
राधिकाने आज कामात चांगलीच गती घेतली होती. मुलाचा, नातवाचा डबा भरून झाला. मशीनला कपडे लावूनही बराच वेळ झाला होता. आता मशीन मधले कपडे काढून वाळू घातले की झालं. स्वयंपाक घरही आवरून पुसून चकाचक झाले होते. तिची नजर सहजच घड्याळाकडे गेली. तिला गंमतच वाटली. आज चक्क नेहमीच्या वेळेपेक्षा पंचवीस तीस मिनिटं काम आधीच झालं होतं. तिला अकरा वाजता गावाला जायचं होतं. तिच्या माहेरी नागपूरला जायचं म्हणून तिचा उत्साह वागण्यातून जाणवत होता. शेवटी स्त्रीचे वय कितीही झालं तरी माहेर या शब्दाला आणि त्या शब्दाप्रती असणाऱ्या भावनांना स्त्रिया मनाच्या गाभाऱ्यात जपतात. या मनाच्या गाभाऱ्यातील या भावना त्यांना सुखावत असतात.
राधिकाचेही आता नाही म्हटले तरी पन्नास वय सुरू होते. नुकतेच तिने एका शाळेतून मुदतपूर्व रिटायरमेंट घेतली होती. आयुष्यभर भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व देणारी राधिका आयुष्याच्या या टप्प्यात स्वतःला नशीबवान समजत होती. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा मोठा तर मुलगी छोटी. रुपा आठ- नऊ वर्षाची आणि शार्विल तेरा वर्षाचा असतानाच एका अपघातात तिचे पती गेले. तेव्हापासून तिने पडलेल्या प्रत्येक जबाबदारीचा मनापासून स्वीकार केला, नव्हे तिला दुसरा पर्याय नव्हता. तिनेही सासरी राहूनच पुढील आयुष्य व्यतीत करायचे ठरवले. सासरी ही सासूबाई एक दिर, जाऊ आणि त्यांची दोन मुलं होती. ननंद बाई दिल्या घरी सुखी समाधानी होत्या. सासुबाईंनी राधिकाला मुलगीच मानले होते. म्हणूनच की काय सत्यजित गेल्यानंतर त्यांनी तिच्यापुढे पुनर्विवाहाचा प्रस्ताव ठेवला. मात्र राधिकाचे मन मानायला तयार नव्हतेच. सत्यजित म्हणजे जणू तिचा श्वास, ध्यास होते. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला ती आपल्या प्रिय व्यक्तीच्या ठिकाणी पाहू शकणार नव्हती.
दिवस आता जणू कासवाच्या गतीने जात आहेत, असं तिला वाटत होतं. रंगीबेरंगी भासणाऱ्या जगावर दुःखाचा काळा रंग उतरला आहे असं तिला वाटत होतं. पाहता पाहता दोन महिने झाले तरी तिला अजूनही सत्यजितचं अस्तित्व भासत होतं. तिला त्यांच्याशिवाय जगणं कठीण भासत होतं. तिची स्थिती पाहता घरच्या लोकांनी ही तिच्या पुनर्विवाहाचा प्रस्ताव ठेवला पण राधिका आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिने आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. सत्यजितच्या स्मृती मनाच्या खोल कप्प्यात तिने जपून ठेवल्या होत्या. त्या स्मृतीच तिच्या जीवनात जीवनांतापर्यंत तिला साथ आणि प्रेरणा देणार होत्या. सत्यजितने तिच्या आयुष्यात व्यापलेली जागा तो नसल्याने काहीशी रिती झाली होती परंतु आपल्या दोन पिल्लांना आई- बाबा या दोन्ही भूमिकेतून प्रेम, माया देताना ती थोडीफार तरी भरली जात होती. तिने बिएड चा कोर्स पूर्ण केला आणि काही वर्षातच तिला नोकरी लागली. ती शाळेतही विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून ओळखली जात होती. आपल्या शार्विल आणि रूपालाच ती विद्यार्थ्यांमध्ये पाहत होती. शाळेत मुख्याध्यापकांनी एकदा शिक्षक मिटिंगमध्ये सर्वांना प्रश्न विचारला,
‘ज्ञानदानाचे पवित्र कार्य पार पाडत असताना आपल्या हातून भ्रष्टाचार होऊ शकतो का?’ यावर तिने उत्तर दिले,
‘बाई शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचार होणं शक्य नाही. तोही शाळेत तर अशक्यच पण मला एक वाटतं मुलांना आपण अध्यापन करत असताना जर कसूर केली तर तो भ्रष्टाचार म्हणता येईल.’
यावर मुख्याध्यापकांनी ‘ते कसं काय?’ असा प्रश्न विचारला असता ती उत्तरली,
‘समजा वर्गात अध्यापनाच्या वेळी आपण आपली वैयक्तिक कामं करत असू तर तो झाला वेळेचा भ्रष्टाचार, जर आपण दोन विद्यार्थ्यांमध्ये कुशाग्र किंवा कमी बुध्दीचा असा ग्रह निर्माण करत असू, हा श्रीमंत किंवा तो गरीब, हा आपल्या जातीचा किंवा पर जातीचा, सुंदर किंवा कुरूप असा भेदभाव करत असू तर तोही भावनेचा भ्रष्टाचारच म्हणायला हवा.’
तिच्या या उत्तरामुळे बाईंचं समाधान तर झालंच पण तेव्हापासून त्यांचं सारखं राधिकाच्या अध्यापन व इतर क्रियांवर लक्ष राहू लागलं. तिची वागण्याची शिकवण्याची सचोटी आणि जिज्ञासू वृत्ती यामुळे ती शिक्षकांमध्येही साऱ्यांचीच आदर्श होती. शार्विलच्या लग्नानंतर त्याच्या बायकोला शर्वरीला तिने हौसेने नोकरी करण्याची परवानगी दिली. नुसती परवानगीच नाही तर मी तुला हवी ती मदत करायला तयार आहे असेही सांगितलं होतं. शर्वरीही कंपनीत अवघ्या काही वर्षात प्रमोशन मिळवून मॅनेजर झाली. एक मुलगा झाला विराज. तोही आजीचा चांगलाच लाडका होता. खरंतर विराजला आई पेक्षा आजीचा सहवास चांगला वाटायचा. शर्वरी आणि शार्विल ऑफिसच्या आणि घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे चिडचिड करत असत. राधिकांने स्वतः नोकरी केल्यामुळे तिला हे सारं माहीत होतं.
एकदा राधिका नागपूरला खास जुन्या मित्र- मैत्रिणींना भेटायला निघाली होती. त्यांच्या कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींनी एकत्र यायचं ठरवलं होतं. मोबाईलवर व्हाट्सअप ग्रुपच्या सहाय्याने पुन्हा एकदा जुन्या मित्र-मैत्रिणींची नव्याने ओळख होऊ लागली होती. कोण कुठे असतो? कोण काय करतो? कोणाला किती मुले मुली? यापासून सध्या ती काय करते? किंवा सध्या तो काय करतो? या प्रश्नांपर्यंत सारे पोहोचले होते. तसं पाहता अगदी थोडेजनच सध्या एकटे होते. बाकी सध्या सारे सेकंड इनिंगची मजा लुटत होते. राधिकाला अलीकडे मित्र-मैत्रिणींमुळे एक वेगळाच ताजेपणा जाणवत होता. आज तर तिला नागपूरला जाण्यासाठी गाडीत बसल्यापासून तिच्या मनात आठवणींनी फेर धरला होता. आठवणींच्या सोनेरी झुल्या वर बसून ती छान हिंदोळे घेत होती. अधून मधून घरून, तर कधी नागपूरहून भाऊ भावजयीचा, तर एखादं दुसरा मित्र- मैत्रिणींचा फोन येत होता. तिला शाळेतील कॉलेजचा पहिला दिवस आठवला. आपल्याला कॉलेज जीवनाची ओढ, भीती, उत्सुकता किती होती? हे आठवलं आणि ती गालातल्या गालात हसली. आपण हसलो हे कोणी पाहिलं नाही ना? म्हणून तिने आसपास नजर फिरवली. तर हे काय आपल्याकडे टक लावून ही व्यक्ती का पाहते?, की आपल्याला भास होतोय म्हणून तिने नजर दुसरीकडे फिरवून परत हळूच चोरट्या नजरेने तिकडे पाहिले. तर काय ती व्यक्ती आताही टक लावून पाहत होती. या वयातही तिला हे असं कोणीतरी आपल्याकडे पाहणं पटलं नाही. तिच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर जावून तिथे आता उदासीनतेचे भाव प्रकटले. त्या व्यक्तीच्या ही ते लक्षात आले असावे. त्यांनी आपली नजर दुसरीकडे वळवली. राधिकाने उगाचच तोंडावरून रुमाल फिरवला. काही वेळाने गाडी जेवणासाठी थांबली तेव्हा मात्र ती ज्या टेबलवर बसली, तिथेच ती व्यक्ती समोर येऊन बसली. आता मात्र इतका वेळ बाळगलेला संयम कुठल्या कुठे गेला. आता ती त्याला चांगलंच काहीतरी सुनवण्यासाठी तोंड उघडणार, एवढ्यात तीच व्यक्ती म्हणाली, ‘राधा, तू मला नाही ओळखलं?’
आणि काय आश्चर्य राधाने पटकन त्याला हस्तांदोलन केलं. ओळखलं नाही म्हणून क्षमाही मागितली. कॉलेजमध्ये वर्गमित्र असलेला मुकुंदा आज तिला ओळखू कसा आला नाही? म्हणून नवल वाटण्यासारखे विशेष असे काही तिला वाटले नाही. मुकुंदा कॉलेज जीवनात खूप हुशार होतकरू होता. त्याचं दिसणं अन् असणं यावर खूप मुली फिदा होत्या. मात्र मुकुंदा अभ्यास एके अभ्यास या तत्त्वाचा होता. तरी एकदा प्रॅक्टिकलला शेजारी उभारलेल्या राधिकाला चक्कर आल्यावर त्यानेच तिच्या तोंडावर पाणी मारले आणि आधार देत उठवले. राधिकाला त्याचे आभार मानावे एवढेही भान नव्हते. पण जेव्हा तिच्या मैत्रिणींनी तिला जाणीव करून दिली तेव्हा चार-पाच दिवसांनी तिने घाबरत लाजत त्याचे आभार मानले. गंमत म्हणजे तेव्हापासून ते एकमेकांना काही ना काही कारणामुळे भेटू लागले आणि बोलूही लागले. राधिकाला कॉलेजमध्ये राधा म्हणणारा फक्त मुकुंदाच. पाहता पाहता दिवस जात होते. मुकुंदा किंवा राधाही मैत्रीच्या पुढे कधी गेलेच नाहीत. पण ज्या दिवशी राधाने आपल्या लग्नाची पत्रिका दिली तेव्हा मात्र मुकुंदा नाराज झाला. पण एकही शब्द बोलला नाही. राधेलाही पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगून गेले. पण उशीर खूप झाला होता त्या दिवसानंतर तिला मुकुंदा कधी दिसलाच नाही. राधेला मात्र एक वेगळीच अपराधीपणाची भावना जाणवत होती. लग्नालाही बाकी मित्र-मैत्रिणी आले पण मुकुंदा आलाच नाही त्या दिवसानंतर आज त्याला पाहून राधेला या वयातही आपण चुकलेल्या दिवसाबद्दल आणि गमावलेल्या क्षणांबद्दल वाईट वाटले पण आता कोणत्याच गोष्टीला काहीच अर्थ उरला नव्हता. कारण आता त्या भावना उरलेल्या नव्हत्या. तिने त्याची चौकशी केली असता त्यालाही दोन मुली असून त्या दिल्या घरी सुखी असल्याचे कळाले. त्याची बायको आणि तो असे दोघे घरात असतात. तिलाही प्यारालीसीसचा अटॅक येऊन गेल्याने ती अंथरुणातच पडून असल्याचे कळाले. त्याची बायको आणि तो एवढेच त्यांचे विश्व. हे सारं ऐकल्यावर तिला खूप वाईट वाटले. ती त्याला शाब्दिक आधार देऊ शकत होती आणि तिने तेच केले. नागपूरला बस थांबली तेव्हा दोघेही आपापल्या घरी गेले. आराम करून दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या गेट-टुगेदरला दोघे भेटणार होते. संथ अशा पाण्यात कोणीतरी दगड मारून पाण्यात अचानक उठणाऱ्या तरंगामुळे पाण्यातील जीवांची होणारी धडपड धांदल घाबरगुंडी असंच काहीसं राधा आणि मुकुंदाच्या मनात आलं होतं आणि झालंही होतं. रात्री आराम करण्यासाठी झोपल्यावर राधेच्या डोळ्यासमोरून पूर्वीचा आणि आताचा मुकुंदा दिसत होता. राधेला पहाटे पहाटे केव्हातरी झोप लागली. सकाळी सात वाजता तिच्या वहिनीने हाक मारली. तुम्हाला जायचं आहे ना कॉलेजला? या वाक्याने तिला माहेरच्या त्या पूर्वापार घरातही क्षणभर सुख, समाधान जाणवले. तिच्या स्वतः त्या घरात सात वाजेपर्यंत झोपायचं म्हणजे खूपच मुश्किल. घरातल्या सर्वांचं जिथल्या तिथं करायचं म्हणजे तिला सध्या पहाटेच उठावे लागत होतं. राधिकाला तयार झालेले पाहून शमिका म्हणालीच,
‘क्या बात है वन्स, आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है।‘
तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच राधा बोललीच, ‘अगं आम्ही मित्र-मैत्रिणींनी ठरवले आहे. आपण पूर्वी कसे राहत होतो तसंच आज कॉलेजमध्ये यायचं.’ दादाही तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होता. त्यालाही हे पाहून असं वाटलं, सत्यजित गेल्यापासून तिचं स्वतःकडे असे लक्ष नव्हतेच ना! तिने नाष्टा केला अन दोघांचा निरोप घेऊन ती तिच्या जया नावाच्या मैत्रिणीकडे गेली. घरापासून काही अंतरावरच तिचं घर असल्याने ती चालतच गेली. पाहते तर जयाचा चुलत भाऊ राजेश त्याच्या मित्रासह न्यायला आला होता. त्यांनी तिलाही सोबत चलण्याचा आग्रह केला. तिने सहजच राजेशचा कोण मित्र आहे?, म्हणून पाहिलं तर काय, मुकुंदा.
क्षणभर ती गोंधळली पण पुढच्याच क्षणी सावधपणे पाऊल टाकत गाडीमध्ये जया सोबत बसली. मुकुंदाने तिला हाय हॅलो करून गप्पा सुरू केल्या. खरंतर तिला राजेश, जया, मुकुंदा सोबत खूप गप्पा मारायच्या होत्या पण मनातली अपराधीपणाची भावना तिला काही सुचू देत नव्हती. मात्र तिने मनाशीच काहीतरी ठरवून वातावरण मोकळं करायचं ठरवलं आणि गप्पांना सुरुवात केली. पाहता पाहता खरंच गप्पांमध्ये कॉलेज कधी आलं कळलंही नाही. कॉलेजमध्ये तर काय मैत्रीच्या भावनांना पूर आला होता. प्रेम, जिव्हाळा, ओढ, आपुलकी यांचे झरे अखंड वाहू लागले. खरंच एवढ्या वर्षात कोणीच कोणाला का बरं भेटलं नाही याचा साऱ्यांना खेद होत होता. पाहता पाहता व्यासपीठावर कॉलेजचे आजी-माजी प्राचार्य, आजी-माजी शिक्षक साऱ्यांची मनोगतं झाली आणि मग सुरू झाला एकमेकांना भेटण्याचा कार्यक्रम. आपल्या वर्गात आपल्या बेंचवर बसण्याचा आनंद. मैदान, बाग, ग्रंथालय, गाड्या लावण्याची ठिकाणे. साऱ्या ठिकाणी त्या वयात केलेल्या गमती जमती आठवून सारे पोट धर धरून हसत होते. आजचा दिवस फुलपाखराप्रमाणे मनसोक्त विहरण्याचा स्वच्छंदपणे भ्रमण करण्याचा होता. पाहता पाहता जो तो आपापल्या आवडीच्या ठिकाणी गेला. राधाही कॉलेजच्या ग्रंथालयात पोहोचली. खरंच किती वेड होतं वाचनाचं आपल्याला. हे आठवून तिने स्मित केलं. एवढ्यात तिला पुस्तकांच्या कपाटाजवळ कोणीतरी पुस्तक पाहते आहे हे दिसलं. मुकुंदा, मुकुंदाच होता तो. त्याने तिचं अन् त्याचं आवडतं पुस्तक काढलं. तिला पाहिलं, तिला पुन्हा पहिले क्षण आठवले. तिथे तिथून निघून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यात त्यांने तिला थांबवलं,
‘मी कॉलेजमध्ये असताना तुझ्यावर मनापासून प्रेम केलं पण आता ती वेळ, ते क्षण फक्त आठवण्यापुरतेच. गेलेले क्षण आता फक्त स्मृतीतच. पण माझी एक इच्छा आहे. जीवनाच्या या टप्प्यात आयुष्याच्या या वळणावर, प्राप्त परिस्थितीत आपण दोघेही जगत आहोत. ते आपापले प्रारब्ध आहे. आपले विचार मतं जुळत होती. आपल्या सहवासाने आपण एकमेकांचे आयुष्य उजळून टाकले असते पण कदाचित ते आपल्या नशिबातच नव्हते. आपण आता कदाचित जीवनाच्या अंतिम टप्प्यात काही वर्षांचे सोबती आहोत. आपण पुन्हा मैत्रीचं निखळ नातं जपूया.’
ती लक्षपूर्वक सारं ऐकत होती. खरंच आयुष्यात बराच वेळा नव्हे जास्तीत जास्त वेळा आपल्या मनाप्रमाणे घडतच नाही. पण जर विचार केला तर मन मानेल तसं वागणं चुकीचं ठरेल म्हणून मागची पिढी मोठ्यांचे निर्णय मान्य करून पुढे येईल ती परिस्थिती स्वीकारत होती पण आता तसे नाही आजकाल फक्त मी, माझे यापलीकडे काही पाहिले जात नाही. तिनेही आनंदाने हात पुढे करत त्याच्या मैत्रीचा स्वीकार केला.
शेवटी काय जगण्याचा आनंद मिळवणं महत्त्वाचं.