अंतर

अंतर

स्वराने सकाळीच फोन करून आईकडून सल्ला मागितला. तिच्या आईनेही लेकीला सल्ला दिला.
‘तुला जमत नसेल तर मुलाला पाळणाघरात ठेव. शेवटी करिअर महत्वाचं.’
मी हे सर्व पहात आणि ऐकत होते. खरंतर नातवाला पाळणाघरात ठेवणे ही संकल्पना माझ्या डोक्याबाहेरचीच पण आयटी कंपनीत जॉब करणाऱ्या सुनेला माझे विचार आणि संस्कार जुन्या वळणाचे वाटत होते. खरंतर मी शिक्षिका होते. हम दो हमारा एक हे धोरण अवलंबले होते. घरात यांचा मोठा कपड्यांचा व्यवसाय होता. सगळं कसं सुरळीत, व्यवस्थित चालले होते. पण स्वराला मात्र आपल्या मुलावर म्हणजेच सोहमवर‌ माझ्या संस्कारांचा पगडा नको होता. तसं तर मी असं काही जगावेगळं करत नव्हते. माझ्या वेळी ज्या गोष्टी माझ्या पिढीतली लोकं करत, तेच मी ही करत होते. लवकर उठणे, वेळेवर प्रत्येक गोष्ट करणे, संतुलित आहार घेणे, बाहेरचं खाणं टाळणे, व्यवस्थित आहार, विहाराचा आग्रह धरणे, नातेवाईकांसोबत व्यवस्थित नातं जपणे, माहेर इतकंच सासर महत्त्वाचं मानने. प्रत्येकाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणे. स्वतःपेक्षा दुसऱ्याला प्रथम प्राधान्य देणे. वेळेवर खाणे, पिणे आणि झोपणे पण का कुणास ठाऊक. स्वराला मी गावंढळ वाटत होते. मात्र मला सोहम शिवाय आणि सोहमला माझ्याशिवाय करमत नसे. मला तर नातू म्हणजे जीव की प्राण. म्हणतातच ना! दुधापेक्षा दुधावरच्या सायीवर जास्त प्रेम असतं आज्जी -आजोबांचं. खरंतर मी तुमच्या सारखीच एक गृहिणी. प्रत्येक गृहिणी स्वतःच्या संसारासाठी काडी काडी जमवून संसार करते म्हणजेच पै पै चा हिशोब व्यवस्थित चोख ठेवून स्वप्नातलं घरटं बांधते,जपते आणि घरट्यातील सर्वांना जीव लावते. तसाच काहीसा माझा स्वभाव. आजचा दिवस आणि आपलं आपलं फक्त पहाणं आपल्या भवितव्यासाठी धोक्याचं, आपण चंगळवादापासून चार हात लांब राहणे हे आपल्यासाठी हिताचेच. हे हेतूपूर्ण लक्षात घेणारी आमची पिढी. तशी माझी सून, अहो स्वरा, गुणांनी खूप चांगली पण मी नौकरी करते ना? एवढ्या एका गोष्टीमागे बऱ्याच गोष्टी स्वतःच्या मनाप्रमाणे करुन घ्यायची कसब तिच्या अंगात खूप छान आहे. तसं मी लग्नाआधीच नौकरीला होते. अगदी मुलगी पाहण्याच्या म्हणजे मला पाहण्याच्या कार्यक्रमात मी स्वतः काही गोष्टी सासरच्या मंडळीपुढे ठेवल्या. त्यातली एक म्हणजे मी नौकरी करणार. खरंतर रवींद्रला म्हणजे आमच्या अहों ना हे मान्य होतच. लग्न झालं आणि बघता बघता दुधात साखर विरघळावी तसं मी संसारात रमून गेले. जीवनाच्या विदयापीठात आवश्यक त्या पदव्या घेत गेले. हे सर्व करताना दहा पैकी नऊ वेळा तरी मी स्वतःची मतं विचारात न घेता नेहमीच दुसऱ्याच्या मतांचा आदर केला. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यात निलेशच्या जन्माची चाहूल लागली. मी मोहरले, अंतरंगातील कणाकणातून रोमांचीत झाले. त्याच्या अस्तित्वाने मला आईपण बहाल होणार होतं. माझ्या सासूबाई आणि आईने माझी मानसिक आणि शारीरिक स्थिती पहाता नौकरी न करण्याचा सल्ला दिला. मला मात्र हे पटत नव्हतं. मी नौकरी करणारच या मतावर मी ठाम होते. पहाता पहाता दिवस जात होते. डोहाळे तर चांगलेच कडक होते. मी बाळाच्या सर्व सुक्ष्म हालचाली सहजपणे टिपत होते. मला नववा महिना लागल्यावर मात्र मी रजा टाकली. खरंतर आता मला दगदग, गोंधळ, धावपळ यांपासून दूर शांत ठिकाणी असावे असे वाटत होते. आता माझं दररोजचं रूटिन बदललं होतं. जमेल तेवढा व्यायाम, फिरणं, खाणं आणि जमेल तेवढेच काम. रवींद्रच्या अट्टाहासामुळे मी माहेरी गेले नव्हते. माझी आई, सासूबाई, रवीद्र तिघंही मला हवं नको पहात होते. एके दिवशी पहाटे निलेशचा जन्म झाला. खरंतर त्याआधी कित्येक रात्री आणि नंतरही तो चांगला मोठा होईपर्यंत कित्येक रात्री मी शांत झोपल्याचं मला आठवत नाही. निलेश चिडचिडा, रागीट असल्यामुळे तो रात्र रात्र रडत असल्याने माझ्यासह घरातील सर्वाचेचं जागरण होत असे. सहा महिन्याच्या रजेनंतर मी नौकरीवर हजर झालेही पण नौकरी, घरातील, बाहेरील आणि निलेशचं पहाता पहाता मला नको वाटू लागले. तसं सासूबाईंनी समजून सांगितलंही, अग हा त्रास कायम स्वरूपी होत नाही. काही दिवसानंतर सारं ठिक होईल. म्हणून मला एका मनाने नौकरी करावी आणि दुसऱ्या मनाने नौकरी करू नये, असे वाटत होते. शेवटी सासूबाई, मी आणि निलेश तिघांनी मिळून काही महत्वाचे निर्णय घेतले. आजारी पडल्यावर एकदा मी आणि दुसऱ्या वेळेस रवींद्रने रजा घ्यायची. शक्य त्या कामाला पटत नसले तरीही बाई लावायची. बाळाच्या संगोपनाला महत्व दयायचे. सर्व निर्णयामुळे थोड्या दिवसातच सर्वांनाच ताण कमी वाटू लागला. मी मात्र हम दो हमारा एक या निर्णयावर ठाम राहिले. निलेशला वाढवताना आम्ही सर्वांनी आमची कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न केला. निलेश हळूहळू मोठा होत गेला. काही वर्षानंतर मी ऐच्छिक राजीनामा दिला. निलेशचं लग्न ठरल्यावर तर मी ठरवूनच टाकलं. मी, निलेश आणि त्याची पत्नी एक विचाराने राहणार. आज जरी रवींद्र, सासुबाई, माझी आई माझ्यासोबत नाहीत, तरीही निलेश, त्याची पत्नी तर असणारच ना! लग्न झालं आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं आजची पिढी स्वतःसाठी जगते तसं ते बरोबरच आहे. स्वरा, निलेश, त्याचं बाळ यांना माझी गरज नसेलही पण मला मात्र त्यांचा मानसिक आधार हवा आहे. माझ्या तिच्या विचारांमध्ये अंतर असल्यानेच नात्यांमध्येही अंतर आले आहे. पण तरीही हे अंतर कधी ना कधी मिटेल यांची मला खात्री आहे. जरी तिने आज बाळाला पाळणा घरात ठेवले तरी कधी न कधी तिची चूक तिच्या लक्षात येईलच. मी मात्र आता स्वतःसाठी जगायचं ठरवलं आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!