सरिताचा कालच फोन आला.
‘नमिता वहिनी, मार्गशीर्ष महिना आला आहे. आपण विष्णू पदाला जाऊ.’
माझं अन् सरिताचं बोलणं वैदेही ऐकतच होती. कॉलेज वयीन वैदेहीला पंढरपूर म्हणजे एक वेगळंच काहीतरी असं वाटत होतं. परवाच ती मुंबईहून आमच्याकडे आली होती. पंढरपूर म्हणजे मंदिरांचे शहर, पंढरपूर मध्ये विठ्ठलाची पवित्र नगरी. इथे अखंड हरिनामाचा जप चालतो. हे सगळं मुंबईत राहणाऱ्या तिला माहीत होतं पण जेव्हा ती गावामध्ये माझ्यासोबत फिरली, तेव्हा तिला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुरलेल्या भक्ताची आणि भक्तासाठी अतुरलेल्या विठ्ठलाची समाधानी मूर्ती पाहायला मिळाली. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे समाधान पाण्यासारखे होते.
ठाई ठाई विठाई
अवघी बहरली पंढरी
पंधरा दिवसाची एकादशी असो की चार मोठ्या एकादशा असो. फक्त आपल्या विठू माऊलीला वेळात वेळ काढून भक्त भेटून आपलं सुख दुःख सांगून जातात. माहेर हे फक्त स्त्रियांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही असतं. याची प्रचिती येते. ऊन वारा पाऊस याची तमा त्यांना कधीच नसते.
मनी आस
विठ्ठल दर्शन
एकच ध्यास.’
मी विचारांच्या तंत्रित असतानाच वैदेही मला
‘आत्या, आत्या’
म्हणून हाका मारीत होती. विष्णू पदाला जायचं म्हणजे कुठे, तिथं काय आहे? तिच्या या प्रश्नांचं मला नवल वाटण्यासारखं काही वाटलं नाही. कारण आजकालची ही लेकरं शिक्षणामुळे कुठे हलू शकत नाहीत. नंतर नोकरी आणि नंतर एकदा भरपूर पैसा हातात खेळू लागला की मग मोठमोठ्या सहली. त्याही कुठे देश आणि परदेशात. धार्मिक ठिकाणी अगदीच क्वचित फिरत असतील. पंढरपूर तेथील मंदिरे, त्यांचा इतिहास येथील संत परंपरा जाणून घेण्याचा प्रश्नच नाही. तसं पाहता आपला भारत देश विविध जाती, धर्म, भाषा, परंपरा, कलांनी बहरला आहे. आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे पण जाणून घ्यायला वेळ कुणाला? किंवा महत्त्व लक्षात येणं हा भाग वेगळाच.
मी तिला विष्णू पदाला का जातात याचे उत्तर द्यायचं ठरवलं होतं पण एवढ्या तिने तिच्याप्रमाणेच हुशार म्हणजेच स्मार्ट असलेल्या मोबाईलवर शोधलच होतं. तिने आपलं गुगल ज्ञान माझ्यापुढे प्रस्तुत केलंच.
” विठ्ठल हे विष्णूची अवतार असल्याने इथे उमटलेल्या पावलांमुळे या चंद्रभागेच्या पाण्यातील खडकावरील ठिकाणास विष्णुपद असं नाव मिळालं. मार्गशीर्ष महिन्यात देव या ठिकाणी राहायला येतात असं मानलं जातं. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते.”
‘मला तोंड पाठ आहे अगं वैदेही.’
मग लगेच कधी जायचं हे तिचं गाणं सुरूच. मला सुजित आणि मिहीका दोघांच्या शाळेमुळे फक्त रविवारी जमणार होतं. त्यामुळे मी कॅलेंडर हातात घेऊन तारखा पाहिल्या. तिला वाटलं फक्त रविवारी जायचं असतं. मी तिला रविवारी जाण्यामागे मुलांच्या शाळा, मैत्रिणींची ऑफिस वेळ आणि आपल्याही इतर जबाबदाऱ्या समजून सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाचं एकविसाव्या शतकातल्या धकाधकीच्या जीवनात धावत पळत कराव्या लागणाऱ्या सर्व कामांमध्ये स्वतःसाठी वेळ काढणं किती महत्त्वाचं असतं. हे ही समजून सांगितलं.
परवाच सुजितचा वाढदिवस झाला. वाढदिवस करायचा म्हटलं तर त्याचे मित्र आणि घरातील प्रत्येकाच्या संबंधितांना बोलवायचं तर हॉलच घ्यावा लागला असता. शेवटी नाही होय करत फ्लॅट संस्कृतीमध्ये एकत्र येण्याचा निर्णय घ्यायचा म्हणजे जास्तीत जास्त पंधरा-वीस माणसं म्हणजे खूप झाली. मग काय वाढदिवस घरातल्या माणसांच्या उपस्थितीत अगदी छोटेखानी स्वरूपात पार पडला. नंतर आम्ही अनाथ आश्रमात जाऊन खाऊ देऊन आलो. तेही फक्त भेट रूपात. कारण तिथे वाढदिवस करणं मला उचित वाटलं नाही. कारण त्यांचाही वाढदिवस शुभेच्छा देऊन छोटेखानी रूपात होत असेल पण आपल्या सोबत असणारे आई- बाबा, काका- काकू, दादा- ताई त्यांच्याबरोबर नसल्याने त्यांना वाईट वाटेल. माझे विचार आवडल्याने वैदेही मला म्हणालीच,
‘आत्या यु आर ग्रेट!’
मी तिला म्हणाले,
‘वैदेही जरा इंग्रजी कमी वापरत जा. आपल्या माय मराठीचा वापर जास्त करत जा.’
यावर वैदेही माझ्यासमोर हात जोडून,
‘आत्या साहेब, आपण महान आहात.’
असं म्हणल्याने आम्ही दोघीही हसू लागलो. खरंच या नवीन पिढीला समजून देण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे. यासाठी वेळ आवश्यक आहे. मात्र सध्या वेळ या विषयाचा सखोल अभ्यास होणं खूप महत्त्वाचं ठरलं आहे.