना कवटाळून धरले होते. पण ‘नियतीचे चक्र कोणीही थांबवू शकत नाही, किंवा बदलू शकत नाही.’ तेव्हापासून शंतनूसाठी आजी-आजोबा हेच आई बाबा पण होते.
आजी-आजोबांच्या मायेच्या पंखाखाली तो व्यवस्थित वाढला. पण कधी बोलण्यातून आई-बाबा नसल्याचे दु:ख त्याने जाणवू दिले नाही. एके दिवशी तासाला मी ‘आई’ या विषयावरील कविता शिकवत असताना अचानक मुसमुसण्याचा आवाज येवू लागला. मी चौफेर नजर टाकली असता शंतनूचे डोळे पाहून मी ओळखले. खरंतर त्याचं दु:ख पाहून मला सुद्धा भरून आले पण दुस-याच क्षणी मी स्वत:ला सावरले. प्रत्येकाच्या जीवनात दु:ख असतंच पण वेळप्रसंगानुसार ते उफाळून बाहेर पडते. घुसमटलेल्या मनाचा कोंडमारा कधी ना कधी दूर होत असतोच. खरं तर शिकवत असताना असं कोणाचं मन दुखावल्या जाईल याची मला कल्पनाच नव्हती. पण नकळत हे घडलं होतं. त्याला गोड बोलून मी त्याची समजूत घातली. ब-याच वेळा दैवी खेळांपुढे आपण हरतो. दैवी शक्तींपुढे नतमस्तक होतो. या घटनेपासून त्याच्याविषयी जास्त आपुलकी वाटू लागली. कोणाशी कसं वागावं याचं गणित त्याला छान जमत असे. मोठ्यांशी आदरभाव नेहमी त्याच्या वागण्यातून जाणवत असे.गरीब मित्रांना मदत करण्यात त्याचा हातखंडा होता. हातचं राखून मदत करणे त्याला जमत नसे. प्राथमिक शाळेत तर त्याने सर्वांना आपलंस केलं होतं. त्याच्या व्यक्तीमत्वाचे बरेच पैलू याच काळात फुलत गेले.
वर्षामागून वर्ष निघून गेली. त्याचा चुलतभाऊ आमच्या शाळेत शिकत होता. अचानक एके दिवशी मधल्या सुट्टीनंतर त्याची बहिण शाळेत रडतच त्याला बोलवायला आली. त्याला आत्ताच्या आत्ता घरी चल म्हणू लागली. कारण विचारले असता,’शंतनू, शंतनू सोडून गेला.’ एवढंच म्हणत होती. मला तर काहीच अर्थबोध होईना. ‘कोणत्या गावाला गेला का ?’
‘नाही.’
‘मग निघून गेला का?’
‘हो’
‘कुठे ?’
‘गावाला नाही.’
‘मग’
मगतर ती जास्तच रडू लागली. एवढ्या वेळात सर्व शिक्षक तिथे गोळा झाले. सर्व चौकशी अंती शंतनू हे जग सोडून गेल्याचं कळालं. कुणीतरी उंच डोंगरावरून दरीत जोरात ढकलल्याचा भास झाला. नियती एवढी क्रुर होऊ शकते का? बरं तो आजारी असल्याची किंवा त्याला एखादा आजार असल्याची खबर याआधी ऐकण्यात आली नव्हती. मग असं अचानक काय झालं? अनेक प्रश्न मनात घोळू लागले. शाळेत माजी विद्यार्थी गेल्यामुळे दु:खाची अवकळा पसरली होती. क्रिडांगणावर मौन पाळून श्रध्दांजली वाहिली. नंतर आम्ही सर्वजण अंत्यविधीसाठी गेलो. एवढ्याशा वयातही त्याने किती माणुसकी कमावली, हे गर्दीवरून लक्षात येत होते. आजी-आजोबांच्या दुःखाला पारावार उरला नव्हता.” अलगद फुलवलेलं कोवळं फूल पूर्ण उमलायच्या आतच आपला सुगंध पसरवून कोमेजले. योग्यवेळी केलेलं कार्य सिध्दीस नेतं. पण अवकाळी येणा-या पावसानं सर्वांचंच नुकसान होतं.’
काळरूपी दु:खही तसंच असतं. एकमेकांचं सांत्वन, विचारपूस, चौकशी सुरू होती. त्यातूनच शंतनूच्या मृत्यूचं कारण उघडकीस आलं. शंतनूचा चुलतभाऊ अनिकेत दवाखान्यात ताप आल्यामुळे होता. ताप मेंदूपर्यत पोहोचला होता. त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. शंतनूलाही एके दिवशी अचानक ताप चढला. त्यालाही त्याच दवाखान्यात दाखल केलं. बघता बघता ताप खूप चढला, अनिकेतचा कमी होवून त्याचा वाढला. डॉक्टरांनी व्हायरल इनफेक्शन म्हणून विविध तपासण्या केल्या. डॉक्टरांचा उपाय चालेना. तापात शंतनू बडबडू लागला.
‘आजी, तू सर्वांना सांभाळ . मी डॉक्टर झालो नाही तरी अनिकेतला डॉक्टर करा. मी आता आई-बाबांकडे चाललो. मला तुम्ही सर्वजण आवडता. आजी तू आजोबांची काळजी घे, त्यांना आधार दे. ते खूप हळवे आहेत.’
एवढं बोलून त्याच्या डोळ्यातून टपाटप अश्रू पडू लागले. काही दिवसातच त्याचा ताप मेंदूपर्यंत चढला. आज तो आमच्यात नव्हता पण तरी त्याचं अस्तित्व जाणवत होतं. त्याचं रेखाचित्र मन:चक्षू समोरून हालत नव्हते. आजही त्याची विनयशील मूर्ती डोळ्यासमोर उभी रहाते ‘काही दिलं त्यानं, पण जाता जाता दोन अश्रूही देवून गेला कायमचे.’
सौ.आशा अरूण पाटील सोलापूर