निरभ्र

         

           शनया शांत झोपली होती तिच्या मुख कमलावर तिचे आलेले कुरळे केस पाहून रवीला ते हळूच सरकवावे आणि तिच्या गालावर प्रेमाने हळुवार हात फिरवावा असे वाटले पण दुसऱ्याच क्षणी त्याने तो विचार मनातून काढून टाकला. शांत झोपलेल्या आपल्या पत्नीची झोप मोड करणं त्याला उचित वाटलं नाही. आधीच काल हॉस्पिटलमध्ये जास्त पेशंट असल्याने त्याला घरी यायला बराच उशीर लागला होता. उशीर तर काय होणारच ना! त्याची ख्याती लांब लांब पर्यंत पसरली होती. तो आपल्या कामातच देव शोधत होता आणि पेशंटला देव मानत होता. पाहता पाहता त्याला आपल्या दिवसातले अवघे काही तास घरामध्ये देणं होत होतं. 

             अट्टाहासने त्याने डॉक्टर नसलेल्या मुलीशी लग्न केलं. स्वतःचं वेगळं असं काही असलं पाहिजे. सारखं काम, पैसा एवढं म्हणजेच  आयुष्य असे तो मानत नव्हता. शनयाच्या घरच्यांनीही त्याला प्रथित यश डॉक्टर म्हणून पसंत केलं होतं. शनयाच्या घरीही मोठा व्यवसाय होता. सर्वांना आपल्याला डॉक्टर जावई मिळाला याचे कौतुक होते. शनायाही डॉक्टर साहेबांवर एकदम खुश होती. दररोज आवर्जून ते तिला हवं नको ते पाहतच पण एकत्र जेवण, फिरायला जाणं हेही होतंच. अधून मधून थंड हवेच्या ठिकाणी तर कधी चार दिवस माहेरी. स्वर्ग सुख म्हणजे नक्की हेच याची तिला खात्री झाली होती. 

                    रवी आज तिला लॉंग ड्राईव्हला घेऊन जाणार होता. सर्व तयारी झाली होती. तेवढ्यात हॉस्पिटल मधून अचानक फोन आला. एक डिलिव्हरी केस आली होती. तशी ती स्त्री त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये नेहमी येत होती पण तिला दिलेली तारीख आणखीन दोन महिन्यांची असताना ती अचानक काही कारणाने आल्याने रवीला तातडीने जाणे भाग होते. शनायाकडे न पाहताच मी जाऊन येतो एवढं सांगून तो निघाला. अशी परिस्थिती यापूर्वी बऱ्याच वेळा आली होती. एवढं काही विशेष नाही असं त्याला वाटत होतं पण तिला मात्र अलीकडे या गोष्टीचा राग येत असे. हाताखाली एवढे डॉक्टर आहेत. काही शिकाऊ डॉक्टर ही आहेत. मग स्वतः जाण्याची गरजच काय? हा प्रश्न तिला सतावत होता. म्हणून तिने एकदा तसे विचारलं होतं. त्यावेळी त्याने तिला व्यवस्थित समजूनही सांगितलं होतं पण तिला मात्र हे मान्य नव्हतं. तिचं आपलं मागच्या पानावरून पुढे सुरू होतं. अलीकडे या आठ-दहा दिवसात तिच्यामध्ये बराच बदल होत होता. त्यांच्यामध्ये त्यामुळे छोटी मोठी भांडणं सुरू झाली होती. त्याला हे समजत नव्हतं की त्याने तिला लग्नापूर्वी हे सारं समजून सांगितलं, मग पुन्हा पुन्हा तेच ते काय? 

                     तो दवाखान्यात जाऊन दोन तासात परतलाही पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे घर म्हणजे कुरुक्षेत्र झालं होतं. आजची केस किती महत्त्वाची होती. त्याच्या वेळेवर जाण्याने एका चिमुकल्या कळीने हे जग पाहिलं होतं. नाहीतर… पण तिला या सर्व गोष्टींशी काही देणं घेणं नव्हतं. बाकी सर्व ठीक पण माणुसकी हवीच ना! असं त्याचं मत.  त्याने या पंधरा दिवसात तिच्यात होत असलेला बदल अचूक टिपला होता. तो तिला समजावण्याच्या पवित्र्यात तिच्या जवळ चालला होता पण तेवढ्यात त्याला सासू-सासर्‍यांचा आवाज आला. अरे बापरे! हे केव्हा आले?  एवढं काय नाराज व्हायचं की लगेच आई-बाबांना बोलावून घेतलं. असा विचार त्याच्या मनात आला. तसा तोही आता मनातून नाराज झाला. त्याला वाटलंच आपल्या दोघांमधील गोष्ट अशी चारचौघात करायची काय गरज होती. या सर्व विचारांचा गुंता त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला. पाहता पाहता त्या घरात असणाऱ्या चार व्यक्तींच्या मनावर एक वेगळंच दडपण जाणवू लागलं. रवीने कामापुरते नमस्कार चमत्कार करून थेट आपले बेडरूम गाठलं. शनयाला आता किती समजून घ्यायचं? हा त्याच्यापुढे प्रश्न होता. गेल्या आठ दिवसात त्यांनी तिच्यामुळे एक महत्त्वाची डॉक्टरांसाठी आयोजित केलेली कॉन्फरन्स सोडली होती. तसं ते तिच्या मनाचा भावनांचा, अस्तित्वाचा विचार करतच होते ना!  मग…

 एवढ्यात त्याला बेडरूमचे दार उघडून शनाया आत आल्याचे लक्षात आलं. आताही हिच्या शस्त्र साठ्यातील एक शस्त्र ती आपल्यावर सोडणार त्यापूर्वीच आपण जागं झालं पाहिजे. या पवित्र्यातच रवी तिच्यावर बरसला. तिला हे अपेक्षित नव्हतं. त्यामुळे तीही मग सुरू झाली. पाच मिनिटांच्या मी- तू मध्ये त्यांच्यात चांगलाच दुरावा निर्माण झाला. 

                    तसं तर शनया आई-बाबांच्या अचानक येण्याने नाराज झाली होती. त्यांना ती काही म्हणू शकत नव्हती म्हणून ती आजच्या रद्द होणाऱ्या फिरायला जाण्याच्या योजनेसाठी माफी मागायला आली होती. तिला मात्र डॉक्टरांचं असं चिडचिड करणं खटकलं होतं. तरीही रागात तिने आई-बाबा आपल्या गावात लग्न असल्याने आले होते, आपणास भेटून जावे म्हणून आले आहेत हे सांगितले. पण तरीही बोलत बोलता समज गैरसमज झाले आणि अबोला सुरू झाला. मुक युद्धचं जाहीर झालं होतं जणू.‌ दोघेही मग आई-बाबांसमोर आमच्यात काहीच समस्या नाही. आमचं कधीच भांडण होत नाही. आम्ही एकमेकांना समजून घेतो. आम्हाला एकमेकांशिवाय करमत नाही अशा गोष्टी दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. 

‌                      आई-बाबांनी अचानक येण्याचे कारण सांगितलेच होते. तेही दोघांमधील प्रेम जिव्हाळा पाहून समाधानाने चार दिवसांनी गावी परतले. इकडे मात्र दोघांमध्ये चाललेल्या मूक युद्धाला आता पुन्हा एकदा नवीन स्वरूप मिळत होते. चांगले एक दोन दिवस पुन्हा वेळ मिळेल तसं मी- तू सुरू झालं. पण समजून घेणं आता शक्य नाही असं वातावरण सुरू होतं. 

                  आज रविवार असल्याने डॉक्टर इस्पितळात जाणार नव्हते. दवाखान्यातून फोन येईल याचीही काळजी नको म्हणून त्यांनी अगदीच महत्त्वाच्या कारणासाठी घरच्या फोनवर फोन करण्यास सांगितले होते. आज युद्धविराम करायचाच त्यांनी ठरवला होता. एकंदरीत सर्व वातावरण निर्मिती करण्याचा त्याचा प्रयत्न जवळजवळ यशस्वी झालाच होता. एवढ्यात शनायाचा फोन वाजला. एवढ्या सकाळी फोन म्हणजे मन घाबरतं. एक तर कोणीतरी या जगातून गेलं किंवा कोणीतरी या जगात आलं. तसंही नातेवाईकांमध्ये कोणी येणार असेल तर त्याची कल्पना असतेच की. विचार करतच  तिने फोन घेतला तर काय, बाबांचा फोन. तिने फोन उचलला पण दुसऱ्या सेकंदाला काय, केव्हा, आता कुठे? या तिच्या प्रश्नार्थक शब्दांमुळे डॉक्टरांनाही अनेक प्रश्न पडले. ती आता हमसून हमसून रडू लागली. काही कळायला मार्ग नसल्याने डॉक्टर साहेबांनी तिच्या हातातून जवळजवळ फोन ओढला. फोनवर बोलल्यावर शनायाच्या आईला अचानक छातीत दुखत असल्याचं कळालं. त्यांनी मित्र असलेल्या हृदयरोगतज्ज्ञाला फोन करून तो पळतच गाडीकडे निघाला. त्याच्या मागे शनायाही पळाली.

               पंधरा दिवसांनी जेव्हा आईला दवाखान्यातून घरी सोडले तेव्हा शनायाने आईला काही दिवस घरी ठेवून घेतले.  जावईही अगदी जातीने त्यांची काळजी घेत होते. शेवटी महिन्याने फेर तपासणी करून आई-बाबा गावाकडे गेले. 

                    दोघेही आज बागेत निवांत बसले होते दोघांच्याही मनात दाटलेलं मळभ आता वाहून गेलं होतं. दाटलेलं आभाळ मोकळं झाल्यावर निरभ्र दिसणाऱ्या आकाशाप्रमाणे. मग शनायाच त्याच्याजवळ सरकत म्हणाली,

‘ मला क्षमा करा. खरंच माझी आई आजारी पडल्यावर, तिला अचानक त्रास व्हायला लागल्याने. मला डॉक्टरांच्या भूमिकेचे महत्त्व पटलं. मी पुन्हा कधी तुमच्या कामाबद्दल तक्रार करणार नाही. तुम्ही खुशाल तुमचा दवाखाना, तुमचे पेशंट पाहत जा.’

 यावर डॉक्टरही मग तिला जवळ घेत म्हणालेच पण मला आता आपल्या संसाराची काळजी केलीच पाहिजे. शनायाच्या चेहऱ्यावर काळजी कसली असा प्रश्न दिसत होता?  तसे डॉक्टर जोरात हसत म्हणाले,

‘अगं वेडाबाई आपल्या घरी पाहुणा येणं महत्त्वाच आहे ना!’

 पाहुणा हा शब्द फक्त शनयाच्या कानांवर जोर देऊन गेला. तिच्या चेहऱ्यावरची नाराजी ती लपवू शकली नाही. तसं डॉक्टर म्हणालेच,

 ‘आपल्या संसार वेलीवरील फुलाविषयी बोलतोय गं राणी.’

 शनया लाजेने चूर झाली आणि तुम्ही पण ना… म्हणत बंगल्यात गेली. आता या बंगल्यावरील आकाश निरभ्र होतं आणि बंगल्यातील जोडप्याचं मनही एकमेकांविषयी तक्रारीच्या भावनेतून मुक्त निरभ्र झालं होतं.

             

                   

                     

                    

‌                     

                  

               

                    

 

 

 

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!