गीताने चेहऱ्याला स्कार्फ बांधला. अन् ती गाडीची चावी पर्समध्ये शोधू लागली. दोन तीन कप्पे धुंडाळले, तरीही चावी काही सापडेना. शेवटी तिने पुन्हा एकदा मोबाइलचा कप्पा शोधला. अन् काय नवल, तिथे चावी होती. काही क्षणापूर्वी तिने हाही कप्पा शोधला होता. तिला घाई झाली म्हणजे नेहमीच असे वाटे की, खरंच चावीलाही मोबाइलसारखी रिंगटोन सिस्टीम हवी, म्हणजे घाईच्या वेळेस ती पटकन सापडेल. तिने गाडीला चावी लावून गाडी स्टॅन्डवरून काढली. अन् तेवढय़ात तिच्या पाठीवर काहीतरी पडलं. त्यासरशी ती दचकली. आपल्या पाठीवर काय असेल या कल्पनेसरशी घाबरून दोन्ही हातातून तिने गाडी सोडून दिली. तिची नजर वर गेली. वरच्या गच्चीवरून एका आजीबाईंनी तिच्या अंगावर लाकडी पट्टी टाकली होती. खरं तर प्रथम तिला त्यांचा खूप राग आला; पण शेवटी काय करायचं. तिथं जाऊन ती भांडू शकत नव्हती. एक तर ते तिच्या स्वभावात बसत नव्हतं. दुसरं म्हणजे ते तिला शोभलं नसतं; पण एक गोष्ट तिच्या लक्षात आली. आजीच वय साधारण साठच्या आसपास असेल. तसा त्यांचा पेहराव नव्हता. त्यांच्या अंगावर गाऊन होता. केसांचा धड बॉयकट नव्हता अन् बॉबकट ही नव्हता. वयाच्या मानाने त्या जास्त थकल्या सारख्या वाटत होत्या. त्यांच्या मुखातून एक सलग काही तरी शब्द बाहेर पडत होते. त्या
‘या, या बोला, बोला.’
एवढेच चार शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत होत्या आणि हातवारे करून जवळ येण्याविषयी खुणावत होत्या. त्यांची अशी अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटले. तिने त्या बंगल्याच्या वॉचमनला त्या बाईंविषयी विचारणा केली. तशी त्याने सांगितलेली माहिती ऐकून तर ती सुन्न झाली. त्यांच्याकडे पहात बऱ्याच वेळ उभी राहिली. विमल मॅडम म्हणून त्या विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रिय शिक्षिका होत्या. विमल शामराव धायगुडे, यांनी आपले पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून मग बी.एड. करण्याचा निर्णय घेतला. अभ्यासात हुशार असणारी विमल विद्यालयातही तिच्या इंग्रजी विषयात गोल्ड मेडलिस्ट ठरली होती. पुढे जाऊन आपण ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होण्याचा मानस तिने बाबांना बोलूनही दाखवला. घरात ती सर्वात मोठी होती. तिच्या पाठची दोन भावंडे राम आणि राधिका.
रामने ही उज्ज्वल यशाची परंपरा टिकवली होती. अन् राधिकाही या गोष्टीला अपवाद नव्हती. राम दहावीला तर राधिका आठवीला. भावंडांपेक्षा ती बरीच मोठी आणि हुशार असल्यामुळे, तिच्याशी प्रत्येकजण आदराने वागे. विमलला सहजच बी.एड. ला अॅडमिशन मिळाले. तशी ही गोष्ट काही जास्त अवघड नव्हती; कारण तिची गुणवत्ता. तिचे बी. एड. सुरू झाले. अन् तिने आपण विद्यार्थ्यांना कसे घडवू किंवा कसे घडविणार याची स्वप्नं पाहायला सुरुवात केली. तिची शिकण्याची जशी हातोटी होती, तशीच शिकवण्याची सुंदर कला तिला अवगत होती. बघता बघता तिने सर्व कौशल्य अवगत केली. तिला कधी एकदा आपण नोकरीला लागतो असं झालं होतं. घरात तिच्या प्रगतीवर आई बाबा भलतेच खूश होते. ती एक आदर्श शिक्षिका होण्याचे स्वप्न, ते दोघे पाहत होते. कधी तरी ते तिच्या लग्नाचा विषय तिच्या पुढे काढंतही; पण विमल खूप चिडत असे. लग्नाचे नाव काढले की, बाईसाहेबांचा मूडच बिघडत असे. बघता बघता वर्ष सरले. अन् ती एका हायस्कूलमध्ये सहशिक्षिका म्हणून हजर झाली. शाळेचे वातावरण, विद्यार्थी यामध्ये ती छान रमली. एक मात्र खरे, शिकत असताना तिला शिक्षकीपेशा व विद्यार्थी या बाबतीत वेगळीच कल्पना होती; पण अनुभवानंतर शालेय जीवनातील शिक्षकांच्या तसेच विद्यार्थ्यांमधील अतूट नात्यातील दुरावा, वचक, दहशत हे सर्व तिच्या लक्षात आले. या सर्वांवर मात करायची तिने ठरविले आणि करूनही दाखविले. थोड्याच अवधीत ती लोकप्रिय शिक्षिका झाली. तिने आपल्या पहिल्या पगारातील काही रक्कम घरच्यांसाठी अन् काही रक्कम आपल्या प्रिय विद्यार्थ्यांसाठी खर्च केली.
एकंदरीत सर्व छान चालले होते. राम ही आता बारावी सायन्समध्ये शिकत होता. राधिका आता परीक्षेची मन लावून तयारी करत होती. विमलने आपल्या पगारातील काही रक्कम खर्च करून, एक दुचाकी खरेदी केली. आता तिच्या वडिलांना तिच्या आर्थिक हातभाराची गरज नव्हती; पण तरीही ती हट्टाने सर्व पैसे घरातच देत होती. तिच्यासाठी स्थळ पाहायला आता घरच्यांनी सुरुवात केली होती. तिचे लोभस व्यक्तिमत्व अन् कतृत्वामुळे स्थळांना काही कमी नव्हती. अनेक स्थळे सांगून आली होती. आता फक्त विमल वरच सर्व काही अवलंबून होते. बघता बघता विमलनेही नको होय करत, करत लग्न करायची तयारी केली होती. अन् बँकेतल्या मॅनेजरने स्थळ तिने पसंत केले. खरं तर प्राध्यापक, हायस्कूल टिचर ही अनेक स्थळं आली होती; पण तिला बँकेतल्या मॅनेजरचे स्थळ स्वतःसाठी योग्य वाटले. बोलाचाली करण्यासाठी मंडळी वटपौर्णिमेच्या सनानंतर मुहूर्त पाहून येणार होती. तसं तर लग्न जमल्यातच जमा होतं. फक्त शेवटची महत्त्वाची बैठक झाली की झालं. सण दोन दिवसांवर आल्यामुळे आईची सणाची लगबग सुरू झाली. आईला घरात स्वच्छता अन् टापटीप लागे. वटपौर्णिमेदिवशी आईने खास लग्नात घेतलेला शालू घातला होता. नथ, अंबाडा, त्यावर गजरा, हातभर हिरव्या बांगड्या अन् कपाळावर उगवतीचा सूर्य भासावा असा कुंकवाचा सूर्यगोल. तिची सर्व तयारी झाली होती. आज राम अन् राधिका दोघेही विमलला सारखी चिडवत होती.
‘ ताई, तू पण जा ना आईबरोबर. अनिकेतरावांसारखा बँक मॅनेजर सात जन्म मिळू दे, म्हणून वडाला फेऱ्या मारून ये.’
विमलही सगळ्यांवर उगी उगी चिडल्यासारखं करून का होईना; पण मनातल्या मनात पुढच्या वर्षीच्या वटपौर्णिमेची स्वप्न रंगवत होती. आई पूजेला निघाली. घरापासून वडाचे झाड लांब होते, म्हणून विमलने बाबांना, आईला नेण्यासाठी म्हणून आपल्या गाडीची चावी दिली. बाबा त्यांची गाडी नेऊ शकत होते; पण लेकीचा आग्रह कशाला मोडायचा. म्हणून कधी नव्हे ते आज लेकीच्या गाडीवर पूजेसाठी सौभाग्यवतींना घेऊन गेले. घरात विमलने जेवणाची सर्व तयारी केली होती. आई-बाबा पूजेवरून आले की मग ताटं वाढून घेऊन जेवायला बसायचे, असा विचार करत ती गॅलरीत जाऊन उभी राहिली. तिला विचारांच्या तंद्रीत असल्यामुळे बराच वेळ फोनची रिंग ऐकू आली नाही; पण राधिकाने तिला
‘ताई, मोबाइल वाजतोय तूझा. तुझं लक्ष कुठं होतं’
असं म्हणत फोन हातात दिला. विमलने फोन रिसीव केला, अन् तिला पुढील व्यक्तीचे बोलणे ऐकून जागेवर घेरी आली. तिची अशी अवस्था पाहून राधिकाही घाबरली. तिने तिच्या हातातील फोन जवळजवळ ओढला, अन् रामला,
‘दादा, दादा’
म्हणून हाक मारत, त्याच्याकडे दिला. ती स्वतः ताईच्या तोंडावर पाणी मारू लागली. आपल्या ताईला कोणाचा फोन आला असेल, अन् असं काय सांगितले असेल. ज्यामुळे ताईंची ही अवस्था झाली. असे अनेक प्रश्न तिच्या मनात निर्माण झाले.
‘ दादा, सांग रे. काय झाले.’
म्हणून ती त्याच्याकडे वळली तर दादाही मटकन जमिनीवर हातापायातील अवसान गेल्याप्रमाणे बसला होता. पाणी मारल्याने विमल शुद्धीवर आली. तिने जास्त काही बोलत बसण्यापेक्षा, राम आणि राधिकाला घेऊन सिव्हिल हॉस्पिटल गाठलं. रिक्षातून जाताना ती दोघांनाही फोनवरील विषयासंदर्भात बोलतच होती. तिला फक्त आई बाबांचा अपघात झाला, एवढंच कळलं होतं; पण मनातून ती खूप घाबरली होती. नक्की किती लागलं असेल. आईने तर सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं अन् नक्की कुठे आणि कसा काय अपघात झाला असेल? असे एक ना दोन अनेक प्रश्न तिच्या मनात फेर धरून नाचत होते. अर्ध्या तासात ते दवाखान्यात पोहोचले. चौकशी केली असता नर्सने तिला डॉक्टरांकडे नेले. तिला तुमच्या घरात मोठं कोणी आहे का असं विचारल्यावर,
‘ मीच.’
म्हणून उत्तर दिलं. सोबत राम अन् राधिकाही होते. डॉक्टरांनी शेवटी त्यांना विश्वासात घेत आई-बाबांच्या निधनाची बातमी सांगितली.
विमल, राम अन् राधिका यांच्या पायाखालची जमीन सरकतेय असा भास त्यांना होऊ लागला. त्या हॉस्पिटलमध्ये
‘आई, बाबा’
या आवाजाचा जोरजोरात आक्रोश सुरू झाला. जो पाहील तो हळहळत होता. अन् दुसरीकडे आईच्या नशिबा विषयीही बोलत होता.
‘ वटपौर्णिमेदिवशी सवाष्णच काय; पण आपल्या सौभाग्यासह स्वर्गलोकी गेली. खरंच या पाशात अडकण्यात काय अर्थ आहे?’
अन् असंच बरंच काही; पण इकडे आई-बाबांशिवाय ही तिन्ही पिलं एकदम अनाथ झाली. पंखाखाली राहायची सवय असताना, कुणी तरी त्यांचं छत्र ओढून घेतलं होतं. आई-बाबा पूजेवरून परतत असताना त्यांच्या दुचाकीला मागून एका ट्रकने जोरात धडक दिली, अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. दुःखाच्या वेळी साथ देणारे सोबती पटापट गोळा होत नाहीत; पण भावकीने सर्व काही व्यवस्थित केले. आईचं सवाष्ण रूप अन् शेवटचं चेहऱ्यावरचं समाधान पाहून तिला ती आणखीही जिवंत असल्याचा भास होत होता. विमलला वाटे, आपण आता दोघांनाही हाताला धरून उठवले तर दोघेही पटकन उठतील. आई-बाबांच्या चेहऱ्यावर कुठेही त्रास किंवा दुःख जाणवत नव्हतं. विमल मात्र खूप खोल गर्तेत पडली होती. वादळात सापडली होती. माणूस विचार करतो त्यापेक्षा नेहमीच वेगळं असं काही तरी घडत असतं. त्यांच्या अंतयात्रेची गर्दी तर वर्णावी तेवढी थोडीच होती.
आई बाबा जाऊन चार महिने होत आले. विमलने आता लग्नाचा विचार मनातून काढून टाकला. चार महिन्यांत अनिकेत किंवा अनिकेतच्या घरचे कोणीही फिरकले नव्हते. राम अन् राधिका आता कुठं थोडं थोडं सावरू लागले होते. दोघांचीही महत्त्वाची वर्षे. विमलनेच आता मोठी म्हणून सर्वांना सावरणे गरजेचे होते.
दिवसामागून दिवस जात होते. जीवनचक्र चालतच असतं, ते कधी कुणासाठी थांबत नसतं. बघता बघता राम बारावी मेडिकल होऊन डॉक्टर झालाही. राधिकाही वकील झाली. विमलच्या केसांमध्ये आता रुपेरी छटा डोकावू लागल्या. ताईंच्या लग्नाविषयी राम अन् राधिका दोघांनीही विषय काढून पाहिला; पण विमलला आता त्या दोघांचे करिअर अन् लग्न महत्त्वाचे वाटत होते. जर विमलने लग्न केले, अन् मिळणाऱ्या पतीने तिच्या भावंडांचा विचारच केला नाही. किंवा त्यांना मदत करू दिली नाही. तर मग या विचारामुळेच तिने स्वतःच्या लग्नाचा विचार दूर मनाच्या कप्प्यात गुंडाळून ठेवला होता. राम अन् राधिका दोघांनीही ताईला समजावण्याचा प्रयत्न केला; पण आई बाबा गेल्यानंतर जवळच्या नातेवाईकांनीही आपल्यापासून कशी पाठ फिरवली. हे ते तिघे विसरले नव्हते.
दिवसामागून दिवस जात होते. रामने आता स्वतःचे क्लिनिक सुरू केले. अन् राधिकाची ही वकिली चांगली चालली होती. ताई आता वयाच्या मानाने थकू लागली होती. बघता बघता दोघेही लग्नाच्या वयाची झाली. राम अन् राधिका दोघांचेही लग्न एकाच मांडवात करायचे. कारण या घरातून राधिका जरी गेली. तरी रामची सौभाग्यवती आल्याने पुन्हा घर भरून जाईल. त्या विचाराच्या दिशेने ताईने प्रयत्न केले. अन् अवघ्या सहा महिन्यात बार उडवून दिला; पण म्हणतात ना. नियतीच्या मनात जे आहे तेच होते. लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच, रामच्या बायकोने बंड पुकारले. जर मला वेगळा संसार थाटून दिला नाही, तर मी निघाले माहेरी. रामने तिच्या निर्णयाला बळी न पडण्याचे ठरवले; पण ताईंच्या हट्टापुढे हात टेकले. एकाच गावात बहीण-भाऊ वेगळे राहू लागले. ताई वरून जरी दाखवत नसली तरी ही गोष्ट तिच्या जिव्हारी लागली होती. कसे तरी तिने राधिकाचे पहिले बाळंतपण, वर्षभराचे सण केले. परंतु नंतर मात्र ती मनाने खचली. रामला परदेशी जाण्याची संधी आली; पण त्याला ती नको होती. काही जरी झाले तरी आणि घरात नसली तरी, गावात तरी बहीण आहे. आपले जीवन तीनेच घडविले. आपल्यासाठी स्वतःच्या जीवनाची घडी विस्कटवली. तिच्यावर ही वेळ यावी. याचे राम अन् राधिका दोघांनाही वाईट वाटत होते. राधिकाने एक वेळेस वहिनीवरच दावा करण्याविषयी सुचविले; पण दावा आपल्याच माणसांवर. तो पण काय म्हणून करणार?
‘ भाऊ चोरून नेला.’
असे म्हणून ताई हसली. ताई दुःखातही हसलेलं पाहून राधिकाला वाईट वाटलं. नंतर ताई रडू लागली. तिने ताईला समजून सांगून शांत बसविले. एवढ्यात ताई म्हणालीच,
‘ आपलेच दात अन् आपलेच ओठ.’
दिवसामागून दिवस जात होते. राधिकाला दोन मुलं झाली, तर रामला एकच मुलगी. राम आता परदेशी स्थिरावला होता. विमल आता रिटायर झाली. तिला एकटीला राहावे लागत होते. राधिका चार-आठ दिवसांतून एकदा येऊन भेटून जात होती. अनंत कष्टांची मालिका अन् सुखाचा अभाव, यामुळे वयोमानापेक्षा विमल जास्त थकल्यासारखी दिसू लागली. तिला साधी साधी कामही होईना. अन् सोबतीला कोणीतरी असावं असं वाटू लागलं; पण या गोष्टीला खूप उशीर झाला होता. या सर्व गोष्टींचा असा परिणाम झाला की, तिची मानसिक स्थिती बिघडली. ती आता घराच्या बाहेर जाण्यासाठी धडपडू लागली. अशात एक दिवशी पायऱ्यावरून उतरताना पडली. राधिकाने हे सर्व पाहता, एक बाई देखरेखीसाठी ठेवली. त्या बाईलाही विमलला आवरणे कठीण जात होते. मग कधी कधी वैतागून ती विमलला कोंडूनही बाहेर जात असे. विमलला करमेनासं झालं की विमल गॅलरीत येऊन येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला,
‘ या, या बोला बोला.’
म्हणून हाक मारत असे. कधी कधी जोरजोरात ओरडतही असे; पण राधिकाचा ही नाइलाज होता. तिच्या संसारात ती पूर्ण गुरफटली होती. रामला तर जवळजवळ ताईंचा विसर पडला होता. ज्या ताईने सर्वांच्या जीवनाचे वृंदावन फुलवले. तिला पाहायला आता कोणी तयार नव्हते. शेवटी काय दिवा सर्वांना प्रकाश देतो; परंतु त्याच्या खाली अंधार असतो. विमलने स्वतःचे जीवन जाळून सर्वांच्या जीवनाला प्रकाश दिला, आकार दिला. तिने स्वतः मात्र दिव्यत्त्व प्राप्त केले.