
शुभदा आज सकाळच्या कोवळ्या उन्हात गच्चीमध्ये बसल्याबसल्या दूरवर पहात कुठेतरी हरवून गेली होती. तिला तिचा भूतकाळ आठवत होता.
शुभदा साताऱ्यातील एका लहानशा गावात लहानाची मोठी झाली. घर म्हणजे दोन खोलींचं मातीचं घर, आजोबा, आई-बाबा आणि दोन लहान भाऊ. घरात पैसे कमी, पण माणुसकी आणि प्रेम मात्र भरपूर. तिच्या आईने तिच्या नावाप्रमाणेच तिच्या स्वभावातही सौम्यता आणि सडेतोडपणा रुजवला होता.
शाळा गावातलीच. शुभदाला अभ्यासात गोडी होती. दिवसभर शेतीत आईला मदत आणि रात्री मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास. तिला वाटायचं – “माझं आयुष्य हे पाटील काकांच्या पोरीसारखं का नाही? पण मी शिकेन, मोठी होईन आणि आपलं आयुष्य बदलेन.” तिचं हे स्वप्न होतं… तिला आई-बाबांना मोठ्या घरात घेऊन जायचं.
तिच्या जिद्द आणि चिकाटी मुळे तिचा दहावीला पहिला नंबर आला. पण पुढे काय? बाबांनी सांगितलं, “आपण तुझ्या शिक्षणासाठी काहीही करू, पण तुला पुढील शिक्षणासाठी पुण्याला जावं लागेल.”
पुण्यात आल्यावर शिक्षण म्हणजे एक नवीन संघर्ष आहे असं तिला जाणवलं. हॉस्टेलचे पैसे, मेसची फी, दैनंदिन गरजा हे सगळं काटकसरीतून करावं लागणार होतं आणि तिने ते केलंही. आजचा संघर्ष उद्याचे सोनेरी क्षण देईलच यांची तिला खात्री होती. पण यासाठी तिला काहीतरी खटपट करावी लागणार होती. अर्थातच तिला छोटे-मोठे काम शोधावे लागणार होते पण शहरात कुठेही ओळख नव्हती. त्यांच्या हॉस्टेलमधील मावशींच्या मदतीने तिने घरी न सांगता एका शिक्षिकेच्या घरी तिच्या बाळाला दिवसातील चार तास संभाळण्याचे काम घेतले. हे काम तिच्या कॉलेजची वेळं सोडून असल्यामुळे तिला ते शक्य होतं. तिला काम मिळालं, तिथून महिन्याला थोडे पैसे मिळत. कॉलेजमध्ये ती नेहमी पहिल्या रांगेत बसायची, पण पाठीमागे सहपाठी कुजबुजायचे,
“ही त्या कामवाल्या मुलीसारखी दिसते.”
ती गप्पच राहायची. तिला कोणी बोलल्यावर वाईट वाटत होते परंतु ती ते मनावर घेत नव्हती.अभ्यासाला महत्त्व देत होती. कोण काय म्हणते याकडे ती कधीही लक्ष देत नव्हती. तिच्या डोळ्यात फक्त उद्याचे स्वप्न आणि आपल्या आई वडिलांना सक्षमपणे आधार देण्याची गरज तिने जाणली होती. तिला डॉक्टर, इंजिनियर व्हावे वाटत होते. परंतु पैशाची अडचण पाहता तिने डीएड करायचे ठरवले. आजच्या महागाईच्या जगात तिला त्यासाठी सुद्धा खूप कष्ट करावे लागणार होते पण ती ते करणार होती. तिने आपल्या अभ्यासाच्या जोरावर डीएडला प्रवेश मिळवला.
दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर शुभदाची सरकारी शाळेत शिक्षक म्हणून निवड झाली. तिने तिच्या बाबांना एक फोन केला, “बाबा, मी नोकरीला लागले! आता आपल्याला सिमेंटचं घर बांधता येईल.” शाळेच्या पहिल्याच दिवशी तिने काळ्या फळ्यावर,
“कोणतीही गोष्ट जिद्द व चिकाटी असेल तर अशक्य नाही.” हे वाक्य लिहिलं आणि शिकवायला सुरुवात केली. तिने घरी पैसे पाठवायला सुरुवात केली. भावांचं शिक्षण, आईच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया आणि बऱ्याच गोष्टी. सगळं एका मागून एक तिनं सांभाळलं. ती समाधानी होती.
काही दिवसांनी तिच्या आई-बाबांनी तिला लग्न करण्याचा सल्ला दिला, तरी तिने बरेच दिवस आपल्या आई-वडिलांना सुखाचे दिवस दाखवण्यासाठी लग्नाचे कार्य पुढे ढकलले. तरीही शेवटी न टाळता येणारी गोष्ट म्हणून तिने होकार दिला. तिचं लग्न अमोलशी ठरलं. तोही शिक्षक, पण शहरी वातावरणात व सुख सोयीने युक्त घरात वाढलेला. तिला तो खूप बोलका, विचारशील आहे हे जाणवलं.
“आपण दोघं मिळून आयुष्य सुंदर करू,” असं तो तिला म्हणाला.
लग्न छान झाले सगळे कार्यक्रम आनंदात पार पडले, सगळे आनंदी होते. काही महिने चांगले गेले. ते दोघे एकत्र शाळेत जायचे, एकत्र परत यायचे. दुपारी दोघं मिळून जेवण बनवत. शुभदाला तर स्वर्ग जाऊन बोटचं उरला होता. ती म्हणायची,
“हेच का ते सुखी संसाराचं चित्र?”
काही महिन्यांतच सासू-सासऱ्यांनी बोलायला सुरुवात केली. ते गावाकडे जरी राहत होते, तरी त्यांचे विचार अमोल च्या माध्यमातून तिला लक्षात येत होते.
“शुभदाला तर खूप पगार, पण घरात काहीच खर्च करत नाही.” “नुसती शिकलेली आहे म्हणून माज आहे हिच्यात,” सासूबाई म्हणायच्या.
शुभदाने सुरुवातीला दुर्लक्ष केलं. घरखर्चासाठी नियमित पैसे द्यायला सुरुवात केली. पण त्यांना समाधान कधीच नव्हतं.
एक दिवस तिच्या सासरे म्हणाले,
“तुझ्या आई-बापांना किती पैसे पाठवणार आहेस? लोक हुंडा घेऊन लग्न करतात आम्ही तर हुंडाही घेतला नाही पण उलट दर महिन्याला तू कमवतेस त्यातला काही भाग तिकडे पाठवतेस. आता इथे लक्ष दे.”
ते तिला टोचलं. पण अमोल शांत राहायचा. तिच्या बाजूने कधी तो बोललाच नाही.
आई-वडील आता म्हातारे झाले होते. वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. तसंही तिचे वडील मुलीकडून पैसे घ्यायचे कसेतरी वाटतात म्हणून नको म्हणत असत. पण शुभदा तिच्या लहानपणापासून आतापर्यंतच्या शिक्षणासाठी आई-वडीलांनी घेतलेल्या खस्ता आठवत असे. तिला असे वाटत असे की आपलेही काही कर्तव्य आहे की नाही? तिचा लहान भाऊ अजूनही शिक्षण घेत होता. शुभदाने त्याचा सगळा खर्च उचलला. तिच्या पगाराचा काही भाग माहेरी जायचा आणि उरलेला सासरी.
सासरच्या लोकांना याचा राग यायचा.
“सासरी आलेली सून, पण लेक म्हणून अजून माहेरीच गुंतलेली आहे.,” असं ते म्हणायचे. शुभदा या वाक्यामुळे खूप वेळा रडली. अमोलकडे तक्रारही केली, पण त्याने नेहमीच तटस्थ भूमिका घेतली “आई-बाबा आहेत, त्यांना काय वाटेल ते बोलतात. तू मनावर घेत जाऊ नकोस. ते जरी बोलत असतील तरीही त्यांचं मनापासून तुझ्यावर माया आहे.”
एकदा शाळेत एका विद्यार्थिनीच्या निबंधात तिला एक ओळ सापडली.
“माझी आई म्हणजे माझं धैर्य आहे.”
शुभदा अंतर्मुख झाली.
“मी दुसऱ्यांच्या सगळ्या अपेक्षा पेलते आहे. पण माझं स्वतःचं काय?”
तिने स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात केली. मनातील अव्यक्त भावना कुठेतरी व्यक्त करणं महत्त्वाचं होतं आई-वडिलांना काही सांगितलं तर ते चिंतेत पडतील व आपल्या धास्तीने त्यांना काही वेगळं व्हायला नको म्हणून ती मनाच्या खोल कप्प्यातले विचार कवितेत उतरवू लागली. यासाठी ती इतरांच्या कवितांचं वाचन करू लागली. अधूनमधून मनात निर्मित झालेल्या अनेक क्षणांना ती कागदावर शब्द रूप देऊ लागली.लिहिणं तिचा छंद झाला होता. हळूहळू तिची कविता एका मासिकात छापून आली. तिच्या कवितेचं नाव होतं.
” ओंजळीतून वाहणारं पाणी.”
तिचे साहित्य वाचून तिला पत्र येऊ लागली. तिच्या कवितांनी अनेक स्त्रियांना एक सक्षम, आपलासा आवाज दिला होता.
शाळेतही तिचे कर्तव्य व्यवस्थित चालले होते कोणतीही घेतलेली जबाबदारी ती चोखपणे बजावत होती. शाळेतील तिच्या कामगिरीसाठी तिला जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला. सगळ्यांनी अभिनंदन केलं. पण सासरच्या लोकांना याचा अभिमान वाटायचा सोडून त्यांना फक्त असूया वाटली. तिला त्याचा अनुभव येतच होता. ती बाहेर एखाद्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून गेली असली किंवा निमंत्रित म्हणून कविता वाचन करण्यासाठी गेली तरी पण घरी आल्यावर मात्र ती फक्त आणि फक्त एक बायको आणि सून एवढ्याच भूमिकेत असे. तिला त्याच भूमिकेमध्ये बघणे तिच्या घरच्यांना आवडत होते. त्यामुळे मोठ्या बक्षीस समारंभा नंतर घरात जाताना ती अभिमानाने न जाता आपल्याला बाहेर खूप वेळ लागला या वेगळ्याच अपराधी भावनेने घरात प्रवेश करत असे आणि तिच्या घरातले ही तिला त्याच पद्धतीने वागवत होते.
अलीकडे अमोलही थोडा अबोल झाला होता. कधी गावाकडे गेल्यावर जर काही कुरबुर झाली तर त्याला ती आवडत नसे.
“तू आता फार मोठी झालीस का?” असा प्रश्न तो तिला विचारू लागला होता.
शुभदाला या गोष्टीचा मानसिक ताण जाणवू लागला. पण तिनं स्वतःला खचू दिलं नाही. तिनं एक छोटा गट तयार केला – “सोनेरी आयुष्य” त्यात शाळेतील महिला शिक्षिका, काही विद्यार्थी.
तिने या गटावर ‘आई-बाबा यांना आधार मिळावा यासाठी मुलांनी किंवा मुलींनी घ्यावयाची काळजी आणि कर्तव्य’ या विषयावर चर्चासत्र, मार्गदर्शन, मदत योजना चालू केली.
एक दिवस तिच्या आईचं अचानक निधन झालं. शुभदा कोसळली. तिला वाटलं, आता सगळं संपलं. पण आईने शेवटच्या पत्रात लिहिलं होतं – “शुभु, तू आमचं स्वप्न आहेस. पण आता स्वतःसाठी जग. तुझ्या पंखांना मोकळं आकाश हवं आहे. तू किती दिवस कर्तव्यात गुरफटून जाणार आहेस.”
ते वाचून ती उभी राहिली. अमोलशी स्पष्टपणे बोलली – “मी सासरी आहे, माहेरीही आहे. पण सगळ्यात आधी मी ‘मी’ आहे. जोपर्यंत तुला माझं अस्तित्व स्विकारायचं नसेल, तोपर्यंत आपलं सहजीवन अधुरंच राहील.”
काही का असेना पण हळूहळू अमोलही बदलू लागला. त्याने तिच्या कार्यक्रमांना यायला सुरुवात केली, सासरचे लोकही तिला थोडं समजून घेऊ लागले. सर्वसाधारण नाही, पण थोडं थोडं का होईना ते पाठिंबा देऊ लागले.
आज शुभदा तालुक्यात एक उत्कृष्ट शिक्षिका म्हणून ओळखली जाऊ लागली. तिच्या कविता शैक्षणिक नियतकालिकांमध्ये छापल्या जाऊ लागल्या. तिच्या भावाने वडील व बहिणीच्या सहाय्याने एमबीबीएस पूर्ण केले. बाबा आता त्याच्याजवळ राहतात.
सासरशीही तिने नव्याने नातं जोडायला सुरुवात केली. तिला अजूनही अडचणी येतातच पण आता तिला स्वतःची ओळख सापडली आहे.
ती म्हणते, “अडचणी हे जीवनाचं वास्तव आहे. पण त्यातूनही आपल्याला आपलं स्वप्नं जपता आलं पाहिजे. ते नुसते जपायचे नाही तर ते सत्यात उतरवायचा प्रयत्न करायचा, तरच आयुष्याचं संगीत खरंच मधुर होतं.”