काळजाचा तुकडा

सुनंदा ताईंची मुलगी सई बारावी उत्तीर्ण झाली आणि पुण्यात इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. गावात आनंदाचे वातावरण होते. सई हुशार, शांत आणि स्वप्नाळू मुलगी होती. तिच्या डोळ्यांत मोठी स्वप्ने होती.  शिकायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, आई-वडिलांचं नाव उज्ज्वल करायचं.

पण सुनंदा ताईंच्या मनात मात्र काळजीचं वादळ होतं.

“इतक्या लांब मुलीला एकटीला पाठवायचं?”

असं त्या त्या वारंवार म्हणत.

त्यावर सईचे वडील म्हणाले,

“अगं, काळ बदललाय. मुलींनी शिकायलाच हवं. पण काळजी घ्यावी लागेल.”

शेवटी हो नाही म्हणत ठरलं, सईला पुण्यात हॉस्टेलवर ठेवायचं, पण सुरुवातीला तिची आजी तिच्यासोबत राहणार असं म्हणत होती. पण नंतर हॉस्टेलला पर्याय निवडल्याने आजीने राहण्याचा प्रश्न आलाच नाही.

पुण्यात गेल्यावर सुरुवातीचे दिवस छान गेले. कॉलेज, अभ्यास, नवीन मैत्रिणी, नवीन वातावरण. पण हॉस्टेलमध्ये वेगळीच दुनिया होती. काही मुली साध्या, अभ्यासू होत्या. काही मात्र रोज नवीन कपडे, महागडे मोबाईल, पार्टी, रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणं…

सईला आश्चर्य वाटे.

“यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतात?”

एक दिवस तिची रूममेट रिया म्हणाली,

“तू पण आमच्यासोबत चल. एक पार्टी आहे. दोन तास ये… मजा येईल.”

सईने नकार दिला. पण रोज तेच ऐकून तिच्या मनात शंका निर्माण झाली.

“मीच मागे पडतेय का? बाकी सगळ्या इतक्या मस्त जगतात…”

त्या रात्री तिने आईला फोन केला. तिच्या आवाजात उदासी होती.

सुनंदा ताईंनी लगेच ओळखलं.

“काय गं? काही त्रास आहे का?”

सई थोडी रडत म्हणाली,

“आई… इथं काही मुली वेगळ्याच मार्गाने पैसे कमावतात. मला पण बोलावतात. मला भीती वाटते.”

सुनंदा ताईंच्या पायाखालची जमीन सरकली. पण त्यांनी शांतपणे उत्तर दिलं.

“बाळा, चुकीचा मार्ग सुरुवातीला सोपा वाटतो, पण शेवटी आयुष्य उद्ध्वस्त करतो. तू त्या मैत्रिणींपासून लाब राहा. उद्या बाबा येतील.”

दुसऱ्या दिवशी गणपतराव पुण्यात आले. त्यांनी सईचं हॉस्टेल बदललं. एका सुरक्षित, कुटुंबवत्सल वसतिगृहात तिला ठेवले. तिथे अभ्यासाचं वातावरण होतं.

गणपतराव म्हणाले,

“बाळा, आम्ही तुझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पाठवलं आहे. तुला उंच भरारी घ्यायला पाठवलंय. पण भरारी घेताना दिशा योग्य हवी.”

सईच्या डोळ्यांत अश्रू आले.

“बाबा, मला कळलं… मैत्रिण निवडताना चूक झाली तर आयुष्य भरकटतं.”

चार वर्षांनी सई इंजिनिअर झाली. कॉलेजच्या समारंभात तिने भाषण केलं.

“पालकांनी मुलांवर फक्त बंधनं घालू नयेत, तर त्यांचे मित्र व्हावं. मुलांना समजून घ्यावं. चुकीच्या वाटेवर जाण्यापूर्वी त्यांना धरून योग्य दिशा दाखवावी.”

सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सुनंदा ताईंच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.

त्या मनात म्हणाल्या,

“लेकरं म्हणजे काळजाचा तुकडा असतात. त्यांना जपायचं असतं… पण पंखही द्यायचे असतात.”

शेवटी काय,

मुलगा असो वा मुलगी, दोघेही घराचा अभिमान असतात. विश्वास, संवाद आणि योग्य संगत यामुळेच त्यांचं भविष्य उज्ज्वल होतं.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!