आज सकाळपासून सर्वांचीच आठवण येत होती. नभात ढग दाटावे तसेच आठवणींनी मन गच्च भरून आले होते. पण नभ दाटले तरी बरसत नव्हते. माझ्या एका आठवणीतून दुसरी आठवण नयनांसमोर प्रस्तुत होत होती. जणू चित्र मालिकाच अवतरत होती. आज अशी अवस्था माझ्या मनाची का व्हावी? हा प्रश्न मला पुन्हा पुन्हा पडत होता. मी या संसारात खरंच किती एकरूप झाले होते. समोरच पडवीत हिम्मतराव बसले होते. खरंच नावाप्रमाणेच हिम्मत दाखवली होती आयुष्यभर त्यांनी. त्यांच्याबरोबर संसारात मी अशी एकरूप झाले, जणू दुधात साखर. अन् न कळत या विचारासरशी माझ्या गालावर हास्याची लकेर उमटली. अन् खळी गाली फुलली. या सर्व सुखाच्या आठवणीत जीवनातल्या कडू गोड आठवणी विसरून नव्हतंच ना चालणार. माझा हात नकळत माझ्या गळ्याकडे गेला. या गळ्यावर कित्येक जणांनी मनापासून प्रेम केले. हा गळा सर्वांना मोहवून टाकत असे. यामुळे तर आपण चार चौघांना माहित झालो. आपले नावलौकिक झाले. आपल्याला गावात चार चौघे अन् नातेवाईक याशिवाय कोणच ओळखत नसेल. पण या गाण्याने मात्र अवघे राज्य ओळखू लागले. सहज गुणगुणत लहानपणी अवखळपणे गाणारी मी. माझ्यातली कला ओळखू आली होती पंडितजींना. सर्वजण त्यांना आवडीने पंडितजीच म्हणत. पंडितजी देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात निघाले होते. आपण त्याच वेळी आपल्या पुस्तकातील कविता गुणगुणत होतो. आपला आवाज ऐकून पंडितजी दारात उभे राहून गाणे ऐकू लागले. आपण आपल्याच नादात. एवढ्यात आईने पंडितजींना पाहिलं.
‘अगंबाई पंडितजी, अहो भाग्य आमचे. या ना पंडितजी.’ म्हणून आईने वाकून नमस्कार केला. पंडितजींचं मात्र आईकडे लक्षच नव्हतं. ते माझ्याकडे पाहत होते. मात्र कसली कुजबूज म्हणून मीही वळून पाहिले अन् शांत झाले. तसे पंडितजी म्हणाले, बाळ म्हण कविता. तुझा आवाज मधुर आहे. तुझ्या गळ्यातला गोडवा खरंच अप्रतिम आहे.
मी तशी लाजले अन् आईच्या मागे जाऊन उभी राहिले. आईने पंडितजींना बसण्याची विनंती केली, तरी ते बसले नाहीत. पण आपल्या मुलीला गाणे शिकण्यास पाठवा. म्हणून सांगून निघाले. आईने त्यांच्यासमोर व्यथा मांडली. आमची परिस्थिती साधारण आहे. त्यामुळे गाणे शिकवायला जमणे जरा अवघडच. पण पंडितजींनी मात्र मला गुरुदक्षिणा म्हणून पैसा नको. तर या शिष्येने सरस्वती मातेची उपासना आयुष्यभर करावी. एवढीच इच्छा व्यक्त करून ते आमच्या वाड्याच्या बाहेर पडले. पंडितजींचे पाय घराला लागले अन् घराचे वासेच फिरले जणू. आईने बाबांची परवानगी काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. खरं तर आमच्या घराण्यात आजपर्यंत नाच गाणे हे महत्त्वाचे म्हणण्यापेक्षा पटण्यासारखे नव्हते. पण तरीही गाणं हे फक्त एकाच प्रकारचं नसतं. त्यात वेगवेगळे प्रकार असतात. हे गाणं आपण देवाची आळवणी करण्यासाठी देखील गातो. तसेच एखाद्या दुःखीताच्या मनावर फुंकर घालण्यासाठी गातो आणि बरंच काही.
“प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.”
याची अनुभूती माझ्या आईसाठी संसार करायला लागल्यापासून फार काही नवी नव्हती. हो नाही करता करता महिन्याने का होईना पण आमच्या घरातून अनुमती मिळाली. कोण आनंद झाला जिवाला, ते शब्दात सांगणे कठीण. तसे तर मी तेव्हा फक्त सातवीत शिकत होते. तशी मी अभ्यासात हुशार होते पण संगीताच्या तासाला मला जास्त मजा यायची. आता पंडितजींकडे जायचा निश्चय केल्यापासून तर मला एक वेगळाच आत्मविश्वास वाटत होता.
पंडितजींकडे जायचं म्हणून आज सकाळपासून माझी धावपळ चालली होती. सकाळी अकराला माझी शाळा भरे. त्यापूर्वीच संगीताचा म्हणजेच गायनाचा तास होणार होता. खरं तर माझ्या माहितीपर्यंत म्हणजेच गायनाचा तास म्हणजे वेगवेगळे गाणे. पंडितजी समोर त्यांच्या वाद्यवृंदा समोर बसून सोबत म्हणायचे, एवढीच कल्पना. पहिल्या दिवशीचे सर्व सोपस्कार पार पडले. मग खऱ्या अर्थाने दुसऱ्या दिवशी सकाळी सात ते नऊ असा तास सुरू झाला. पहिल्याच दिवशी माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला. कारण मला पंडितजींनी संगीत, गाणं याविषयी काही प्राथमिक प्रश्न विचारले. पण मी मात्र कुठल्याच प्रश्नांचे योग्य उत्तर देऊ शकले नाही. खरं तर मला संगीताविषयी जुजबी ज्ञानही नसावे. हे चुकीचं नव्हतं. कारण मी ज्या वातावरणात वाढले. त्यात घरात मुलींनी किंवा स्त्रीयांनी गाणं म्हणणं देखील चुकीचं होतं. मग बाकी सखोल ज्ञानाचा प्रश्नच उद्भवत नव्हता. तरी देखील आपण ज्ञान मिळवायचं. हा अट्टाहास मनात मी चिकाटीने सातत्याने टिकवून धरला. त्यामुळेच मी माझ्या ध्येयाप्रत पोहोचू शकणार होते. गाण्याचे प्राथमिक ज्ञान, सप्तसूर सांगून माझा पहिल्या दिवशीचा तास संपला. पण मला मात्र हे अपेक्षित नव्हते. मला गाणी वगैरे गायला पहिल्या दिवसांपासूनच मिळणार असे मला वाटत होते. घरी गेल्यावर माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून आईने काळजीने विचारले ही,
‘का राणूबाई, तास आवडला नाही का?’
‘तसे नाही पण हा वेगळाच तास होता.’
‘म्हणजे काय? गायनालाच गेली होतीस ना?’
‘हो गं, पण तू म्हणाली. मी गायनाला गेले की लगेच मला गाता येईल. अन् मग माझे आकाशवाणीवर देखील गाणे होईल.’
‘हो खरंच आहे ते.’
‘अगं पण ते मला गाणं नाही शिकवत. ते वेगळंच काही काही शास्त्रीय माहिती सांगत होते. अन् काही सूर सप्तसूर सांगत होते. ‘
‘ राणु, कोणत्याही गोष्टींचं सखोल माहिती, ज्ञान असणं महत्त्वाचं असतं बरं! नाही तर डबक्यात पोहणाऱ्या बेडकाला डबकं म्हणजेच आपलं विश्व वाटतं. पण जेव्हा ते नदी किंवा तलावात जाईल. तेव्हा मात्र त्याला आपला कमी पणा जाणवतो.
‘हं…. ठीक आहे.’
एवढं बोलून आमचं बोलणं संपलं. मी ही गाणं शिकण्याचा ठाम निश्चय केलाच होता. अन् त्यामुळेच मी मन लावून दररोज गायनाच्या तासाला जाणे अन् प्रामाणिकपणे गायनाचे धडे आळवत होते, हे मात्र खरं. बघता बघता मला त्यातलं बरंच काही कळू लागलं. इतर विद्यार्थी गाताना मी लक्ष देऊन ऐकत असे. त्यांच्या आवाजातील चढ उतार, आरोह अवरोह सारं सारं ध्यानात घेत होते. पंडितजीच काय, पण त्यांच्या घरातले सारेजण माझी विचारपूस आस्थापूर्वक करत असत. संगीत क्लासमध्ये माझ्यापेक्षाही लहान बरेचजण होते. खरं तर माझ्यापेक्षाही लहान असल्यापासून पंडितजींचा मुलगा गायन अन् पेटी शिकत होता. पण ज्याच्या कानावर सप्तसुरांचे गुंजन जन्मापासूनच पडले. त्यासाठी हे नवल नव्हते पण ज्याच्या घरात सूर, ताल, लय म्हणजे काय हेच माहित नसेल. त्या घरात गाणे शिकण्याचा माझा अट्टाहास आगळाच नव्हता काय?
संगीत या विषयांतर्गत वेगवेगळे प्रकार असतात. यांच्या परीक्षा असतात. सुगम संगीत, शास्त्रीय संगीत असे अनेक प्रकार अन् बरेच सखोल ज्ञान मला हळूहळू प्राप्त होत होतेच. मी माझ्या मनाचा टिपकागद सदैव उघडाच ठेवला होता. येणारा प्रत्येक अनुभव, माहिती, ज्ञान हे सर्व मी टिपत होते. कोणत्याही गोष्टीचे पूर्ण ज्ञान माणसाला कसोटीवर उतरण्यास मदत करते. अन् त्याचे सिद्धत्व दाखवून देते. हे मला हळूहळू उमजू लागले. बघता बघता मी सातही परीक्षा पास झाले. खरं तर या परीक्षा, त्यांची तयारी या सर्वांचं मला काहीच वाटत नसे. कारण दोन परीक्षा दिल्यानंतर, मला गाणं इतकं आवडू लागलं की, मी वेळ मिळेल तेव्हा रियाज करू लागले. पंडितजींकडून होता होईल तेवढं नवीन विचारत राहाणं. गाण्यातल्या जागा कशा घेतात. सुरांची पकड, तालावर गाणे अन् बरंच काही. पंडितजींनाही माझं खूप कौतुक वाटायचं. खरं तर माझं संगीत शिक्षण म्हणजे पंडितजींचे अनंत उपकारच होते. कारण काही जुजबी खर्च वगळता त्यांनी मला गायनाची अशी कधी गुरुदक्षिणा घेतलीच नाही. आताशा माझं गाणं खुपच सफाईदारपणे सादर होत असे. आईलाच काय पण बाबांनाही याचा खूप अभिमान वाटत असे. सर्व पाहुणे सखे सोबती यांमध्ये रसिकाचा आवाज म्हणजे अप्रतिम. मी आता पंडितजींच्या परवानगीने पुढील शिक्षण घेत होतेच. पण काही बाहेरचे कार्यक्रमही घेत होते. तसं तर कार्यक्रम करणं अवघड नव्हतं पण आपल्या गाण्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला तरच कार्यक्रम सफल झाला असं वाटत असे. अन् आतापर्यंत तर घडतही तसंच होतं. बघता बघता मी आता पुढचं शिक्षण सुरूच ठेवलं होतं. आईच्या दृष्टीने वेगळीच चिंता सतावत होती. अन् तिने ती एके दिवशी बोलून पण दाखविली.
‘रसिका, आता लग्नाचं पाहायला हवं.’
‘ खरं आहे आई पण माझं करिअर पूर्ण होऊ दे. मग तू म्हणशील तिथे लग्न करायला मी तयार आहे.’
‘ लग्न झाल्यावर करिअर कर ना! आपण तसंच स्थळ पाहू तुला.’
‘ म्हणजे माझी अडचण होते तुमच्या सगळ्यांना, होय ना!’
‘ अगं तसं नव्हे पण कर्तव्य करायला हवंच ना! आम्ही आतापर्यंत तुला नाही म्हणालो का?’
‘ ते खरे पण मी विचार करून सांगते.’
मी म्हणाले खरं पण मी विचार कशाचा करणार होते. आयुष्यात मला काय करायचे हे ठरलं होतं. मी त्या दिशेने पाऊलही उचललं होतं. मला यासाठी साथ देणारा साथीदारच आई बाबा शोधणार होते म्हणजे यंदा कर्तव्य आहे.
मी पण माझ्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा पुर्ण करणारचं होते. आई बाबांविषयी विचारपुर्ण निर्णय घेणार होते. माझ्या आई बाबांचा अन् माझ्या करियरचा होणाऱ्या नवऱ्याने विचार करावा. मी ही त्यांच्या आई बाबांना आपले आई बाबा समजून वागेन. बस्स ठरलं तर मग एकमेकांना समजून घेण्याने सर्व सुरळीत पार पडणार. यात काही शंका नव्हती. मग माझ्या गाण्याचा आणि लग्नाचा कार्यक्रम धुमधडाक्यात होणार यात काही शंकाच उरली नव्हती. हिम्मतराव पंडितजींच्या ओळखीचे होते. पंडितजींच्या मित्राकडे त्यांच जाणं येण होतं. त्यांना गाणं आवडत होतं पण गाण्याविषयी ज्ञान नव्हतं. त्यांनी एका कार्यक्रमात मला पाहिलं होतं म्हणे. त्यांनी पंडितजींनी विचारल्यावर लगेच हो म्हणलं. आता फक्त मी काय म्हणतेय याकडेच सर्वांच लक्ष होते. माझ्या मनात संवाद सुरु झाला होता. यंदा कर्तव्य आहे.