
वर्तमानपत्रातील पलाशची मुलाखत वाचताना मला ती माझी मैत्रीण आहे याचा खूप अभिमान वाटला. मला पलाश राजीव रणसुभे महाराष्ट्रात १२५ व्या क्रमांकाने तर देशातून २४०व्या नंबर वर होती. तिने राज्यसेवा आयोगाची मुख्य परीक्षा पास केली होती. ती क्लासवन अधिकारी झाली होती. तिचे अथक परिश्रम, चिकाटी, जिद्द आणि नशिबाची साथ या सर्वांबरोबरच तिने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना तर दिलेच होते पण सोबत तिने आपल्या शाळेची ही नाव खूप अभिमानाने घेतले होते. ज्या शाळेत ती अवघी साडेतीन वर्षाची असताना तिने पाऊल ठेवले होते. त्या शाळेने तिला अनुभव ज्ञान तर दिलेच पण तिला संस्कार देऊन तिचा सर्वांगीण विकास केला. खरच प्रत्येकाच्या जीवनात गुरूंचे, शाळेचे महत्त्व किती असते हे तिला कळले होते. म्हणून तर तिने ते व्यक्तही केले होते.
पलाशला लहानपणी टीव्ही पाहण्याची खूपच आवड होती. तिला या गोष्टीपासून दूर करण्यासाठी कारणीभूत ठरली ती आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा. ती लहानपणापासूनच धाडसी होती. तिला एखाद्या विषयावर बोलायचे म्हणजे जे बोलायचे ते दुसऱ्याने लिहून द्यावे लागत होते. तिला एखादा विषय वक्तृत्वासाठी दिला तर त्या विषयाविषयी माहिती गोळा करणे, ती सुसंबंधपणे मांडणे हे सारे कंटाळावाणे वाटे. जर कोणी विषयाची तयारी करून दिली तरच ती वक्तृत्वास तयार होई पण तिची ही सवय बदलण्यासाठी बाके बाईंनी प्रयत्न करायचा ठरवले. शाळेमध्ये पाच सप्टेंबर शिक्षक दिन या दिवशी भाषणासाठी उत्सुक विद्यार्थ्यांची नावे घेतली गेली. त्यामध्ये पलाशने ही नाव नोंदवले होते. या स्पर्धेत मुलांनी स्वतः स्वतःचे भाषण तयार करावे अशी अट घालण्यात आली. पलाशने शाळेतल्या शिक्षकांकडून मदत मिळणार नाही म्हणल्यावर आईकडून भाषण घ्यायचे ठरवले पण आईचा तर या गोष्टीला विरोध होता.
‘ तू तुझ्या विषयासंबंधी स्वतः माहिती गोळा कर.’
हे आईचे वाक्य ऐकले आणि तिला ब्रह्मांड आठवले. इतके दिवस इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत तिला सर्व विषयांची माहिती मिळे पण आता मात्र आपल्या विषयाची तयारी आपणच करायची होती. पलाशला हे काम अवघड वाटले होते पण जेव्हा तिने बाईंनी सांगितलेली सूचना ऐकली तेव्हा मात्र स्वतःच भाषणाची तयारी करायचे ठरवले. तिने शाळेतल्या ग्रंथालयातून डॉक्टर राधाकृष्णन यांच्यावरचे पुस्तक आणले. घराशेजारच्या ग्रंथालयातूनही एक भाषणाचे पुस्तक आणले. दोन -तीन पुस्तकातून तिने थोडी माहिती लिहून काढली ती चांगलीच होती. ती या आधी अशा अनेक स्पर्धेत सहभागी झाली होती. सगळ्याच स्पर्धेत नसली तरी बऱ्याच स्पर्धेत ती यशस्वी झाली होती. आता स्पर्धेकरिता नव्हे तर ज्ञान समृद्धीकरिता ती वाचन करीत होती. तिने आतापर्यंत अनेक पुस्तकांचे वाचन केले होते. आज शाळेमध्ये येणाऱ्या लेखकांचे तिने आत्मचरित्रही वाचले होते . खरंतर तिला त्यातल्या सगळ्याच गोष्टी कळल्या नव्हत्या पण बऱ्याच अंशी समजल्या होत्या. लेखकाच्या बालपणात लेखकाला शिक्षणाची आवड असूनही शिक्षणाची संधी मिळाली नव्हती. तर त्याने ती हट्टाने, अट्टाहासाने मिळवली होती. तरी घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे लेखकाने कामापुरते शिक्षण पूर्ण करून पोटापाण्यासाठी आपला स्वतःचा कामधंदा सुरू केला पण म्हणून आपला वाचन आणि लेखनाचा छंद सोडला नाही. दुकानातून येणारी रद्दी, किराणाच्या मालाला आलेले पेपरचे तुकडे यावरचे वेगवेगळ्या विषयाविषयीचे वाचन करून लेखकाने आपली वाचनाची हौस पुरविली. जेव्हा लेखक आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभा राहिला. तेव्हा मात्र त्याने आपल्या कमाईच्या काही अंशी पैसा पुस्तक खरेदीमध्ये खर्च केला. लेखकाला ना उंची कपड्यांची हाऊस, ना घरादाराची हौस. फक्त वाचन एके वाचन. ते पुस्तकाला आपले खरा मित्र मानत होती. खरंतर त्यामुळे बरेच ज्ञान तर मिळतच होते पण अनेक अनुभवही वाचायला मिळत होते. तिच्या डोळ्यासमोर एवढे सगळे असणारा लेखक कसा असेल त्याची एक वेगळीच प्रतिमा होती. तिने त्याप्रमाणेच आपल्या मनपटलावर त्यांची रेखाकृती बनवली होती. आज शाळेतील सारेच विद्यार्थी खूप उत्सुकतेने त्यांची वाट पाहत होते कारण अभ्यासाच्या तासांना गोष्ट ऐकायला मिळतच नव्हती. एक एक इयत्ता ते वर चढत होते तसतशी त्यांच्यावर अभ्यासाचा बोजा वाढत होता. त्यात पालकांच्या अवास्तव अपेक्षा. त्यासाठी वेगवेगळे क्लास पण त्यामुळे एक वेगळाच ताण मनावर जाणवे. सगळ्यांच्याच घरात आजी-आजोबा नसतात. त्यामुळे हट्टाने गोष्ट ऐकण्यासाठी जागा नसते. त्यातूनही एखाद्याने आई-बाबांकडे जर हट्ट केला की,
‘ मला आज गोष्ट ऐकायची आहे.’
अशावेळी एक तर वेळ नसल्याचे कारण सांगतील अथवा रागाने अंगावर खेकसतील. अभ्यास केलास का? म्हणून रागवतील नाहीतर एखादी सीडी देतील त्या सीडी मध्ये अगदी गोष्टीनुसार चित्रही हलतील पण गोष्ट सांगताना दिसणारा आजी आजोबांचा भाव, चेहरा, प्रेमळ स्पर्श आणि गोड बोलणं हे सारं कसं मिळणार ? आज यातली थोडी तरी भावनिक भूक भागणार होती. आज शाळेतले येणारे पाहुण्यांमुळे साऱ्यांना अपूर्व योग लाभणार होता. पलाश वही, पेन घेऊन जाणार होती. शाळेच्या सभागृहामध्ये जाऊन साऱ्यांना ही गोष्ट ऐकायची होती. पहिल्यापासून प्रत्येक कार्यक्रमातील महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्द्यांची नोंद करायची तिला सवयच होती. पाहुणे येण्याची वेळ झाली. तसं शिस्तीने, रांगेत सारी मुलं सभागृहात हजर झाली. पाहुणे येईपर्यंत सभागृहातील अनेक विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी सर्वांसमोर काही प्रार्थना, कविता सादर करणार होते. स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी व इतर विद्यार्थी या साऱ्यांनी सभागृह फुलून गेले होते. सभागृहामधील सर्वच मुलांना जास्तीत जास्त संधी देण्यात येत होती. बघता बघता अनेक विद्यार्थी समोर येऊन आपले कलागुण सादर करत होते. थोड्या वेळात प्रमुख पाहुणे आले. त्यांचा पाहुणचार झाला आणि ते सभागृहात आले. साधारण पन्नाशी ओलांडल्याच्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावरच काय पण एकंदरीत राहणीमानावरून जाणवत होते. पायजमा, शर्ट असा पेहराव. कोणत्याही प्रकारे झगमगाट, मोठेपणा त्यांना आवडत नव्हता. हे त्यांच्या राहणीपणामुळे कळतच होते. त्यांनी सभागृहात पाऊल ठेवले आणि वातावरण एकदम शांत झाले. टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता होती. वातावरणात पाहुणे दमदार पावले टाकत व्यासपीठाकडे गेले. त्यांनी व्यासपीठावर चढताना प्रथम व्यासपीठाला वंदन केले आणि मग ते व्यासपीठावर गेले. तेथे गेल्यावर त्यांनी सभागृहातील मुलांना हात जोडून नमस्कार केला आणि मग ते आसनस्त झाले. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू झाला. पलाशला मात्र त्यांचा नम्रपणा खूपच आवडला. एवढी मोठी व्यक्ती वयाने, मानाने आणि मनानेही तो किती मोठी आहे हे जाणवले. कारण व्यासपीठावर चढताना त्यांनी वाकून हात लावून व्यासपीठाला वंदन केले आणि तिला एकदम सचिन तेंडुलकरची आठवण झाली. शतक पूर्ण केलेले असो किंवा एखादा षटकार मारला की सचिन आकाशाकडे पाहून जमिनीला डोकं टेकून पायाही पडतो. पलाशचे बाबा ही दररोज गाडीवर प्रवास करण्यापूर्वी गाडीला पाया पडून मगच प्रवासास सुरवात करत. घरात आईही स्वयंपाक करण्यापूर्वी शेगडी, पाण्याचा हंडा आणि परात. या साऱ्यांची पूजा करून मग कामाला सुरुवात करे. तीच्या डोक्यात सहजच आले. बरोबर आहे खरं. या साऱ्यांसारखेच आपण पण पाडव्याला आपल्या वही पुस्तकांची पूजा करतोच. तिला विचार पडला आणि मग ती कान देऊन समोरचे बोलणे ऐकू लागली. समोर ग्रंथालयांच्या ताई कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत होत्या. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. त्यानंतर स्वागत गीत आणि पाहुण्यांची ओळख. मग मुख्य कार्यक्रम सुरू झाला. कथाकथनासाठी पाहुणे उभे राहिले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रत्येकजण आतुर होता त्यांना ऐकण्यासाठी. त्यांनी प्रथम छोट्या छोट्या कथा सांगितल्या. सारे लक्ष देऊन ऐकत होते. खरंच जणू असा भास होत होता. मुलांचे आजोबाच त्यांना गोष्ट सांगत आहेत.
त्यांनी मुलांना संस्कृती, विकृती आणि प्रकृती हे समजून सांगण्यासाठी एक उदाहरण देखील सांगितले. मुलांना त्यांनी प्रश्न विचारला.
‘ मुलांनो तुम्ही जेवायला पान वाढून घेऊन बसलात आणि तेव्हा एखादी व्यक्ती आली तर मग तुम्ही काय करता’ यावर कोणी काही तर कोणी काही उत्तर दिले. दोन-तीन जणांची उत्तरं ऐकल्यावर त्यांनी स्वतः सांगितले.
‘ अरे मुलांनो तुम्ही जेवताना किंवा काही खाताना कोणी आले तर तुम्ही ताट आत घेऊन निघून जाता किंवा जेवायला लागलोय पुन्हा या म्हणून सांगता. त्याला विकृती म्हणतात पण जर तुम्ही येणाऱ्या व्यक्तीला या जेवायला म्हणून निमंत्रित करता. तर ती झाली प्रकृती आणि आपल्या सोबतच जर त्याला आग्रहाने दोन घास तरी खाण्याची विनंती केली तर ती झाली संस्कृती. खरंच पलाशला एकदम आठवले ते तिच्या आईचे बोल. नेहमी ती तिला आपल्या डब्यातला खाऊ सरांना देत जा म्हणून सांगत असे.
. खरंच आपली आई ही या लेखकांना भेटली असणार असा गंमतशीर विचार मनात डोकावून गेला. पाहुणे सांगत होते ते खरंच साऱ्यांना पटत होतं. बघता बघता पाहुण्यांनी दोन-तीन कथा सांगून झाल्या होत्या. विद्यार्थी एवढे एकचित्त होऊन ऐकत होते की पुढचा कार्यक्रम संपूच नये असं वाटत होतं. पाहुणे आता शेवटची गोष्ट सांगणार होते. त्यांनी सहजच प्रश्न विचारला की,
‘ शिक्षक कसा असावा.’
खरतर हा प्रश्न त्यांना सुचला तो त्यांच्या लहानपणाच्या शिक्षकांवरून. त्यांच्या शिक्षकांनी त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन केले. म्हणूनच आज इथेपर्यंत ती आणि असे बरेच विद्यार्थी पोहोचू शकले होते. लहानपणी ते वर्गात जास्त लक्ष देत नसत. हुल्लडबाजी करत पण त्यांच्या शिक्षकांनी त्यांना योग्य वेळी जागृत करण्याचे काम केले. शिक्षण योग्य पध्दतीने घेण्याचे फायदे आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करण्याचे तोटे विद्यार्थ्यांपुढे मांडले होते. खरंच विचार करायला लावणारे जीवन होते. त्यांनी त्यांच्या शिक्षकांवरून एक प्रश्न सभागृहातील साऱ्यांपुढे मांडला. यावर आठ ते दहा जणांनी आपापल्या बुद्धिमत्तेनुसार विचार करुन उत्तरे दिली.यावर साऱ्यांची नाही पण थोड्याफार मुलांची मतं ऐकून घेतल्यावर शेवटी त्यांनी त्यांचे मत सांगितले.
‘पाणी सर्वांना माहित आहे. पाणी म्हणजे जीवन आहे. पाणी जेव्हा वाहत असते तेव्हा ते आपल्या सोबत अनेक दगड , गोटे, माती वाहून नेते. ते जात असताना त्याच्या जे जे समोर येतं त्याला बरोबर घेते अथवा आहे तिथेच भिजवून टाकत ते पुढं मार्गक्यमित होतं. समजा त्याच्या समोर एखादा खड्डा आला तर ते त्या खड्ड्याला वळसा घालून पुढे जात नाही तर तो खड्डा पाण्याने भरून मग त्या खड्ड्यावरून पाणी वाहू लागते. मिळेल त्या मार्गाने वाहने. ज्या रंगात मिसळेल त्याप्रमाणे दिसणे, तहानलेल्यांची तहान भागवणे हेच त्याला माहीत असते म्हणजेच शिक्षकांनीही तसेच असले पाहिजे. त्यांच्यासमोर कसलाही विद्यार्थी असला तरी त्याला ज्ञानाने समृद्ध करणे हेच त्यांचे आद्य कर्तव्य असते. जो प्रवाहाबरोबर येऊ शकत नाही त्यांनाही आपल्याबरोबर घेणे हीच तर खरी कला आहे, होय ना! यावर विद्यार्थीच काय पण शिक्षकांचेही चेहरे प्रसन्नतेने झळकले. त्यांनी केलेल्या श्रमाची जणू काही पावतीच त्यांना नकळत मिळाली होती. कौतुकाची थाप, प्रशंसा कोणाला नको असते का? शिक्षकांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहुण्यांनी अचूकपणे टिपले होते. बघता बघता कार्यक्रम संपण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत होता. कथाकथन झाले आता कौतुक सोहळा. खरंतर बक्षीस समारंभ प्रथम करू असं पाहुण्यांचे मत होतं पण विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे तो कथाकथनानंतर ठेवण्यात आला. बहारदार असे कथाकथन झाले. बक्षीस समारंभ सुरू झाला आणि यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुकारली जात होती. मुलांना प्रोत्साहन म्हणून टाळ्यांचा कडकडाट होत होता. बघता बघता उत्तेजनार्थ, तिसरा, दुसरा आणि आता जाहीर होणार होता, प्रथम क्रमांक. पलाश अगदी जीव कानात आणून आतुरतेने ऐकत होती. तिचा आत्मविश्वास यावेळी ही सफल होणार होता आणि एवढ्यात तिच्या कानावर आलेच.
‘ प्रथम क्रमांक मिळवला आहे, पलाश देसाई हिने.’
पलाश एक मिनिट स्तब्ध झाली आणि दुसऱ्याच क्षणाला ती बक्षीस घेण्यासाठी उठली. तिला एक वेगळाच उत्साह जाणवत होता. आपण त्या मेहनतीपेक्षा निष्ठेने पुस्तक परीक्षण केले. त्या मेहनतीचे फळ खऱ्या अर्थाने मिळाले. हाच विचार तिच्या मनात आला. तिचे डोळे आनंदाश्रुंणी पाणावले. व्यासपीठावर जाताना व्यासपीठाला तिने वंदन केले आणि मग व्यासपीठावर चढली. प्रमुख पाहुणे आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना तिने प्रथम वंदन केले आणि मग बक्षीसाचा स्वीकार केला. बक्षीस घेतल्यावर तिने प्रशालेतील शिक्षकांना पाहून हात जोडले आणि नंतर सभागृहातील साऱ्यांकडे पाहत हात जोडले. आनंदाश्रुंना ती रोखू शकत नव्हती. पाहुण्यांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि मग तिची पाठ थोपटत तिला,
‘ शांत हो बाळा, जीवनात अशीच यशस्वी होत राहा.’
म्हणून आशीर्वाद दिला. पलाश व्यासपीठावरून उतरताना एक वेगळाच आत्मविश्वास मनात जागृत करून घेऊन उतरली होती. तिला जणू परिसस्पर्श झाला होता. आजपासून आपण परीक्षार्थी नाही तर विद्यार्थी बनून ज्ञान मिळवणार. स्पर्धेमध्ये स्पर्धा करायची पण ती मनापासून, अभ्यासपूर्ण आणि मेहनती असेल तर खूपच अभिमानास्पद. ती स्वतःविषयी अवांतर फाजील आत्मविश्वास ठेवायचा नाही, यशाची हवा डोक्यात शिरू द्यायची नाही, कितीही यशस्वी झाली, कितीही मोठे यश मिळाले तरी जमिनीवर पाय असल्याप्रमाणेच वागायचे आणि बरेच काही विचार करत ती केव्हा जागेवर आली तिला कळलंच नाही. तिच्या मैत्रिणींनी तिच्याकडे पाहून लांबूनच अभिनंदन करुन स्मितहास्य केले. तिचा निर्धार मनात पक्का झाला होता. आजपासून दररोज ती पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त दोन पानं तरी वाचणारच. आपली दैनंदिनी दररोज लिहिणारच आणि जसे जमेल तसे चार ओळी का होईना ती लिहिणारच. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज झळकत होते. ते पाहून असं वाटत होते जणू तिला आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या विचारांचा परिसस्पर्श झाला होता. एक वेगळीच आभा तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती. अशी ही जिद्दी मैत्रीण आज महाराष्ट्रात यशस्वी होऊन ती अधिकारी बनली होती. याचा मलाही कुठेतरी खूप खूप अभिमान वाटत होता.