अट्टाहास

अट्टाहास

          सुनंदा सकाळपासून बेचैन होती. तिला आपल्यात काही तरी वेगळे जाणवत होते. सतत चक्कर अन् अधूनमधून कोरड्या उलट्या. यामुळे तिला जीव नकोसा झाला होता. घरातील सर्वजण अस्वस्थ होते. सासूबाईंना घेऊन ती दवाखान्यात गेली. दवाखान्यात त्यांना बराच वेळ लागला. दवाखान्यात बरीच गर्दी होती. घरी सारेजण चिंतेत होते. लीना तर सारखी आईला फोन करून वहिनीविषयी विचारत होती; पण जेव्हा दोघीही घरी परतल्या अन् घरामध्ये आनंदाची लकेर उमटली. सुरेशला आपल्या घरात पाहुणा येणार याची बातमी समजताच, त्याने आनंदाने घर डोक्यावर घेतले. लीनाला पार्टीसाठी म्हणून पाचशे रूपये दिले. गोड बातमी येणार काय आणि आली काय एकूण एकच असं मानून सर्वांचं तोंड गोड केलं. त्याचे दोनाचे चार हात होऊन पाच-सहाच महिने झाले होते; परंतु त्या चाराचे सहा केव्हा होतात म्हणून तो बऱ्याच दिवसापासून वाट पहात होता. लग्नाला काहीच महिने झाले होते; पण लोकांच्या चौकशीला घरातला प्रत्येकजण आरी पडला होता. घरातही कुजबूज होतीच; पण शेवटी काय, देवाने मनावर घेतलं तर, आमचं घर वंशाच्या दिव्याने उजळेल. असे अनिताबाईंचे म्हणणे होते. सुरेशला आईचे म्हणणे पटत होतेच. रामराव मात्र आपल्या घरात नात किंवा नातू काहीही चालेल या मताचे होते. दिवा असो वा पणती दोघेही घरासाठी शुभदायक असतात, अशा विचारांचे होते. घरातील सर्वांची प्रतिक्षा संपली. तिचे रूपांतर आनंदात झाले.

                 सुनंदामध्ये होणाऱ्या बदलांमुळे ती अंतर्मुख झाली. आपण आई होणार या भावनेनं पुलकित झाली. आपण एका जिवाची आई होणार, हा जीव आपला, आपल्या नवऱ्याचा अंश असणार. खरंच तो कसा दिसेल? कसा असेल ? कसा वागेल ? या दिवास्वप्नात सुनंदा रममाण व्हायची. तिने आपला असा दिनक्रम ठरवला. फिरायला जाणे, व्यायाम करणे, संस्कारक्षम पुस्तके वाचणे, योग्य व सकस आहार घेणे. तिने सर्व बाजूंनी आपल्या मनाची व शरीराची तयारी केली. या सर्व गोष्टींमध्ये  तिला बघता बघता तीन महिने झाले. सुनंदाची काळजी प्रत्येकजण घेत होता. तिची उठता बसता विचारपूस करत होता. काय हवं, काय नको पाहत होता. ती दोघेही नोकरी करत होती. तिच्या ऑफिसमध्ये तिला पोहोचवणे,  आणणे, आठवण आली की फोन करणे. या सर्व गोष्टी तो मन लावून करत होता. नेहमी घरात सुकामेवा, फळं, पौष्टिक पदार्थांची रेलचेल असे. आपलं स्वप्न सत्यात उतरणार म्हणून तो भलताच खुश होता.

                        त्याच्या मित्र कंपनीची एका रविवारी भेट झाली. तसंतर ते महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ठरवून एकत्र येत असत. त्यांचा सात जणांचा ग्रूप होता. त्याने ही आनंदाची बातमी सांगितली अन् त्यांच्यामध्येही आनंदोत्सव झाला. पार्टी करूनच तो घरी परतला. मात्र दुसऱ्या दिवसापासून सुनंदाला दवाखान्यात चल म्हणून मागे लागला. खरंतर नेहमीच्या तपासणीसाठी म्हणून दवाखान्यात नाव नोंदविले होते ; पण हा मात्र सुरेशचा भलताच हट्ट चालला होता. त्याला पुत्ररत्न असावं असंच वाटत होतं. त्याच्या मित्र कंपनीमध्ये सर्वांना मुलं होती. मलाही मुलगाच हवा असा त्याचा अट्टाहास चालला होता. सुनंदा मात्र भलतीच काळजीत पडली होती. तिने तपासणी करून घ्यायला नकार दिला होता. तिने घरातील सर्वांना सुरेशचा अट्टाहास सांगितला होता. सर्वजण मात्र आश्चर्यचकित झाले. सुरेशची आई फक्त त्याच्या बाजूने होती. बाकी सर्वजण सुनंदाच्या मताचेच होते. सुनंदाला आपल्या पाठीशी बहुमत आहे, हे कळल्यावर तिने सुरेशला आपले मत हिमतीने सांगितले. सुरेश मात्र ध्रूव बाळासारखा आपल्या निश्चयावर अढळ होता. त्याने घरात मौनव्रत धारण केले. कामापुरतंच बोलायचं, कोणी बोलायचा प्रयत्न केला तर चिडचिड करायची. यामुळे घरातील लोकांना ताण जाणवू लागला. सुरेशचा हाही प्रयोग तेवढा काही यशस्वी झाला नाही. म्हणून त्याने नामी योजना आखली. जेवण करताना तो काही ना काही कारण काढून ताटावरून उठून जाई. कामापुरतंच बोलायचं, कोणी बोलायचा प्रयत्न केला तर या सर्वाचा परिणाम म्हणून सुगंधाने नाईलाजाने गर्भलिंग तपासणी करून घेण्याचे ठरविले. परंतू त्यापुढील निर्णय हा मीच घेणार हेही ठामपणे सांगितले. तसा तर सुरेश तयार नव्हता; पण सर्वांपुढे त्याचा नाईलाज झाला. बघू तरी काय होतंय ते, या विचाराने तो तयार झाला.

                           दिवस ठरवून तपासणी करायची म्हणून तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी सुरेश- सुगंधा  या दोघांना बसवून तूम्ही असा निर्णय का घेताय? आणि मुलाचा निर्णय नक्की कोणाचा? हेही विचारले. सुगंधाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या एकंदरीत सगळी परिस्थिती लक्षात आली. त्यांनी प्रथम आपला निर्णय सांगितला की, आपण गर्भलिंग तपासणी करणार नाही. कारण ही सोय फक्त मुलगा आहे की मुलगी यासाठी वापरली जाऊ लागली, हे चुकीचं आहे. खरंतर या तपासणीमुळे बाळांमध्ये काही वेगळेपणा आहे का ?  बाळाची सद्यस्थिती या सर्वांसाठी सोनोग्राफी केली जाते; परंतु समाजाने त्याचा हवा तसा वापर करून घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सुरेशच्या मनातील मुलींविषयी जो विरोध आहे तो काढून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, जिजाबाई, झाशीची राणी, गार्गी मैत्रेयी, सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, प्रतिभा पाटील या सर्व महिलांचा आदर्श समाजाने का व कशासाठी घ्यावा हे तर सांगितले; पण त्या महिलाच होत्या हेही विसरणे चुकीचे आहे. हेही समजाविले तुमच्या घरात तुमची आजी, आई,बहीण, वहिनी, बायको या सर्व स्त्रियाच आहेत. त्या सर्वजणी नसल्या तर जीवन पूर्णत्वाला गेल असतं का? शेवटी या जीवनाचं हे सत्य आहे की एक स्त्री एक पुरुष हे नातं असल्याशिवाय विश्वाची निर्मिती होणार नाही. आज प्रत्येकाने मुलाचा अट्टाहास केला तर विश्वाचे संतुलन बिघडेल मुली मुलांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून कार्य करतात.  हरेक क्षेत्रात प्रावीण्य मिळवितात, कौशल्य मिळवितात. मग आपण त्यांना कमी का लेखता किंवा गळ्यात  ओझे का समजतो. राजकारणासह इतर अनेक क्षेत्रात त्या अव्वल दर्जा प्राप्त करतात. मग मुलांचा अट्टाहास का ? डॉक्टर एका संस्थेचे चेअरमन होते. त्या संस्थेतर्फे जीव्हाळा. नावाचा एक वृद्धाश्रम चालवला जाई. यामध्ये चाळीस वृद्ध होते. डॉक्टरांनी सुरेशला जिव्हाळामध्ये आमंत्रित केलं. हा दिवस म्हणजे त्रैमासिक मीटिंगचा. या दिवशी तीन महिन्यांनंतर आपल्या आई बाबांना त्यांची मुले भेटत. सुरेश वेळेवर जिव्हाळामध्ये गेला; परंतु त्याच्या लक्षात आले की त्या दिवशी चाळीस पैकी फक्त बोटावर मोजण्याइतकी मुले- मुली आपल्या आई बाबांना भेटायला आले होते. प्रत्येकाने काही ना काही कारण सांगून येण्याचे टाळले होते. आलेल्यांपैकी मुलींचे प्रमाण जास्त होते. मुले एक दोन होती. एका आजोबांनी आपला अनुभव कथन केला त्यांना चार मुले एक मुलगी. आयुष्यभर चिकाटीने संसार करून मुलांना शिक्षण दिले. एक मुलगा अमेरिकेत, एक चेन्नई, एक दिल्ली तर एक कॅलिफोर्नियाला. मुलगी कोल्हापूरला दिल्या घरी सुखी होती. या चार मुलांना आई वडिलांना सांभाळणे होत नाही म्हणून चौघांनी मिळून त्यांना वृद्धाश्रमात ठेवले होते; पण वर्ष सहा महिन्यांत देखील भेटायला येत नव्हते. मुलगी आई वडिलांना आपल्या घरी ठेवू इच्छित होती. मात्र आई वडिलांचा स्वाभिमान आडवा येत होता. मुलगी दर तीन महिन्याला येऊन भेटून जात होती. हे सर्व ऐकल्यावर सुरेशला वास्तवाचे भान आले. सुरशचे डोकं सुन्न झालं. आपण करतोय तो अट्टहास किती चुकीचा आहे. हे लक्षात आल्यावर तो शांत झाला.दोन चार दिवस तो विचार करतच होता.

 एके दिवशी मात्र त्याने घरातल्या सर्वांसमोर आपला निर्णय जाहीर केला. येणाऱ्या बाळाचे आपण मनापासून स्वागत करणार आहोत. मग तो मुलगा असो वा मुलगी सुरेशच्या निर्णयामुळे वातावरण स्वच्छंदी उत्साहवर्धक वाटू लागले. सुगंधा सुरेश आपल्या भविष्याच्या स्वप्नात सप्तरंगी इंद्रधनूत  हरवून गेले.

                   सौ आशा अरुण पाटील     

                           

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!