
रविवार म्हणजे निवांतपणा. आज हवेत गारवाही जाणवत होता. आकाशात सुर्याची पसरलेली लालीमा राधिकाला पहायला खुप आवडत असे. तसेतर दररोजच्या घाई गडबडीत हे शक्य होत नसे. मात्र रविवारी ती सर्व गोष्टी मनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत असे. तिला निसर्गाच्या सान्निध्यात रहायला खुप आवडायचे. ती कधीकधी लता वेलींसोबत छान गप्पा मारत असे. तिचं असं निर्मळ, निखळ वागणं त्याला खुप आवडत असे. तसं पहाता रविवारीच खुप कामांची गडबड असे. मात्र स्वप्निल आज रविवार असूनही घाईघाईने आवरत होता. राधिका त्याची चाललेली लगबग पाहत होतीच. लग्न होऊन दोन महिने झाले होते. आता कुठे त्यांची पुरती ओळख झाली होती. पाहता पाहता त्यांना एकमेकांचे स्वभाव आणि भविष्याची ओळख झाली होती. स्वप्निलच्या जीवनरुपी पुस्तकाच्या प्रत्येक पानाची राधिकाने लग्नापूर्वीच माहिती करून घेतली होती. स्वप्निलने तिला आपल्या आयुष्यात आतापर्यंत आलेल्या अडचणींविषयी संगितले होते. मग एवढ्या घाईने तो कोणाला आणि कशासाठी भेटायला चालला होता, हा प्रश्न आतापर्यंत दोन तीन वेळा तिने विचारला पण तो गप्पच. तिच्या मनात काय चालले असेल याची कल्पना तो करु शकत होता. तिच्या मनात उठलेले विचारांचे काहूर त्याच्या लक्षात येत होते. तरीही तो गप्पच होता. आपण त्यालाओळखतो असे तिला वाटत होते. तरीही आज तिला त्याच्याविषयी परकेपणा जाणवत होता. लग्नानंतर त्यानं असं वागण्याची ही पहिलीच वेळ होती. आपल्याला सांगू नये अशी कोणती गोष्ट असेल? असे तिला वाटत होते. तिच्या मनात विचारांची चाललेली गडबड तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तरीही तो सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून मी मित्राला भेटायला जातो, असं सांगून घरातून निघाला. आज रविवार असल्याने तिची बरीचशी कामं खोळंबली होती. एक एक करत हातावेगळी काम करत दुपारचे दीड कधी वाजले ते तिला समजले नाही. तिला आता स्वप्नीलची वाट पाहून कंटाळा आला. थोडा वेळ वाट पाहून फोन करण्याचा निर्णय तिने घेतला. पाहता पाहता तीन वाजत आले. आतापर्यंत फोन करुन का उशीर होतो आहे? ते विचारावे म्हणून तिने तीन वेळा फोन हातात घेतला. पण रिंग जाण्यापूर्वीच कट केला. कारण तिने ओळख झाल्यापासूनच्या या तीन-चार महिन्यात घेतलेल्या अनुभवानुसार, तो बाहेर गेल्यावर तुम्ही कुठे आहात? म्हणून फोन केला तर त्याला ते आवडत नसे. पण शेवटी तिने धाडसाने फोन केलाच. स्वप्निलने फोन उचलला. आलो अर्ध्या तासात, असं त्याने सांगितलं. राधिकाच्या मनावर फोन करण्यापूर्वी आलेलं दडपण बरंच कमी झालं. आपण खरं तर दोन तासापूर्वीच फोन करायला हवा होता, असं तिला वाटलं. तिने तो येणार म्हणून पटापट घर आवरून स्वतःचही आवरलं. तेवढ्यात तो आलाच. जेवण झाल्यावर ती दोघं काही गरजेचं सामान आणायला बाहेर जाऊन आली. संध्याकाळी जेवणानंतर निवांत आपण आज कुठे गेला होता? हे विचारायचं तिनं ठरवलं आणि ठरवल्याप्रमाणे विचारलंही. स्वप्निलने जुन्या मित्रांना भेटायला गेलो होतो असं सांगितलं. खरंतर तिचं समाधान झालं नाही पण शेवटी उगाच वाद नको. म्हणून ती गप्प बसली. तिचा शांत स्वभाव तिला नडला होता. ताणतणाव तिला सहन होत नसे. एकवेळ असं वागणं ठिक आहे अशी तिने मनाची समजूत घालून घेतली.
सोमवार आला तसा ज्याप्रमाणे गाडी वेग घेतल्यावर धावते. त्याप्रमाणे दिवसांची गाडी धावू लागली. धावपळीत एकमेकांशी बोलायलाही वेळ मिळत नसे. दिवसामागून दिवस जात होते. स्वप्निलच्या आयुष्यात राधिका आल्याने जणू कायापालट झाला होता. संसार रथाची दोन्ही चाकं असणारे दोघं, एकमेकांना आधार देत व्यवस्थित चालत होती. त्यामुळे संसाररथ व्यवस्थित चालला होता. तिच्या आणि त्याच्या ऑफिसमध्ये दहा ते पंधरा मिनिटाचं अंतर होतं. फरक फक्त एवढाच होता की दोघांच्या नोकरीची ठिकाण विरुद्ध दिशेला होती. राधिकाला तिच्या एकमेकांशी ओळख होण्यापासून लग्न जमण्या पर्यंतच्या वेळेची सहजच आठवण झाली. राधिकाच्या शेजारी राजू नावाचा एक मुलगा राहत होता. दोघांच्या घरातील व्यक्तींचा घरोबा चांगला होता. दोन्ही घरातील व्यक्तींची एकमेकांशी वागणे म्हणजे रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा जास्त. राजूचा स्वप्निल हा मित्र होता. तो घरपणं अनुभवण्यासाठी राजूकडे येई. राजूची आईही त्याला हवं नको सारं विचारत असे. त्याची आणि राधिकाची ओळख झाली होती आणि हळूहळू ओळखीचे रुपांतर प्रेमात. आणि प्रेमाचे लग्नात करणं हीच या दोघांचीही मर्जी होती. स्वप्निलच्या आई- बाबांचा तो लहान असतानाच अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे तो अनाथाश्रमातच वाढला होता. त्याने आयुष्याच्या बऱ्याच रंगांचा अनुभव घेतला होता. राधिकाला स्वप्निलआवडलाच पण त्याच्या खडतर आयुष्याविषयी ऐकून आणि सध्याचं यशस्वी आयुष्य पाहून ती त्याच्या प्रेमातच पडली होती. आई-बाबांनी अनाथ मुलाशी लग्न करण्यापूर्वी दहावेळा विचार कर असं सांगितलं पण तिने आपण केलं तर स्वप्नीलशीच लग्न करू. असा ठाम निर्णय जाहीर केला होता.
आज रविवार पहिल्या दीपावलीसाठी आमंत्रित करायचं म्हणून तिचे आई-बाबा येणार होते. तिने त्यांना जेवायलाच बोलावलं होतं. ते तयार नव्हते पण लेकीच्या इच्छेखातर ते तयार झाले. तिने तशी कल्पना स्वप्निलला दिली होती. तरीही तो तीन चार महिन्यांपूर्वी आवरून बाहेर पडला, तसा आजही बाहेर निघाला. राधिका आज हट्टाला पेटली.
‘आज माझे आईबाबा घरी येणार आणि तुम्ही नसणार. हे बरे वाटते का? मी तुम्हाला विचारूनच ठरवलं होतं ना! मग हे असं कसं?’
तो तिला पुन्हा पुन्हा सांगत होता. मी मित्रांना भेटून लगेच दोन तीन तासात येतो पण ती ऐकायला तयारच नव्हती. ‘आज मला सगळं माहित झालं पाहिजे. नाहीतर मी निघाले…….’
स्वप्नील तिला पुन्हा पुन्हा समजावून सांगत होता. मी काहीही चुकीचं काम करत नाही. मी तुला आज नक्की सगळं सांगतो. हट्ट करू नकोस पण राधिकाच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तिच्या आई- बाबांचा त्यांच्याकडे येण्यासाठी निघाल्याचा फोनही आलाच. स्वप्नीलला सासू-सासरे येण्यापूर्वी आपण जाऊन परत येऊ असे वाटले होते. पण शेवटी तो तिला समजावून थकला. त्याने मित्रांना फोन करून आज येऊ शकत नाही, म्हणून माफी मागितली. तो घरातच थांबला. घरात आता संशयाचे ढग दाटून आले होते. ती त्याला थांबविण्यात यशस्वी झाली होती. तरी तो नक्की कुठे जात असतो हे जाणून घेण्याची उत्सुकता कायम होतीच. सासू-सासरे आल्यावर जेवण झाले. सहज गप्पा मारत असताना, त्याच्या सासर्यांनी त्याला रविवारी दिवसभर बाहेर जाण्याविषयी विचारले. संसारासाठी हिताच्या चार गोष्टी सांगितल्या. स्वप्निल एवढा वेळ शांत होता पण शेवटी त्यांने सर्व सांगायचे ठरवले. ‘आई-बाबा माझ्यावर विश्वास ठेवा. मी काहीही चुकीचं वागत नाही.’
‘आमचा तुमच्यावर विश्वास आहे जावईबापू. पण अविश्वासाचं ढग दाटून आलं तर संशयाच्या पावसानं तुमचा संसार मातीमोल होईल. जे काही असेल ते स्पष्ट सांगून टाका.’
स्वप्निलने शेवटी विचारपूर्वक बोलायला सुरुवात केली. त्याचा चेहरा गंभीर दिसत होता. त्याच्या सांगण्यानुसार अनाथाश्रमातल्या वीस-पंचवीस मित्र एकत्र येऊन काही समाजोपयोगी काम करत होते. प्रत्येकजण ऑफिसमध्ये महिन्यातले काही दिवस जास्तीचे काम म्हणजेच ओव्हर टाईम करून ते पैसे एकत्र खात्यावर ठेवत होते. अनाथ आश्रमातून १८ वर्षे पूर्ण होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्याचे काम करत होते. कारण अनाथांना आधार देणारं या जगात कोण असतं. बालपणापासून सांभाळून घेणाऱ्या संस्थेकडूनही किती काळ अपेक्षा करणार आणि किती करणार? स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम शेवटी स्वतःलाच करावे लागणार. पण खरा खडतर काळ आयुष्यात शिक्षण पूर्ण झाल्यापासून नोकरी मिळेपर्यंतचा असतो. इथेच खरी सत्त्वपरीक्षा ठरते. अशा वेळी व्यक्ती निराशेच्या गर्तेत जाण्याची शक्यता असते आणि जीवनातल्या अशाच प्रसंगी आधार देण्याचं काम ही संस्था करत होती. ही संस्था या मित्रा मित्रांनी मिळून छोट्या प्रमाणात का होईना उभी केली होती. दर चार महिन्यांनी, महिन्यातल्या पहिल्या रविवारी एकत्र येऊन तिथे त्यांची विचार विनिमय सभा होत असे. एखाद्या मुलाला गरज असेल तर त्याच्या खाण्या-पिण्याची आणि राहण्याची सोय केली जाई. जेव्हा त्याला नोकरी लागेल तेव्हा त्याला आधार या सामाजिक संस्थेचा सभासद करून घेतलं जात असे. या संस्थेची सुरुवात फक्त सात मित्रांनी मिळून केली होती. त्यात आतापर्यंत वीस पंचवीस जण सहभागी झाले होते. प्रत्येकजण ओव्हर टाईम केलेल्या कामाचे पैसे प्रामाणिकपणे जमा करत आणि त्यातून संस्थेच्या कार्याची कार्यवाही केली जात होती. यातील कोणालाही कुणाकडूनही काहीही अपेक्षा नव्हती. कुठल्या कार्यामुळे सत्कार समारंभाची ही अपेक्षा नव्हती. या संस्थेच्या मूळ सभासदांपैकी स्वप्निल एक होता. आजची विचार विनिमय सभाही अनाथाश्रमात जावून दिवाळी फराळ आणि भेटवस्तू देण्याविषयी होती. स्वत:साठी सर्वजण जगतात पण दुसऱ्यासाठी खुप कमीजण जगतात. खरं तर ही गोष्ट त्याने राधिकापासून लपवायला नको होती. हे त्याला मान्य होते. पण राधिका पैसे देण्यास नकार देईल किंवा कामात मोडता घालेल. तिला अनाथपणाच्या दु:खाची कल्पना येणार नाही. जेव्हा तिने हे सगळं ऐकलं तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते. त्याला वाटलं तसंच झालं. राधिकाला आपण तिच्या परस्पर मदत करत होतो. हे पटणार नव्हतंच. म्हणून त्याने आई-बाबांकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले. नजरेतून जणू तो सांगत होता. तुम्ही तरी तिला समजून सांगा. तो काही बोलणार एवढ्यात राधिका म्हणाली. माझं चुकलं स्वप्निल, तुझ्या सारख्या महान विचारांच्या माणसाविषयी माझ्या मनात चुकीचे विचार आले. तुम्ही तुमच्यावर आलेली परिस्थिती दुसऱ्यावर येऊ नये म्हणून सारे करता. याचा मला अभिमान आहे. मी तुम्ही घेतलेल्या सेवेच्या व्रताचा वसा प्रामाणिकपणे पूर्ण करेन. मी ही तुम्हाला तुमच्या कार्यात साथ देईन. मला तुमचा अभिमान वाटतो. खरंतर त्याला तिच्या हळुवार दुसऱ्यांविषयी विचार करणाऱ्या मनाची कल्पना होती. परंतु त्याला तो विचार फक्त आपल्या पुरता सीमित असावा असं वाटलं होतं. तिच्या गालावरुन ओघळणारा अश्रू पुसत पुसतच त्याने आनंदातच मित्राला फोन केला. आधार संस्थेसाठी मी एक कार्यकर्ती घेऊन येतो. असं त्यानं सांगितले. यावर समाधानाने चौघेही हसू लागले.