वेळ

आज मी गडबडीने स्वयंपाक केला. घाईघाईने सर्वांना व्यवस्थित जेवायला वाढले, आपलं आटोपलं. आता दोन घास खावे ठरवून स्वतःला घेतलं आणि सासूबाईंना गोळ्या द्यायच्यात हे आठवलं. तेवढयात ऑफिसमधील सेजलजचा फोन.
गाडी बिघडल्याने तिला ऑफिसला जाताना घेवून जायचे होते. म्हणजे दोन घास खायला देखील आज जमणार नव्हते. कालचा उपवास असल्याने भुक लागली पण खात बसले तर ऑफिसला जायला उशिर होणार, असा विचार करतच मग मी शार्विलचा, धनुषचा आणि स्वतःचा डबा भरला. धनुषला, शार्विलला शाळेत सोडून मग ऑफिसला जावे लागणार होते. मी घाईत सर्व आवरले अन् निघणार तेवढ्यात मला चक्कर आली. समोर अंधार दिसू लागला. चक्कर आल्याने आई गं… म्हणून ओरडल्याने घरातील सर्वजण माझ्या दिशेने पळाले. कोण पाणी देत होतं, तर कोणी घाम पुसत होते, तर कोणी पंख्याचा वेग वाढवत होतं. शार्विलने तेवढ्या गोधळातही विचारलेच,


‘आई, तू न्ह्यारी केलीस.’

त्याचं वाक्य ऐकून तिचे डोळे भरून आले.
मी तुमच्या सारखीच एक मैत्रीण. मैत्रीण म्हणण्याचे कारण सध्याच्या युगात वावरणाऱ्या आम्ही तुम्ही सुपर वुमन बनण्याच्या नादात गोंधळून जातोय, स्वतःविषयी जागरूक न राहता, स्व-अस्तित्वासाठी झगडतोय. आपण आपल्या पायावर उभारून सक्षम असलेच पाहिजे हे सिद्ध करताना भोवतालच्या सर्वांचे करतोय पण या सर्वांमध्ये स्वतःला विसरून जातोय. इतरांनी जमेत धरणं, न धरणं आपल्या हातात नाही पण आपण स्वतःला महत्व दयायचे की नाही हे तरी आपल्याच हातात आहे ना? आपण हे हेतूपुरस्कर दुर्लक्ष करतो.

आपण स्वतःला विसरतो पण आपल्या घरातीलही सर्वजण रितसर विसरतात हे खूप मोठं दुःख आहे. मला सकाळी उठल्यापासून रात्री अकरापर्यंत एखादया चक्रात अडकल्यासारखं वाटतं. एक गृहिणी, ती कुणाची तरी सुन, बायको, आई असते. या प्रत्येक नात्यांविषयी तिची काही कर्तव्य असतात. ती या कर्तव्यात गुरफटून जाते. स्वतःविषयी ती कधीच जागरूक नसते. तिला स्वतःला जपणे माहित नसते. पण तिच्या घरच्यांनी तिने खाल्ले का ? विचारावे, तिने केलेले पदार्थ, केलेल्या नाविन्यपूर्ण कृतीचे कौतुक करावे असे तिला वाटत असते.

मलाही या घरात स्वतःचं अस्तित्व हवं आहे. माझ्या खुप मोठ्या अपेक्षाही नाहीत. अगदी साध्या सोप्या आणि आवाक्यात असणाऱ्या अपेक्षा आहेत. दररोजच्या घाई गडबडीत मला घरातील सदस्यांनी थोडी मदत करावी. ही मदत केल्याने मला स्वत:साठी वेळ मिळेल. या वेळेमध्ये मी स्वतःच्या मनाचे व तनाचे आरोग्य जपेन, तसे तर मी वेळेचा सदुपयोग व नियोजन याबाबत खूप काटेकोरपणे नियम पाळते. आठवड्याच्या भाज्या कोणत्या करायच्या, त्या बाजारातून आणून स्वच्छ करून, नीट करून ठेवणे, आठवड्यात एखादा नवा पदार्थ करायचा असेल तर त्याचे नियोजन, तयारी करते. आठ दिवसासाठी लागणारा दाण्यांचा कुट, चटण्या तयार ठेवते. दळणं आहेत का? पहाते. काहीतरी खायला हवे म्हणून चिवडा, लाडू किंवा शंकरपाळी असे पदार्थ करून ठेवते. दर रविवारी सर्व घर झाडून झटकून स्वच्छ करते. हे सारं करताना माझा सुट्टीचा वेळ क्षणात निघून जातो.

मला हे सारं करताना स्वत: साठी काही वेगळे करावे हेही लक्षात येत नाही. रविवार आज सुट्टीचा दिवस म्हणून शार्विल, धनुष उशिरा उठतात. उठल्यावर त्या दोघांनाही सुटीच्या दिवशी अंघोळीला घाई केलेली आवडत नाही. दोघंही थोडीफार न्ह्यारी केल्यावर मैदानावर जातात. शार्विलचे खेळण्यासाठी तर यांचे मित्र सायकलवरून भटकंती करतात. घरात त्यादिवशी प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे सुट्टी घालवतो. सासू-सासरेही आपली अंघोळ, पूजा, न्ह्यारी आटोपून घराजवळील मंदिरात जातात. दररोज तुझ्या ऑफिसमुळे जमत नाही. आज तरी देवाला जाते. म्हणून सांगून वेळेवर जेवायला येतो हेही सांगायला विसरत नाहीत. माझं बाकीचे आवरून होईपर्यंत सासूबाईंनी न्ह्यारीची नुसती तयारी केली तरी… पण छे. उलट त्या मला एकतर दिवस बाहेर जायला मिळतं. इतरवेळेस घरात बांधून घेवूनच बसावे लागते. अशी तक्रार करतात. तू ऑफिसला निघून जातेस मागे बाईला भांडे देणे, दुपारी जेवण वाढून घेणे, शार्विलला दुपारी शाळेतून आल्यावर काय हवं काय नको पहायचं, त्याच्यासोबत खेळायचं बरीच कामं असतात. एखादा पाहुणा आला तर पाहुणचार करणे आलेच. तू काय नोकरी करतेस या नावाखाली सर्वच माफ. सगळ्याचं सगळं खरं पण माझी शारिरीक आणि मानसिक होणारी ओढाताण कोणीच समजून घेणार नाही का? कमीतकमी स्वतः सोबत नाही तर स्वतःचे झाल्यावर तरी आठवणीने तू खाल्ले का? अगं वेळ नसेल तर कमीत कमी दूध पी. नाहीतर आम्ही काही मदत करु का? एखादा पदार्थ आवडला तर लगेच प्रतिक्रिया दिली तर करणाऱ्यांचा उत्साह द्विगुणित होतो. एवढंस माझं लेकरू पण आईला चक्कर आली म्हणजे तिने काही खाल्ले नसेल हे त्यांच्या लक्षात येतं. पण…
मला तोंडावर पाणी मारलं आणि थोडीसी फळे खाऊ घातल्याने बरंस बरं वाटू लागलं. मी ऑफिसला जाण्यासाठी उठले तसं आजच्या दिवस विश्रांती घे असं आई म्हणाल्या. पण आज महत्वाचं काम आहे मला जावेच लागेल असं सांगितल्यावर धनुषला तू तिला ऑफिसला सोडव असं माझ्या समोर त्यांनी यांना सांगितले. त्यांनी आग्रहाने सांगितले.
मला ऑफिसवरून यायला वेळ लागला. घरात पाय ठेवताच खिचडीचा खमंग वास सुटला होता. मला तर आश्चर्याचा धक्का बसला. जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने कामाची वाटणी मला सांगितली. मला शार्विलसह सारेच जण मदत करणार होते. मला स्वतः साठी वेळ मिळावा यासाठीच हे नियोजन होते. एकामागून एक आश्चर्याचे धक्के बसत होते. मला चक्कर आल्याने झालेला बदल असावा हा. पण शेवटी काय उशीरा का होईना देव पावलाच म्हणायचं.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!