तितली

                       ‘तितली’ 

‘काय, कुठे? एकतर  उकाड्याने हैराण होतंय अन् असल्या वातावरणात तुम्हाला बरी दिसली तितली.’ बायकोच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहिले अन् न  खाताही कारलं खाल्ल्याचे भाव चेहर्‍यावर उमटले. 

   ‘चला’, उचला बॅग उशीर होतोय आपल्याला. स्विटीची शाळा सुटली असेल. राॅनी आया जवळ राहून कंटाळला  असेल. चला ना!’ 

   माझ्या कानावरून शब्द जसे काही वरच्या वरच तरंगले. ती काही तरी म्हणाली एवढंच कळलं आणि मी तिच्या मागे मागे चालू लागलो. माझं मन मात्र मागे भूतकाळात पोहोचलं होतं. मनानं मी भूतकाळात पोहचलो तरी वर्तमान काळात धर्मपत्नीच्या मागे बॅग उचलून चालत, चालत, पळत होतो. 

             मला आजही आठवते. रिया वर्मा माझ्या कॉलेजवयीन वयात माझ्या स्वप्नांची राणी होती. आम्ही शाळेतील सर्वांनी ठरवूनच अभिनव महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. म्हणजे इथे शिस्तीचा बडगा तसा जास्त नव्हता म्हणून घरच्यांना कसेबसे तयार करत प्रवेश झाला. तसे कॉलेज जीवन, तिथलं वातावरण याविषयी आम्हा मित्रांमध्ये आठवीपासून उत्सुकता होती. आम्ही तेव्हापासूनच छोटी-मोठी स्वप्न रंगवत होतो. कॉलेजला जाताना कसे कपडे घालायचे. केशरचना, गाडी आणि हटके स्टाइल कशी असावी. या विषयावर बऱ्याच वेळा चर्चा रंगत असे या सर्व गोष्टींमध्ये दहावी केव्हा झाली कळलच नाही आणि अकरावीचे वर्ष सुरू झाले. अभिनव महाविद्यालयात जाण्याचे स्वप्न सत्यात उतरवलं पण ११ वी चे विद्यार्थी म्हणजे फ्रेशर्स. सीनियर विद्यार्थ्यांचा धाक किंवा अरेरावी म्हणजे थोडक्यात रॅगिंग. काही प्रमाणात सहन करावा लागतं. याविषयी ऐकून होतो आणि त्याचा अनुभव थोडाफार येतच होता. सिनीयर मुलांनी सांगेल ती काम ऐकावी लागायची. त्यांच्या असाइनमेंट पूर्ण कराव्या लागायच्या. तर कधी त्यांना लागणारे प्रयोगाचे साहित्य आणून द्यावं लागायचं. त्यांची प्रेमपत्र ही पोहोचवावी लागायची. पकडले गेलो तर पाठवणारा नामानिराळा. सर्व परिस्थितीचा अंदाज घेत होतो. 

             रिया वर्मा माझ्या वर्गात होती. सिन्सियर विद्यार्थिनी होती ती आणि आम्ही काय, उद्या परीक्षा म्हणल्यावर आज अभ्यासाला लागणार. फरक इतकाच होता की अर्ध्या-अर्ध्या मार्गासाठी ती झटत होती. आऊट ऑफ मार्क मिळवण्यासाठी धडपडत होती, आणि आम्ही पासिंगसाठी अर्ध्या-अर्ध्या मार्गासाठी इकडं बघ तिकडं बघ करत होतो.  तेवढाच काय तो फरक. मला तिचीअभ्यास करण्याची चिकाटी सोडून सर्व काही खूप खूप आवडत होतं.

           तिचे काळेभोर टपोरे डोळे. रेखीव कमानीसारख्या भुवया, कपाळावर रुळणाऱ्या बटा, गौरवर्ण, सफरचंदा सारख्या गालावर पडणारी खळी आणि रेखीव ओठ. तिच्या ओठांवर डाव्या बाजूला एक छोटी म्हस होती. पण तिचा तिला त्रास वाटण्याऐवजी अभिमानच वाटावं, असंच काहीसं होतं. मी तिला पाहण्यात एकेदिवशी एवढा दंग झालो होतो. त्यामुळे मला गणिताच्या सरांनी पाटील, पाटील, राज पाटील. अशी  हाक मारली तरी कळलेच नाही. सरांनी माझा सर्वांसमोर उभा करून अपमान केला आणि बाहेर काढले. प्रेमात बुडालेल्या मला हा अपमान जिव्हारी लागला. रियासमोर सर बोलत होते आणि सार्‍या वर्गात गालातल्या गालात हसणारी ही कमी नव्हते. सरांनी वर्गाबाहेर काढल्यावर मी बाहेर उभारलो खरा. पण मनाने वर्गातच रेंगाळत होतो. पाहता पाहता तास संपला. माझ्याबरोबरची चांडाळ चौकडी मोठ्या आपुलकीने भेटायला आली. सरांविरुद्ध तक्रार करू म्हणू लागली. नाही तर सरांना अद्दल घडवू म्हणू लागली. 

‘बाकी काही म्हणा गुरु पण तुमची चॉइस म्हणजे….’ माझ्या मनातलं पोरांच्या ओठांवर आल्याने जशी ती माझीच असा भास होवू लागला. मी गालातल्या गालात हसलो. बाकी मला कुणा विषयी तक्रार वगैरे करायची नव्हती.  मला बाकीच्या गोष्टींशी देणंघेणं नव्हतं. फक्त रियाला काय वाटलं असेल, ती आपल्याविषयी काय विचार करत असेल, वर्गात आपण तिच्याकडे पाहतो हे तिच्या लक्षात तरी आलं असेल का? तिच्या मनात माझ्याविषयी अशाच भावना असतील ना! या आणि अशा बर्‍याच प्रश्नांचा गुंता माझ्या मनात निर्माण झाला होता. मी तिच्या स्वभावाचा आतापर्यंत बराच अभ्यास केला होता. ती जेवढी अभ्यासू होती. तेवढीच इतर गोष्टींतही हुशार होती. तिला गायन तर खूप आवडत होते. मला आता तिच्या शिवाय काही काहीच सुचत नव्हते. आमची चर्चा सुरू होती. तेवढ्यात तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात त्यांची काहीतरी चर्चा चाललेली माझ्या लक्षात आली. माझ्या विषयी बोलत असतील असं मला वाटलं आणि खिडकीकडे सरकून वर्गात चाललेल्या चर्चेचा मी कानोसा घेतला. तिला तिच्या मैत्रिणी चिडवत होत्या. काही शब्द माझ्या कानावर पडले. 

‘ओ लैला! तुझा मजनू…. तुझ्या प्रेमात पुरा…..’ 

‘मला असल्या गोष्टींत रस नाही.’ 

‘तुला नसू दे पण त्या भ्रमराला खूप रस वाटतो या फुलात.’ आणि बरंच काही. मला तर असं वाटू लागलं ती पण माझ्या प्रेमात आहे. तिचा होकार वाटत नव्हता तसा नकारही आहे असं वाटत नव्हतं. नाहीतरी असं प्रेमाचं समीकरण असतंच की.’ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे…. . ‘

            मी याच विचारात प्रेमाची स्वप्न रंगवत होतो. मी तर तिचं तितली असं नामकरण करून टाकलं. खरं कोणत्या अर्थाने मी तितली म्हणत होतो मी तिला. कदाचित अर्थापेक्षाही मनाच्या भावना महत्वाच्या. मला आता कॉलेजला जाणं आवडू लागलं. तासांना बसणं, प्रयोगशाळेत रेंगाळत रहाणं खूप खूप आवडू लागलं. तिचं दिसणं माझ्या मनाच्या कॅनव्हासवर कोरलं गेलं होतं. तिचं हुशार पण माझ्यासाठी अभिमान होता. झाला परिणाम असा की, मी तिच्या आसपास राहण्याच्या प्रयत्नात हळूहळू सर्वांना म्हणजे अगदी शिक्षकांसह सर्वांना अभ्यासू  वाटू लागलो. नाही तसंच वाटलं असावं कारण मी प्रॅक्टिकलची वही तिला मागण्याचे धाडस केलं. या गोष्टीवर ती माझ्यावर जाम भडकेल. मला काही ऐकवेल. तुला करायचा नसेल तर करू नको पण मला तरी अभ्यास करायचा आहे. मार्क मिळवायचे आहे. असं बरंच काही होईल असं वाटलं. पण काय…. तिने पटकन वही दिली. मला अनमोल असं काही गवसल्याचा आनंद झाला. मी तिचं अक्षर मनात साठवत होतो. तिचं अक्षर म्हणजे जणू मोतीच. किती हुशार होती ती. टापटीपपणा पण वाखाणण्याजोगा होता. तिचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि मी हा असा. पण म्हणतात ना. देव अशाच जोड्या एकत्र आणतो. विरूध्द स्वभाव एकत्र सहज नांदतात असं ऐकलंच होत मी. मी वहीचा वास घेत होतो. किती हुशार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारी होती ती. मी तिच्या प्रेमात पडल्याने हळूहळू नकळत अभ्यासाला लागलो होतो. ती माझ्याशी अधून-मधून अभ्यासाविषयी चर्चा करत असे. माझ्या लक्षपूर्वक ऐकण्याचा आणि तिने बोलताना एकटक पहाण्याचा तिने वेगळा अर्थ घेतला. म्हणजे मी किती एकाग्र होतो वगैरे वगैरे. एकाग्र तर मी होतो पण ते तिच्या दिसण्यावर. पण या तितलीला कोण सांगणार. 

            एके दिवशी तिने वही दिली. त्यावेळी त्यामागे काही लिहिलं होतं. १६  १  १८  १ १९ मी ते पाहिलं आणि विचारात पडलो. हा मोबाईल नंबर नव्हता. घर नंबर एवढा मोठा कसा असेल. एवढं अंतर ठेवून अंक का लिहिले असतील.  पण मग काय असावं. मी विचार करत होतो. तेवढ्यात मला चांडाळ चौकडी सोडूनही एक  मित्र होता. तो म्हणजे पारस मेहता. मी तितलीच्या वह्या त्यालाही देत होतो लिहायला. तोही खूप हुशार होता. तिच्या प्रमाणे त्याचंही स्वप्न डॉक्टर होण्याचं. माझ्या वाढलेल्या अभ्यासू वृत्तीमुळे तोही मला अभ्यासात मदत करत होता. काही महिन्यांपूर्वी फक्त कॉलेजमध्ये झालेल्या अभ्यासाच्या वह्या पूर्ण करायला तोही रिया कडून वह्या घेत असे. परीक्षा जवळ आल्यावर काय अभ्यास करावा याची माहिती तो देत असे पण पडलं होतं कुणाला अभ्यासाचं. आम्ही त्याच्या मैत्रीची आठवण ठेवत असू. पण  माझ्यात वाढलेल्या दिखाऊ अभ्यासवृत्तीला तोही सहकार्य करत होता पण माझे आधीही कधी अभ्यासात मन लागत नव्हते आणि आताही लागत नव्हतेच. 

            तितली असं जरी मी तिला म्हणत होतो. तरी ते फक्त माझ्या चांडाळ चौकडीतच माहीत होतं. पारसलाही माहित नव्हतं. त्यालाही वाटत होतं की मी अचानक माझ्यात जीवनाविषयी, करियरविषयी जागरूकता येऊन अभ्यासाला लागलो आहे. मी रियाच्या वह्या त्यालाही देत होतो. त्याला सहज तिच्या वहीतले ते आकडे दाखवले. खरंतर वहीत मागच्या आणि पुढच्या काय. कोणत्याही पानावर बसल्याबसल्या वहीत नक्षी काढायची मुलींना सवयच असते. पण तिने मात्र तसं काही न करता असे लिहावे म्हणजे काय? अभ्यास, अभ्यास, अभ्यास. जीवनाचा आनंद घ्यायला हवा. आयुष्य पडले आहे अभ्यासासाठी. वर्गात उठवून अपमान केल्यावर तिच्या नजरेत माझी किंमत कमी होईल असे वाटले होते. पण झालं उलटच. शेवटी काय माझ्या पथ्यावर पडले होते सारं. आकडे पाहिले आणि पारसने थोडा विचार केला. तो गालातल्या गालात हसला.

            ‘ काय लिहिले तिलाच माहीत?’

    खरंतर तिला वहीत एक छोटीशी रेघही ओढलेली आवडत नाही. पण हे आकडे कसले?

    पारस म्हणाला, 

    ‘काय पण या मुली, काहीही लिहितात. तू असं तसं काही लिहिलं की मला दाखवत जा. बघु कधीतरी आपल्याला त्यातून काही कळेलच की.’

    मलाही काहीच कळले नाही. मग त्यानंतर बरेच काही आकडे लिहिले गेले. मला तर वाटते, या वयात शेरोशायरी कविता  लिहायला हव्यात. तर त्या वयात हे काय असलं. पुन्हा एके दिवशी तिने वहीत 

  १६  १  १८   १९       

  २०   २१

  १३   १२   १  

  १   १     २२

  ४    २०    १५    १९  असं लिहिलं होतं मी लगेच पारस ला दाखवलं. अंक लिहीतानाही  वेगवेगळ्या रंगीत  पेनांचा वापर केलेला दिसला. वेगवेगळ्या अंक आणि पेनांचा वापर पाहून ही जशी हुशार आहे तशी थोडी सरकलेली आहे असं मला वाटलं. मी परत पारसला विचारलं. तर तो मला नाही लक्षात आलं म्हणाला. मग असे काही आकडे दिसले की मी त्याला दाखवत असे. एके दिवशी मी घरात पुस्तक घेऊन रियाच्या बरोबर गुलाबी स्वप्नात हरवलेलो असतानाच शेजारचा सुजित माझ्याकडे आला. बुध्दिमत्तेचं उदाहरण सोडवून दे म्हणू लागला. मी पाहिलं खरं. पण मला नाही जमणार हे माहित होतं आणि गुलाबी स्वप्नातून मला बाहेर येवू वाटत नव्हतं. प्लीज मला मदत कर म्हणून तो माझ्या मागे लागला. नाइलाजाने त्याला मदत करावी म्हणून पुस्तक हातात घेऊन पाहिलं आणि इथेच घात झाला. ते प्रकरण सांकेतिक भाषेचं होतं. त्यात इंग्रजी मुळाक्षरांच्या खाली एकदा सरळ आणि एकदा उलट अंक लिहिले होते.  त्यातून शब्द तयार करून दाखवले होते आणि काही शब्द तयार करायला सांगितले होते. पाहता पाहता मी ते सर्व लक्षपूर्वक पाहिलं त्यात शाळा या शब्दासाठी

  १९   ३८   १५   १५   १२ असे दोन अंक दिले होते म्हणजे  स्कूल आणि असे बरेच शब्द सांकेतिक भाषेत लिहायला सांगितले होते. खरंच किती डोकं चालवावं लागतं या छोट्यांना या वयात. असा विचार करतच होतो आणि  माझ्या डोक्यात रियाच्या वहीतले आकडे आले. त्यात  लिहिलेले आकडे असेच काहीसे होते. काही लिहून घेतलेले आकडे मी  तपासून पाहिले आणि माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला. तिने

  १६  १ १८  १  १९ म्हणजे पारस असं लिहिलं होतं. आणि त्यानंतर एकदा

  १६  १  १८  १  १९  पारस

    ९  मी

   १२  ९  ११  ५  आवडतोस

   २५   १५  २१  तू

 PARS  I LIKE YOU  म्हणजे पारस तू मला आवडतोस. असं लिहिलेलं होतं. बापरे म्हणजे मी…. मी फक्त मध्यस्थ ठरलो. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून लढाई खेळली गेली प्रेमाची. खरंच काही म्हणा मुली हुशार असतात. मला गोड बोलून तिने गोल केलं होतं. मी भयंकर चीड, संताप  येऊन बोललो असतो पण तिने स्वतःहून कधी बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता. ना कधी प्रेम व्यक्‍त केलं होतं. माझं आपलं स्वप्न रंगवणं सुरू होतं. 

            मी बरेच दिवस कॉलेजला गेलोच नाही. खरंच काहीही म्हणा मुली हुशार असतात. मला गोड बोलून तिने गोल केलं होतं. मी भयंकर संतापलो. चांडाळ चौकडी सोबत मीटिंग घेऊन बोललो पण काय त्यांचही म्हणणं आलं, 

   ‘गुरु, हुशार डोकी काही औरच चालतात. आपण यांच्या नादी नाही लागायचं. तरीच पारस आणि ती सारखी भेटतात. माझ्यासमोर सगळं चित्र उलगडत गेलं. नसलेल्या प्रेमाविषयी भांडण्यात अर्थ नव्हता. माझ्या स्वप्नांची राणी माझ्या मित्राची बायको होईल असं वाटलंच नव्हतं. त्या दिवसापासून मी दोघांच्या मधून बाजूला झालो. पुढे काही वर्षांनी त्या दोघांनी  लग्नाची पत्रिका मला आठवणीने दिली. 

            मी मात्र त्या दिवसापासून विचार करणंही  बंद केलं होतं. पण मनात दडलेली तितली अजूनही स्वैर उडतच होती. आठवण तर येतच रहाणार कारण पहिलं प्रेम होतं. पण……. बऱ्याच वेळा वाटलंही तिची चौकशी करावी.  आज ती दिसली आणि मी शांत केलेलं प्रेमाचं वादळ जोरदार वाहू लागलं. वाटलं तिला एकदा तरी सांगावं. 

            ‘माझं तुझ्यावर प्रेम होतंआणि आहे.’ 

पण दुसऱ्या क्षणी विचार आला ज्या गाडीत बसायचंच नाही त्याची चौकशी कशाला. तिच्या प्रेमामुळेच तर आज मी इथे होतो. कारण पुन्हा कधी मी कोणत्याही मुलीवर प्रेम केलंं नाही. जमेल तसा अभ्यास करून पायावर उभारलो. मी केलेल्या प्रेमाने आणि तिने न केलेल्या प्रेमाने मी मात्र व्यवहारी झालो तो कायमचा.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!