
पावसाळ्याची ती शांत संध्याकाळ होती. गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर पावसाचे थेंब अलगद झाडांच्या पानांवर पडत होते. दूरवर काळे ढग जमले होते आणि वातावरणात एक विचित्र उदासी दाटली होती. त्या उदास हवेतही देशमुख कुटुंबाचं घर मात्र नेहमीप्रमाणे आनंदाने उजळलेलं दिसत होतं.
अमोल देशमुख त्याची आई आणि त्याची पत्नी स्वरा… कॉलनीत गुण्यागोविंदाने राहणार हे त्रिकोणी कुटुंब. स्वरा आणि अमोल हे सगळ्यांसाठी आदर्श जोडपं मानलं जायचं.
लोक म्हणायचे,
“नवरा असावा तर अमोलसारखा!”
आणि स्त्रिया हसत म्हणायच्या,
“स्वरासारखी समजूतदार बायको मिळाली तर आयुष्य स्वर्ग होईल!”
अमोल एका अकॅडमीचा मालक होता. गरीब मुलांना तो मोफत शिकवत असे. कोणाच्या घरात अडचण आली तर अमोल पहिला धावून जायचा. गावात त्याला खूप मान होता.
स्वरासुद्धा तितकीच प्रेमळ आणि जबाबदार होती. सासू-सासऱ्यांची काळजी, मुलांचा अभ्यास, घरातील प्रत्येकाची आवड… सगळं ती मनापासून सांभाळत होती. त्यांच्या घरात रोज तुळशीपाशी दिवा लागायचा आणि अंगणात मुलांच्या हसण्याने गजबज व्हायची.
पण प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काही न बोललेली रहस्य दडलेली असतात…
ऑक्टोबरच्या एका सकाळी अमोल अकॅडमीबाहेर बसून विद्यार्थ्यांशी बोलत होता. रस्त्याच्या कडेला गुलमोहराची पानं वाऱ्याने उडत होती. अचानक भरधाव ट्रकची त्याला जोरात धडक दिली.
क्षणात सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला.
“अमोल भाऊ…!”
लोक धावत आले.
रक्ताने माखलेल्या अमोलला रुग्णालयात नेण्यात आलं. अनेक तास शस्त्रक्रिया चालली. त्याचे दोन्ही पाय गंभीर जखमी झाले होते. डॉक्टरांनी अखेर जीव वाचवला, पण महिनोन्महिने बेडवर राहावं लागणार होतं.
घरी परतल्यावर स्वरा त्याची खूप सेवा करू लागली. ती वेळेवर औषधं द्यायची, रात्री उशिरापर्यंत त्याच्या जवळ बसून राहायची. घरच्यांना वाटलं— संकट गेलं… आता सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल.
पण नियती अजून शांत नव्हती.
डिसेंबरच्या थंड रात्री घराभोवती धुक्याची चादर पसरली होती. स्वयंपाकघरातून फोडणीचा सुगंध येत होता. स्वरा जेवण बनवत होती आणि अमोल आपल्या खोलीत पडून खिडकीतून बाहेर दिसणारा निसर्ग पाहत होता.
अचानक घराचा दरवाजा अलगद उघडला.
काळ्या जॅकेटमधला एक माणूस आत शिरला. त्याच्या हातात बंदूक होती.
तो सरळ अमोलच्या खोलीत गेला.
क्षणात दरवाजा बंद झाला आणि काही सेकंदांत गोळ्यांचे आवाज घरभर घुमले.
“अमोल…!” स्वराच्या तोंडून किंकाळी फुटली.
ती दरवाजा ठोठावू लागली. बाहेरचे लोक धावत आले. दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण आतला माणूस बंदूक फिरवत बाहेर आला. संतप्त लोकांनी त्याला पकडलं.
अमोलला रुग्णालयात नेण्यात आलं… पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
त्या रात्रीपासून देशमुख कुटुंबाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं.
पोलीस तपास सुरू झाला. पकडलेला माणूस होता— राकेश, तोच ट्रक ड्रायव्हर.
तो म्हणाला,
“माझ्याकडून चुकून अपघात झाला पण मी कितीही विनवणी केली तरी मला साहेबांनी पोलिसांचा तगादा माझ्या मागे लावलाच.अपघाताच्या केसचा राग होता… म्हणून मी हे केलं.”
पण अमोलच्या आईच्या मनाला हे काही पटत नव्हतं.
“माझा मुलगा कोणाचं वाईट करत नव्हता… यात अजून कोणीतरी आहे,” त्या रडत म्हणत होत्या.
दोन वर्ष तपास चालू राहिला.
आणि मग…
एके दिवशी व्हॉट्सॲपवर आलेल्या चॅटने सगळं सत्य बाहेर आणलं.
पोलिसांना वारंवार एक नाव दिसत होतं— करण.
त्याचे कॉल रेकॉर्ड्स, पैशांचे व्यवहार, आणि राकेशशी संपर्क… सगळं संशयास्पद होतं.
पोलिसांनी चौकशी केली.
आणि जेव्हा करणशी जोडलेलं दुसरं नाव समोर आलं… ते ऐकून सगळे हादरले.
ते नाव होतं— स्वरा देशमुख.
चौकशीत स्वरा अखेर तुटली.
तिने कबूल केलं की कॉलेज मध्ये तिची करणशी ओळख झाली होती. हळूहळू दोघे जवळ आले. मैत्री प्रेमात बदलली. आई वडिलांनी तिचं मत न घेता तिचे लग्न केल्यामुळे तिला तिचे कॉलेजमधले प्रेम विसरावे लागले होते. करणला विसरून तिने अमोल अशी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण कुठेतरी हृदयाच्या खोलवर करंजी आठवण तिने जपली होती. स्वराच्या लग्नानंतर बदलत गेलेल्या वागण्यामुळे अमोलला संशय आला आणि घरात भांडणं सुरू झाली.
स्वरा आणि करणला वाटू लागलं की अमोल त्यांच्या आयुष्यात अडथळा आहे.
आधी अपघात घडवून आणला गेला.
पण अमोल वाचला.
मग त्यांनी कायमचा मार्ग संपवण्याचा निर्णय घेतला.
त्या रात्रीच्या गोळ्या केवळ अमोलच्या शरीरावर झाडल्या नव्हत्या… त्या एका कुटुंबाच्या विश्वासावर गोळ्या झाडल्या गेल्या होत्या.
आजही त्या घराच्या अंगणात तुळशीचा दिवा लागतो. पण त्या प्रकाशात आता आनंद नसतो… फक्त आठवणी असतात.
कधी काळी प्रेमाने भरलेलं ते घर आता शांत आहे. खिडकीबाहेर वारा वाहतो, पानं सळसळतात… आणि जणू निसर्गही एकच प्रश्न विचारतो—
“विश्वास तुटला की माणूस खरंच जगतो का?”