
शकुंतलाने आज सकाळीच मुलाला फोन केला. मात्र संजीवने उचलला नाही. यावर विक्रमराव म्हणालेच,
‘अगं आपण भारतात रहातोय ते परदेशात राहतात. त्यांच्या आणि आपल्या वेळेमध्ये फरक असतो ना!’
यावर शकुंतला गप्प बसली. तिच्या मनात विचारांचे काहुर माजले होते. विक्रमरावांची एनजिओग्राफी झाली, त्यांना चार ब्लॉकजेस असल्याचे निदर्शनास आले होते. आता एनजिओप्लास्टी करावी लागणार होती. संजीव अन् कुमूद या दोघांनी यावेळी हजर असलंच पाहिजे असं शकुंतलाला वाटत होतं. ती सहजच भूतकाळात हरवली. जेव्हा शकुंतला अन् विक्रमराव नोकरी करत होते, तेव्हा विक्रमरावांच्या आईने आणखी एखादं आपत्य होवू द्या असं सुचवले होते, पण.. करिअर अन् वाढती महागाई वाढत्या जबाबदाऱ्या अशी प्रशस्त कारणं दाखवत शकुंतला अनू विक्रमरावांनी जबाबदारी पासून हात झटकले. तसं विक्रमरावांना राहून राहून मनात नेहमी एक विचार यायचा. आपल्या मुलाला अजून एक भाऊ किंवा बहिण असलीच पाहिजे. एकमेकांना साथ सोबत जिव्हाळा, प्रेम राहील. शकुंतला मात्र एका मुलावरच खुश होती. ती नेहमी विक्रमरावांना त्यांच्या भावा-बहिणीच्या परस्पर संबंधांची उदाहरणं देई. तिचे सख्खे दीर जगाला सढळ हाताने व सहर्ष प्रत्येक गोष्ट करत. मात्र सख्ख्या भावाला किंवा त्याच्या घरातील कुणालाच काही करायचे म्हणलं की त्यांच्या डोक्यात व्यवहाराचं भूत थैमान घालत असे. आपण किती अन् काय केलं याचा हिशेब ते कधीच लावत नसत. फक्त पुढच्याने माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी काय केलं हाच स्वार्थी विचार करत. त्यांना फक्त आणि फक्त बाहेरची माणसं, नाती, हे जग म्हणजे खूप चांगले आहे. घरातले मात्र…. पण काही का असे ना विक्रमराव आणि त्यांची आई मात्र आपण सरळ मार्गानेच वागायचं. पुढच्याने कसे जरी वागले तरी आपल्या वागण्यात काही फरक पडू द्यायचा नाही हे मनाशी ठरवून निश्चयावर ठाम होते.
बघता बघता दिवस जात होते. शकुंतलाच्या सासूबाईंचे वय आता वाढू लागले. एकीकडे संजीवचे बालपण आणि दुसरीकडे सासूबाईंचे म्हातारपण. तारेवरची कसरत पार पाडत तिचं नोकरी करणं सुरू होतं. विक्रमरावांच्या एकट्या पगारावर कुटुंबाचा खर्च पेलवला जाणार होताच पण शकुंतलाच्या नोकरी करण्याने थोड्या सैल हाताने खर्च करणे सोपे जाणार होते. काही का असेना आपल्या एकुलत्या एक मुलाला म्हणजेच संजीवला आपण काहीतरी वेगळे बनवायचे असे त्यांनी ठरवले होते. आपण एकदम उच्च वर्गा इतका खर्च करू शकत नाही. अगदी गरिबा इतकी आपली परिस्थिती बिकट नाही. आपण मध्यम वर्गातील अगदी वरच्या स्तरात नाही पण एकदम खालच्या स्तरातही नाही. आपण मधल्या स्तरात असल्यामुळे कमीत कमी महिन्याच्या वीस बावीस तारखेपर्यंत तरी चिंतामुक्त वातावरणात राहू शकतो. गाठीला चार पैसे ठेवण्याचं यशस्वी नियोजन शकुंतलेला जमलं होतं. सध्या मात्र घरातल्या अन बाहेरच्या वाढत्या जबाबदाऱ्या तिला त्रस्त करत होत्या. तिने विचार केला, नोकरी सोडून तर चालणार नाही. घरातल्या जबाबदाऱ्या दुसरं कोणी घेणार नाही. मग यातून आपल्यालाच काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे. म्हणून मग तिने सासूबाई व संजीवसाठी गावाकडून नात्यातली एक सारिका नावाची गरजू मुलगी आणली. तिचे शिक्षण जास्त काही झाले नव्हते. ती जेमतेम हिशेब व पत्र वाचण्यापुरतं शिकली होती. तिची इच्छा असेल तर तिला दहावीच्या परीक्षेसाठी ती बसवणार होती पण प्रथम घरातल्या जबाबदाऱ्या ती कशी पेलवते हे पहावे मग पुढे ठरवावे असा विचार झाला. पहाता पहाता सारिकाने शकुंतलाला घरातील जबाबदाऱ्यांपासून मोकळं केलं. ती घरातील सर्वांनाच हवं नको पाहत होती. संजीव अन् सासूबाई यांच्याकडे जातीपूर्वक लक्ष देत होती. शकुंतलाला आता दिवसातला काही वेळ का होईना थोड्या वेळाचा निवांतपणा मिळत होता. आता सारिका म्हणजे जणू घराचा श्वासच बनली होती. फक्त संजीव अन् सासूबाईंसाठीच नाही तर शकुंतला आणि विक्रमरावांनाही तिची चांगलीच सवय झाली. हळूहळू तिचे शिक्षणही सुरू झाले. तिने बहिस्थ विद्यार्थी म्हणून दहावी, बारावी चांगल्या मार्कांनी पास केले. पण हे सारं काही वर्षांपुर्वी. पुढे शिक्षिका होण्यासाठी व्यवसायिक शिक्षणासाठी शकुंतलाच्या कुटुंबाचा निरोप घेऊन ती बाहेर पडली. खरंतर सारिकाचं जीवन मार्गी लागलं पण पुन्हा शकुंतला पुढे नव्याने अडचणी उभ्या राहिल्या. सारिकाला पुढील शिक्षणासाठी बाहेर पाठवूच नये असे विक्रमरावांना आणि त्यांच्या आईला वाटतच होते पण सारिका सोबत असं वागणं स्वार्थीपणाचा वाटलं असतं. पाहता पाहता पुन्हा नातेवाईकात गरजू मुलीचा शोध सुरू झाला पण काही करता यश मिळालेच नाही. मग आता कसे म्हणून खूप विचारांती त्यांनी नोकरी सोडायचे ठरवले. आर्थिक काटकसर, धावपळ आणि विचारांचा गुंता. शकुंतलाचा स्वभाव अलीकडे चिडचिडा झाला होता. विक्रमराव जमेल त्या पद्धतीने आर्थिक अन मानसिक जबाबदारी पेलवत होते. शकुंतला संजीवला स्वतः शाळेत सोडत व आणत होती. सासूबाईंचं हवं नको करत होती. शकुंतलेला मात्र नोकरीत असताना मिळणारं मानसिक व आर्थिक समाधान, मन स्वच्छंदी, आनंदी राहण्याची अनुभूती दुर्मिळ झाली. शेवटी तिने आता विचारांची कवाडं घट्ट लावून, झापडं लावलेल्या बैलाप्रमाणे संसाराचा घाणा ओढण्याचं ठरवलं होतं. खरंच गृहिणीला जाणवणारी घुसमट तोच तोचपणा नक्की का आणि कशामुळे होत असतो हे तिच्या लक्षात येऊ लागलं. हळूहळू संजीव मोठा होत होता. तसं सासुबाईंचे वयही वाढत होते. संजीवला एके दिवशी शाळेतून आणण्यासाठी शकुंतला घाईघाईने निघालीच होती. तेवढ्यात सासूबाईंना अचानक त्रास होऊ लागला. नाईलाजाने तिला थांबावं लागलं. खरं तर तिकडे संजीव वाट पाहत असेल किंवा चुकून कुणाबरोबर गेला तर? किंवा एकटाच घरी येण्यास निघाला तर? अशा अनेक प्रश्नांच्या वावटळीत तिच्या मनातील विचार कस्पटासारखे उडत नव्हते तर प्रचंड वेगाने इकडे तिकडे फेकले जात होते. तसा तिने त्याच्या वर्गशिक्षिकेला फोन केला पण उपयोग झाला नाही. संजीवला मी येईपर्यंत थांबवा असं सांगितलंही असतं पण काहीच उपयोग नव्हता. संजीवने थोड्या वेळ आईची वाट पाहिली होती आणि तो एका मित्रासोबत शाळेबाहेर पडला होता. शिपाई काकांकडे चौकशी केली तर तिला कळाले की जवळजवळ अर्धा तासापूर्वीच तो कोणासोबत तरी घरी गेला आहे. पुढे अचानक उभारलेल्या परिस्थितीला नक्की कोण जबाबदार होते हे तिच्या तिलाच कळले नाही. ती आता संजीवच्या सगळ्या मित्रांना फोन करत होती पण संजीव काही केल्या सापडत नव्हता नक्की तो कोणाबरोबर गेला हेही कळत नव्हतं. तिने आता ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली तोही धावत पळत तिच्याकडे निघाला. मग त्यांनी सर्व चौकशीअंती पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी शाळेचा सीसीटीव्ही तपासला पण योगायोगाने गेट जवळचा कॅमेरा बंद होता. दुर्दैवाने पिच्छा पुरवणं जणू सुरू केलं होतं. त्या दोघांना आता तहानभूक, घरदार या सर्वांचा विसर पडला होता. काही वेळानंतर मात्र शेजाऱ्यांचा फोन आला. तुमच्या आजी मोठमोठ्याने ओरडत आहेत. सगळी परिस्थिती समजून सांगूनही त्या एकसारखं माझा संजूबाबा.. माझा संजूबाबा.. म्हणून गोंधळ घालत आहेत. या सगळ्या परिस्थितीत गावातच राहणाऱ्या आपल्या भावाला विक्रमरावांनी फोन केला तर काय? तोही लग्न कार्यानिमित्त दूर गावी गेला होता. नातेवाईकांमध्ये असे कोणी नव्हते की ते पळत मदतीसाठी येतील. शेवटी नणंदेला फोन करून बोलावून घेतले.
शाळेतून घरी जाताना संजीवला आई न्यायला आली नाही, हे पाहून तो गांगारुन गेला. खूप वेळ वाट पाहून तो शेवटी एकटाच घराकडे चालत निघाला. मात्र इथे जवळतर घर आहे आणि आपण सहज एकटे जाऊ शकू या त्याच्या विचारांनी तो संकटात सापडला. रस्त्याने जाताना तो एकतर आई सोबत गाडीवर किंवा रिक्षात जात असल्याने त्याला रस्ता तितकासा लक्षात येईना. घर लांब होते पण त्याला जवळ वाटत होते. चालत असताना त्याला त्याच्या घराचा रस्ता लक्षात येईना. शेवटी आपल्यासारखाच गणवेश घातलेल्या मुलाच्या मागे तो गेला आणि रडू लागला. त्याला स्वतःचा पत्ता, मोबाईल नंबर ही कुणाला सांगता येईना. घाबरलेल्या मनस्थितीत आपण कुठे राहतो त्या सोसायटीचे नाव ही धड त्याच्या लक्षात येईना. त्याला खेळण्याच्या नादात आपल्याला घरी जायचं ह्याचा विसर पडला. तो ज्या मुलासोबत गेला, त्याच्या आई-वडिलांनाही ते रात्री कामावरून आल्यानंतर आपल्या मुलासोबत कोणी दुसरा मुलगा आला आहे हे कळाले. तरी त्यांनी चौकशी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांच्या वर्गशिक्षिकेला फोन केला पण उशीर झालेला असल्याने फोन उचलला गेलाच नाही. मग आता पर्याय काय? एवढ्या रात्री कुठे जायचं आणि कुठे या सापडलेल्या मुलाचे घर शोधायचं. पोलिसांना सांगायला गेलं तर अंगलट येणारं प्रकरण. जवळ ना गाडी, ना पैसा. शोध घेणार कसा? हा विचार करत करत शेवटी उद्या आपल्या मुलाबरोबर ह्या मुलाला शाळेत घेऊन जाऊ. हा विचार करत ते सर्वजण जेवण करून झोपले. नेहमीच्या दिनक्रमाच्या ऐवजी थोडे लवकरच दोन्ही मुलांना सोबत घेऊन ते बाहेर पडले. दोन्ही मुलांना शाळेत मुख्याध्यापकांकडे न्यायचं आणि सगळी परिस्थिती सांगून ज्याच्या त्याला मुलगा स्वाधीन करा असं सांगायचं ठरवून ते शाळेत पोहोचले. गेट वरच्या शिपाई काकांनी त्या मुलाला पाहिले अन् पटकन ऑफिस मध्ये फोन करून कळवले. पालकांसह दोन्ही मुलांना ऑफिसमध्ये पाठवले. सगळ्यांनाच नक्की काय झालं याची उत्सुकता होतीच. संजीवचे आई-वडील धावत पळत आले. आईने त्याला आपल्या कुशीत घेतले. पटापट त्याचे पापे घेतले. तिकडे पोलिसांचा शोध सुरू होताच. त्यामुळे मुलगा सापडला म्हणून त्यांनाही कळवले. ऑफिसमध्ये संजीव सोबत आलेल्या त्या मुलाला व त्याच्या पालकांना दोषी ठरवले जाऊ नये म्हणून शकुंतलाने सर्व ऐकल्यावर पोलिसांना विनंती करून आमची काही हरकत नाही, असे सांगितले. शेवटी त्या पालकांचे आभार व्यक्त करून संजीवच्या आई बाबांनी त्याला शाळेत न बसवता घरी आणले. त्याला पाहून आजी आणि आत्याच्या जीवात जीव आला होता. कालची रात्र घरात कोणीच झोपले नव्हते. आजी जपमाळ ओढत बसली होती. बाबा बेचैन होवून नुसत्या येरझाऱ्या मारत होते. आत्याने गणपती पाण्यात ठेवला होता. शकुंतला तर माझंच चुकलं याचा विचार करून रडत होती.
आजीने त्याला शाळेत पाठवू नका… बास झालं एवढ्या दूरच्या शाळेत पाठवणं. त्यापेक्षा घराजवळच्या शाळेत पाठवा. असं म्हणून लागल्या. मात्र विक्रमरावांनी त्याला तिसरी, चौथी इथेच शिकवून पाचवीपासून हॉस्टेलला ठेवायचे ठरवले. संजीव आता तर दुसरीत होता. बाहेरचं जग हे घरातल्या वातावरणापेक्षा खूप छान असते, असा त्याचा गैरसमज होता. एवढे दोन वर्ष आहे त्या शाळेत काढून नंतर पुढच्या वर्षी होस्टेलला ठेवायचे ठरले. सप्तरंगी इंद्रधनुषाप्रमाणे भासणाऱ्या बाहेरच्या जगाचा अनुभव संजीवला नव्हताच. इकडे आजीची तब्येत खूपच खलावत चालली होती. शकुंतला आपल्यावर आलेल्या जबाबदारीला पूर्वीसारखीच सामोरे जात होती. मी कितीही कष्ट करेन पण माझ्या मुलाला हॉस्टेलवर ठेवायचं, हे शक्य नाही असं तिला वाटायचं पण शेवटी विक्रमरावांनी घरातल्या उभ्या ठाकलेल्या परिस्थितीबद्दल समजून सांगितलं. पाहता पाहता संजीव चौथी पास झाला. तो मुळातच खूप हुशार होता. शकुंतला अन् विक्रमराव त्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्षपूर्वक पाहत होते. सासूबाईंची जबाबदारी पेलवत शकुंतला ही त्याच्या अभ्यासाकडे, खाण्यापिण्याकडे, खेळण्याकडे लक्ष देतच होती. त्याला सैनिक स्कूलमध्ये ऍडमिशन मिळाले. तो आई-बाबा, आजी यांना सोडून जाणार म्हणून ते सारे मनातून दुःखी असले तरी तो तेवढा दुःखी वाटत नव्हता. घराबाहेर राहणं म्हणजे अगदी सिनेमा, सिरीयलमध्ये दाखवतात तसंच, असं त्याला वाटत होतं. हॉस्टेलवर जाताना फक्त घरातील्यांनाच नव्हे तर शेजाऱ्यांनाही दुःख झाले होते. त्यालाही या सर्वांना सोडताना थोडे का होईना वाईट वाटत होते पण… दिवस येतात आणि जातात. वर्षा मागून वर्ष सरत होती. सणासुदीला आणि उन्हाळी सुट्टीला तो येत जात होता. हळूहळू आजी आता अंथरुणालाच खिळून होत्या. तो आठवीत असताना त्याच्या आजी देवाघरी गेल्या. थोडे दिवस, थोडे महिने भेटायला येणारे आणि जाणारे. परत सगळं, सगळं शांत… शांत…
आता शकुंतला घरात एकटीच होती. आपण मुलाला घरी आणावे, एकुलता एक मुलगा तेवढ्या लांब ठेवायचा? हे तिचे विचार नवरा आणि तिच्या लेकालाही पटले नाही. त्याचे उज्वल भवितव्य ते दोघे पाहत होते. तिचा एकटेपणा किंवा मुलाची मानसिक दुरावलेपणाची अवस्था कोणाच्याच लक्षात येत नव्हती. शेवटी घरात बसून काय करायचे म्हणून तिने पुन्हा एकदा नोकरी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागतच झाले. तिचा वेळ जाईल आणि चार पैसे गाठीला राहतील. असा विचार तिने केला. तोही यशाच्या पायऱ्या चढत चढत सैनिक स्कूलमध्ये शिकून बाहेर पडून नोकरीला लागला. शकुंतला अन् विक्रमराव दररोज आठवणी मध्ये रमत पण संजीव आपल्या सोबत रहावा असे त्यांना सारखे वाटे. नोकरी लग्न अन् सण समारंभ क्रमानुसार घडतच गेले. तो पाहता पाहता परदेशी नोकरीसाठी जाणार होता. प्रथम शकुंतला आणि विक्रमरावांना हे ऐकून अभिमानाने मान ताठ झाली, मात्र दुसऱ्याच क्षणी तो आपल्यापासून कायमचा दूर जाणार याची जाणीव झाली. मात्र संजीव आणि कुमुदचा निर्णय ठरला होता. त्यांनी त्यांच्या उज्वल भवितव्याचा विचार केला. कुठेतरी लहानपणापासून, घरापासून दूर राहिल्यामुळे संजीवच्या मनात आई-वडिलांच्या प्रेमाचा कोपरा रिकामाच राहिला होता. लहानपणापासून बाहेर राहिल्यामुळे आलेल्या अनुभवांनी त्याला हसवलं अन रडवलंही होतं. तो परदेशी चांगलाच स्थिरावला. आई-वडिलांनाही सोबत न्यावं असं त्याला जरी वाटत होतं, तरी हवामान बदल, परदेशी राहण्यासंदर्भातले नियम आणि बऱ्याच गोष्टींमुळे ही दोघं इकडं अन् ती दोघं तिकडं राहिली.
लग्नाला चार वर्षे होऊन गेली होती. संजीव अन् कुमुदने बाळाचा निर्णय घ्यायचा ठरवला. या निर्णयाने त्या मोठ्या जबाबदारीस ती दोघं तोंड देत होती. अशातच विक्रमरावांची एन्जिओग्राफी आणि एनजिओप्लास्टी. संजीवची अवस्था म्हणजे सोडलं तर पळतंय अन् धरलं तर चावतंय अशी झाली होती. पाहता पाहता आई-बाबांचे मेसेज फोन या भावनिक प्रश्नांना काही उत्तर नव्हते. ना परदेशातून अशा परिस्थितीत ती दोघं येऊ शकत होती. शेवटी या क्षणाला शकुंतला आपल्या जीवनाचे सिंहावलोकन करत होती. निभावलेली कर्तव्य अन् जबाबदाऱ्यांची गणितं मांडत होती. पण बाकी आता शून्य येत होती. सारिका तरी मदतीला किती दिवस येणार होती. त्यांनी काही का होईना सारीकाच्या जीवनाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. तिच्याहीकडून काही वर्ष यांना आधार मिळाला. तीही तिच्या मुलाच्या, कुटुंबाच्या जबाबदारीत गुंतली होती. तरीही ती जमेल तसे कर्तव्य पार पाडतच होती. विक्रमराव रिटायर झाले आणि शकुंतलाने ही नोकरी सोडली होती पण आता पुढे काय हा यक्ष प्रश्न पाठ सोडत नव्हता. आता या उतारवयात हातात भरपूर पैसा, अडका, सुख वाटावं अशा वस्तू होत्या पण नव्हतं ते फक्त सून आणि मुलाचं प्रेम. सरता दिवस काळजीत टाकत होता, मनाला घाबरवत होता पण पर्याय नव्हता. आपल्यापैकी कोणीही एक जण आधी गेला तर मागच्याचं काय हा यक्षप्रश्न होताच. शेवटी विचारांती वृद्धाश्रमाचा पर्याय दोघांनीही निवडला. आपला गरजेपुरता पैसा बँकेत नावावर ठेवायचा आणि बाकी सर्व पैसा त्यांनी अनाथाश्रमाला अन् वृध्दाश्रमाला दान करायचं असं ठरलं. या सर्व निर्णयाला संजीव व कुमुदचा विरोध झाला. आम्ही अधून मधून भारतात आलो तर कसे? तुमच्या सोबत आम्ही राहायचेच नाही का? आमच्या मुलांना आजी आजोबा नको का? अशा अनेक प्रश्नांना शकुंतलेने उत्तर दिलं नाही पण गेल्या सहा वर्षात दोघं किती वेळा भारतात आले? भारतात आले तरी कुमुदच्या माहेरी किती आणि आपल्याकडे किती दिवस राहिले हेही ती जाणतच होती. आज एवढा मोठा एनजीओप्लास्टीचा निर्णय घ्यायचा. शेवटी काय, आलेल्या परिस्थितीला सामोरे जावं लागणार होतं. मग कोणासाठी आणि का असं राहायचं? जीवनाच्या अंतिम क्षणांना चार माणसांसोबत सुख दुःख अनुभवत, वाटत जगणं केव्हाही चांगलं. हा विचार करून ते वृद्धाश्रमात गेले. त्यांनी आनंदी समाधानी राहायच्या त्यांच्या निर्णयाला वृद्धाश्रम निवडला. कोणी एक आधी गेला तर दुसऱ्याची काळजी थोडी कमी वाटेल हे ही खरेच होते. शेवटी माणसाला काय हवं असतं. चार शब्द प्रेमाचे अन् दोन अश्रू जवळीकतेचे. मायेनं कुणी पहावं अन् आधार हेच महत्त्वाचं. ते आता इथं काही प्रमाणात का होईना मिळणार म्हणून ती दोघं समाधानी होती.