मी सासरी येवून तीन वर्षे झाले. खरंतर आई-वडिलांनी शिकवलंही आणि एक-दीड वर्षे नौकरीही करू दिली. माहेरी आम्ही तिघी बहिणीच. स्त्री स्वातंत्र्य, हक्क, जाणीवांची जाणीव लहानपणापासून आई-वडिलांकडून मिळालेलीच, उदात्त विचारात वाढलेल्या आम्ही तिघी आणि आई. आमच्या चौघीला तर बाबा ‘तुम्ही चारचौघी’ किंवा ‘चौकट’ म्हणून हाक मारत. बाबा म्हणजे खरं तर आमच्यासाठी एखादया चित्रपटाचे नायक असावे असे होते, बाबांना आमचा चिवचिवाट घरात नसेल तर अजिबात करमत नसे. आई कधी कधी गमतीने म्हणेही
‘लेकींसोबत घरात मी पण असते बरं. फक्त लेकींशीच हितंगुज चाललेलं असतं. तुमच्याकडून लाड करून घ्यायचे म्हणजे तुमच्या पोटीच जन्म घ्यायला हवं हो ना!’
असे म्हणून आई हसे. तसं बाबा आमच्या तिघींच्या बाबतीत खूप जबाबदारीने वागत. आईला जशी आमची काळजी वाटे तशी काळजी बाबांनी पण घेतली. काही योग्य संस्कार आमच्यावर घडवण्यासाठी त्यांनी मनापासून कष्ट केले. त्यांच्या लहानपणी त्यांनी घरात पाहिलेले, अनुभवलेले वातावरण जरी खूप वेगळं असलं तरी आम्हा तिघीच्या बाबतीत ते वातावरण कधी अनुभवायला मिळू दिलं नाही. स्त्रियांनी घरातल्या सर्व जबाबदाऱ्या घ्यायच्या असतात. पुरुषांना अर्थाजनासाठी कमवायचं, दुनियादारी सांभाळणं ही पुरुषांची जबाबदारी. तसे घरातले काम ही स्त्रीयांची मक्तेदारी, जरी स्त्रिया अर्थाजनासाठी वेगळं काही काम करत असतील तरी सुद्धा त्यांनी घरातल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणं हे त्यांचं आद्य कर्तव्य. नसेल जमत त्यांना हे तर त्यांनी घराच्या बाहेर पडू नये, पडायचेच असेल तर घरातील कर्तव्य आधी नंतर सर्व काही. अशा सर्व विचारांच्या वातावरणात ते वाढले होते. माझे बाबा लहानपणापासून घरात अगदी शिस्तिच्या वातावरणात वाढले. आम्हालाही त्यांनी लहानपणापासून स्वातंत्र दिले पण स्वातंत्र म्हणजे स्वैराचार नव्हे हे ही समजून सांगितले.
पहाता पहाता आमच्या तिघींची लग्न झाली. माहेरच अंगण सुनं सुनं झालं, त्यांच्या संस्कारांची बीजं मनात रुजवून आम्ही तिघींनी सासरी एक-दोन वर्षाच्या फरकाने प्रवेश केला. माझं सासर गावी वाणेवाडीला असले तरी मी आणि गौरव पुण्याला राहत असू. गावी रजा काढून का होईना सण साजरे करायला येत असू. दोन-तीन वर्षात जाधवांच्या घराण्यातील सर्व रिती-परंपरा मला माहित झाल्या होत्या. गावी सणाला यायचं म्हणजे एखादया कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांनी ऐनवेळी येण्यासारखंच होतं, कारण आम्हाला रजा मिळायची ती एक किंवा दोन दिवसाची. मग कार्यक्रम म्हटले की त्याची धामधूम आधी पाच-सहा दिवस आणि नंतर दोन चार दिवस असतेच की पण हे सारं सासूबाई आणि सासरे करत. आम्ही आपले धावतपळत जाणार अन् घाईघाईने निघणार. यावर्षी सासूबाईना हरतालिकेपूर्वी सौम्य हृदयविकाराचा झटका आला. अन् साऱ्या घराचे धाबे दणाणले, सण तर करावेच लागणार. त्यासाठी कशी का होईना रजा काढता येईल पण घरातल्या महत्वाच्या जबाबदाऱ्या मी पेलवू शकेन का? अशी शंका साऱ्यांच्याच मनात आली. एवढंच काय माझ्याही मनात आली. पण मला आईने व अहो आईंनी घरात करावयाची कर्तव्य सांगितली होतीच. आमच्याकडे सणाला काय काय असते हे या तीन वर्षात मला बऱ्यापैकी पाठ झाले होतेच. पण फक्त लांबून पाहणं आणि स्वतः करणं यात खूप फरक असतो. जसं की दुसऱ्याला पोहताना पहाणं आणि स्वतः पाण्यात उतरुन पोहणं यात जेवढा फरक तेवढाच फरक कामतही असतो. मी मात्र सखुला मदतीला घेवून लक्ष्युम्यांचा सण व्यवस्थित कसा पार पाडायचा याचे नियोजन आणि कार्यवाही अगदी मनापासून पार पाडली. अन काय सांगायचं. सण झाल्यावर माझ्या डोक्यावरून कोणीतरी मणभराचं ओझं उत्तरवल्यासारख वाटलं. माझ्या आईला माझा अभिमान वाटणं साहजिक आहे पण माझ्या सासूबाईंना तर गर्व वाटला. कधीही जास्त काहीही न करणाऱ्या हिने सारं कसं काय पार पाडलं? असे त्यांना वाटणं साहजिक आहे. पण लहानपणापासून आई आणि लग्न झाल्यापासून अहो आईंचा आदर्श मी मनापासून जपला आणि अंगिकारला. बाकी विशेष काहीच नव्हते. खरंतर आजपर्यंत खुशाल चेंडप्रमाणे वागणाऱ्या मला एका घटनेने पोक्त केलं होतं. आई आणि सासूबाईं इतकंच माझ्या जबाबदारीने कर्तव्य पार पाडण्याच्या भुमिकेला गौरव आणि सासऱ्यांनी नावाजल्यावर खऱ्या अर्थाने जिंकल्या सारखे वाटले. संस्कारांची माहेरची वेल सासरच्या अंगणात बहरलीच नाही तर आता नव्याने रुजणार होती.