नागपंचमी आटपाट नगरातली

आटपाट नगरात एक वेळ होती, जेव्हा नागपंचमीचा सण सगळे मिळून मोठ्या उत्साहात साजरा करत. शेतात वारुळाभोवती  रांगोळी. नाही जमलं शेतात जायला तर घराच्या अंगणात ‌पाटांवर नागदेवतेचं पूजन, दूध, लाह्या, दुर्वा, फुलं… आणि महत्त्वाचं म्हणजे, निसर्गाशी जोडलेलं श्रद्धेचं नातं.

पण आता, गोष्ट आहे या बदललेल्या आटपाट नगराची.

नीला ही एक हुशार, स्मार्ट सॉफ्टवेअर इंजिनीयर. ती मुंबईतल्या एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करते. लहानपणी तिने आजीकडून खूप गोष्टी ऐकल्या होत्या.  नागपंचमीच्या, निसर्गाच्या, सर्पांच्या आणि माणसांमधल्या नात्यांच्या.

पण गेल्या काही वर्षांत, ती सणांना ‘मॅन्युअल वर्क’  म्हणजे शारीरिक श्रम करून केलेले काम. यात यंत्रांपेक्षा मानवी हातांची मेहनत अधिक असते. किंवा ‘मिथ’ म्हणजेच कल्पित गोष्टी किंवा अख्यायिका म्हणायला लागली होती. तिच्या सोसायटीत आता नागपंचमीला ना कुठे पूजा, ना गोडधोड. उलट तिला हे सगळं ‘गावंढळ’ वाटायचं.

नीलाचं आयुष्य स्क्रीनवर फिरत होतं. ऑफिस, मेट्रो,  जिम, ऑर्डर केलेलं जेवण, नेटफ्लिक्स आणि या सर्वांमुळे निद्रानाश.

एक दिवस तिला अचानक आजीचा मोबाईलवर एक मेसेज आला.

“बाळा, नागपंचमीला गावी येतेस का? आपल्या देवळात नव्या पिढीसाठी विशेष कार्यक्रम आहे.  एक सर्पतज्ज्ञ येणार आहेत!”

नीला हसली – “आजी, हे सगळं आता कोण करतं? साप म्हणजे धोका, निसर्ग म्हणजे सध्या माझ्यासाठी महत्वाचा नाही. माझं काम म्हणजे माझं सत्य. 

 पण शेवटी आज्जीने बोलावलं. जायला तर पाहिजे. आज्जी म्हणजे मायेचा महासागर होती. आठवणी दाटून आल्या आणि तिच्या डोळ्यांपुढे एक जुनी आठवण उभी राहिली. लहानपणी आजीच्या सोबत नागपंचमीच्या दिवशी गायीचं दूध घेऊन ती वारुळाजवळ गेली होती. आजी म्हणाली होती,

“सापाला मारू नको, बाळा. तो रक्षक असतो. पृथ्वीच्या संतुलनासाठी त्याची भूमिका मोठी असते.”

तिचं मन गावाकडच्या आठवणींनी भारावल्याने तिने गावी जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने अचानक आजीला फोन लावला –

“आजी, मी येतेय. नागपंचमीला गावी.”

गावी आल्यावर तिला एक वेगळाच अनुभव आला. गावात सणाचा जल्लोष होता, पण आधुनिक पद्धतीने. सर्पतज्ज्ञाने एक माहिती सत्र घेतलं.

“नागपंचमी ही सर्पांची उपासना नव्हे, तर निसर्गाशी समरस होण्याचा सण आहे. कागदावरच्या किंवा प्लास्टिकच्या नागांना दूध घालणं व्यर्थ आहे. पण सर्पांचा नैसर्गिक अधिवास वाचवणं हिच  खरी पूजा आहे.”

नीलाचं मन सुन्न झालं. तिला समजलं. आपण शहरात राहून निसर्गालाच दूर केलंय. मानवानं आधुनिकतेच्या नावाखाली सगळी झाडांची जंगलं तोडून सिमेंटची जंगलं वसवली.

मागच्या वर्षी जी नीला नागपंचमीला ‘बुरसटलेली परंपरा’ म्हणत होती, ती यावर्षी आपल्या सोसायटीमध्ये ‘निसर्ग संवर्धन सप्ताह’ घेऊन आली. तिने एक छोटी माहितीपर फिल्म बनवली.

 “सर्प आपला मित्र करी  निसर्गाचे रक्षण ”.

मोबाईलच्या स्क्रीनमधून थेट मातीत उतरून नीलाने आपल्या आधुनिक जीवनशैलीला निसर्गाशी जोडलेलं एक नवं परिमाण दिलं.

नागपंचमी म्हणजे केवळ सण नव्हे. ती निसर्गाशी असलेली नाळ जागवण्याची एक संधी आहे.

आपण जर निसर्गाकडे पाठ फिरवली, तर एक दिवस निसर्ग आपल्याला विसरेल म्हणजेच त्याचं आपलं नातं विसरेल आणि अशा वागण्याने नाश करेल.

नीलासारखी अनेक माणसं आता हे समजू लागली आहेत… आणि म्हणूनच, आटपाट नगर पुन्हा शुद्ध हवेने श्वास घेऊ लागलं आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!