दोन दिवस

क्षण असा एकही नाही
उसंत वाटे कधी जीवाला
आठवणींची वाहे नदी
जावे दोन दिवस माहेराला

मी गाणं गुणगुणतच बँग भरत होते. काही दिवसांपूर्वीच पाडवा आणि भाऊबीज झाली. एका दिवसात दोन सण म्हणजे अगदी दोन दिवसात दीपावली पार पडली. सासूबाईंना मात्र मी माहेरी जाणार म्हणल्यापासून चीड चीड होवू लागली होती. त्यांची स्मिता शनिवारी येणार आणि मी रविवारी जाणार.
‘माझं लेकरू संसारातून दमून भागून दोन दिवस विश्रांतीला माहेरी येणार अन् या बाईला आहे का काही त्याचं.’
असा काहीसा विचार त्यांच्या नजरेतून स्पष्ट दिसत होता. हे सारं खरं होतं पण मी ही कुणाचे तरी लेकरू होतेच ना ! मी ही माहेरी दोन दिवस विश्रांतीसाठीच चालली होते पण…

मला सुट्टी लागल्यापासूनच काय पण त्याच्या आधीपासूनच कामं करून करून दमल्यासारखं वाटत होतं. खरंतर नौकरी करून घरचं दारचं सांभाळायचं म्हणजे शरीराची हालत बेकार होतेच पण मनाची तर विचारूच नका. परवाच काही दिवसांपूर्वी एक गोष्ट घडली आणि माझ्या आणि सासूबाईमध्ये शाब्दिक वाद झाले आणि त्या स्पष्ट मला म्हणाल्या,
‘तू नौकरी करताना घरातलं आणि बाहेरचं दोन्हीही व्यवस्थित पाहीन या अटीवर नौकरी करण्याचा निर्णय घेतलास आणि कशाला तक्रार करतेस. सोड नौकरी आणि बस निवांत घरात. नवरा एक भाकरी कमवेल त्यातली अर्धी खाऊन समाधानी रहा.’
मी सर्व बोलणं ऐकलं आणि माझी जास्तच कुचंबणा होतेय असं मला जाणवू लागले. शांतपणे विचार केला आणि माझ्या मैत्रिणीला म्हणजे शिरीनला फोन केला. ती ऑफिस सुटल्यावर आली. तिथून आम्ही दोघी कॉफी घ्यायला गेलो. कॉफी घेताना इकडच्या तिकडच्या गप्पा होवून गाडी शेवटी आमच्या मूळ विषयावर आली. माझ्या आणि सासूबाईच्या वादाबद्दल बोलणं झालं आणि तिने मला राजमार्ग दाखविला.


‘तू घरातल्या आणि ऑफिसमधल्या जबाबदाऱ्या टाळू शकत नाही. कारण त्या तूच पार पाडायच्या आहेत. ते तूच मनापासून समजून घेतलंस तर मग सारी परिस्थिती कशी हाताळायची हे तू समजून घेऊन नियोजन केलं तर तुला ताण जाणवणार नाही. सोबत घरातल्यांनाही ताण वाटणार नाही. तू कमवतेस तर काही निर्णय तुझ्या तू स्वतंत्रपणे घेतले पाहिजे.’
तिचा सल्ला मला असा सहजासहजा पचनी पडणारा नव्हता पण शेवटी पर्याय नसल्याने मी तो अंगिकारला. पाहता पाहता मी नियोजन केले आणि माझ्या लक्षात आलं की खरंच आपण विचार का करत नव्हतो. आपण आलेल्या परिस्थितीला प्रसंगाला सामोरे जाणं महत्वाचं जर आहे तर ती परिस्थिती स्विकारण्याने बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. मी घरात घरकामासाठी असणाऱ्या उषालाच आणखी थोडी घरातली कामं वाढवून पगारही वाढवला.

तिला वाढीव पगार मिळाल्याने तीही खुश. माझीही कामं वेळेवर होवू लागली. सासूबाईंवर कामाचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी झाला . घरातल्या जबाबदाऱ्या कमी झाल्याने मला स्वभाविकपणे थोडा मोकळा वेळ मिळू लागला. त्यात मी घराबाहेरच्या घराशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडत होतेच. सारेच खुश होते. सासूबाईनी माझ्या निर्णयाचे स्वागत केले. हेही खूप झाले. आलिकडे त्यांची नीती मला आवडते,
‘आम खानेसे मतलब गुठलियों से क्या काम।‘
पहाता पहाता दिवस जात होते. ऑफिसमध्ये चांगल्या कामामुळे माझी पदोन्नती होत होती. मला एकूणच मनाला शांतता आणि समाधान मिळत होते.


मैत्रीणीच्या निर्णयाप्रमाणे सर्वच परिस्थिती मान्य करून रहायचं होतं म्हणजेच मी स्वतःला आनंदी, प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न मी करत होते. म्हणूनच दीपावली सणाची तयारीही उत्साहाने केली होती. सर्वांसाठी आवडीचे पदार्थ स्वतः केले होते. सर्वांसाठी कपडे आणले होते. सजावट आणि फटाके यांकडे विशेष लक्ष दिले होते. खरंतर फराळाचे पदार्थ ऑफिसमधल्या खूप जणांनी ऑर्डर देवून करून घेतले पण मी मात्र याबाबतीत वेगळा विचार करत होते. वर्षातून दोनदा फक्त हे पदार्थ घरामध्ये बनवले जातात. एक तर लक्ष्युम्या आणि दुसरे दीपावली. लक्ष्युम्याच्या वेळी वेळ कमी म्हणून प्रमाण कमी पण आता वेळेपेक्षा सुद्धा नाती- गोती, पै- पाहुणे आणि घरातील सर्वांचा विचार करता सढळपणे करणे महत्त्वाचे म्हणूनच मी हौसेने ऑफिस व घरकामातील काही काम बघत हे सारे केले. नाही म्हणलं तरी थोडी धावपळही झालीच.

पहाता पहाता सणाचे दोन दिवस गेले अन् सुट्टीचे चार-पाच दिवस राहिले. या दिवसात मग दोन दिवस माहेरी जावून साऱ्यांना भेटलं की एक सकारात्मक उर्जा वाढते. मन प्रसन्न ताजेतवाने होते. तसं चार पाच दिवस रहाण्याचा विचार होता पण नणंदबाईंची गाठ घेऊनच जावे म्हणून एक-दीड दिवस त्या आल्यावर राहून मग मी माहेरी जाणार म्हणल्यावर सासूबाई चिडल्या खरे. पण माझ्या नणंदबाईंनी त्यांना समजून सांगितले कारण जरी आम्ही नात्याने नणंद-भावजया होतो तरी शेवटी आम्ही स्त्रिया आहोत. एकमेकांना समजून घेण्याने आमचंच भलं आहे हे आम्ही जाणतोच.

आपणच आपली आणि इतरांची काळजी घेत असताना आपल्या स्व अस्तित्वाला जपणं खुप महत्वाचे असते. कर्तव्य तर आयुष्यभर करावीच लागतील पण त्यात गुरफटून न जाता, स्वकर्तृत्वावर व्यक्तित्व खुलवणे ही आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे महत्वाचे आहे कतृत्वाचे पंख पसरुन स्वच्छंदी वृत्तीने फिरणे सोपे नसले तरी अशक्य नाही हे मात्र अगदी खरं. आज मी, माझ्या नणंदबाई, सासूबाई किंवा आमच्या लेखी. या सर्वांच्या पुढील वेळेकाळानुसार निर्माण झालेली परिस्थिती पाहिली की स्त्रीयांनी केलेली प्रगती सहज लक्षात येते.

4 thoughts on “दोन दिवस

  1. स्त्री जेव्हा नोकरी आणि घरकाम दोन्ही करते तेव्हा तिच्या शरीराची खूपच जास्त झीज होते । स्त्रीला गर्भारपण , बाळंतपण , मुलांना दूध पाजणे अशा अनेक शारीरिक कसोट्याना सामोरे जावे लागते । स्त्रीच्या आरोग्याचा , सोयीचा विचार कोणीही कधीही करत नाही । गायीसारखे स्त्रीला फक्त उपयोगी वस्तू म्हणून वापरून घेतले जाते । तयामुळे स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्य आणि सोयीचा विचार स्वतःच खंबीरपणे केला पाहिजे । होत नसेल तर स्पष्ट नाही सांगा । नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा पैसे नवरे संसारासाठी वापरून घेतात आणि तयाची वैयक्तिक शिल्लक अजिबात राहू देत नाहीत । नोकरदार स्त्रियांनी अर्धा पगार स्वतःच्या वेगळ्या खात्यात टाकलाच पाहिजे ।
    पतीला सेक्स , मुले , दिल्यावर , स्वयंपाक केल्यावर पत्नीची कर्तव्ये संपतात । नवऱ्याला फक्त पैसे कमावून कुटुंब पोसणे एवढेच काम असते । तेही यांच्याच्यानी होत नाही म्हणून बायकोला नोकरीला लावून तिचा पैसे खातात आणि सर्व घरकाम , मुले , आई वडिलांची सेवा स्त्री कडून करून घेतात ।
    कशाला एवढे काम स्त्रियांनी करून स्वतःची तब्येत बिगढवायची ? आजारी स्त्रीचे हाल कुत्रेही खात नाही
    तेव्हा नोकरदार स्त्रियांनी नोकर ठेऊन jamel तेवढेच करावे

    1. वास्तव आणि विचार करायला लावणारी प्रतिक्रिया. धन्यवाद

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!