माझा विठू

 माझी वारी… माझा विठ्ठल

आषाढ महिन्यातील ती एक प्रसन्न पहाट…

आभाळ काळ्याभोर ढगांनी गच्च भरून आलं होतं. रिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या सरींनी पंढरीच्या मातीचा तो मनाला  सुखावणार सुगंध सगळीकडे दरवळत होता. चंद्रभागेच्या विस्तीर्ण वाळवंटावर सकाळी-सकाळी श्रध्दामय वातावरणात भक्ती मनात मनात खोलवर रूजलेली. मंदिराच्या कळसावरून उगवत्या सूर्याची कोवळी किरणे जणू विठ्ठलाच्या पायाला स्पर्श करायला धडपडत होती. टाळ-मृदंगाचा तो नाद आणि सोबतीला 

“ज्ञानोबा-तुकाराम… माऊली… माऊली…” 

असा लाखो कंठातून फुटणारा अखंड जयघोष सबंध आसमंत व्यापून टाकत होता. 

वाऱ्यावर डोलणाऱ्या त्या भगव्या पताका मनातील भक्तीला आणखीनच उधाण आणत होत्या. ते वातावरण माणसाला आकंठ भक्ती रसात न्हाऊ घालून या जन्माचे सार्थक झाले असे दाखवत होत्या. पायाला चिखल, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, डोळ्यांत फक्त आणि फक्त विठुरायाच्या भेटीची आस आणि ओठांवर विठूचे नाम घेत लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर पाऊल टाकत होते.

त्या दिवसांत पंढरपूर हे नुसतं एक शहर उरतच नाही; ते तर भक्तीचा एक अथांग महासागर बनून जातं. प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्लीबोळ, अगदी माणसांचं मन अन् मन विठ्ठलमय होतं. 

वाटेवर कुणी वारकऱ्यांच्या कोरड्या घशाला पाण्याचा घोट देतं तर कुणी कुणी आनंदाने फराळ वाटत असतं, तर कुणी श्रद्धाभावनेने त्यांच्या थकलेल्या, सुजलेल्या पायांना प्रेमाने तेल चोळत असतं. ‘सेवेतूनच देव भेटतो’, या उक्तीची प्रचिती पंढरीची ही पवित्र भूमी दरवर्षी आपल्याला देत असते.

अशाच या भक्तीने भिजलेल्या पंढरीत मी एक शिक्षिका म्हणून काम करते.

इथे राहते म्हटल्यावर अनेक जण मला अगदी सहज आणि आपुलकीने विचारतात, “अहो, तुम्ही तर साक्षात विठ्ठलाच्या पंढरीत राहता… मग तुम्हाला तर रोज विठ्ठलाचं दर्शन मिळत असेल ना?”

मी त्यांच्याकडे पाहून फक्त मंद स्मित करते…

पण खरं सांगू का? रोज त्या गर्दीत मंदिरात जाणं मला खरंच जमत नाही. शाळेची वेळ, विठ्ठलावर जितक्या श्रद्धेने भक्त विश्वासतो, तेवढ्याच श्रध्देने  पालकांनी माझ्याकडे पाठवलेले त्यांचे विद्यार्थी, भावी राष्ट्राचे आधारस्तंभ अशा हुशार अन् होतकरू विद्यार्थ्यांची माझ्यावर असलेली जबाबदारी, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची ती रोजची धडपड… या सगळ्या व्यापात मंदिराकडे जाणारे माझे पाय नेहमी नकळत शाळेकडेच वळतात. कधी कधी मात्र मनात कसं तरी होतं. एक हुरहूर दाटून येते की, “अरेरे! देवाच्या इतक्या जवळ राहूनही आज त्याचे दर्शन घेता आले नाही…” अशी एक सुप्त खंत मनाला स्पर्श करून जाते.

पण मला वाटतं, माझ्या विठ्ठलाने माझ्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यापेक्षा एक वेगळीच वाट निवडून ठेवली आहे…

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. मला खूप ताप आला होता, अंगात अजिबात त्राण म्हणून उरले नव्हते. मनात आलं की आज हक्काची सुट्टी घेऊन आणि विश्रांती घ्यावी. पण माझ्या डोळ्यांसमोर मुलांचे चेहरे आले, त्यांचं नुकसान नको म्हणून मी तशाही स्थितीत शाळेत गेले.

मी वर्गात पाऊल ठेवले मात्र, अंगात शक्तीच नव्हती. माझा एक छोटासा विद्यार्थी धावत धावत माझ्यापाशी आला. त्याच्या इवल्याशा हातात बागेतून आणलेलं एक टवटवीत, सुवासिक मोगऱ्याचं फूल होतं.

तो अगदी निरागसपणे डोळे मोठे करून म्हणाला, “मॅडम, हे मी तुमच्यासाठी आणले आहे… आज सकाळी आई म्हणाली की गुरुंना दिलेलं फूल थेट देवापर्यंत पोहोचतं.”

मी काही बोलणार, इतक्यात मागून दुसरी विद्यार्थिनी बोलली, “मॅडम, तुम्ही आजारी आहात का हो? तुमचा चेहरा किती सुकून गेलाय!”

आणि बघता बघता सगळी मुलं माझ्याभोवती जमा झाली.

“मॅडम, पाणी देऊ का?” “मॅडम, आज तुम्ही अजिबात उभे राहू नका, खुर्चीवर बसूनच शिकवा.” “तुम्ही औषध घेतलं का मॅडम?”

त्या मुलांचे ते काळजीने ओथंबलेले शब्द ऐकून माझे डोळे कधी भरून आले, माझे मलाच समजले नाही.

त्या चिमुकल्या हातातलं ते मोगऱ्याचं फूल, त्यांच्या डोळ्यांतील ती खरीखुरी काळजी आणि मनापासून चाललेली ती विचारपूस… त्या क्षणी मला आतून खूप काहीतरी जाणवलं—

मी विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात गेले नव्हते; पण माझा विठ्ठलच माझ्या या लहानग्यांच्या रूपाने माझी विचारपूस करायला माझ्यासमोर उभा ठाकला होता.

त्या निष्पाप चेहऱ्यांत, त्या प्रेमळ नजरेत आणि त्या निखळ हसण्यात मला काळ्या दगडाच्या मूर्तीपेक्षा कितीतरी पट अधिक जिवंत आणि सळसळता विठ्ठल गवसला होता.

त्या दिवसापासून माझा विठ्ठलाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्ण बदलून गेला.

अशाच पावसाळ्याचा आणखी एक दिवस मला आठवतो.

दुपारची वेळ होती. सकाळपासून थांबलेला पाऊस अचानक पुन्हा एकदा मोठ्या आवेशाने कोसळू लागला. आभाळातून जणू पाण्याच्या मोठमोठ्या धारा जमिनीवर कोसळत होत्या. वारा इतका सोसाट्याचा सुटला होता की शाळेच्या खिडक्यांची तावदाने थरथरू लागली. वर्गाच्या खिडकीतून बाहेर पाहिले, तर समोरची झाडे वाऱ्याच्या तालावर पिसाटासारखी डोलत होती. पानापानांतून पाण्याचे थेंब मोती बनून ओघळत होते. आभाळात मध्येच चमकणारी विजेची रेघ वातावरणात एक वेगळाच दरारा निर्माण करत होती. हवेत छान गारवा पसरला होता आणि मातीचा तो ओलसर सुवास आता थेट वर्गाच्या बंद दारातून आत पसरला होता.

शाळा सुटायची वेळ झाली तसा पावसाचा जोर अधिकच वाढला. सगळी मुलं आपापल्या छत्र्या आणि रेनकोट सावरत घाईघाईने घराकडे निघाली. पण वर्गाच्या एका कोपऱ्यात आमचा सुमित शांतपणे उभा होता. त्याच्याकडे ना छत्री होती, ना रेनकोट. त्याचे लक्ष बाहेर कोसळणाऱ्या त्या मुसळधार पावसाकडे आणि वाऱ्याने उडणाऱ्या पाण्याच्या तुषारांकडे होते. त्याच्या चेहऱ्यावर घरी कसे जायचे, या विचाराची चिंता स्पष्ट दिसत होती.

मी त्याच्याजवळ गेले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो दचकला.

मी हसून म्हटले, “काय रे सुमित, छत्री नाही आणलीस?”

तो हळूच मान खाली घालत म्हणाला, “नाही मॅडम… बाबा म्हणाले होते संध्याकाळी येताना नवीन छत्री घेऊन येतो. पण आज पाऊस खूप लवकर आणि मोठा आला.”

त्याच्या घरातली गरिबी मला ठाऊक होती. मी विचार न करता माझी स्वतःची छत्री त्याच्या हातात दिली आणि म्हणाले,

 “हे घे, आज ही छत्री तू घेऊन जा. उद्या येताना घेऊन ये.”

त्याने आधी नकार दिला, पण माझ्या आग्रहाखातर त्याने ती छत्री हातात घेतली. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान आणि आनंद उमटला, तो शब्दांपलीकडचा होता. तो छत्री उघडून पावसात निघाला.

काही अंतरावर गेल्यावर तो अचानक थांबला, मागे वळला आणि त्याने पावसात भिजतच मला हात दाखवून तो गोड हसला. मुसळधार पावसात, त्या काळवंडलेल्या ढगांच्या पार्श्वभूमीवर, हिरव्यागार निसर्गाच्या कुशीतून जाणारा तो लहानगा सुमित आणि त्याच्या चेहऱ्यावरचे ते हास्य… मला जणू सांगून गेले की, माझ्या विठ्ठलाने आज माझी छत्री आनंदाने स्वीकारली आहे.

आता माझ्यासाठी हा वर्ग म्हणजेच पंढरीचं मंदिर आहे. हा काळा फळा म्हणजेच विठ्ठलाची वीट आहे. हा हातातला खडू म्हणजे पूजेची तुळस आहे. आणि माझ्यासमोर बसलेला, उत्सुकतेने बघणारा प्रत्येक विद्यार्थी हाच माझा विठ्ठल आहे.

त्यांना अक्षरांची ओळख करून देणे, त्यांच्या कोमल मनावर चांगले संस्कार रुजविणे, त्यांच्या चुकांना रागावण्याऐवजी प्रेमाने दुरुस्त करणे, ते कधी खचले तर त्यांच्या पाठीवर विश्वासाचा हात ठेवून पुन्हा उभे राहण्याचे बळ देणे आणि त्यांच्या यशात स्वतःचे अस्तित्व विसरून मनापासून आनंद मानणे—हीच माझी खरी पूजा, हीच माझी आरती आणि हीच माझी रोजची पायी वारी आहे.

माणूस म्हणून माझ्याकडूनही चुका होतात, मी काही परिपूर्ण नाही. पण रोज घराबाहेर पडताना विठ्ठलाकडे एकच मागणं असतं—”देवा, माझ्या कर्तव्यात कधी कसूर होऊ देऊ नकोस.” कारण माझा या गोष्टीवर ठाम विश्वास आहे की, आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे, हीच खरी आणि सर्वोच्च भक्ती आहे.

आज लाखो वारकरी पायी चालत, चिखल तुडवत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जात आहेत.

पण माझी वारी मात्र रोज सकाळी माझ्या या शाळेकडे निघते…

माझ्या मुलांच्या त्या निरागस हसण्यात, त्यांच्या माझ्यावर असलेल्या अथांग विश्वासात, त्यांच्या मुखातून निघणाऱ्या “मॅडम” या प्रेमळ हाकेत आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी पाहिलेल्या स्वप्नांत… मला माझा पांडुरंग रोज भेटतो.

त्यामुळे आता मंदिरात रोज जाता येत नाही, याची मनात कोणतीच खंत उरलेली नाही.

कारण…

माझा विठ्ठल आता फक्त त्या गाभाऱ्यात विटेवर उभा नाही; तो तर रोज माझ्या वर्गात, माझ्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या रूपाने डोळ्यात प्राण आणून माझी वाट पाहत उभा असतो. आणि त्यांना घडवता घडवता, माझी रोजची वारी अगदी सहज पूर्ण होत असते!

माझ्या माय बापाला मी वेळ मिळेल तेव्हा भेटलेच पण इतर वेळी ते माझ्या हृदयात, मनाच्या मंदिरात, माझ्या विद्यार्थ्यात, पंढरीला विठ्ठलाच्या ओढीने येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यात त्यांचं अस्तित्व मला जाणवतं.

जय हरी विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल!

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!