
लेकरं
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आषाढी एकादशीचा सोहळा संपला होता. दिवसभर विठ्ठलाच्या चरणी लाखो वारकऱ्यांनी मस्तक टेकवले होते. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने पंढरी दुमदुमली होती. पण आता द्वादशीची पहाट उगवली होती. चंद्रभागेच्या वाळवंटात हळूहळू शांतता पसरू लागली. वारकरी आपल्या गावाकडे परतण्याची तयारी करत होते.
विटेवर उभा असलेला विठ्ठल प्रत्येक वारकऱ्याकडे प्रेमाने पाहत होता. त्याच्या डोळ्यांत समाधान होते, पण त्याचबरोबर विरहाची एक हलकीशी जाणीव पण होती. रुक्मिणी माताही मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पाहत होती. तिच्या नजरेसमोर प्रत्येक वारकरी म्हणजे तिचेच लेकरू होते.
रुक्मिणी हळूच म्हणाली, “नाथ, पाहा ना… कालपर्यंत हे सारे भक्त आपल्या दर्शनासाठी किती आतुर होते. आज मात्र प्रत्येकाच्या पावलात जडपणा आहे.”
विठ्ठल मंद हसले. “रखुमाई, त्यांना तुझ्या -माझ्यापासून दूर जायचे नाही. पण संसाररूपी सेवा हीही आपलीच आज्ञा आहे. ते शेतात जातील, काम करतील, कुटुंब सांभाळतील; पण त्यांच्या प्रत्येक श्वासात आपले नाव असेल.”
एक लहान मुलगा मंदिराबाहेरून वळून पुन्हा पुन्हा विठ्ठलाकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यांत पाणी होते. ते पाहून रुक्मिणीचे हृदय द्रवले.
“नाथ, त्या लेकराला किती वाईट वाटत असेल!”
विठ्ठल म्हणाला, “त्याला वाटते मी इथेच राहतो. पण त्याला अजून कळले नाही की मी त्याच्या हृदयातही राहतो.”
इतक्यात एक वृद्ध वारकरी विठ्ठलाला हात जोडून म्हणाला, “देवा, आता पुढच्या आषाढीला भेटू.”
विठ्ठलाच्या डोळ्यांत प्रेमाश्रू दाटले. ते मनोमन म्हणाले, “तू फक्त आषाढीतच नाही, रोज मला आठव. तुझ्या प्रत्येक सत्कर्मात, प्रत्येक नामस्मरणात मी तुझ्यासोबत आहे.”
रुक्मिणीने भक्तांना आशीर्वाद दिला, “सुखरूप घरी जा. तुमच्या घरात प्रेम, समाधान आणि भक्ती नांदो. संकटात धीर सोडू नका. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत.”
वारकऱ्यांच्या टाळांचा आवाज दूर दूर जात राहिला. भगव्या पताका नजरेआड झाल्या. पंढरी पुन्हा शांत झाली.
विठ्ठल मात्र विटेवर तसाच उभा राहिला—पुढच्या भेटीची वाट पाहत.
आणि त्या शांततेत त्याचे मन जणू प्रत्येक भक्ताला त्यांच्या लेकराला हाक देत होते—
“जा रे माझ्या लेकरांनो … संसारातील कर्तव्य पार पाडा. पण नामाची दोरी कधी सोडू नका. मी तुमच्या प्रत्येक पावलासोबत आहे. पुन्हा या… मी याच विटेवर तुमची वाट पाहत उभा असेन.”