बरीच रात्र झाली. तो पुन्हा पुन्हा कागदावर काहीतरी लिहीत होता. बायजाक्कानं
पोराला आवाज दिला.
‘सुरेश का रं झोपला नाहीस का?’
‘मला झोपच येईना. आज अंग खूप दुखतंय. जरा दाबून देती का?’
‘व्हयं यं इकडं’
तो आईकडं गेला खरा पण त्याला काही फरक वाटेना.
‘आयं जरा जोर लावं की’
असं त्यांनं म्हटल्यावर.
‘आता या वयात अंगात कुठला जोर असणार.’
लहानपणीच लग्न झालेली त्याची आई. घरंदाज घरात तिच्यावर पडलेल्या जबाबदाऱ्या. त्याला दोन बहिणी होत्या. सर्वात लहान तो. तीन वर्षाचा झाल्यावर त्याच्या बाबांचा अपघात झालेला विहीर खोदताना. गुण्यागोविंदानं नांदत असलेल्या घरात बाबा गेल्यावर झालेलं वातावरण. वाटणीत झालेला दुजाभाव. संकटांशी दोन हात करण्यासाठी पदर खोचून उभा राहिलेली ती. या सर्व गोष्टी घडताना जरी तो लहान होता. तरी त्याला सर्व घटनांचा साक्षीदार असावा अशा साऱ्या घटना त्याला तोंडपाठ होत्या. तिने संसाराचा गाडा ओढत इथपर्यंत आणला होता. दिल्या घरी पोरी सुखात नांदत होत्या. तर पोराला शिकवून नोकरीला लावून शहरात पिटाळायचं ठरवलं होतं. पण पोराला नोकरीपेक्षा शेती करायला आवडत होतं. तो पुन्हा-पुन्हा शहरात राहण्याचे तोटे आणि अवाढव्य खर्च, हरवलेली माणुसकी या सर्वांबद्दल सांगत असे. सर्व तिला पटतही होते पण भावकीची कपटनीती, नको तितका व्यवहारीपणा याची ओळख लहानपणापासून पोराला करूनच दिली होती तिनं.
बघता-बघता बरीच वर्षे गेली. सुरेशचं लग्न ठरलं होतं. एकुलता एक मुलगा आणि बर्यापैकी शेती बघून चांगली मुलगी मिळाली. म्हणून देवाचे पुन्हा पुन्हा आभार मानत होती बायजक्का. काही का असेना देवाबरोबर स्वर्गातनं बापाचं बी लक्ष हाय लेकावर असं म्हणत होती. लग्न ठरवून सहा महिने झाले होते. मुलीकडचे लग्नाची घाई करायला लागले म्हणून दोन जावयांना बोलवून समदंच ठरवून टाकलं. या महिन्यात लग्न करायचं ठरलं होतं. तयारीला सुरुवात झाली. एकुलत्या एक पोराचं लग्न करायचं म्हणून बायजाक्का आनंदाने हुरळून गेली होती. लेक जावई आले होते. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. त्यामुळे पोराच्या मनात नसतानाही तिनं कर्ज काढून सगळी हौस मौज करायला लावली. गेल्या दोन वर्षापासनं पाण्याच्या संकटाने जेरीस आणलं होतं. पण या वर्षी सुरेशनं लय मेहनत घेतली होती. लग्नानंतर दोन-तीन महिन्यानं पीक हातात आलं की झालं. सगळं कर्ज बार! कर्जाचा हिशोब सुरेशने केला होता. सकाळी त्याला लवकर जाग आली. तो शेतातली कामं करून घेण्यासाठी गेला होता. लग्न चार दिवसानंतर होते. मुलीकडील पाहुण्यांनी त्यांच्या गावाकडे येण्यासाठी जीप, बस अशी सगळी व्यवस्था केली होती. तोही शेतातली सगळी व्यवस्था बघून गड्याला कामं समजून सांगून घरी आला. घरात बहिणी, दाजी, मावश्या, मावळण्या, तिघी काकू अन् जवळ लांबचे बरेच पाव्हणे आले होते. पाव्हण्यांबरोबर गप्पा मारता मारता लग्नाची खरेदी अन् बाकीचं बरंच काही बोलून झालं. एवढ्यात टीव्हीवर बातम्या लागल्या होत्या. लॉकडाऊनची बातमी आली. लॉकडाऊन? काय असतं आणि कशामुळे? लॉकडाऊनची बातमी सगळ्या गावात पसरली. वीस एकवीस दिवसांचा प्रश्न होता. लग्नाला आलेल्या पाहुण्यांना जाता येईना, अन् राहू पण वाटेना. बायजाक्का धास्तावली. लग्नाची केलेली तयारी, वाटलेल्या पत्रिका. खरेदी. सारं सारं……. ब्राह्मणाकडं जाऊन एकवीस दिवसानंतरची तारीख धरायचं ठरवलं आणि पाहुण्यांना फोन केला. पाहुणे तयार झाले . घरात तर लग्नघाई दररोजची होती. जवळ अन् दूरचे बरेच नातेवाईक मुक्कामाला होते. लॉकडाऊनमध्ये कुठे जा आणि या म्हणून सगळे निवांत राहिले होते. बायकांचा काम करून पिट्टा पडू लागला. पुरुष, लहान पोरं त्यांचा वेळ मजेत जात होता. त्यामुळे एकत्रित राहण्याच्या अनुभवाचा आनंद मिळत होता. राहून राहून मागच्या गप्पा निघत होत्या. दुसऱ्यांदा धरलेली तारीख पण जवळ आली. पुन्हा तयारी सुरू झाली. देवाला जाण्यासाठी गाडी ठरवली. तोंडीच सांगायचं ठरलं. आता पत्रिकांचा काही उपयोग नव्हता. लॉकडाऊन उद्या संपणार म्हणून बायजाक्का खुशीत होती. एकदा पोराचे दोनाचे चार झाले म्हणजे झालं. रात्री जेवणं झाली. टीव्ही वरची बातमी पाव्हण्यांनी पाहिली. झालं लॉकडाऊन वाढलं व्हतं. पाहुण्यांना अन् घरातल्यांना हसावं का रडावं तेच कळंना. कारण एवढ्या माणसांची सोय लावता लावता जीव नको झाला होता. अन् हे काय संपना. आता पुढची तारीख पुन्हाच काढू असं ठरलं. रात्री उशिरापर्यंत नुसत्या चर्चेला ऊत आला होता. असं केलं तर कसं? अन् तसं केलं तर कसं? भरीसभर यात लग्न मंडपापर्यंत लग्न जाऊन कशी मोडली असलेही अनुभव सांगावे म्हणजे कहरच झाला होता. सुरेशला तर काहीच कळेना. कधी एकदा लग्न होतंय अशी त्याच्या मनाची अवस्था झाली होती. अन् शेतातली कामं पण होतीच. आता पाहुण्यांचं पण मन लागंना. ज्याला त्याला घरी जायची ओढ लागून राहिली. नवरदेव नवरीचं येगळं अन् बाकी लोकांचं येगळच. वेगवेगळ्या बातम्या बघून सगळीच मनातनं घाबरली होती. शेवटी कसंतरी चार चौघात लग्न करायचं ठरलं. दुसऱ्यां पंधरा दिवसाच्या लॉकडाऊन नंतर जरा वेळ मिळाला. नवरी जवळच्या गावाचीच होती. मिळालेल्या वेळात नवरी, तिचे आई-वडील अन् पाच पंचवीस लोकात एकदाशी विवाह सोहळा संपन्न झाला. लोकांना मात्र परत जायची परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे तिचे आई-वडील मघारी गेले. बाकी सगळे मात्र नाईलाजाने राहिले होते.
दिवस जात होते. पीक काढणीला आलं होतं. लग्न झाल्यावर घरातल्या घरात सगळे विधी उरकून संसार रांकेला लावला होता. सुरेश आपल्या कामाच्या नियोजनात होता. त्याला एक नवीन घोर मनाला लागला होता. पिकं काढणीला आली आणि टीव्हीवर टोळधाडीची बातमी आली होती. त्याचा जीव घाबरला. पिकावर काढलेले कर्ज जर भरलं नाही तर….. आता कुठे संसाराला लागलेली गाडी . कसं होणार एवढ्यात आपल्या संसाराचं. कोणीतरी दुधात मिठाचा खडा टाकावा अना दुधं नासावं. तसंच त्याला वाटायला लागलं. शहरात जाता येत नव्हतं तालुक्याच्या गावावरून काही माणसे येऊन गावात माहिती देऊन जात होती. सरकारकडून फवारणीसाठी मोफत औषधं मिळणार होती. त्याप्रमाणे उपाययोजना करायचं ठरलं. घरात मनुष्यबळ बऱ्यापैकी होतं. घरातल्या धान्यावर पाहुण्यांची टोळधाडच पडली होती. आता बऱ्यापैकी धान्यसाठा संपत आला होता. मागं आलेल्या टोळधाडीविषयी जुनी जाणती माणसं अनुभव सांगत होती. करायचे काही बाही उपायही सांगत होते. आम्ही आहोतच करू काहीतरी म्हणून धीर देत होती. सुरेशनं आता कोणतं औषध फवारायचे? किती वेळा आणि कधी? या सर्वाची माहिती घेतली. बरीच माहिती अधिकारी देऊन गेले होते. लोकं तयारीला लागली होती. आता दोन-चार दिवसात फवारणी केली म्हणजे बिनधास्त. देवाला हात जोडून बायजाक्का विनवणी करत होती. आभाळाकडे बघून विनवत होती. ‘देवा तुच पाठीराखा.’ म्हणत होती. अन्नपाणी गोड वाटंना झालं. उद्या काहीतरी केलंच पाहिजे असं ठरवून सगळे झोपले होते. सुरेश आणि बायजाक्का बऱ्याच वेळ जागी होती.
पहाटं एकाएकी वाऱ्या सारखा आवाज येऊ लागला. म्हणून उठून खिडकी लावावी म्हणून बाहेर बायजाक्कानं बघितलं पण वारं सुटल्याच्या कोणत्याही खुणा दिसत नव्हत्या. मग. मग कसला आवाज? आणि तिच्या लक्षात आले की आता फवारणीचा काही उपयोग नव्हता. डांबाच्या प्रकाशात किडे उडताना दिसले. ती जोर जोरानं ओरडू लागली.
‘देवा, घात झाला. हाय रं माझ्या कर्मा.’
तिच्या आवाजानं सगळी जागं झाली. पण काय झालं कुणालाच कळंना. तिला काही त्रास होतोय का काही चावून गेलं. सगळ्यांच्या कालव्यात कुणाचंच कुणाला कळंना. एवढ्यात गळून गेलेल्या बायजाक्कानं कसाबसा अंगात जोर आणून ‘टोळधाड, टोळधाड ‘ असं म्हणल्यावर हातात काठी, दगड. माती घेऊन सगळे पीकाकडं पळाले. टोळांना हाकलण्याचा प्रयत्न केला. दिवसात शेत मोकळं करणार, एवढं मात्र खरं. दोन अडीच तास सगळे प्रयत्न करत होते. तेवढ्यात चांगलाच प्रकाश दिसू लागला आणि समोरचं दृश्य पाहून सर्वजण घाबरले. अनेक झाडांवर, पिकांवर, घरावर टोळधाडीचे किडे गच्च भरलेले दिसत होत. बायजाक्का मटकन खाली बसली आणि बघता बघता भुईवर पडली. सुरेश पाहत होता. कुठे जावू अन् कुठे नको अशी त्याची अवस्था झाली होती. आई….. .. म्हणून तो तिच्याकडे धावला. सगळ्यांनी तिला उचलून घरात नेलं. खूप प्रयत्न केल्यावर ती शुध्दीवर आली खरं. पण तोपर्यंत इकडं सारं रान रिकामं झालं होतं. आईssss अशी हाक त्याने पुन्हा एकदा मारली पण काही उपयोग झाला नाही.