सायलीला आज राहून राहून कॉलेजमधले ते सोनेरी दिवस आठवू लागले. ते दिवस नुसते आठवले तरी तिच्या गालावरून कोणीतरी मोरपीस फिरवत आहे, असा भास होवून तिला गुदगुल्या होवू लागल्या. आज जणू ती डोळ्यासमोर तो सारा नजारा पहात होती. या साऱ्या मोहक, हळव्या क्षणांच्या दिवास्वप्नात ती इतकी हरवली की तिला तिचा फोन वाजतोय हे ही लक्षात आले नाही. नुकतंच एक वर्षापूर्वी तिला नोकरी लागली होती. शिक्षण, नोकरी सारं व्यवस्थित पार पडलं, मग लग्नाचं काय? हा प्रश्न घरच्यांना सतावत होता. पण उत्तर दयायचं ती टाळत होती. कदाचित हा प्रश्न ती स्वतःच्या मनालाही पुन्हा पुन्हा विचारत होती. नक्की ती कोणाची वाट पहात होती. आणि कुठपर्यंत पहाणार होती? पण या प्रश्नाचे उत्तर आता तिला सापडलं होतं. ती आता सर्वांना लग्नासाठी होकार सांगणार होती.
‘अगं ताई फोन उचलना ! केव्हापासून वाजतोय तो.’
शरदच्या वाक्यासरशी ती मनात दाटलेल्या विचारांच्या गुंत्यातून एकदम बाहेर आली. तिने मोबाईल पाहिला असता शंतनूचे चार मिसकॉल दिसले म्हणजे ती इतकी विचारांमध्ये गढून गेली होती, की चार वेळा फोन येवूनही तिने उचलला नव्हता. बापरे ! तिला काहीच कळेना. आज ती तिच्या कॉलेजमधील मित्राला म्हणजेच शंतनूला भेटायला जाणार होती. कॉलेज जीवन संपून आता चांगली तीन-चार वर्षे झाली होती. कॉलेजमध्ये असताना कंसातले म्हणजे मनाच्या खास कप्यातले म्हणून जे मित्र असतात. त्यापैकी एक महणजे एकच होता. तो म्हणजे शंतनु. शांत अन् सरळ स्वभावाचा, दिसण्यातला रुबाब पहाता तो खूप जणांना सहजच आवडे. त्याचे केस मध्यम लांबीचे सरळ, चेहऱ्यावरील निरागसता नुकतेच तारुण्यात पदार्पण केल्याच्या खुणा म्हणजेच अगदी बारीक असे वाढलेले मिशी अन् दाढीचे केस त्याला पाहिलं की मन फुलपाखराप्रमाणे मुक्त वावर करत असे. त्याच्या आसपास असण्याचीही तिला समाधान वाटेल. महाविद्यालयीन जीवनाचा सहआनंद ते घेत होते. अभ्यासात तो एकदम हुशार पण दिखावूपणा जराही नाही. प्रत्येकाला मदत करण्याची वृत्ती, खिलाडूवृत्ती. यामुळे शंतनू तिला आवडत असे. जरी तो मित्र होता. तरी पण प्रेमाचा एक कटाक्ष या पुढे आणि यापलीकडे कधीच ते दोघेही गेलेच नाहीत. मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात तो पण असे, तशी ती पण असे. वेगळं कधी भेटावे, बोलावे. आपलं एक विश्व असाव असं तिला वाटे. पण तो बोलत नाही मग त्याच्या मनात नक्की काय चाललंय ते कसे कळणार. म्हणून तीही गप्पच राही.
सगळा विचार करत करतच ती आवरून घरातून बाहेर पडली. त्याला फोन लावला होता पण तो व्यस्त लागत होता. आता परत त्याचा फोन आला. तो वाट पाहून पुढे एक काम करण्यासाठी गेला होता. ठरलेल्या ठिकाणी येवून थांब असे सांगून त्याने फोन ठेवला. त्याचं बोलणं पूर्वीसारखंच होतं. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या फेसबुकवर एका वर्ग मैत्रिणीचे प्रोफाइल पहाताना तिच्या मित्र-मैत्रिणींच्या यादीत याचं नाव दिसलं. तिला आकाश ठेंगणे वाटू लागलं. तीचा आनंद ती शब्दात व्यक्त करू शकत नव्हती, त्याचा फोही पाहिला आणि जुन्या आठवणींनी मनात फेर धरला. मनातल्या विचारांचं वावटळ, तिच्या नयनांतून अश्रूंच्या रुपाने बाहेर पडू लागलं. तिला दुःख आणि आनंद अशा दोन्ही भावना मनात एकत्रितच दाटून आल्या. आपण यापूर्वी फेसबुक वर शोधल्यावर का नाही सापडला हा खरं. तो आज भेटल्यावर राहून गेलेल्या बऱ्याच गोष्टी ती सांगणार होती. आपले मन हळुवारपणे त्याच्या पुढयात उघडून दाखवणार होती. आपलं काॅलेज सुरू असताना आपल्याकडे फोन नव्हता. जर असता तर कदाचित…. शंतनूने सांगितलेल्या ठिकाणी ती पोहोचली. पहिल्या इतकाच तो तिला रुबाबदार वाटला. पण कसली तरी काळजी चिंता चेहऱ्यावर जाणवत होती. कॉलेजच्या शेवटचे दोन दिवस तो गायब होता. त्यानंतर तो आजच भेटला. त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या बाबांना अचानक पॅरेलिसीस अटॅक आल्याने तो अचानक दवाखान्यासाठी पुण्याला निघून गेला. दवाखाना आणि धावपळ या साऱ्यात तीन-चार महिने निघून गेले. वडिलांची नौकरी गेली. शेवटी उपलब्ध भांडवलामध्ये त्याने कपड्यांचे दुकान टाकले. आता सध्या चांगले चालले होते. तो एखादया कंपनीत नौकरी करावी या विचाराने पुण्यात राहिला. पण वडिलांची देखभाल आणि आईला मदत यासाठी एक बाई आणि एक पुरुष कामाला ठेवला. पण ठेवलेल्या माणसांकडून प्रामाणिकपणे काम करतील अशी अपेक्षा करावी असा जमानाच राहिला नाही सध्या. आईला वडिलांचे पहायचे म्हणजे ओढाताण होवू लागली. शेवटी कंपनीतील नौकरी सोडून तो आई-वडिलांसाठी पंढरपूरला म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी रहायला आला. बरेच दिवस काय करावे याचा विचार करून
विचाराअंती त्याने दुकान टाकण्याचा निर्णय घेतला. त्याला बी. सी. एस झाल्यावर पुढे आणखी शिकायचे होते. पण प्राप्त परिस्थितीचा स्विकार करण्याशिवाय दुसरा मार्ग त्याच्यापुढे नव्हताच. त्याला सायलीची बऱ्याच वेळा आठवण झाली. पण त्याच्या घरातील कर्तव्य पुर्ततेत तो तिला भेटू शकला नाही. एक दोन वेळा चौकशी केली पण सायली शिकण्यासाठी तिच्या मावशीकडे नागपूर गेली, एवढंच तिच्या मैत्रीणीकडून कळले. त्याने अधून मधून मित्र- मैत्रीणींकडून तिच्याविषयी माहिती घेण्याच प्रयत्न केला पण व्यर्थ. पण का कुणास ठाऊक एक ना एक दिवस ती आपल्याला भेटणारच याची मात्र खात्री आणि विश्वास त्याला होता. सायलीनेही त्याच्या मित्रांना एक -दोनदा विचारले. पण नागपूरला गेल्यावर विषयच संपला. तिचे मन मात्र शंतनूच्या नावाचा जप करत होते. शिक्षण संपवून ती नौकरीला लागली. लग्नाच्या विषयापासून ती लांबच राही. सध्या ती तिच्या मावसबहिनीच्या लग्नासाठी पुन्हा पंढरपूरला आली अन् तिची शंतनूशी गाठ पडली. दोघांनी आपापल्या घरच्यांपुढे आपली मतं मांडली. शंतनूच्या घरात शंतनू इतके दिवस लग्नाला नकार का देत होता ते लक्षात आले. तसेच सायलीच्या घरातल्यांच्याही लक्षात आले. दोघांच्या घरच्यांची बऱ्याच विचार, वाद प्रतिवाद यानंतर परवानगी मिळाली. आयुष्यात शंतनूने बरेच कर्तव्य पालन केले. आता मात्र त्याने लग्नाविषयी ठाम मत मांडले होते. अन् शंतनूचे दोनाचे चार हात झाले.
‘शंतनू, शंतनू’
सायली त्याला लग्नमंडपात हलवतच बोलली. तसा तो म्हणाला, ‘भगवान के दरबार में देर है पर अंधेर नहीं।’
त्याच्या या वाक्यावर दोघंही खळखळून हसले.