
नीता
‘वहिनी, वहिनी असं काय करतेस अगं आपल्याजवळ खूप थोडा वेळ आहे, बाबांना डोळे भरून पाहून घे.’
सुजाता नीताच्या तोंडावर पाणी शिंपडतच तिला उठवीत होती. नीताचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं. नीताने आपल्या वडिलांना मृत स्थितीत पाहिलं आणि ती आपली शुद्ध हरवून बसली होती.
अवघ्या सात- आठ महिन्यांपूर्वीच नीता या घरात लक्ष्मीच्या पावलांनी गृहलक्ष्मी बनून आली होती. घरात सासू -सासरे आणि दोन दीर व दोन नणंदा. नीताच्या सासूबाई संसारात अगदी सुगरण होत्या. सात जणांच्या कुटुंबात सर्वाचं हवं नको वेळच्या वेळी त्या बघत होत्या. सर्वांच्या आवडी निवडी, सणवार, पाहुणे- रावळे सर्वांचं आदरातिथ्य, आजारपण, वाढदिवस, शिक्षणं, घराचा नीटनेटकेपणा. सगळं कसं जिथल्या तिथं. आपल्या दोन मुलींनाही त्यांनी स्वयंपाक शिकवला होता. नीता मात्र आजपर्यंत आईच्या घरात असताना वरवरची कामे करत असे. घरात एकुलती एक असणाऱ्या नीताला कामाचा ताण घ्यायला वेळच नव्हता. तिला मेहंदी, शिवणकाम, विणकाम या सर्व गोष्टींची खूप गोडी होती. नीताचे वडील सावरगावचे सरपंच. सरपंचांच्या दिमतीला वाड्यावर भरपूर माणसं होती. नीताने शिक्षण पूर्ण केलं तिचा बी. एड. साठी नंबर लागला ही असता; पण नीताच्या वडिलांना स्त्रियांनी नोकरी करणं मान्य नव्हतं. मुलींच्या जातीने बापाच्या जीवाला घोर लावू नये. तुमच्या तिकडच्या घरी काय करायचं ते करा, असं सांगून त्यांनी नीताच्या लग्नाचा बार मोठ्या धामधुमीत उडवला. नीताला खरं तर स्वतःच्या पायावर उभं राहावं स्वावलंबी असावं असं खूप वाटत होतं; पण काही केल्या लग्नाआधी तरी ते शक्य नव्हतं. आता लग्न करून आलेल्या घरात तर ते कदापि शक्य नव्हतं. नीताचा नवरा बँकेत अधिकारी होता. त्याची स्वत:ची दोन चाकी गाडी होती. सासऱ्यांनी लाडक्या जावयाला चारचाकी गाडी, फ्रीज, कुलर, टी. व्ही. पंखा आणि गाडी भरून भांडी दिली होती. नीताचा निम्म्यापेक्षा जास्त रूखवत तर बांधून माळ्यावरचं ठेवण्यात आला. कारण या सर्व वस्तू घरात आधीपासूनच होत्या.
नीता नवीन नवरी असताना बऱ्याच वेळा मजा होई. घरात वॉशिंग मशीन, भांडय़ाला बाई, फरश्या पुसायला बाई, भाजी, दळण आणि घरातील छोटी मोठी काम करण्यासाठी एक सोना आत्या नावाची बाई, त्यांनी कामाला ठेवली होती; पण सासरा व नीताच्या नवऱ्याला स्वयंपाक हा गृहिणीच्या हातचाच हवा. बाहेरच्या कोणी केल्यास त्यांना चालत नसे. सासूबाईंनी नीताला हळूहळू एक एक पदार्थ शिकवायला सुरुवात केली. नीतालाही आपण केलेला पदार्थ खाऊन पतीराजांनी स्तुती केलेली खूप आवडे. ती उस्फुर्तपणे आणखी नवीन पदार्थ तयार करण्यास शिके. हळूहळू दोन तीन महिने होत आले. नीता दोन दीर, दोन नणंदा व सासू- सासरे यांच्यात छान रमली. नीताने थोड्या दिवसांपूर्वीच घरातील माणसांना एक आनंदाची बातमी दिली होती. सरपंचांना तर आजोबा होणार म्हटल्यावर कोण आनंद झाला होता. त्यांना नुसती बातमी कळली तरी सर्वांचे तोंड गोड केलं. हिकडे निता व तिचे पती सुरेश यांना तर जणू स्वर्गच मिळाल्याचा आनंद झाला होता. घरात नीताच्या नणंदा, दीर, सासू- सासरे हेही खूप आनंदी झाले होते. नवा पाहुणा घरी येणार, सर्वांना त्याचे वेध लागले होते. सर्वजण नीताची खूप काळजी घेत. नीताला मात्र आपली शिक्षणाची हौस राहिली म्हणून मनातून थोडे वाईट वाटे. माहेरची आठवण झाली की, ती आई बाबांकडे जाऊन येई. सर्व सुरळीत चालले होते; पण म्हणतात ना प्रत्येकाच्या जीवनात थोडं तरी दुःख असतंच. सुखाबरोबर दु:ख हे येतच असते. एके दिवशी काही महत्त्वाच्या कामासाठी जिल्ह्याच्या गावी जाण्यासाठी नीताचा नवरा सुरेश व नीताचे वडील गाडीवरून गेले. मोटारसायकल रस्त्यावरून जात असतानाच अचानक ट्रकसमोर दुसरी मोटारसायकल आली. या मोटारसायकलला चुकवण्यासाठी ट्रक रस्त्यावरून थोडा बाजूला सरकला; परंतु खरा धोका इथेच झाला. सुरेशच्या गाडीला थोडा कट बसला. गाडी रस्त्यावरून जोरात खाली गेली व दोघेही रस्त्याच्या बाजूच्या दगडावर जाऊन आपटले. बघणाऱ्यांना काही समजायच्या आत तर ट्रकवाला व आडवा आलेला मोटारसायकलवाला पटकन निघून गेले. रस्त्यावरील एका माणसाने पोलिसांना फोन करून बोलाविले व तोही काही झंझट गळ्यात नको म्हणून निघून गेला. पोलीस आले तेव्हा रस्त्यावर गर्दीच गर्दी; परंतु पोलिस आल्याशिवाय अपघातग्रस्तांना कोणीच मदत केली नाही. वास्तविक पोलिसांच्या चौकशीचा तगादा नको म्हणून सर्वजन दूर उभे राहून पाहत होते. पोलिसांनी येताच फोन करून अॅम्ब्युलन्स बोलावली. सुरेश बेशुद्ध होता. त्याला डोक्याच्या मागच्या भागाला मार बसला होता; परंतु सरपंच थोडे शुद्धीवर होते. दवाखान्यात जाईपर्यंत अपघाताविषयी त्यांनी पोलिसांना माहिती सांगितली. दवाखान्यात पोहोचण्याआधीच त्यांनाही लागलेला जबरदस्त मार, झालेला रक्तस्त्राव व सोबत जावई बेशुद्ध या सर्व गोष्टींचा परिणाम की काय त्यांनी या जगाचा निरोप घेतला. इकडे सुरेशला ऑक्सिजन लावून डॉक्टरांनी प्रयत्न सुरू केले. सुरेश शुद्धीवर आला; परंतु त्याच्यावर झालेल्या मानसिक आघातामुळे त्याची वाचा गेली. त्याबरोबरच एक पाय गाडीखाली सापडून तो अधूही झाला.
घडलेला सर्व प्रकार सुरेशच्या मोबाइलवरून घरातील सर्वांना कळवून त्यांना बोलावण्यात आले. नीताला जेव्हा सर्व परिस्थितीचा अंदाज आला, तेव्हा तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला. तिला वडिलांचे दुःख करावे, नवऱ्याची स्थिती पाहावी की पोटातल्या जीवासाठी जगावे काहीच कळेना. उंच डोंगरावरून कुणीतरी ढकलल्याचा तिला भास होऊ लागला. तिचा आक्रोश तर तिच्या सासरच्या लोकांनाही बघवेना. नीताला आता तीन व्यक्तींना आधार द्यायचा होता. आपली आई, बोलता व चालता न येणारा नवरा व या पृथ्वीतलावर जन्म घेऊ इच्छिणारा जीव. एक सेकंद तर तिला काहीच नको, सर्व सोडून वडिलांच्या मागे आपणही जावे असे वाटले; परंतु दुसऱ्या क्षणी तिने आपली जबाबदारी निभवायची ठरविली. दिवसांमागून दिवस जात होते. नुकतेच तिला सात महिने झाले होते. या सर्व मानसिक धक्क्याने बाळाचा सातव्या महिन्यातच जन्म झाला. बाळंतपण व्यवस्थित पार पडले. मुलगा नताच्या वडिलांसारखा दिसत होता. एवढ्या दुःखात नीतासाठी एवढी तरी आनंदाची गोष्ट होती; पण तो आनंदही तिला साजरा करता येईना. एखाद्याला साखर सुद्धा कडू वाटते तसंच काहीसं तिला झालं होतं. सुरेश आता कुबड्यांचा आधार घेऊन चालण्याचा प्रयत्न करीत होता. नवीन बाळाच्या आगमनाने घरातील वातावरण शांत करण्याला बरीच मदत झाली. शेवटी नीता हा एकमेव आधार तिच्या आईला होता. परंतू तिला आता घरात अवघडल्यासारखे वाटू लागले. तिच्या सासूबाईंनी मात्र तिला आधार दिला. त्यांनी तिला व तिच्या आईला आधार द्यायचे ठरविले. सुरेशला फिजिकली अनफिट सर्टिफिकेट देण्यात आले. सुरेशवर कोसळलेल्या संकटांमुळे त्याची नोकरी गेली. नीताला त्याच बँकेत नोकरी मिळू शकत होती; पण ज्या बँकेत नवरा अधिकारी तिथे ती साध्या पगारावर नोकरी करणार हे तिच्या व सुरेशच्या मनाला पटेना.
नीताच्या सासऱ्यांना तर नीताने नोकरी करावी ही गोष्टच पटेना. शेवटी सुरेशच्या स्थितीचा व एकूण निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करत, नीताने शाळेत शिक्षिका व्हावं, हा निर्णय झाला. नीतानेही बी. एड. करायचे ठरवलं. आपल्या छोट्या पिलाला लाडात वाढवत, मांडीवर घेऊनच तिने सीईटीचा अभ्यास केला व ती बी. एड. च्या सीईटीमध्ये यशस्वी झाली. सरकारी कॉलेजमध्ये तिने अॅडमिशन घेतले. बाळाला घरातील मंडळी प्रेमाने वाढवतच होते. त्यांच्याबरोबर सुरेशही तळहातावरील फोडाप्रमाणे जपत होता. बघता बघता नीताचे बीएड झाले. बाळही सव्वा वर्षांचे झाले. नीताची हुशारी, जिद्द व चिकाटी या गुणांमुळे तिला लगेच हायस्कूलमध्ये नोकरी लागली. नीताने नवऱ्याच्या पायावर इलाज केला. तिने पायावर शस्त्रक्रिया करून घेतली व गुडघ्यापासून जयपुरी फुट बसविला. सुरेश पहिल्यासारखा फिरू लागला. तो मुलाला घेऊन शेतात फिरायला गेला. पहिल्यांदा तर सुरज बाबांचा हात धरून चालला होता; पण अचानक विहिरीजवळ झाडावर मोर पाहून तो त्याला पाहायला हात सोडून पळाला. सुरेश मागे कसा बसा पळत होता; पण तेवढ्यात सुरज विहिरीजवळ अगदी जवळ गेला. बाबांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे त्याने वळून पाहिले. परंतु मागे पाहातच पुढे सरकला आणि तो घसरून आत पडला. सुरेश एका पायाने पोहणार कसा? बोलायलाही येत नव्हते, मग ओरडणार कसा? या सर्व गोंधळात तो विहिरीचा आसपास पळू लागला. आत वाकून सुरज कोठे आहे हे पाहत असताना, तोही घसरून आत पडला. शेतात आसपास काम करणाऱ्या लोकांना जोराचा आवाज आल्यामुळे ते सर्वजन पळत आले. कामावरच्या राम्या व श्याम्याने विहिरीत उड्या मारून दोघांनाही वाचवले. सुरेशच्या डोक्याला पुन्हा लागलं; पण आता मात्र एक गोष्ट चांगली घडली. ती म्हणजे सुरेश बोलू लागला. सुरजच्या पोटात थोडं पाणी गेलं होतं; पण ते काढल्यावर, त्याला कृत्रिम श्वासोच्छवास दिल्यावर, तो शुद्धीवर आला. नीताला मात्र सर्व कळल्यावर दुःख व आनंद दोन्ही झालं. या अपघाताचा परिणाम चांगला झाला हे बरं. नाही तर, विचाराने देखील तिचं डोकं सुन्न झालं. तिने देवाला हात जोडले बरंच काही हरवलेलं थोडं तरी सापडलं; पण तिचे बाबा ते कधीच परतणार नव्हते. सूरजच्या रूपाने त्यांचं अस्तित्व जाणवत होते.
सौ आशा अरुण पाटील
सोलापूर