शाळा सुटूनही बराच वेळ झाला. सारंग काही शाळेतून घरी परतला नव्हता. म्हणूनच त्याच्या आईला काळजी वाटू लागली. ती घरामध्ये फेऱ्या घालू लागली. सांरग सकाळी अकरा वाजता शाळेत गेला होता. शाळेत जाताना, त्याने यायला उशिर होईल. असा काही मेसेज दिला नव्हता. तो स्वराजबरोबर शाळेला ये-जा करीत असे. हे आठवून सोसयटीतच रहात असलेल्या स्वराजच्या घरी काकू चौकशीला गेल्या. स्वराज सुद्धा आलाच नव्हता. स्वराजचे आई- बाबा नौकरी करत असल्यामुळे घराला कुलूप होते. शेजारी चौकशी केली असता, काकूंना माहित झाले की, स्वराज दररोज या वेळेपर्यंत येतो; पण आज आला नाही. सारंगच्या आईला काय करावे कळेना. सारंगचे बाबा नौकरीच्या निमित्ताने पुण्यात रहात होते. त्यांची दर दोन वर्षाला बदली होत असे. मुलांना शाळा, महाविद्यालयं बदली करत बसावे लागणार. त्यापेक्षा काकूचं एका ठिकाणी स्थिर राहिल्या म्हणजे सर्वांची त्रेधातिरपिट वाचेल असं काका-काकू दोघांचंही मत होतं. म्हणूनच सारंग, नताशा या दोघांना घेऊन त्या जिल्ह्याच्या गावी स्थिर राहिल्या. सोलापूरला रहाण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे काकुंचे माहेर सोलापूरातच होते. सारंगचे बाबा आठवडया, पंधरा दिवसाला ये-जा करत. अलीकडे सोलापूर-पुणे हुतात्मा रेल्वे सुरु झाल्यामुळे काकांना प्रवास सोपा वाटू लागला होता. काकू ही कधी कधी एकटया पुण्याला जात असत.
सोलापूर सारख्या जिल्हाच्या ठिकाणी काही अडी अडचणीला उपयोगी पडणारी माणसं आधाराला असल्यामुळे काकाहीबिनधास्त राहू शकत होते. सारंगचे आजोबा-आजी खेडेगावात रहात होते. शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे काका-काकू आजोबा-आजी शहरात यायला तयार नसत. अगदीच काहीतरी महत्त्वाचे काम असेल तरच शहराकडे येणे होतं असे, सारंग सातवीला तर नताशा नववीला होती. सारंगच खाणं, पिणं, व्यायाम यामुळे त्याची तब्येत जाम होती. नताशा त्याच्यापेक्षा
मोठी असूनही तोच मोठा वाटत असे. सारंगचे आणि स्वराज उशिरा घरी आले. सारंगच्या आईला तर वाटले होते, सारंगला मी खूप रागवेन, उशिया येण्याचे कारण विचारेन आणि बरंच काही; पण जेव्हा सारंग समोर आला. तेव्हा त्या काहीच बोलू शकल्या नाही. फक्त त्यांच्या डोळ्यांमधून अश्रुधारा बरसू लागल्या, सारंगला आईची माया पाहुन गलबलून आल्यासारखे झाले. त्याला काय बोलावे तेच सूचेना आईने त्याचा उशिरा येण्याविषयी विचारल्यावर मित्राची सायकल पंक्चर झाल्याने त्याच्याबरोबर मी पण चालत आलो. मित्र एकटाच चालत येणार, हे काही बरोबर नाही.असे सांगितल्यावर काकू शांत झाल्या. त्यांनी सारंगला पाच-दहा रुपये जवळ ठेवत जा’, म्हणून सांगितले. उशिर होवू लागला तर, एखादा फोन करत जा, अशीही विनंती वजा सूचना करुन सांगितले. काकूंनी त्याला आता जेवणाचीच वेळ झाली आहे. मी गरम गरम स्वयंपाक करते. जेवूण घे असे सांगितल्यावर,
‘मला चालून आल्यामुळे कसेतरी होतेय, थोड्यावेळाने जेवतो. ‘
म्हणून तो खोलीत निघून गेला. तो गेला आणि दुस-या क्षणाला खोलीचे दार बंद केल्याचा आवाज झाला. हे नेहमीचच आहे म्हणून काकूंनी दुर्लक्ष केले. तसे खोलीत गेलं की दार बंद करण्याची काय गरज असते, या विषयावर बऱ्याच वेळा वादावादी झाली होती; पण अभ्यासात व्यत्यय नको म्हणून….. हा विषय इथेच संपे.
दिवसामागून दिवस जात होते. अधूनमधून सारंगला शाळेतून यायला उशिर होई. तर केव्हा केव्हा तो मित्राच्या घरी अभ्यासाला जातो म्हणून दोन-दोन तास घरातून गायब होत असे. मित्रालाच घरी बोलावं अभ्यासाला, असं सांगितल्यावर
‘नाही, नको त्यांच्या घरात कोणीच नसते.त्यामुळे शांत वातावरण असते.’
असे तो कारण सांगे. सहामाहीचा रिझल्ट लागला आणि कमी मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलवण्यात आले. सारंगला कमी मार्क का पडले असतील याचे कारण काकूंच्या लक्षात येईना .. काकूंना काही समजेना. सारंग शाळेत जातो, अभ्यास करतो मग नक्की प्रॉब्लेम कुठे आहे? सारंगशी या
विषयावर बोलायचेच असे काकूंनी ठरवले. सारंगला त्यांनी,
‘मला तुइयाशी बोलायचे आहे.’
म्हणल्याबरोबर सारंग चपापला. कशाबद्दल? काय? असं विचारण्याऐवजी एकदम तो बोलून गेला.
‘आई, चूक झाली नाहीच. मी प्रत्यक्ष या खेळात सामील नव्हतो, मित्र खेळत, म्हणून मी पहात थांबत असे. उगीच्या उगीचंच मला आता मित्र अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत.’
सारंगचे बोलणे ऐकून काकूंना काही कळेचना. तू कशाबद्दल बोलतो आहेस म्हणून त्यांनी सारंगला विचारले, सारंग मनातून खूप घाबरला होता. त्याच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होते. त्याला काय करावे ते सुचत नव्हते. त्याच्या मनात चाललेला गोंधळ त्याच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. त्याला काय होतंय वाटतय ते काकूंना कळेचना.. काकूंनी त्याला प्रेमाने जवळ घेतले, मायेने डोक्यावरून , पाठीवरुन हात फिरवला आणि एखादा बांध फुटावा, त्याप्रमाणे सारंग रडू लागला. काकूंना काही कळेना! पण तरीही त्याला या क्षणी मानसिक, भावनिक आधाराची गरज आहे. हे त्यांच्या लक्षात आले. त्याला आपल्या जवळ घेत, काय झाले म्हणून त्यांनी विचारलं . दुधात साखर विरघळावी तसा आईच्या मायेच्या अलोट सागरात त्याचे दु:ख संपून जाईल. याची त्याला खात्री वाटली आणि त्याने सांगण्यासाठी सुरुवात केली. एवढयात दारावरची बेल वाजली. कोण आले. हे पहाण्यासाठी काकू गेल्या. गावाहून आत्या आली होती. त्यांना पाहून काकूंना आश्चर्य वाटले, न सांगता कधी न येणारी आत्या आज अचानक कशी काय? असा प्रश्न सारंगच्याही मनात येवून गेला. आल्या आल्या आत्याने मुलांसाठी आणलेल्या भेटवस्तू, खाऊ दिला . सारंगचा पडलेला चेहरा तिच्या लक्षात आला पण तरीही काही कळलं नाही, असं दाखवत ती बोलत होती. सारंगही काहीच झालं नाही असं वागत होता. चहा-पाणी होवून इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि आत्या येण्यामागचे कारण स्पष्ट झाले. कोल्हापूरात आत्याच्या एका मैत्रिणीचे लग्न होते. त्यामुळे आत्या आली होती. नताशा आत्याची खूप लाडकी होती. त्या तिला लाडूबाई म्हणत. आत्या आली म्हणजे आता चंगळ, हे समीकरण नताशा आणि सारंगला माहित होते. नेहमीप्रमाणे नवीन नवीन रेसिपी शिकून, ती करुन सर्वाना खावू घालणे हा त्यांचा आवडता कार्यक्रम, आत्या आली की सिनेमा, नाटक, कंबर तलावावर एखादं दुसरी चक्कर आणि बरंच काही. तिच्याशी गप्पा मारायला गंमत येई.
आत्याच्या मैत्रिणीचे लग्न रविवारी होते. लग्न झालं की लगेच ती पुण्याला तिच्या घरी परतणार होती. सध्या मात्र दोन-तीन दिवस सासरहून माहेरपणासाठी वेळ काढून ती आली होती. सारंग आपल्या मनातला गोंधळ कधी एकदा आईला सांगतो असं झालं होतं. पण आईला आत्या असताना सांगावे की नको? या संभ्रमीत अवस्थेत तो होता. पण आईने आत्याला सारंग विषयी थोडं सांगून ठेवलंच होतं. त्याचा आधार घेतंच आत्याने एके दिवशी सारंगचा शाळेतून येताना पाठलाग केला. तिला ज्याप्रमाणे वाटलं तसंच घडलं. आत्याने जे पाहिलं ते पाहून तर तिच्या चेह-याचा रंग उडाला, सांरग आणि स्वराज चालत येत होते. अचानक दोनचार मुलांनी त्यांना अडवलं, ते त्यांच्याच शाळेतील असावेत. कारण त्यांचा गणवेश सारंग सारखाच होता. काहीतरी चालल होतं. आणि त्यानंतर चक्क सारंग आणि स्वराजला मारण्यासाठी त्यातल्या एकाने हात पकडले,
काहीजण मारणार, त्या अवस्थेत आत्या जोरात ओरडली. आत्या त्यांच्या दिशेने धावत गेली. आपल्या दिशेने कोणी पळत येत आहे हे पाहून पोरं प्रथम तर हललीही नाहीत . पण जेव्हा सारंगने आत्या म्हणून ओळखून हाक मारली, तेव्हा ती पोरं मग पळाली.
सारंग, स्वराज सातवीच्या मानाने चांगलीच थोराड म्हणजेच नववी , दहावीला असल्यासारखी वाटत होती. तर आता मारायला आलेली पोरं, त्यांच्यापेक्षाही मोठी वाटत होती. आत्याने सारंग, स्वराजला कुठे लागले तर नाही ना ते पाहिले . दोघांनाही घरी व्यवस्थित नेले, घरी गेल्यावर आई, आत्या, बाबा, नताशा प्रश्न विचारणारंच, मग आपणच आज सांगून टाकायचंच असं सारंगने ठरवले होते. सारंगने सांगायला सुरुवात केली, आम्ही एके दिवशी शाळेतून येत असताना स्वराजची सायकल पंक्चर झाली. स्वराज एकटाच चालत येणार, हे काही योग्य नाही. म्हणून मी ही त्याच्याबरोबर चालत येत होतो. डांबरी रस्त्याने खूप लांब पडेल म्हणून आम्ही जवळच्या मार्गाने जायचे ठरवले. रस्ता जरा आडवळणीचा होता. पण दिवसा काही हरकत नाही म्हणून आम्ही निघालो. रस्त्याने येत असताना एका मोठ्या झाडाखाली काही मुलं घोळका करुन काहीतरी करीत होती. आमच्या मनात उत्सुकता निर्माण झाली.आम्हीही त्या बाजूने गेलो. आम्ही पोहचेपर्यंत कुणाच्या लक्षात आलेही नाही. गोळा होवून आणि गोल करुन ती मुलं पैशांवर पत्ते खेळत होती. चांगली १०० रु. ची नोट ठेवून खेळ सुरु होता. हे चाललंय ते योग्य नाही. आपण इथून निघालेलंच बरं म्हणून आम्ही निघणार तेवढ्यात स्वराजचा पाय त्यातील एका मुलाला लागला. त्याने काहीतरी घाण शिवी दिली. स्वराजला खूप वाईट वाटले.
‘नुसता पाय लागला, मी तुझ्या पाया पडणारच होतो, शिवी द्यायचं काही कारण होतं का?’
म्हणून स्वराज चिडला. ते सर्वांच्या लक्षात आलं की ही
आपल्या घोळक्यातील नेहमीची मुलं नाहीत. मग अंगावरचा गणवेश पाहून आपल्याच शाळेतली मुलं आहेत. याची ही खात्री पटली. ही मुलं आपण खेळत असलेला खेळ शाळेत सरांना सांगतील की काय? अशी शंका त्या मुलांच्या मनात निर्माण झाली म्हणून ती घाबरली. बोलून सारंगला आता जरी थकल्यासारखे वाटत होते. तरी आपलं मन आपण कुठंतरी हलकं करु शकलो.या समाधानानं चेहरा बराच शांत वाटत होता. सारंग सांगताना थांबलेला पाहून स्वराज बोलू लागला. त्याने सांगितल्याप्रमाणे, सारंग आणि स्वराजला त्या मुलांनी तुम्ही
आता जे पाहिलं ते कुणालाही सांगायचे नाही, अशी धमकी दिली होती. पण तरीही हे गप्प बसतील का? याची खात्रीही त्यांना वाटत नव्हती.
त्यामुळंच त्या दिवसानंतर शाळेत, जाण्या-येण्याच्या रस्त्यावर ही मुलं सारंग आणि स्वराज्यला अडवत, आणि मारण्याची धमकी देत. स्वराज मुख्य रस्त्यानेच ये-जा करत होते. जवळचा मार्ग धोकादायक असतो, हे त्यांना चांगलेच उमगले होते. सहामाही परिक्षेचे पेपर सुरु झाले. याही मुलांचा नंबर आला होता. त्यातील एका मुलाने गाईडची पाने खिशात लपवली होती. स्वत: उत्तर लिहिले आणि झाल्यावर सर तपासायला येणार म्हणताच, जवळच असलेल्या सारंगच्या पायाखाली त्याने ती पानं फेकली. सांगितले तर… असं हाताने आणि चेहऱ्यावरील हावभावाने दाखवून, हाताने मारीन अशी खूण केली. सर तपासायला आलेच होते. सारंग, आपल्या बाकाखालची पानं वर टाकावी म्हणून वाकणार, एवढ्यात सरांचे लक्ष त्याच्याकडे गेले. सारंग हा वर्गातील हुशार, शांत, समंजस मुलगा. त्याच्याकडून ही अपेक्षा सरांना नव्हती. सर्वासमोर त्याला असे उभे करुन विचारणा केली. सारंगने ही मी कॉपी केली नाही म्हणून सांगितले पण ही पाने कुणाची आहेत ते ही माहीत नाही असेही सांगितले. सरांनी त्याला ऑफिसमध्ये मुख्याध्यापकाकडे नेले, पण तरीही तो बोलेना. शेवटी आई-वडिलांना घेवून ये म्हणल्यावर घाबरला, त्याने ऑफिसमध्ये खरे काय ते सांगितले. सरांनी त्याला तू नाव सांगितले, हे त्या मुलांना कळू देणार नाही म्हणून सांगितल्याने तो पुढील पेपर लिहू शकला. पण मनस्थिती बरोबर नसल्यामुळे त्याला कमी मार्क पडले. म्हणूनच सरांनी त्याच्या पालकांना बोलावून आणायला सांगितले होते. सारंगला आपण जणू कात्रीत सापडलो आहोत असे वाटत होते. एकीकडे नको वाटणारी टारगट मुले, त्यांची धमकी आणि दुसरीकडे आई, बाबा आणि शिक्षक. त्याच्या मनाचा कोंडमारा होवू लागला. कुठून बुध्दी सुचली आणि जवळच्या मार्गाने गेलो, असं त्यांना झालं होते. त्याचे काका नेहमी म्हणायचेच, कोणत्याही ध्येयाप्रत जाण्यासाठी जवळचा मार्ग (शॉर्टकट ) चा कधीही अवलंब करायचा नाही. तो कधी कधी अडचणीत आणणारा ठरू शकतो, कोणतेही काम करत असताना सरळ मार्गाचा अवलंब फायदेशीर ठरतो. सारंगने झालेला सर्व प्रकार आईला बोलायचा, सांगायचा मनाचा निर्धार केला. आपली आई नक्कीच योग्य विचार करुन, काय आणि कोणती कृती केली पाहिजे ते सांगेल. याचा त्याला आत्मविश्वास होता. त्याने आईला एके दिवशी सांगायचा प्रयत्न केला पण त्याला जमलंच नाही, आपल्याविषयी ती योग्य विचार करेल असा विचार ठेवून तो गप्पच झाला.
सहामाहीला गुण कमी पडले म्हणून पालकांना घेवून येण्यास सांगितल्यावर मात्र आता आईला सांगूच असं ठरवलंच होतं मी आणि त्याच प्रसंगी आत्या गावाकडे आली, सारंगच सारं ऐकल्यावर आत्या, आईने शाळेत मुख्याध्यापकांची भेट घेतली. सर्व वृत्तांत सविस्तर सांगितला. त्या मुलांना सुधारण्यासाठी पहिल्यांदाच शिक्षा करण्यापेक्षा त्यांना व्यवस्थित समजून सांगू, असेही सुचवले. मुख्याध्यापकांनी यावर योग्य तो निर्णय घेवू असे सांगितले. सारंग, स्वराज यांना जाण्यायेण्यासाठी सोबत काकू जावू लागल्या. शाळेत यशासाठी सरळ मार्ग की आडमार्ग सोपा या विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी मानसशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नेने यांना शाळेने आमंत्रित केले. मुलांना रुचेल, पचेल आणि पटेल अशा शब्दांत डॉक्टर साहेबांनी मार्गदर्शन केले. डॉक्टरांनी केलेल्या मार्गदर्शनाने विद्यार्थामध्ये नक्कीच फरक पडणार होता. यात काही वादच नव्हता. डॉ. नेने यांच्याशी काही विद्यार्थ्यांनी स्वत: ही संवाद साधला. शाळेने काही विद्यार्थ्यांशी डॉक्टरांची खास भेट घडवून आणली. डॉ. नेने यांच्या मते ही मुलं खूप लहान आहेत. यांना चांगले-वाईट यांची जाण यायला सुरुवात झालेली असते. पण या वयात आपण कोणीतरी वेगळे आहोत. वेगळं काही तरी करू शकतो. आपलं प्रभुत्व मित्रांवर असलं पाहिजे. असल्या मनेच्छांमुळे मुले-मुली विचित्र काहीतरी वागतात; पण योग्य वेळी वळण दिल्यास पाण्याचा प्रवाह जसा त्रासदायक ठरत नाही. तसंच काहीसं मुलांच असतं.
सारंग, स्वराज यांच्या वागण्यात फरक पडलाच पण जवळच्या वाटेवरच्या विचित्र वागणाऱ्यांमध्येही फरक पडला, लहान वयातच काहीतरी वेगळं करुन अंगी लसलेला मोठेपणा का सिद्ध करावा वाटतो, याचे उत्तर डॉ. नेनेनी सर्वांना सांगितलेच होते.
‘कुमारवस्था ही वळण घेण्याची आणि देण्याची योग्य वेळ असते.’
सारंगच्या आईला डॉ. नेने यांचे हे वाक्य खूपच आवडले. सारंग आणि स्वराज च्या शाळेतील सर्वच मुलांना सन्मार्गावर आणण्याचे कार्य डॉ. नेने यांनी हाती घेतले होते. हळू-हळू आणि लांबच्या मार्गाने, कमी वेगाने जरी हे काम होणार असले तरी, ते होणारच याची सर्वांनाच खात्री होती.