
दुपारचे उन्हं चढायला लागलेलं होतं. मंदिराच्या जुन्या पायऱ्यांवर एक वयोवृद्ध पुरुष नेहमीप्रमाणे बसलेला होता. धोतर, अंगावर साध्या कपड्यातला अर्धा सदरा, आणि चेहऱ्यावर थकव्याचे पण शांततेचेही भाव. त्यांचं नाव होतं — सतीशराव .
मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांना ते परिचित होते. कोणी “रामराम” करायचं, कोणी गोड स्मित देऊन जायचं. पण त्यांच्याजवळ बसून चार शब्द जवळीकतेचे बोलायला कोणाला वेळ नव्हता. आपल्या लोकांनाच नव्हता तर परक्यांना कसा असेल?
नव्यानेच त्या गावात रहायला एक कुटुंब आलं होतं. दररोज दुपारी साडेबारा वाजता त्या घरातली अनन्या नावाची स्त्री घरातली कामं आटोपून देवाला यायची. साधे वस्त्र, डोक्यावर पदर, आणि डोळ्यात काहीतरी जाणून घेण्याची उत्सुकता.
“आजोबा, इतक्या उन्हात इथे बसता कशाला?” — ती रोज विचारायची.
सतीशराव हलकेच हसायचे. “कधी कधी घरातल्यांपेक्षा उन्हं बरी वाटतात गं.”
अनन्या थबकून जायची. ती खूप काही बोलू शकत नसे, पण त्या एका वाक्यात जी एक अनाम वेदना असे, ती तिच्या मनात घर करून बसली.
सतीशराव कधी काळी शिक्षण खात्यात कारकून होते. कडक शिस्तीचे, अभ्यासू, आणि अत्यंत प्रामाणिक. दोन मुलं, एक मुलगी, सर्वांना शिक्षण देऊन मोठं केलं. पत्नी गंगाबाई गेल्यानंतर त्यांनी स्वतःला घरातल्या जबाबदाऱ्या आणि नातवंडांमध्ये गुंतवून घेतलं.
पण काळाच्या ओघात खूप काही बदलत गेलं. एक मुलगा मनाप्रमाणे लग्न करुन मुंबईत वेगळा राहू लागला. त्याचे आणि सतीश रावांचे पटलेच नाही. दुसरा मुलगा आणि सून दोघे नोकरीला. दोघांच्याही आयुष्यात व्यस्तता, आपलीच एक वेगळी व्यवस्था. आजोबा जणू घरातले नसून एका कोपऱ्यातले शोपीस झाले होते. सतीश रावांना जुन्या आठवणी जाग्या झाल्या म्हणजे आपण व गंगाने घेतलेल्या खस्तांची आठवण होई. पण गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी. आपल्या लेकरा बाळांसाठी कित्येक सुवर्ण क्षणांना त्यांनी तिलांजली दिली होती.
विनित, आई-वडिलांसाठी खूप काही करू इच्छिणारा पण अनाथ. व्यावहारिक मर्यादांनी झगडणारा माणूस. अनन्याने त्याला सतीशरावांविषयी सांगितलं. तो ऐकून थांबला.
“त्यांचा नातू शिरिष आपल्या मुलाच्या अंशच्या शाळेत आहे. आपल्याला काही करता येईल का?” — अनन्याचा प्रश्न होता.
त्या दिवशी त्यांनी आजोबांशी थोडं मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न केला.
“तुमचा चष्मा तुटलाय का आजोबा?” — विनितने विचारलं.
“हो, दोन महिने झाले. दुरुस्तीला पैसे नव्हते. आता पेंशन येईल तेव्हा बघू.” — त्यांच्या आवाजात निसटता लाजरेपणा होता.
विनित गप्प झाला. दुसऱ्याच दिवशी त्याने नवीन चष्मा आणून दिला.
“हे घ्या, आजोबा.”
तेव्हा सतीशराव पहिल्यांदा डोळे मिटले आणि डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
एक दिवस अंश मंदिरात आजोबांबरोबर बसलेला दिसला. दोघे एकत्र हसत होते.
“तुम्ही खूप चांगल्या कविता करता,” अंश म्हणाला. “शाळेत मी तुमचं नाव सांगितलं.”
“कविता? तू ऐकतोस?” — सतीशरावांनी थक्क होऊन विचारलं.
“हो, मम्मा म्हणते तुम्ही खूप हुशार आहात. माझं प्रोजेक्ट तुम्हीच करणार!” — त्याच्या डोळ्यांत कौतुक होतं.
तेव्हाच सतीशरावांनी डोळे मिटले. पायरीवर उन्हं होतं, पण आता त्यांना सावली लाभली होती — आपलेपणाची.
पैशाची कमी कधीही भरून निघेल पण नात्यांचा आसरा आयुष्य सुधरवतो. आयुष्यात जगण्याचे कारण बनतो.