गावातील वटवृक्षाच्या सावलीत सरोजा रोज येत असे, तिच्या हातात पुस्तक असायचं, पण डोळे नेहमीच कुठेतरी हरवलेले. रवी तिथून रोज जात असे, त्या विशाल वटवृक्षाखाली बसायला त्यालाही आवडले असते. पण तो नुसतं येता जाता तिच्याकडे पाहायचं असं ठरवायचा. पण पाहायचं धाडस मात्र कधी केलं नव्हतं त्याने. तिच्या मोकळ्या केसांमध्ये वारं खेळायचं, आणि त्याला उन्हाच्या तिरीपी मध्ये तिची दिसणारी सावली खूप आवडायची. ते दृश्य मोहून टाकायचं.
एका संध्याकाळी रवी आज काही का होईना बोलायचंच असा निर्धार करून आला आणि त्याने धाडसाने तिला विचारलं,
“तुम्ही इथे रोज येता, काही विशेष कारण?”
ती त्याला ओळखत होती. कदाचित तो तिला विसरला होता. ती दोघं लहानपणी एकाच शाळेत शिकत होती. त्याला क्रिकेटची भयंकर आवड. आवड नव्हे वेडच. काही वर्ष म्हणजे अगदी सातवी आठवीपर्यंत तो वर्गात होता. नंतर त्याच्या बाबांनी त्याला क्रिकेट अकॅडमी साठी मोठ्या शहरात ठेवले होते आणि तिथूनच त्यांचा संपर्क कमी झाला होता. त्याला ती आठवत नव्हती. कदाचित माहित नव्हती. तिच्या बहिणीच्या वर्गात तो शिकत होता. तिला पाहिल्यावर त्याला कुठेतरी मनामध्ये जुनी ओळख असल्याचं जाणवत होतं पण लक्षात येत नव्हतं. म्हणूनच त्याने आज तिच्याशी बोलण्याची धाडस केलं होतं.
ती मंद अशी छान हसली. तिने स्मित केल्यावर तिच्या गालावर दिसणाऱ्या खोल खळ्यांमध्ये तो पाण्यातील भोवऱ्यात सापडावं, हरवून जावं तसा गुंतला.
सरोजा म्हणाली,
“माझं वाचन इथे जास्त चांगलं होतं.”
त्याला तिच्या हसण्याने एक वेगळीच ऊर्जा मिळाली.
दिवसामागून दिवस गेले, त्यांचं बोलणं वाढलं. तो तिच्या लांब केसांमध्ये हरवायचा, आणि ती त्याच्या साध्या बोलण्यात आपलं असं वेगळं जग शोधायची. त्या दोघांच्या आयुष्यात एक प्रकारचं गोड मोकळेपण आलं.
याची खबरबात मात्र तिच्या व त्याच्या मित्र मैत्रिणी पर्यंत गेली होतीच.
एके दिवशी पाऊस लागला, आणि ती झाडाखाली भिजत उभी राहिली. त्याने तिच्यासाठी छत्री आणली, पण तिने हसून ती नाकारली. “पाऊस मला आवडतो,” ती म्हणाली. तोही तिच्यासोबत पावसात उभा राहिला. दोघांच्या नजरा भिडल्या, आणि त्या क्षणी त्याच्या मनातल्या भावना स्पष्ट झाल्या.
तो म्हणाला, “मला तुला काही विचारायचं आहे.”
ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, “हो, मला माहितीय.”
तो गोंधळला, “कसं?”
ती म्हणाली, “कारण मी तुझ्या नजरेची भाषा जाणते. आपण आपले जीवन एकत्र जगू शकतो.”
त्या दिवशी पाऊस साक्षीदार ठरला त्यांच्या प्रेमाचा. सावली जिथे साक्षीदार होती ओळखीची, तिथे पाऊस साक्षीदार ठरला नात्याचा. आता त्या झाडाखाली ते दोघं रोज येतात, पण फक्त सावलीत वाचनासाठी नाही, तर एकमेकांसोबतचा आनंद अनुभवण्यासाठी.
त्यांची प्रेमकहाणी वाऱ्यासारखी मोकळी, पावसासारखी निर्मळ, आणि वटवृक्षासारखी स्थिर बनली.