पायातलं पैंजण

पायातलं पैंजण तुझ्या छुनछुन वाजायचं

बाळा तू खुदकन हसायची अन्

माझ्या मनात नंदनवन फुलायचं

तेव्हा पायातलं पैंजण तुझ्या छुनछुन वाजायचं

           पाळण्यातनं तू बेबी वॉकरवर गेलीस

            ठुमकत ठुमकत घरभर फिरू लागलीस 

        येण्याची माझ्या चातकासारखी वाट पाहू लागली 

            आल्यावर आनंदाने चेकाळू लागलीस

     तेव्हा पायातलं पैंजण तुझ्या छुनछुन वाजायचं

शाळेत जाताना मला जावु नको म्हणू लागली 

हात पाय आपटून राग राग करू लागलीस

लाडे लाडे गळ्यात हात गुंफू लागलीस

  रुसून तू गोबरे गाल फुगवू लागलीस

  तेव्हा पायातले पैंजण तुझ्या छुनछुन वाजायचं

    बघता बघता यशाच्या पायऱ्या चढत गेलीस   

   चालताना तू वळून कधी नाही बघितलीस

   जीवनात तू तुझ्या यशश्री ठरलीस

    यश मात्र तुझं आपल्यात दुरावा ठरलं

   तेव्हा पायातले पैंजण तुझ्या छुनछुन वाजवायचं

तुझ्या केबिन मध्ये मे आय कम इन डॉक्टर 

म्हणताना ऊर माझा भरून आला 

आपली छबडी बबडी मोठी केव्हा झाली 

माझ्या मलाच कळलं नाही तेव्हा पायातले पैंजण

  घरातनं छुनछुन करणं कमी होऊ लागलं

   आज तुला सासरी पाठवताना 

    तुझा राजकुमार तुला माझ्यापुढून नेताना 

   मन माझं आतल्या आत सारे सोहळे आठवत होतं

   उत्सव मात्र तन साजरा करत होतं

 तुझं पैंजण मात्र जोर जोरात वाजत होतं

            तुझं पैंजण मात्र जोर जोरात वाजत होतं

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!