मी दादाला सांगून भाऊबीजेला गेल्यावर चार दिवस आईला आपल्या घरी आणलं होते. तसे आम्ही दोघंच बहिण-भावंडं, मी साताऱ्याला तर माझा राजू दादा मुंबईला. आई पूर्वी बाबा असताना गावाकडे रोपळ्याला राहत होती. आई बाबा दोघं असताना त्यांचा वेळ छान जायचा. आईला बाबांचं अन् येणाऱ्या जाणाऱ्यांचं करण्यात वेळ भुर्रकन उडून जायचा. बाबांची नौकरी अन् शेती होती. त्यात खूप वेळ जायचा. कधी चार दिवस मुंबई- सातारा कुठल्याच ठिकाणी जायला सवड नसायची. बाबा गेले तसे तिचे आकसलेलं विश्व आणि मनाच्या विचित्र संकल्पनांनी ती एकाकी झाली. पण या प्रश्नावर मी आणि राजू दादानं तोडगा काढला आणि आईला समानतेचं महत्व पटवून देवून जुन्या संकल्पनांना छेद देत, तिला नव्या दृष्टीने जगाची ओळख करून दिली होती.
माझ्या बाबांच्या जाण्याने मला काही दिवस आपलंच घर म्हणजेच माहेर परकं वाटू लागलं पण दादाने मात्र बाबांची जागा घेत सशक्तपणे माझं माहेर पेललं होते. बाबा गेल्यानंतर आईला तसं एकटं वाटत होतं पण तरीही मी आणि राजू दादाने आईला मानसिक आधार दिला. तिला गावाकडून इकडे मुंबईला आणण्यासाठी आम्हाला द्राविडी प्राणायाम करावा लागला. गावाकडच्या वातावरणातून ती शहरात रमणं सोप्पं नव्हतं तेवढ्याच मानसिकतेने ती गावी एकटी रहाणंही शक्य नव्हते. पहाता पहाता ती गरज म्हणून का होईना मुंबईमध्ये राहिली. नातवंड, सुन, मुलगा यांच्या शाळांच्या कामाच्या वेळा. त्यांच्या गरजेला आपण उपयोगी पडायचं आणि राहिलेल्या मोकळ्या वेळात स्वतःचे छंद जोपासायचे. यासाठी मग दादाच्या सोसायटीतील वयस्क लोकांचा ग्रुप होता. त्यांच्या सोबत देवाला जाणे, भिशी कार्यक्रम, भजन- किर्तन, नामजप आणि छोटया-मोठया सहली. बघता बघता कळी खुलावी तसं इतक्या दिवसांपासून अव्यक्त असलेल्या आईची कळी खुलली होती. मला तर सुखावल्यासारखं वाटलं. तशी मीं सणावाराला आणि आठवणींनी मन् भारावलं की दोन दिवसांची वेळ काढता आली तर नक्की जायचे.
आई तेवढे दोन दिवस मात्र माझ्यासाठी तिचे सर्व कार्यक्रम बाजूला ठेवत असे. असच एकदा मी आईला माझ्या मुलाच्या श्रीच्या वाढदिवसाला बोलावलं. तसं दादा-वहिनी त्याची बच्चे कंपनी होतीच. आई आली खरं पण दादा- वहिनीबरोबर आली आणि एक दिवसात लगेच परत निघाली. मी रहाण्याचा आग्रह केल्यावरही तीने जावयाच्या घरी मी कशी रहाणार? असं तिचं वाक्य ऐकल्यावर मला तर तिच्या जुन्या विचारांचा राग आला. मी तिला मुलगा-मुलगी समानता आणि बदलते विचारप्रवाह समजून सांगितले. मुलींना माहेरात हक्क, अधिकार दिला जातो मग, आईचा सहवास का नको ? आईचं माहेरपण लेकीन नाहीतर कुणी करायचं. या सर्व विचारांचं श्रवण जरी तिने केलं तरीही मनाचं चिंतन अन् त्याप्रमाणे आचरण इतक्या सहज होणार नाही हे आम्हा सर्वांना माहित होतेच.
काही समस्यांना, अन निरुत्तरीत प्रश्नांना काळ हे खूप मोठे औषध असते. आणि हेच साधून मी तिला भाऊबीजेला गेल्यावर चार दिवस माझ्या बरोबर चलण्याचा आग्रह केला. कधी नव्हे ते काही समस्या आणि कारणे न सांगता ती तयार झाली, हे विशेष. पहिलं तर ती माझ्या घरात रहाणार म्हणून मी सुखावले होते. मायेची शाल पांघरायला अन् तिच्या ऊबेत स्वर्गसुख अनुभवायला साऱ्यांनाच मिळतं असं नाही. माझी मुलं अन् यजमान ही खुश होते. आईकडून कधी आणि काय करून घ्यायचं याची यादी प्रत्येकाच्या मनात तयार होती.
आईनंही कुणाला काय करायचं, कधी करायचं, हे ठरवलेलंच होतं. पण मी या सर्वांच्या मनसुब्यांवर पाणी टाकलं. म्हणजेच मी तिला निवांतपणा, दयायचं ठरवलं. तसही ती दादाच्याही घरी निवांतच होती. पूर्वी मला माहेरी यायला आवडायचे. म्हणतात ना! सासर, कितीही गडगंज असलं तरी माहेरच्या घरच साधं सुधं जेवणही पंचपक्वानांच्या चवीला मागं टाकत मी तिला जे जे आवडतं ते करता येईल अशी योजना करून तिचा दिनक्रम आखून दिला. तिला बागेत फिरायला तसंच रोपलागवड आवडते. म्हणून तिला सकाळी बागकाम करणे, मुक्पणे फिरणे, व्यायाम. नंतर तीची इच्छा असेल तर एक पदार्थ करे. नंतर दुपारी वामकुक्षी. नंतर चहा पाणी झाले की मग पुन्हा मंदिरात जावून दर्शन. पुन्हा गप्पा टप्पा मग वाचन. तिला वाचायला आवडतं म्हणून मी खूप पुस्तके आणली होती, मी मनात विचार केला, तीनं स्वत:च्या आवडींना आजपर्यंत महत्त्व दिलं नाही.
हौस मौज आणि इतर अव्यक्त इच्छा मनाच्या समुद्रात पुरचुंडीत बांधून दूर भिरकावून दिल्या. कधीतरी आठवण होणारच. आयुष्यात इतरांसाठी जगावं हे जरी खरं असलं तरी स्वतः साठीही जगलंच पाहिजे. कर्तव्याच्या बरोबर स्वअस्तित्व आणि आत्मसमाधान हे महत्त्वाचे असतात. माझी आई फक्त इतरांसाठी जगली, चंदन बनून दुसऱ्यांसाठी झिजली. आता ती फक्त स्वतः साठी जगेल. तीने या उभ्या आयुष्यात स्वतः साठी काही मौलिक क्षण गोळा केलेच नाही कदाचित. तिच्या मनासारखं ती केव्हां राहू शकली नव्हती. कर्तव्याच्या दुष्ट चक्रातून कोणी सुटका करत नाही. पण,..त्यातून थोडं जरी पाऊल सकारात्मकतेकडे पडले तर ती सुखावेल. म्हणूनच तिला माझ्याकडे चार दिवस बोलवून तिला समाधान. ही गोष्ट देणार होते. त्यासाठीची दिशा मी निवडली तरी त्यादिशेने यशस्वी पाऊल ती टाकणार यात काही वादच नाही.
Khup khup chan / touching – Vijay Patil, Sangli
Thanku sir
Atishay Sundar..
धन्यवाद सोनम
खूप छान 👌
धन्यवाद मॅडम