
“दादा! यंदा राखीला तू गावी येशील ना?” – स्वरा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फोनवरुन विचारत होती.
मुंबईत मोठ्या कंपनीत नोकरी करत असलेला साहिल, तिचा मोठा भाऊ, गेल्या तीन वर्षांपासून राखीच्या दिवशी घरी येऊ शकला नव्हता.
“अगं हो बघतो गं, मी प्रयत्न करतो!”
तो नेहमीसारखंच उत्तर देई.
स्वरा आणि साहिल हे पाटील कुटुंबातले दोनच भावंड. वडिलांचं लवकर निधन झाल्यामुळे साहिलने कॉलेजपासूनच जबाबदारी स्वीकारली होती. आईला मानसिक आधार देत, बहिणीला शिकवत, तो मोठा झाला होता.
स्वरासाठी राखी म्हणजे केवळ एक सण नव्हे, तर तिच्या दादाच्या आठवणींचं, त्याच्या मायेचं, आणि संरक्षणाच्या वचनाचं प्रतीक होतं.
मुंबईच्या गर्दीत, ऑफिसच्या मीटिंगमध्ये अडकलेला साहिल तसं खरं तर विसरलेला नव्हता. पण वेळेचं गणित जमत नव्हतं.
आदल्या दिवशी ऑफिसमधून परत येताच त्याला आईचा व्हिडिओ कॉल आला. स्वरानं त्याच्यासाठी राखीची सर्व तयारी केलेली, आणि घराच्या देवघरात तो यावा म्हणून, ती मनोभावे प्रार्थना करत होती.
आई म्हणाली, “ती म्हणते, ‘दादाला काम आहे म्हणून तो आला नाही तरी चालेल, पण त्याचं पत्र तरी असावं’…”
साहिल क्षणभर गप्प झाला.
त्याच रात्री साहिलनं एक मिटिंग झाल्यावर आपल्या लॅपटॉपवर एक पत्र लिहायला सुरुवात केली. खरंतर पत्र लिहिताना त्याला काय लिहू नी काय नको असे झाले होते.
शब्दांचा अफाट सागर होता. भावनांच्या लाटा कर्तव्याच्या दगडावर आदळत होत्या. आणि त्यातून प्रेमाचे तुषार सिंचन होतं होतं.
“स्वरा,
राखीचं वचन मी शब्दांतच देतोय यंदा. पण मनानं मी तुझ्याजवळच आहे. तुझं हसणं, शिकणं, तुझं नी स्वतःचं आयुष्य उभं करणं – ह्यांचं संरक्षण मी करत राहीन.
तुझ्या प्रत्येक यशात माझा आशीर्वाद असेल, तुझ्या प्रत्येक संकटात माझा खांदा असेल. सुख दुःखात मी बरोबरीने साथ देईन. सुखाचे दिवस देण्याचा प्रयत्न करेन आणि दुःखात तर सावली बनून संरक्षण करेन. मी तुझ्या पाठीशी आहे.
– तुझा दादा.”
त्यानं ते पत्र लाहिलं, लिफाफ्यात टाकलं, छानश्या भेटवस्तू सोबत ते पत्र पाठवलं.
राखीच्या दिवशी सकाळी स्वरा आणि आईनं दार उघडलं तर कुरिअरवाल्यानं एक बॉक्स दिला. स्वरानं आनंदाने ते उघडलं.
“दादा!” – तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. तिचा दादा नव्हता तरीही तिच्या मनात भावनांचा पूर होता.
ती लिफाफा हृदयाशी लावून म्हणाली, “आई, दादा आलाय ना… ह्या शब्दांतून!”
संध्याकाळी एक दुचाकी घरासमोर थांबली. हेल्मेट काढून हसणारा चेहरा तिला दिसला – दादा!
“तुला आश्चर्यचकीत करायचं ठरवलं होतं गं! पत्र आधी पाठवलं, पण मी स्वतः पण आलो!”
स्वरा धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडली. तिने ओवाळलं. राखी बांधताना स्वराचं एकच वाक्य होतं –
“धागा जरी कधी तुटेल , मात्र भावना तुटू देऊ नकोस. आज मला तुझे प्रेम मिळतंच आहे! भविष्यातही मिळेलच. कधी कुठल्याही परिस्थितीत दुरावा येणार नाही याची काळजी मी ही घेईन आणि तू पण घे. पैसा, अडचणी, संकटं येतील आणि जातील. आपलं नातं जन्मांतापर्यंत अखंड ठेवण्याचा आपण प्रयत्न करु”
तिचा दादा तिला म्हणाला,
“राखी म्हणजे केवळ धागा नव्हे – ती आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आणि जबाबदारीची गाठ आहे. अंतरं असूनही, भावभावनांचा धागा कायम जुळतच राहतोय आणि जुळतंच राहील.
आई हे सारं पाहत होती. तिची दोन बछडी आपापसात कशी बोलतायेत. एकमेकांवर किती जिवापाड प्रेम करताहेत. हे पाहून तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते.
राखीला नाही तरी शेवटी बहिणींना काय हवं असतं. केवळ भावाचा आश्वासक प्रेमळ आधार.