
प्रचंड अशा मोठ्या शहराच्या एका कोपऱ्यातल्या त्या भाड्याच्या घरात ५८ वर्षांचे सदाशिवराव डोक्याला हात लावून बसले होते. बाहेर रात्रीचा अंधार चांगलाच दाटून आला होता. खिडकीबाहेरून येणारा वारा आज नेहमीसारखा सुखावणारा नव्हता, तर त्यात एक अनामिक हुरहूर, एक भीती दाटलेली होती. गल्लीतल्या त्या जुन्या पिंपळाची पानंही आज शांत, स्तब्ध झाली होती; जणू निसर्गही सदाशिवरावांच्या दुःखात अबोल झाला होता. घरा शेजारच्याच हॉस्पिटलच्या आयसीयूच्या खोलीत सदाशिवरावांचा जीव अडकला होता. त्यांच्या काळजात भीतीचा गोळा आला होता. आत त्यांची पत्नी, सुशीला, मृत्यूशी दोन हात करत होती.
सुशीला… आयुष्यभर कमालीची हौशी. तिला छान नटायला, सणावाराला चारचौघात कौतुकाने फिरायला, देवदर्शनाला जायला, तीर्थक्षेत्राला जायला, खूप आवडायचं. डोक्यात मोगऱ्याचा गजरा माळणं आणि कपाळाला ठसठशीत कुंकू लावणं, हा तिचा हक्काचा आनंद. तिने संसारात आल्या गेल्याचं करताना कधी आखडता हात घेतला नाही की कुरकुर केली नाही. सदाशिवरावांच्या कारकुनी पगाराच्या मर्यादित चौकटीत तिची कोणतीच हौस कधी पूर्ण होऊ शकली नाही. सुशीलानेही कधी हट्ट धरला नाही; घरातला तिचा तो समजूतदारपणा तिने कायम ठेवला. संसारात स्वतःला झिजवताना तिने मनातल्या भावना अलगद एका पुरचुंडीत बांधून दूर कुठेतरी काळजाच्या कोपऱ्यात दडवल्या होत्या.
काही दिवसांपूर्वीच सदाशिवराव निवृत्त झाले. निवृत्तीचे थोडे पैसे हातात आले आणि त्यांनी गावाकडे आता स्थिर व्हायचं ठरवलं होतं. त्यापूर्वी त्यांनी सुशीलाच्या मनातली ती जुनी हौस ओळखली, “सुशीला, चल… आता पैशांची नड नाही. तुला देवदर्शनाला घेऊन जातो. तिथे तुला हवी ती खरेदी कर!” राहिलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचे दिवस आले होते. दोघेही जाण्याची पूर्ण तयारी करत होते.
दोनच दिवसांपूर्वी घरात सामानाची आवराआवर झाली होती. सुशीलाने तिच्या लग्नातली, वर्षानुवर्षे जपून ठेवलेली ती जरतारी पैठणी सुटकेसमध्ये सर्वात वर ठेवली होती. “तिथे गेल्यावर मी हीच साडी नेसणार,” असं म्हणताना तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य सदाशिवरावांच्या डोळ्यांसमोरून हलत नव्हतं. ती आनंदात जणू पंख लावूनच घरात वावरत होती. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. निघण्याच्या आदल्याच रात्री, जेव्हा अंगणात गार वारा सुटला होता, दोघेही दुसऱ्या दिवशीच्या तयारी विषयी बोलत होते. तेवढ्यात सुशीलाच्या छातीत तीव्र कळ आली—तो हार्ट अटॅक होता. बघता बघता काहीतरी अघटित घडतंय हे लक्षात आलं आणि गावाला जाण्याच्या सुटकेसऐवजी सदाशिवरावांच्या हातात हॉस्पिटलच्या फाईल्स आल्या. गावातच राहणाऱ्या आपल्या मुलाला त्यांनी लगेच कळवले होते परंतु त्याला ऑफिसच्या कामातून वेळ नव्हता त्यामुळे तो अजून दवाखान्यात येऊन भेटलाच नव्हता.
हॉस्पिटलचा खर्च लाखांच्या घरात गेला. आयसीयूचे रोजचे आकडे पाहून खिशातले पैसे आणि काळजाचा ठोका दोन्ही सुटत चालले होते. सदाशिवरावांनी तातडीने मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर असणाऱ्या आपल्या मुलाला, अमितला फोन केला. अमित दवाखान्यात आला खरा, पण आयसीयूच्या पांढऱ्याशुभ्र, थंडगार भिंतींकडे पाहत त्याने अत्यंत व्यावहारिकपणे हात वर केले.
“बाबा, तुम्ही समजून घ्या. माझ्या नवीन फ्लॅटचे हप्ते, कारचे लोन आणि मुलांच्या इंटरनॅशनल स्कूलची फी… यातच माझा पगार संपतो. माझ्याकडे एवढी मोठी रक्कम शिल्लक नाही. आणि शेवटी वय झालं की हे सगळं होणारच, आपण तरी काय करणार?”
अमितच्या या थंड शब्दांनी सदाशिवरावांच्या काळजाचे तुकडे केले. रक्ताच्या नात्याने, स्वतःच्या जन्माच्या पांग फेडण्याऐवजी ऐनवेळी परक्यासारखी पाठ फिरवली होती.
आता सदाशिवरावांसमोर फक्त एकच मार्ग उरला होता, गावाकडचं जुनं घर विकणं. ते घर म्हणजे फक्त दगड-मातीची भिंत नव्हती. घराच्या सभोवताली खेळलेलं बालपण, ओसरीवर बाबांनी घरासाठी घेतलेले कष्ट, अंगणात डोलणारी आईच्या हातची तुळस आणि वाडवडिलांच्या मायेचा, परंपरेचा गंध तिथे रेंगाळत होता. उन्हाळ्यात ज्या घराच्या कौलारू सावलीत जीव सुखावायचा, ते घर विकायचं म्हणजे स्वतःच्या हाताने कुऱ्हाड चालवण्यासारखं होतं. एकीकडे आई-वडिलांचे संस्कार, गावाकडच्या आठवणींची ती पवित्र माती आणि दुसरीकडे मृत्यूच्या दारात उभी असलेली, श्वासांसाठी धडपडणारी अर्धांगिनी. त्यांच्या मनात विचारांचं प्रचंड वादळ उठलं होतं.
शेवटी, डोळ्यात दाटून आलेलं पाणी पुसत सदाशिवरावांनी जड अंतःकरणाने गावाकडच्या एका मित्राला फोन लावला. “माझं घर विकायचंय… बघ,” असं म्हणताना त्यांचा आवाज लटपटत होता, छाती दडपून आली होती. पण त्याच क्षणी आयसीयूच्या काचेतून आत सुशीलाकडे पाहताना त्यांच्या मनात एक खंबीर विचार चमकून गेला,
“गावाकडचं ते अंगण, ती माती, ते घर पुन्हा कमावता येईल… पण सुशीला गेली, तर या सिमेंटच्या शहराच्या जंगलातून मी गावाकडे एकटाच जाईल आणि पूर्णपणे पोरका होईन. ज्या हक्काच्या घराचं सुख तिला आयुष्यभर उपभोगता आलं नाही, तेच घर आज तिचे प्राण वाचवून तिचं अस्तित्व जपणार होते.”
मुलाच्या स्वार्थीपणामुळे मन विदीर्ण झालेलं असतानाही, सदाशिवराव आयसीयूबाहेर एखाद्या जुन्या वृक्षासारखे खंबीरपणे उभे राहिले. खिडकीतून बाहेर पाहताना रात्रीचा तो काळाकुट्ट अंधार आता विरळ होत चालला होता. पहाटेची पहिली कोवळी, सोनेरी किरणं त्या अंधाराला चिरून बाहेर पडत होती. ती किरणं जणू सदाशिवरावांच्या चेहऱ्यावर रेंगाळत सांगत होती की, जुन्या घराच्या त्या त्यागाने सुशीलाच्या श्वासांची एक नवी, सुखाची लहर आता या संसारात नक्कीच सुखावून जाईल.