आकाशात नभ दाटून आले होते. मन भरून आल्यासारखे काळ्या ढगांनी आकाश भरले होते. भरलेल्या नयनांमधून आसवे केव्हा गालावरून ओघळतील हे जसे सांगता येत नाही त्याप्रमाणे आकाशातले मेघ केव्हा बरसतील काही सांगता येत नव्हतं असंच वातावरण केतकीला आजिबात आवडत नसे. तिच्या जीवाची घालमेल होऊ लागली. एकटीच असल्यामुळे अशा वातावरणात तिला अंथरुणातून उठून एक कप चहा करून घ्यावा असेही वाटेना. तशी ती बऱ्याच दिवसापासून एकटी राहात होती. या एकाकीपणाचा तिने चांगलाच अनुभव घेतला होता. तिने कॉलेजमध्ये आधिव्याख्याता म्हणून नोकरीला लागून दोन वर्षे झाली होती. पुढे पीएचडी करण्यासाठी बायोकेमीस्ट्री विषय तिने निवडला होता.त्यासाठी सरकारकडून तिला स्कॉलरशिप मिळाली होती . तो अभ्यासक्रम तिला परदेशात राहून पूर्ण करावा लागणार होता . तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत होते. अभिनंदनाचा वर्षाव होत होता. आज रजनीश असता तर तो भलताच खुश झाला असता. आज या यशाच्या आनंदातही ती मात्र दुःखी होती. खरे तर तिचा भरला संसार… असला असता. या विचारसरशी तिच्या डोळ्यासमोर भूतकाळातले दिवस तरळू लागले.
ती एफवाय बीएसी ला असताना रजनीश बीई करीत होता. या आधीचे शिक्षण कोल्हपूरला झाले होते. परंतु त्याच्या बाबांची बदली सोलापूरला झाली आणि तो नव्यानेच शासकीय वसाहतीत राहायला आला. केतकी ए ब्लॉकमध्ये राहायला तर तो एफब्लॉक मध्ये राहत असे. त्याचं आणि केतकीचं कॉलेज एकाच मार्गावर होत. केतकीचा मनमोकळा स्वभाव, तिचे लोभस वागणं, वर्गात टॉप ला राहणं, सोसायटीतल्या प्रत्येक उपक्रमात हिरीरीने भाग घेणं, सर्वांशी मिळून मिसळून वागणं, नेहमी हसतमुख राहणं हा तिचा स्वभाव आणि सावळंच पण लोभस दिसणं. तिला सर्वजण रूपसुंदरी म्हणून ओळखत. हे सर्व त्याला आवडू लागलं. केतकीच्या घरात सुगंधा, सरिता अशा दोन बहिणी आणि आई बाबा. केतकीच्या आई बाबांना कधीच मुलगा नसल्याचं दु:ख वाटत नसे. कारण त्यांच्या तिन्ही मुली खूप हुशार होत्या. वर्गात नेहमी प्रथम क्रमांक. मग काय,प्रत्येकीचे गुण रूप वर्णन करावे असेच होते. रजनीशच्या घरात आई-वडील आणि रिना नावाची एक बहिण. तीही केतकीबरोबर कॉलेज मध्ये शिकत होती. केतकी जरी विज्ञान शाखेत शिकत होती तरीही ती रसिक होती. विणणे, स्वयंपाक करणे याबरोबरच अवांतर वाचनाचीही तिला खूप आवड होती. रजनीशला तिची ही पुस्तक वाचनाची आवड लक्षात आली. पुस्तक देण्या-घेण्याच्या निमित्ताने तो तिला बोलण्याचा प्रयत्न करीत असे. केतकीने तर प्रथम टाळाटाळ केली. पण रजनीश चांगला मुलगा असल्याचं तिला कळाले. तो आपल्याशी चांगल्याच हेतूने मैत्री वाढवतोय. मग असं वागून त्याचं मन दुखावण्यापेक्षा तिने त्याच्या मैत्रीचा स्विकार केला. अवांतर वाचनासाठी पुस्तक, मासिकं याबरोबरच अभ्यासातल्या डिफीकल्टीही रजनीश छान समजून सांगे. हळूहळू बसमधून जाता-येता बरोबरच जाणं-येणं सुरू झालं. कळत-नकळत दोघांनाही एकमेकांची साथ हवीहवीशी वाटू लागली. रजनीशचे बीईचे थर्डईअर संपले. अन् कंपनीकडून त्याला जॉब ऑफर आली. रजनीशने केतकीमध्ये आपले गुंतून जाणे मान्य केले होते आणि हे तिच्यापुढे मांडून लग्नासाठी मागणीही घातली होती. आपणही कुठेतरी रजनीशमध्ये गुंतून गेलो, हे तिला ठाऊक होते.पण ती मान्य करत नव्हती. तिच्या बाबांचा स्वभाव कडक होता. अन् केतकीचे वडिल ज्या खात्यात अधिकारी या हुद्द्यावर कार्यरत होते त्याच खात्यात रजनीशचे वडील शिपाई होते. केतकीच्या बाबांच्या बोलण्यात ते अधिकारी असल्याचा अहम् पणा डोकावत असे. रजनीशच्या बाबांचीही वीस एकर बागायत शेती होती. पण हुद्दा आडवा येणार हे केतकीला माहित होते.एका शिपायाच्या मुलाला मुलगी द्यायची, बाबा मान्य करणार नाहीत. भले तो मुलगा, त्याच्या घरातील लोक, परिस्थिति चांगली असली तरीही. एवढं सगळं असलं तरी आपल्या आपण लग्न ठरवणे केतकीला पटेना. घरात छोट्या दोन बहिणी होत्या. बरेच विचार तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेले. म्हणूनच तिने आपण निखळ मैत्री करू असं सुचवले.
नोकरीसाठी म्हणून रजनीश पुण्याला निघाला. त्याला अजूनही वाटत होतं की, कोणत्याही क्षणी केतकी आपलं प्रेम व्यक्त करेल पण सारं व्यर्थ. केतकीच्या घरच्यांचे अन् रजनीशच्या घरच्यांचे चांगले पटत असे. त्यामुळे केतकीची आई शुभेच्छा देवून आली. रजनीश जड अंत:करणाने पुण्याला निघून गेला. केतकीला रजनीश गेल्यापासून उदास वाटू लागले. कॉलेज, घर, मैत्रिणी कुठेच मन लागेना.मनाची हुरहुर कोणाला सांगता येत नव्हती.रजनीशला फोन करावा म्हणून तिने खूप वेळा मोबाइल हातात घेतला अन् नाविलाजाने ठेवला. एकवेळेस तर नंबर डायल केला पण तिने लगेच कॉल कटही केला. इकडे रजनीशला पुण्याला आल्यावर दिवसभराच्या धावपळीत जाणवत नसे. पण निवांत क्षणी आठवण आल्याशिवाय रहात नव्हती.रजनीशने तिचा मिसकॉल पाहिला अन् त्याचा आनंद गगनात मावेना. आपल्या प्रेमाचा होकार सांगण्यासाठीच तिने फोन लावला असणार, मग तिने फोन कट का केला ? तिच्या समोर घरातले कोणीतरी आले असणार. नाहीतर मग आणखी काही कारण असू शकतं. तिच्या विचारांनी रजनीशच्या मनात झिम्मा सुरू झाला. रजनीशने धाडसाने तिला फोन लावला. मात्र केतकी फोन विसरून काही कामासाठी बाहेर गेल्याचं सुगंधाने सांगितलं. ‘काही निरोप द्यायचा का?’ असं पण तिने विचारलं. पण तसं काही नाही सहजचं, म्हणून रजनीशने घरातील सर्वांची खुशाली विचारून फोन ठेवला. रजनीशला वाटले आपण फोन केल्याचं कळल्यावर केतकी नक्की फोन करेल. या वाट पहाण्यातच दोन-तीन दिवस गेले.पण काही उपयोग झाला नाही. इकडे सुगंधा फोन आल्याचं विसरल्यामुळे तिने केतकीला फोन आल्याचं सांगितलं नव्हतं.
केतकीचं आता शेवटचं वर्ष संपल होतं. या सुटीत ती आत्याकडे पुण्याला जाणार होती. त्यावेळेस आपण रजनीशला भेटूच, अस तिने ठरवलं. परिक्षा एक-दोन महिन्यात संपलीही, ती मोठ्या उत्साहात पुण्याला जायला निघाली. परंतु रजनीश कंपनीतर्फे ट्रेनिंगसाठी सहा महिन्यांसाठी अमेरिकेला जाणार असल्याचं कळाले. रजनीशची मावशी पुण्यात रहातं होती. तिने रजनीशला, रिना व आई बाबांना चार दिवसां साठी आमंत्रण दिले होते.रजनीशला दगदग नको म्हणून त्यांच्या घरातले सर्व पुण्याला गेले. रजनीश अमेरिकेला जाणार त्याच्या आदल्या दिवशी केतकीने फोन केला. रजनीशने फोन घेतला मात्र तिला काय बोलावे ते सुचेना. रजनीशचे अभिनंदन करून इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी चौकशा झाल्या.पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिला. शेवटी रजनीशनेच मी फोन केल्यावर तू का फोन केला नाहीस असे विचारले. या प्रश्नावर केतकी गोंधळात पडली. मला काहीच माहित नाही असे तिने स्पष्टीकरण दिले. मग रजनीशने सर्व सांगितल्यावर सुगंधा सागायचं विसरली असेल असं ती म्हणाली.कोणाची तरी चाहूल लागल्यामुळे तिने फोन ठेवू का असं विचारल्यावर रजनीशला राग आला. ‘एवढ्यासाठीच फोन केला होतास?’ असं रजनीश थोड रागातचं बोलला. तिला सगळं समजतच होतं. तिने धाडसाने बोलायचं ठरवलं पण एवढ्यात बाबा समोर दिसल्याने ‘बाबा तूम्ही’ असं म्हणत फोन कट केला.
रजनीशला परदेशी जाऊन सहा महिने होत आले होते. त्याला मायदेशी परतण्याची खूप ओढ लागली होती. या सहा महिन्यात एकदाही केतकीचा फोन का आला नसेल याचा तो विचार करत असे. त्याला केतकीला भेटून व्यक्त होण्याची ओढ लागली होती. रजनीशच्या वडिलांची नौकरी संपत आली होती. त्यांनी जागा घेवून बांधकाम सुरू केले होते. ते आता पूर्ण होत आले होते. वास्तूशांतीसाठी म्हणून रजनीश परदेशाहून पुण्याला आल्यावर पंधरा दिवस रजा घेवून येणार होता.केतकीला मात्र रजनीश नवीन घरी रहायला जाणार म्हणून वाईट वाटत होते. त्याच्या घरच्यांनकडून मिळणारी एखादं दुसरी बातमी ही त्यांना कळणार नव्हती.
रजनीश अमेरिकेहून परतला. त्याने प्रत्येकासाठी काही ना काही भेटवस्तू आणल्या होत्या. केतकीच्या घरच्यांसाठीही भेटवस्तू आणल्या होत्या. केतकीसाठी स्पेशल गिफ्ट घेतलं होतं. सोलापूरला येवून चार दिवस झाले पण तरीही केतकी दिसेना म्हणून रजनीश बेचैन झाला.रीनाकडे चौकशी केली तर तिला निमोनिया झाल्यामुळे ती दवाखान्यात असल्याचं कळाले. हे ऐकल्यावर दादाच्या चेह-यावरचे भाव पाहून रीना काय समजायचे ते समजली. पण तरीही अनभिज्ञच राहिली. रजनीश भेटवस्तू घेवून दवाखान्यात भेटायला गेला. केतकीसोबत सुगंधा, सरिता होत्याच. रजनीशला आलेलं पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. केतकी मनातून खूप आनंदी झाली. केतकीने उठून बसण्याचा प्रयत्न केला पण रजनीशने राहू दे असे सांगितले तरीही सुगंधाला खुणावून ती कशीबशी उठून बसली.आजारी असल्याने तिचे डोळे खोल गेले होते. हातात सलाईन होतेच, हे सर्व असतानाही केतकीला रजनीश आल्यापासून आपण पूर्ण बरे झालो असे वाटत होते.रजनीशने बोलायला सुरूवात केली.
‘बरी आहेस ना ? अगं वास्तूशांती…’
तो काही बोलणार एवढ्यात नर्सने येवून गोळ्या दिल्या आणि सलाईन आणण्यासाठी रिसीट दिली. रजनीश उठलाच पण सुगंधा आणि सरिताने आम्ही दोघी जातो, तुम्ही बसा असं म्हणून त्या पटकन गेल्या. तसं तर सुगंधा आणि सरिताच्या हळू-हळू सारं लक्षात आलं होतं. रजनीशने केतकीला केलेला फोन सुगंधाला माहित होताच. पुण्यातून रजनीशने केलेल्या फोनमुळेच संशयामुळे बाबांनी तिचा फोन काढून घेतला होता. पण तरीही त्यांच्यातली ओढ वाढतच गेली होती. रजनीशने सुरूवात केली,
‘मी काय म्हणत होतो…’
केतकीने वाक्य पूर्ण केले,’आपल्या घराची वास्तुशांती १५ तारखेला आहे.’
या वाक्यासरशी रजनीशचे डोळे आनंद, समाधान, प्रेम या एकत्रित भावनेने चमकले. त्याने अलगदच तिच्या हातावर हात ठेवला. तिचा हात थंड पडला होता. अचानक झालेल्या स्पर्शाने ती लाजली. यासाठी मला तू खूप वाट पहायला लावलीस. रजनीशचे वाक्य अर्धेच झाले असेल अन् सुगंधा आणि सरिता आत आल्या. केतकीने त्यांना पाहिलं पण रजनीशचे लक्ष नव्हते. रजनीशला सुगंधाने उत्तर दिले,
‘सब्र का फल मीठा होता हैं।’
या वाक्यासरशी रजनीश केतकी दोघंही अवघडले. हे म्हणजे असं झालं, चोरीचा मामला अन्…. सरिता केतकीकडे पहात म्हणाली,’काय ताई, बार केव्हा उडवायचा मग?’
या वाक्यासरशी सगळेच हसले. तूम्ही दोघं बोलत बसा आम्ही दोघी घरी जावून डबा घेवून येतो. म्हणून त्या दोघी घरी गेल्या. रजनीशने केतकीला आपण कॉलेजपासून तिच्यासाठी वाट पाहिलेले क्षण, मजेदार किस्से सांगितले. आपण प्रेमाची कबुली दिली तरीही तिने होकार देण्यास लावलेला वेळ आणि ब-याच गोष्टी. रजनीशने तिला गिफ्ट दिले. या सर्व गप्पांमध्ये दोन तास क्षणाप्रमाणे गेले. डबा घेवून त्या दोघी आल्याच. सुगंधाने चेष्टा करायला सुरूवात केली.
‘झालं की नाही बोलणं, नाहीतर आम्ही आणखी एकदा घरी जावून डबा घेवून येतो. यावर चौघेही हसले. रजनीशला घरी जायला हवं होतं. वास्तूशांतीसाठीची बरीच तयारी करायची होती. ‘ येतो’ असं सांगून तो गेला. तो गेल्यावर सरिता ताईला पहातचं म्हणाली, ‘हूं, बाकी निवड अगदी एक नंबर आहे.’
यावर केतकी लाजली. पण तिलाच काय घरातील सर्वांनाच बाबांचा स्वभाव माहित होता. दोन दिवसातच केतकी दवाखान्यातून घरी आली. चार दिवसांनी सुगंधाने सहज बसल्यावर विषय काढला रजनीशचा. आईला तिने सर्व सांगितले. प्रथम केतकीवर आई नाराज झाली. पण सुगंधाने सर्व व्यवस्थित सांगितले, मुलगा आपल्याचं जातीचा आहे. महिन्याला पन्नास हजार घेतो, दिसायलाही स्मार्ट आहे. या सर्व गोष्टींचा खुलासा केल्यामुळे ती शांत बसली. पण मनातल्या मनात विचार करू लागली. सुगंधा,केतकी अन् सरिता तिघींनीही बाबांना बोलताना सहजचं रजनीशचा विषय काढ म्हणून तगादा लावला. त्यामुळे संधी मिळाल्यावर त्यांनी विषय काढलाही.
‘रजनीश पुण्याहून वास्तूशांतीसाठी आला आहे. मुलगा चांगला आहे, घरातील माणसेही चांगले आहेत. केतकीसाठी स्थळ चांगलं आहे.’
या वाक्यासरशी बाबा आईवर जवळजवळ ओरडलेच.
‘त्या शिपायाच्या मुलाला मी माझी मुलगी देणार नाही.’
एक अक्षरही पुढे न बोलता ते रागाने बाहेर निघून गेले. केतकी, सरिता, सुगंधा बाजूच्या खोलीतून ऐकत होत्याच. केतकी खूप नाराज झाली, तिला उंच टेकडीवरून कोणीतरी ढकल्यासारखं वाटले.
रजनीशच्या घराची वास्तुशांती चार दिवसावर आली होती. रजनीशच्या आई-बाबांनी येवून खास आग्रहाने आमंत्रण केतकीच्या आई बाबांना दिले. रजनीशच्या बाबांना केतकीचे बाबा व्यवस्थित बोलले. सर्व पाहुणचार केतकीच्या आईला म्हणजेच बबिताला करायला लावला. बबिता तर थक्कच झाली. पोटात एक अन् ओठात एक हे बाई यांनाच जमतं. रजनीशचे बाबा गेल्यावर सहजचं बबिताने, आपण सर्वजण वास्तूशांतीला जावू हा पर्याय मांडला. पण तिला अपेक्षित नसलेलं उत्तर मिळालं.
‘ सर्वांनी जायची काही गरज नाही. मला महत्वाच काम आहे, तुझ्या तू एकटी जावून ये.’
चार दिवसांनी बबिता एकटीच वास्तूशांतीसाठी गेली. तिला एकटीला पाहून सर्वांनाच वाईट वाटले. रजनीशला तर खूपच वाईट वाटले, पण बबिताने केतकी न येण्याच कारण सांगितलं. ते त्यांना पटलं, डॉक्टरांनी दगदग करू नका असे सांगितलं आहे. तसेच तेलकट,आंबट पदार्थ खावू नका असे सांगितलं आहे. तिच्या सोबतीला म्हणून सुगंधा, सरिता दोघीही राहिल्या होत्या.
वास्तूशांती होऊन रजनीशच्या घरच्यांनी सामान हलवले होते. रजनीशची रजा फक्त तीन दिवस शिल्लक राहिली होती. वास्तूशांतीच्या दुस-या दिवशी त्याच्या मित्राचे लग्न होते. त्या लग्नात केतकी,सुगंधाला पाहून त्याला आनंद झाला पण दुस-याच क्षणी तो मावळला. काल काकूंनी प्रकृतीचे कारण सांगितले आणि आज हे काय? तो या भावनेनेच त्यांना पहात होता. तेवढ्यात काका-काकू ही दिसले. काकांनी त्याला पहाताच हसून नमस्कार करत जवळ बोलावून एका मुलाशी त्याची ओळख करून दिली. रजनीशला काही कळेना. तेवढ्यात काकांनी खुलासा केला, ‘मुंबईच्या मित्राच्या नात्यातले स्थळ केतकीसाठी आलेलं आहे. मुलगा पोस्टात आहे, त्याला केतकी आवडली. केतकी काही आमच्या शब्दाबाहेर नाही.’ हे सर्व ऐकल्यावर रजनीशचा चेहरा एकदम उदास झाला. तरीही रजनीशने हिमतीनं मुलगा कोणत्या पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीस आहे, असं विचारलं. इतरही बरीच चौकशी केली. तसं तर रजनीशला मुलगा मवाली वाटत होता. तो नोकरीला आहे असं वाटतंच नव्हतं. पण तो केतकी बरोबर लग्न करणार म्हटल्यामुळे त्याच्याविषयी एक प्रकारचा द्वेष वाटू लागला. काकांनी कारण काढून मुलाला अन् घरच्यांना लांब पाठवून रजनीशला फटकारले. ‘माझ्या मुलीला मी चांगले स्थळ बघून लग्न करून देईन. तिचा विचारही तू डोक्यात आणू नकोस.’ या वाक्यासरशी केतकी,सुगंधा अन् रजनीश दु:खी झाले. शेवटी रजनीशने हसत हसत विषय टाळला. तेवढ्यात काकू आल्या, रजनीशने मुंबईच्या पोस्टातल्या चुलत काकांना फोन लावला. योगायोगाने ते ज्या शाखेत होते, तिथलाच पत्ता मुलाने सांगितला होता. चुलत काकांनी मात्र या नावाचे कोणी ऑफिसमध्ये नाही म्हणून सांगितलं तेव्हा रजनीशने ही गोष्ट जाहीर केली. मुलाने मात्र आढेवेढे घ्यायला सुरूवात केली. मी हंगामी तत्वावर कामाला आहे. दुस-या शाखेत आहे, कायम झाल्यावर या शाखेत येणार आणि बरेच काही. त्याची फसवेगिरी सगळ्यांच्याच लक्षात आली. काका त्याच्याकडे पहातच होते, पण तो काहीतरी निमित्त करून निसटला. काकांनी मुंबईच्या मित्राला फोन केल्यावर त्यांनी सहज उत्तर दिले. मलाही पक्क काहीच माहित नव्हतं.असं ऐकल्यावर मात्र काका जाम वैतागले. त्यांनी रागाने फोन कट केला. रजनीशच्या चेह-यावरचे विजेत्याचे भाव काकांना सहन होईना. एवढं सगळं होवूनही मी माझ्या मुलीसाठी छप्पन स्थळं पाहू शकतो. असं त्यांनी त्याला ठणकावून सांगितले.
दोन दिवसांनी रजनीश पुण्याला निघून गेला. केतकी बाबांच्या शब्दाबाहेर जाणार नव्हती. सुगंधा, सरिता तिला ताई तू योग्य निर्णय घे म्हणून सांगत होत्या. शेवटी रजनीशचं प्रेम आहे ना तुझ्यावर, हे ही सांगत होत्या. कारण प्रेम जरी असलं तरी त्याने कोणत्याही प्रकारचा चुकीचा निर्णय आतापर्यंत घेतला नाही.
केतकी सगळ्या गोष्टींचा खूप सखोल विचार करत होती. सर्व शक्यता पडताळून पहात होती. एके दिवशी रजनीशने फोन केला तेव्हा ती फक्त रडत होती, तिला बोलायचे जमेच ना. त्याने मात्र तिची समजूत घातली. तुझ्या बाबांचा होकार घेवूनच आपण लग्न करू असंही सांगितलं. पण केतकी बाबांना चांगलंच ओळखत होती. बाबा त्याची नौकरी,गुण हे लक्षात न घेता फक्त तो शिपायाचा मुलगा आहे जावई म्हणून त्याला मान्य करणार नाहीत. बाबांनी केतकीसाठी खूप स्थळं पाहिली पण तिला साजेसं स्थळंच मिळेना. ब-याच प्रयत्नानंतर संदीप वाटवे नावाचा युवक त्यांना केतकी साठी योग्य वाटला. संदीप उंचापुरा, दिसायलाही स्मार्ट अन् सरकारी नोकरीत होता. झालं आता बोलणी सुरू झाली. स्थळात खोट काढावी असं नव्हतंच काही. संदीप अबोल होता एवढंच. अबोल नव्हे तर घुमाच होता. बाबांनी केतकीला पसंती विचारायचे कारणच नव्हते. साखरपुडा अन् काही महिन्यात लग्न हा मानस त्यांनी पाहुण्यांना बोलून दाखविला.संदीप एका पायावर तयार होता. केतकी, सुगंधा मात्र त्याला भेटून सर्व काही सांगणार होत्या. त्यांना कोणाचे आयुष्य उधवस्त करायचे नव्हते. संदीपच्या घरच्यांना मात्र मुलाने मुलीला लग्नापूर्वी भेटणे मान्य नव्हतं. मग काय, बोलाचाली नंतर साखरपुड्याची तारीख काढण्यात आली. केतकी, सुगंधा, सरिता मात्र दु:खी होत्या. तरीही सुगंधाने संदीपच्या बहिणीला गोड बोलून केतकी अन् संदीपच्या भेटीचा दिवस ठरविला. साखरपुड्यानंतर बघू असं संदीपच्या बहिणीचे मत आले. काही दिवसात साखरपुडा झाला. खरं तर संदीप नको होय करत कसातरी तयार झाला.सुगंधा अन् त्याची बहिण या दोघींच्या साक्षीने भेट होणार होती. तसं पहाता एकांता साठी आसुसलेली जोडपी वेगळी अन् ही दोघं वेगळी. केतकीला काहीही करून हे लग्न टाळायचे होते, संदीपची अडचण कुणाच्याही ध्यानात येत नव्हती. सुगंधाला संदीपविषयी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तो नेहमी गळ्याभोवती स्कार्फ किंवा ओढणी घेतो. साखरपुडा अन् टिळा एकत्रित झाला. टिळ्याला केतकीच्या घरच्यांनी वेगळाच ड्रेस शिवला. प्रथम संदीप घालायला तयार होईना, त्याने सांगितल्याप्रमाणे ड्रेस नव्हता पण नाईलाज झाला. तो त्या ड्रेसमध्ये वेगळाच वाटत होता.कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. दोघंही समोरासमोर खुर्चीवर बसले. संदीप काहीच बोलत नव्हता. शेवटी सुगंधाने दारातून लवकर बोला रे म्हणून सांगितले. संदीपच्या बहिणीने उगाचच हसण्याचा प्रयत्न केला असे सुगंधाला वाटले. तिच्या मनातली चलबिचल चेह-यावर जाणवत होती.
संदीप बोलेना म्हणून शेवटी केतकीने सुरूवात केली.मला खूप दिवसापासून तुम्हाला भेटायचं होतं. यावर तो कशासाठी किंवा आणखी काही तरी बोलेल असे तिला वाटले. तो नुसता हुं म्हणून गप्प बसला. मग तिने इकडचा तिकडचा विषय काढून बोलायला सुरूवात केली. तो फक्त मानेनेच हो किंवा नाही किंवा हूं एवढ्याच कृती करण चाललं होत. सुगंधाला आता रहावेना, भावोजी तुम्ही काही तरी बोला ना, असं म्हणत ती त्याच्या जवळ जावून उभी राहिली. संदीपच्या गळ्यावर टाके घेतलेल्या खुणा दिसत होत्या. ते पाहून काही तरी वेगळच आहे,हे तिच्या लक्षात आले. तिने खुणेनेच केतकीला गळ्याकडे पहायला सांगितले. एवढ्यात संदीपची बहिण आत आली. ‘चला आम्हाला उशिर झाला.बाकी गप्पा लग्नानंतर.’ असे म्हणत तिने संदीपला जवळ जवळ ओढलेचं. एवढ्यात केतकी संदीपला म्हणाली, ‘तिलाच काय पण मलाही तुमच्याशी खूप बोलायचं होत हो भावोजी.’ यावर एवढा वेळ गप्प बसलेला संदीप पटकन बोलून गेला
‘मी काय बोयणार? तुम्हीच काय ते बोया.’
या वाक्यासरशी केतकी सुगंधाचाचं काय पण संदीप व त्याच्या बहिणीचाही चेहरा पांढराफटक पडला. यापुढं मात्र हा हा म्हणता म्हणता सर्वांना ही गोष्ट जाहीररित्या माहित झाली. अन् एकच गोंधळ उडाला. केतकीच्या बाबांनी मला ही सोयरीक मान्य नाही असे सांगितलं.संदीपच्या बाबांनी केतकीच्या बाबांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.संदीपचा सहा महिन्यापूर्वी अपघात झाल्यामुळे त्याच्या जिभेवर परिणाम झाला होता.स्वरयंत्राला जखम झाली होती पण बोबडेपणा कायम राहिला होता. पण हे सर्व जरी केतकीच्या बाबांनी ऐकलं तरी ते तडजोड करणार नव्हते. कारण त्यांना रजनीशच्या तोडीचा जावई हवा होता.सर्व जिकडे तिकडे झाले. प्रत्येकाच्या मनावर मानसिक ताण जाणवत होता. त्याच रात्री रजनीशला झालेला सर्व प्रकार केतकीने फोन करून सांगितला. सध्या तू शांत रहा, मी पहातो काय करायचे ते. असं सांगून त्याने पुढील निर्णय घ्यायचे ठरवले. तस तर संदीपला भेटून आपल्या दोघांविषयी सांग ,असं त्यानच सुचविलं होतं.
रजनीशने रिनाला फोन करून थोडीफार कल्पना केतकी आणि त्याच्याबद्दल दिली होती. रिनाला केतकी पसंत होतीच. कारण नापसंत करण्यासारखं तिच्यामध्ये काही नव्हतंच. तिनेही वेळप्रसंगानुसार विषय आई-वडीलांच्या कानावर घातला. तस तर मुलाने आपलं लग्न आपण ठरवणे ही गोष्ट त्यांनाही पटणारी नव्हतीच परंतू केतकीला पाहून शेवटी ते गप्प बसले. रिनाने फोनवरून रजनीशला तसे सांगितलेही. रीतसर मागणी घालायचे ठरले. इकडे केतकीच्या वडीलांचा चांगलाच अपमान झाला पण तरीही रजनीशपुढे हार त्यांना मान्य नव्हती. जेव्हा रिना आई-वडीलांना घेवून केतकीच्या घरी गेली तेव्हा कल्पना देवूनही केतकीचे बाबा बाहेर निघून गेले. त्यांना हार मान्य नव्हती,
‘जसं तुम्हाला पाहिजे तसं करा’
फक्त केतकीच्या आईला सांगून त्यांनी त्या प्रकरणातून काढता पाय घेतला होता. ते घरात नसल्यामुळे रजनीशच्या आई-वडीलांना त्यांची नाराजी लक्षात आली. तरीही केतकीच्या आईने लेकीच्या सुखासाठी त्यांच्या पुढे नमते घेवून बोलल्याने जमवून घेणे भाग पडले. सर्व पाहुणचार होऊन ते घरी गेले. त्यांनी चार दिवसात रजनीशला फोन केला. रजनीशने चार दिवसांची रजा घेवून रजनीश आला. केतकीच्या घरातील सर्वजण व रजनीशच्या घरातील सर्व या सर्वांची परवानगी घेवून केतकीबरोबरच जावून त्याने लग्न करण्यासाठी नोंद केली. एक महिन्याने कोर्टात लग्न करायचे नंतर जसं जमेल तसं या निर्णयासह तो पुण्याला परतला. एवढं सगळ होत होतं तरी केतकीच्या बाबांना अजूनही केतकी अन् रजनीशच्या लग्नाची कल्पना पटेनाशी झाली होती. त्यांनी या सर्वापासून लांबच रहायचे ठरवले होते. केतकीच्या मनात मात्र धाकधुक होतीच. बाबांच्या जिद्दी स्वभावापुढे कुणाचंच काही चालणार नव्हतं. बघता बघता महिना गेला. योगा योगाने कार्टातील लग्नादिवशी केतकीचे बाबा मुंबईला चार दिवसांच्या कामासाठी म्हणून गेले होते. बबिताने आजपर्यंत नेहमीच नव-याचा शब्द, आज्ञा म्हणून पाळला होता. पण सध्या मात्र लेकींच्या सुखापुढे नव-याच्या विचाराला झुगारावे लागत होते. सर्वजण मिळून कोर्टात जाऊन लग्न करून आले.घरातच केतकीच्या आईने पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. सर्वांनी यथेच्छ जेवण केले. लग्न झाले म्हणजे रजनीश बरोबर केतकी जाणे क्रमप्राप्त होते. परंतू बाबा आल्यावरचं मी येते असे तिने जाहीर केले. रजनीशच्या घरातल्यांना मुलाचे लग्न धुमधडाक्यात व्हावे असं वाटत होतं. नंतर रिसेप्शन द्यायचं ठरविलं. बाबा जेव्हा मुंबई वरून आले, तेव्हा ते चिडले. प्रत्येकाची त्यांनी हजेरी घेतली,शेवटी त्यांनी तू या घरातून बाहेर निघून जा. अशा परखड शब्दात मुलीची पाठवणी केली. त्यांनी केतकीला ब-याच गोष्टींची जाणीव करून दिली. तिच्या मागे दोन बहिणी आहेत, त्याचा तू विचार केलास का असं विचारले. आम्ही केलेल्या संस्काराचं काय आणि बरचं काही.परंतू तिचं लग्न कितीवेळा मोडले. त्यामुळे तिची झालेली मन:स्थिती याचा ते विचार करत नव्हते. शेवटी त्यांनी तू मला तुझे तोंड दाखवू नकोस. या घराचा संबंध तुटला असे सांगून जवळ जवळ घरातून बाहेर काढले. आज ना उद्या काका सुधारतील अशी आशा रजनीशसह सर्वांनाच होती. हळूहळू दिवस जात होते. एकातरी सणाला केतकीला घेऊन यावे असे बाबांना वाटत नव्हते. बबिताने समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तर उलट तिलाच बरंच काही ऐकावं लागलं. लेकीला जाऊन भेटावे, तिची खुशाली विचारावी , असं बबिताला वाटे. पण त्यांना वडील म्हणून कर्तव्याची जाणीव नव्हती. त्यांना त्या गोष्टींची गरजही वाटत नव्हती. उलट कोणी रजनीश विषयी बोलले तर त्यांना अपमान झाल्यासारखे वाटे. ऑफिसमध्ये केतकीच्या सास-यांना पाहून तर जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटे. सुगंधा व सरिताच कसं होईल असं त्यांच्या मनात येई.
(क्रमशः)