‘साहेब, मला सोडा. मी निर्दोष आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. अहो माझी बायको आहे ती. मी कसा मारण्याचा प्रयत्न करू शकतो तिला? साहेब साहेब.’
माझं सहजच त्या ओरडण्याकडे लक्ष गेलं. ओरडणारी व्यक्ती सुशिक्षित आणि सज्जन होती. पण मग असं काय झालं, ज्यामुळें ती अशी पोलिसांच्या ताब्यात आहे, असा मला प्रश्न पडला. मी जरा लक्ष देऊन पाहिलं तर पोलिसांच्या गाडीपासून थोड्या अंतरावर गर्दी दिसत होती. माझ्यातले कुतूहल जागे झाले. आणि मी जवळ जाऊन पाहिले तर काय, बापरे अवघी अठरा-एकोणीस वर्षांची एक तरुणी रक्तबंबाळ झालेली. डोक्याला हात लावून बसली होती. शेजारीच एक दुचाकी पडलेली होती आणि आसपास संसारोपयोगी वस्तू विखुरल्या होत्या. त्या युवतीच्या पेहरावावरून ती नवीन लग्न झालेली होती, असे दिसत होते. पण मग नक्की झाले काय, ते मात्र कळेना. बघ्यांची गर्दी पाहून तिथून मी बाजूला झाले. माझे काकाच मला थोड्या अंतरावर उभे दिसले. ‘काका काका’
मी हाका मारताच त्यांच्या चेहऱ्यावर ओळखीचा भाव उमटला. पण नेहमीप्रमाणे ते हसले नाहीत. मी त्यांच्या जवळ गेले.
‘काका, तुम्ही इथे कसे काय? आज तुम्ही ऑफिसला गेला नाहीत? बराच उशीर झाला.’
काकांचे उत्तर ऐकून मी विचलित झाले.
‘अगं हा अपघात झाला. तो माझ्या मित्राचा जावई आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्या दोघांचा विवाह झाला होता.’
‘मग पोलिस अपघात झाला म्हणून त्यालाच का पकडून नेऊ लागले आहेत?’
‘कारण त्याच्यामुळेच अपघात झालाय, असं पोलिसांचं मत आहे.’
‘ ते कसं काय?
‘ती पाहिलीस गॅसची टाकी. ती टाकी घेऊन ही नववधू मागे बसली होती. गाडीला दोन्ही बाजूला सामान लावण्यासाठी हूक आहेत. त्यालाही बरेचसे सामान होते. त्यामुळे ती कशीबशी अवघडून गाडीवर बसली होती. तो व्यवस्थितच गाडी चालवत होता. पण गतिरोधक आला आणि गाडी एका बाजूला कलू लागली. त्याने खूप प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. तिचाही तोल गेला आणि तोही पडला. ती मागच्या बाजूने जोरात पडल्याने डोक्याला मागे मार लागला. ती जागीच बेशुद्ध झाली.’
मी हे सर्व लक्ष देऊन ऐकत होते. काकांना त्याचे नाव विचारले. ‘दिवाकर प्रकाश घोडके.’ मी तर उडालेच.
‘काय? मी त्याला ओळखते पण सध्या मी त्याला ओळखू शकले नाही.’
काका म्हणालेच,
‘अगं ही आजकालची मुलं काय ती फॅशन करतात. एवढं सव्वीस-सत्तावीस वर्षांचं पोरंग पण ती दाढी वाढवल्यावर चांगलं थोराड तर दिसतंच आणि वर ओळखायलाही येईना.’
मला आठवतं, दिवाकर शाळेमध्ये खूप हुशार, त्याची आईवडील नोकरीला. दिवाकर आणि दोन बहिणी. आईवडिलांनी घरात कधी मुलं-मुली असा भेदभाव केला नाही. सर्वांना समान वागणूक दिली जात तर होतीच पण शिक्षण, स्पर्धा परीक्षा, नोकरी याबाबतीतही हेच समानतेचे धोरण अवलंबिले जात होतं. दिवाकर दोन बहिणींपेक्षा खूप हुशार. त्या दोघींनी शास्त्र शाखेची पदवी पूर्ण केली. त्यानंतर एक वर्षांचे बी. एड्.
आपल्या हुशारीच्या अन् कर्तृत्वाच्या जोरावर त्या दोघीही नामांकित संस्थेत नोकरीला लागल्या. दिवाकर सर्वात लहान असल्याने आयटीमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न त्याने मनात बाळगलं होतं. त्याचे त्या दिशेने प्रयत्नही सुरू होते. त्याची जिद्द, चिकाटी, ध्येयासक्ती पाहाता तो यशस्वी होणारच यात शंका नव्हती. पण एक दिवस असाही येईल असे वाटले नव्हते. दिवाकरच्या बाबांना पॅरेलिसीसचा अटॅक आला. त्यांना दवाखान्यात तसे वेळेवर नेले खरे,. पण अटॅक तीव्र होता. त्यांची एक बाजू कामातून गेली. दवाखाना आणि लागून येणारे आजार हा सर्व खर्च. दिवाकरच्या आईला या साऱ्यातून मुलांच्या शिक्षणासाठी आपण काही खरंच करू शकू असे वाटेना. दिवाकरच्या बाबांची नोकरी तर ते वैद्यकीयदृष्ट्या व्यवस्थित नसल्याने गेली. जी काही रक्कम त्यातून मिळाली त्यातून आजारपणासाठी काढलेले कर्ज देऊन टाकली. त्याच्या वडिलांना पेन्शन बसली, पण मध्येच हे सारे असे झाले. त्यामळे पेन्शन पण मिळू शकली नाही. दोन मुलींची लग्नं, त्यांचे सण, बाळंतपण, सारी कर्तव्य पार पाडली होती. दिवाकरचं शिक्षण आणि लग्न एवढंच करायचं होतं, पण हे शिक्षण खुप होतं. दिवाकरची आई तरीही त्याला बळ देत होती. तू शिक, मोठा हो. आपण या परिस्थितीतून मार्ग काढू. आईचा पाठिंबा त्याला बळ देत होता, पण घरातली परिस्थिती त्याला जाणीव करून देत होती. तू निम्मं आयुष्य शिकतंच बसलास तर तो खर्च घरच्यांना परवडणार नाही. सध्या घराला मजबूत आधाराची गरज आहे. आपण बी. ई. करून नोकरी करावी, असे त्याला वाटत होते. बाबांच्या औषधाचा खर्च, घराचे हप्ते आणि नाही म्हटलं तरी बहिणींच्या सासरच्या थोड्याफार अपेक्षा या सर्वांत त्याच्या शिक्षणासाठी काय उरेल, याचा तो विचार करत असे. त्याने या सर्वातून मार्ग काढण्यासाठीच आयटीच स्वप्न गुंडाळून, मनातून काढून टाकले होते. परिस्थितीजन्य आलेले अनुभव माणसाला जीवनाचे ज्ञान देतात. तो आता सध्याचा विचार करू लागला. बहिणींच्या सासरच्या माणसाचा जरा पाठिंबा असला तरी किती आणि कधीपर्यंत कोण मदत करणार? प्रत्येकाला जीवनात आपला मार्ग आपणच शोधावा लागतो.
दिवाकरच्या बाबांची स्थिती वाईट झाली होती. आपल्या आजारपणामुळे आपण बिनकामाचे झालो आहोत. आपल्या पेन्शनचा अर्धा अधिक पैसा आपल्या आजारपणावरच जातो, या मुलाच्या भवितव्याचे काय? हा प्रश्न त्यांना पोखरून काढत होता. त्यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती ढासळत चालली होती. आपला या जगात असून नसून काय उपयोग? उलट आपल्या जाण्याने पेन्शनचा उपयोग घरातील खर्चासाठी, मुलाच्या शिक्षणासाठी होईल असे त्यांना वाटत होते.
रुग्णाच्या मनाची स्थिती ठीक नसेल तर काय उपयोग? सारे प्रयत्न वाया. त्यांच्या शरीरात एकातून दुसरी, तिसरी अशा व्याधी निर्माण होऊ लागल्या. दिवाकरची आई त्यांना धीर देण्याचे काम करत होती. मुलीही काळजी करू नका, म्हणून सांगत होत्या. पण आपल्या आजारपणामुळे निर्माण झालेली स्थिती ते जाणून होते. अशातच दिवाकरच्या आत्याने, दिवाकरने शिक्षण थांबवून नोकरीचे पाहावं, असा सल्ला दिला. बिचारा दिवाकर, आलेल्या परिस्थितीने त्याच्या स्वप्नांचीच धूळधाण झाली होती. बघता बघता हा निर्णय योग्य आहे, असे साऱ्यांनाच वाटले. दिवाकरही तसा फार मोठा नव्हता. त्यामुळे त्याने स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, मतं सारी बाजूला ठेवली. कामापुरतं एखाद्या ऑफिसमध्ये सहज नोकरी लागेल, असा विचार केला. नव्हे तो अंमलात आणला. बरोबरीचे मित्र, शिक्षक साऱ्यांनी खूप समजावले
मदतीची तयारी दाखविली. वेगवेगळ्या स्कॉलरशिपची माहिती सांगितली पण हे जरी सगळे खरं असलं, तरी प्राप्त परिस्थितीत त्याने शिक्षण घेत बराच वेळ घालवावा. हे शक्य नव्हतं. दिवाकरने एक कंपनी जॉईन केली. तो त्याच्या हुशारीवर बरंच काही करू शकत होता, पण डिग्री हातात हवी. ती नाही म्हणून त्याला काहीच करता येईना. त्याने शेवटी सर्वानुमते आयटीआय केले. कामापुरते शिक्षण झाले, अशी भावना त्याच्यासह सर्वांचीच झाली. तो तेवढ्या शिक्षणावरही कंपनीत बराच पुढे सरकला. घरात सूनबाईंचे आगमन कसं आणि किती महत्त्वाचं आहे, हे साऱ्यांनी पटवून दिल्यावर तो लग्नासाठी तयार झाला. काही महिन्यांपूर्वी त्याचं लग्न झालं. काकांचा पॅरेलिसीस बरा होत होता. घरात सूनेची मदत मिळू लागल्याने आईही जरा सुखावली. पण प्रत्येकाच्या मनात त्याचे अधुरे राहिलेले स्वप्न टोचत होतंच. परंतु परिस्थितीपुढे सर्वच झुकले होते. सांसारिक जीवन छान चाललं होतं. थोड्या पैशातही घर चालवावं कसं, हे दिवाकरची बायको चांगलं जाणत होती. म्हणूनच की काय, गॅस सिलेंडर गाडीवरून न्यायचं चुकीचं पाऊल तिने उचललं.
दिवाकरचं अधुरं स्वप्न त्याचं बाळ पुर्ण करणार होतं. तो आता मात्र येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीवर मात करणार होता. नियतीशी झगडणार होता. नशीब घडवणार होता. निश्चयाने त्याने तिला पटकन दवाखान्यात दाखल केले. पोलीस तपासाला सहकार्य करणार होताच. होवू नये अशी घटना घडल्याने सर्व घडी विस्कटू पहात होती पण सकारात्मकतेने तो या सर्वांवर मात करत ध्येय निश्चितीकडे वाटचाल करणार होता.