
मी आज बाजारात नाही नाही म्हणत म्हणत तूफान खरेदी केली. पियू आणि समीर दोघांच्याही शाळेला सुट्टया लागल्या होत्या. समीर मित्रांसोबत किल्ला बनवत होता. किल्ला बनवताना ही मुले खूप विचारपूर्वक त्यांची बांधणी करत होते. किल्ल्यातून चोर वाटा, किल्ल्याच्या तटावर जादा संरक्षणासाठी वेगळी योजना आणि किल्ल्याच्या बाहेरील भिंतीलगत खंदक, या खंदकात पाणी, पाण्यात मगरी, खंदकावर आभासी पूल जो किल्ल्यातूनच हलवता येतो. शत्रू असेल तर त्याला पाण्यात मगरीचं भक्ष्य बनवले जाण्याची योजना. खरंच ही छोटी छोटी मुलं किती आवडीने किल्ला बांधणी करत होते, पियूला जसं सुट्टी लागली. तस बाईसाहेब टि. ही. पाहणे. तो बंद केला की मोबाईल असंच करत होत्या. शाळा सुरू होती. तोपर्यंत सुट्टीत काय करायचं हे ठरवण्यासाठी फोनवर मैत्रिणीशी बऱ्याच वेळ गप्पा चालत पण सुट्टी सुरु झाली तसं यांचा छंदच बदलला. आज काय या नायकाचे सिनेमे पाहू, उद्या वेगळ्या नायिकेचे. सुटीत अभ्यास करा, असे घरात जो कोणी सांगेल तो यांचा शत्रूच जणू. परवा मी म्हणाले
‘पियू, चल थोड्यावेळ अभ्यास कर’
तसं ती लगेच म्हणाली,
‘काय गं आई शाळा सुरु असतानाही तेच आणि आता ही तेच. जरा तरी जीवाला आराम घेवू दे.’
तिचं असं मोठ्या माणसासारखं बोलणं ऐकून मला तर रागचं आला. मला एवढ्यात सासूबाई म्हणाल्याच,
‘अगं सुट्टी लागून एकतर दिवस झाला. जरा तिला निवांत राहू दे, सारखं अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. अभ्यासाच्या ओझ्याने भावना अन् दप्तराच्या ओझ्याने उंची खुंटुन जाईल. तिला जरा मोकळा श्वास घेवू दया.’
सुमती बाई म्हणजे माझ्या सासूबाईच बोलल्या.’
मी काय मुलांचा शत्रू आहे का? पण त्या मुलांपुढे या असं काही बोलल्या म्हणजे मुलांनाना तर त्या आपली काळजी घेतात. आपल्याच हिताचे निर्णय घेतात असे वाटत असते. पण मला कुणाला काय वाटते किंवा लोक काय म्हणतील असल्या चिंता कधी सतावत नाहीत मी माझे निर्णय विचारपूर्वक आणि हिमतीने घेते. आता आजही दीपावलीसाठी खरेदी करण्यासाठी मी बाजारात आले असताना मी माझ्या कामवालीच्या मुलांनाही माझ्या लेकरांचे कपडे जिथे घेतले. तिथेच आणि तेवढ्याच किमतीचे घेतले. सासूबाईंनी सांगितले म्हणून मातीच्या पणत्या पहाणं सुरू होतं. खरंतर मी भाजीला, हार आणायला, कपडे आणायला किंवा इतरत्र घराबाहेर गेल्यावर शक्यतो व्यापा-यांपेक्षा गरजूंकडून खरेदी करते आजही मी सामानाच्या पिशव्या सावरत असतानाच एका पणती विकायला बसलेल्या आजी नातीकडे माझं लक्ष गेलं. चौथीच्या वयाची ती मुलगी आजीला चांगलीच मदत करत होती. गिर्हाईकाकडून पैसे घ्यायचे. ते आज्जीला दयायचे. पणती व्यवस्थित पाहून, सांगितलेल्या प्रमाणात दयायची जबाबदारी नातीचीचं. मी सहजच विचारले,
‘बाळा, कितीला दिल्या पणत्या?’
तिने मला तिच्याकडे विविध प्रकारच्या असलेल्या पणत्या दाखवल्या, किंमत सांगितली आणि सहा किंवा आठ घेण्यापेक्षा जर दोन डझन घेतल्या तर स्वस्त देवू असंही सांगितले. मी तिची हुशारी पहात होते. खरंच एवढीशी चिमुकली, किती हुशार होती. ती चौथीत शिकतेय हेही तिच्या कडूनच कळलं ती तिच्या आजीकडे रहात असून आई बाबा नसल्याचंही कळालं. आजी आणि ती वेगवेगळ्या वस्तू सणवाराप्रमाणे विकत. त्यामुळे तिच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा उभारत तर होताच पण सोबत तिने शेजारी रांगोळी विकायला बसलेली एक वृद्ध आजी दाखवली. आम्ही या आजींनाही मदत करतो. अस तिनं सांगितलं, कारण या आजींना त्यांच्या घरच्या लोकांनी इथं देवाला जाऊ म्हणून दर्शनासाठी आणून सोडून दिलं. आजीला मागचं तसे आठवत नव्हतं किंवा कदाचित मनाला त्रास नको म्हणून त्या आठवतंच नाही, असं दाखवत होत्या. त्याही या दोघींबरोबरच रहात होत्या. मला त्या आजी-नातीचं खूप कौतुक वाटलं, कारण मी या मुलीकडून जास्त पणत्या घेताना किंमत कमी करून मागत होते, जास्त पणत्या घेवून मी तिच्यावर उपकार करतेय अशीही भावना माझ्या मनात होतीच, पण त्या मूलीचे उदार आचरण आणि विचार खूपच भावणारे आणि प्रसन्न करणारे होते. स्वतःकडे असणारे पोटभरल्यावर इतरांना देतातच, पण स्वतःच्या पोटापेक्षा आधी दुसऱ्याचा विचार करणारे खरे महान असतात. म्हणजे माझं पण त्या तिचा विचार करत करतच मी माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी तिच्याकडूनच आहे त्या किमतीत पणत्या घेतल्या. तिचा आदर्श घेत आपणही थोडंस पुण्यकर्मात सहभागी झालो तर मनाला थोडंस समाधान. दीपावली दिवशी जेव्हा मी घरा-दारात पणत्या लावल्या. तेव्हा घरात प्रज्वलित झालेल्या दिव्यांनी मन आणि घराचा परिसर उजळून टाकला. खरंच इतरांचा विचार करणं हे जर साऱ्यांना जमलं तर विश्वची माझे घर ही संकल्पना सर्वांनी आचरणात आणली असं होईल.