तिरंगा
शार्दुलला गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रप्रेमामुळे सीमेवर जाण्याचे वेड लागले होते. त्याला लहानपणापासूनच सैनिक, सैनिकांचे जीवन याविषयी आकर्षण आणि आदर वाटत होता. खरं पाहता लहानपणी सैनिकांसारखा ड्रेस घातला म्हणजे त्याची छाती गर्वाने आणि मान अभिमानाने ताठ होत असे. हेच स्वप्न उराशी बाळगून तो वाढत होता. त्याचे बाबा, काका आणि आजोबा हे तिघेही सैन्यातच होते. म्हणूनच की काय गावात सर्वजण त्यांना त्यांच्या पवार आडनावा ऐवजी देशप्रेमी म्हणूनच संबोधत. त्याचे आजोबा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंग्रजांकडून लढले होते. त्यांना मिळालेली मेडल घरामध्ये सन्मानपूर्वक ठेवली गेली होती. स्वतःच्या जीवापेक्षा देशाचा आदर आणि देशाविषयी प्रेम महत्वाचे. हेच लहानपणापासून त्याच्या मनात रुजवले गेले होते.
पहाता पहाता तो सैनिकी शाळेतून यशस्वीपणे सैन्यभरती झाला. सैन्यात येणे हे त्याचे ध्येय असल्याने तो मनापासून देशसेवा करणार होता. त्याला भारताच्या सीमारेषेवर चाललेले वाद आणि अनुषंगाने होणारे हल्ले माहित होतेच. पण भारतात उत्पन्न झालेल्या देशद्रोह्यांचा तो विचार करत राही. त्याला नेहमी सीमेवरून होणाऱ्या वादाविषयी काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे हे जाणवत होतेच. पण अंतर्गत होणारे कलह वाद याचे काय? हे ही मनाला बोचत होतं. खरंच सीमेवरील एक एक क्षण सैनिकाला जीवनाचे महत्व जाणवून देणारा तर असतोच पण राष्ट्रप्रेम असणे किती महत्वाचे आहे. याचीही जाणीव करून देणारा असतो. इतरवेळेस गावाकडे आपल्याच भावंडाशी इंच इंच जमिनीसाठी लढणारे आम्ही देशाचा विचार करतो का? सैनिक स्वतःचे प्राण पणाला लावून इथे इंच इंच भूमातेचे रक्षण स्वतःचे रक्त सांडून करतात.
शार्दुल सीमेवर येवूनही आता सहा वर्ष होवून गेली. नेहमीच त्याने देशाचं कार्य प्रथम आणि मग व्यकीगत जीवन हेच तत्व ठेवलं होतं. म्हणूनच की काय त्याच्या स्वतःच्या लग्नासाठीही त्याने जास्त रजा घेतली नाही. दररोज सीमेवर वेगवेगळ्या कारणाने
होणारे हल्लेही तो विसरु शकत नव्हता. यावर त्याची बहिण त्याला म्हणेही,
‘दादा, तू एकटा फक्त सीमेवर लढतोस असं तुला वाटतं का? अरे अजून कितीतरी सैनिक असतात!’
यावर त्याचे उत्तर ठरलेलं,
‘अंग प्रत्येकानं आपल्या भारतमातेचं रक्षण ही स्वतःची जबाबदारी मानली तरच इच्छित ध्येयप्राप्ती होईल. अगं प्रभुरामचंद्राच्या कार्यात इवलुश्या खारीनेही वाटा उचलला होताच की. माझ्यामुळे असा काही विशेष फरक पडणारे असं त्या खारुताईने विचार केला असता तर.’
यापुढे सगळेच निःशब्द होत. एकेदिवशी सीमेलगत असलेल्या भागात काही परकीयांनी हल्ला केला. त्या चकमकीत काही सैनिक जखमी झाले होते. त्यात शार्दुल ही होता. त्याला औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याला त्याही अवस्थेत भारतमातेची चिंता वाटत होती. तो त्वेषाने बोलत होता. मला सोडा मी एक एकाला मारतोच. जिवंत सोडणार नाही असे बडबडत होता. थोड्या वेळाने मात्र डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे तो शांत झोपला.
काही दिवसांनी तो व्यवस्थित बरा झाला. पुन्हा तो सीमेवर डयुटीसाठी रवाना झाला. गावाकडे त्याच्यावर आलेल्या संकटाची माहिती मिळाली होती. त्याच्या बायकोला आणि बहिणीला त्याने परत यावे आणि गावाकडे छोटे मोठे काम करावे वाटत होते. त्यांनी घरात तसे विचार सर्वासमोर त्यांनी बोलून दाखवलेही. पहिले तर आजोबांनी त्यांना देशप्रेमाच्या चार गोष्टी समजून सांगितल्या. त्याला तूम्ही उगाच नाही तो आग्रह करू नका असेही सांगितले. बाबा आणि काकाही याच मताचे होते. देशप्रेम त्याच्या रक्तातील थेंबाथेंबात होते.
काही दिवसांनी शार्दूल गावाकडे सुट्टीसाठी आला. वेळ पाहून त्याच्या बायको व बहिणीने पुन्हा हा विषय काढलाच. पण आपण देशासाठी जगतो आहोत आणि देशासाठीच प्राणार्पण करू
अशी ठाम भूमिका त्याने घेतली होती. सुरुवातीला त्या दोघी नाराज झाल्या पण सीमेवर सैनिक जर नसतील तर देशातील शांतता, समाधान, आनंद, सुव्यवस्था असणार नाही. हे त्याने पटवून दिले. प्रत्येक घरातून जर सीमेवर सैनिक पाठवावयास नकार दिला. तर दुश्मनांना सीमेवर विरोध कोण करणार? त्यांना मग आपल्या देशात घुसखोरी करणे सोपे जाईल. त्यामुळे स्वार्थी विचार साडून निस्वार्थीपणे देशसेवा हीच ईश्वरसेवा मानून आपण आपली ड्यूटी निभावणार ही भूमिका शार्दूलने ठामपणे मांडली. एवढेच काय पण ही वंशपरंपरा अखंडपणे चालू ठेवणार असेही सांगितले. मुलगा होवो किंवा मुलगी. भारत होवो किंवा भारती ती देशाचा तिरंगा गर्वाने अभिमानाने फडकता ठेवणारच. देशाच्या सेवेसाठी तीही कार्यरत रहाणारच. त्याच्या ठाम भूमिकेमध्ये त्याच्या बायको आणि बहिणीने खंबीरपणे पाठिंबा दिला.
दोन दिवसावर पंधरा ऑगस्ट आल्याने गावातील शाळेत त्याला निमंत्रित करण्यात आले होते. देशप्रेममयी त्या वातावरणात त्याचे मन भारावले होते आणि तन शहारले होते. शाळेमध्ये त्याच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा झाला. त्यावेळेस अभिमानाने फडकणारा तिरंगा पाहून त्याचे मन शहारले. त्याला तिरंगा हवेने फडकताना पाहून स्वातंत्र्यात जगण्याचे महत्व तर जाणवलेच पण मनातल्या मनात तिरंग्याला साक्षी ठेवून त्याने शपथ घेतली.
“मी माझ्या जीवनांतापर्यंत तुझ्यासाठी लढून, माझ्या रक्ताचा थेंबन् थेंब फक्त तुझ्यासाठीच खर्च करेन. तिरंगा खाली येवू देणार नाही. यासाठी प्रसंगी प्राणार्पण करेन.”
विचारात असताना एकदम त्याच्या कानावर सलामीची आरोळी आली. त्याने कडक सलामी तिरंग्याला दिली.
” भारतमाता की जय”
कॉमिनारे ऐकुनच त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले.